महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,747

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४६

By Discover Maharashtra Views: 2559 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४६…

संभाजीराजांना नजराणा देऊन दिपवून टाकण्यासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली

पेहरावाची तबके घेऊन काही रजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिऱ्यांची मोठी पिंपळपाने हातात धरून अब्दगिरे खडे होते. एका बाजूला शिंगे, तुताऱ्या, नगारे यांचा शहाजणांचा ताफा उभा होता. तळावरचा तमाम हशमलोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता.

ज्येष्ठ वद्य द्रितीयेचा दिवस कासराभर वर आला होता; पण पावसाळी कुंदपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियान्यातून मिर्झा राजा जयसिंग संभाजीराजांच्यासह बाहेर आला. रजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवाकंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरलेले गर्द निळे जरीकाठाचे उपरणे होते. पाचू मढविलेला, मागे झुकलेला, झुरझुरत्या सफेद पिसांचा तुर्रबाज किमॉश त्याने मस्तकी चढविला होता. गळ्यात मोत्याचे कंठे आणि हिरवे पदक होते. संभाजीराजांनी जरीकोयऱ्यांच्या नकसकामाचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माटाचाच, पिछाडीला ठेवणारा केसरी टोप त्यांनी मस्तकी

चढविला होता. कमरेला गर्द जांभळा जरीशेला आवळला होता. चुणीदार मांडचोळण्याखाली पायात भगवे चढाव होते. मोत्याच्या कंठ्याबरोबर छातीवर कवड्यांची दुपेडी माळ आणि कपाळी दोनदळी शिवगंध होते. सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांतमंगल गाभाऱ्यातून समईचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा, तसे ते दिसत होते!

मिर्झा राजे संभाजीराजांच्यासह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कातऱ्या ललकाऱ्या शहरात उठल्या. शहाजणे वाजू लागली. आघाडीच्या खाशा स्वाऱ्यांमागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, किरतसिंग, रायसिंह राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंग हाडा, महमद तर्खान, तुर्कताझखान अशी मंडळी अदबीत चालली. मिर्झा राजाने संभाजीराजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वत: बैठक घेतली आणि किरतसिंग व उदयराज मुन्शी यांच्याकडे इशारतीची नजर दिली.

नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला, एक-एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातांतील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा

दस्तुरी-स्पर्श घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्यासमोर धरू लागला. संभाजीराजे नजराणा आपला केल्याचे दस्तुरी-स्पर्श देऊ लागले.

एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले – “किरत!”

“जी,” म्हणत किरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवबली. एका घोड्याच्या पाठीवर चलाख झेप घेऊन किरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले.

काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती! भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजींचे तरबेज पट्टेबाज

धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले!

सगळ्यांचे डोळे किरतसिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामेट्याच्या, घाणेरीच्या, करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत तीस एक

स्वारांची घोडे-तुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला दोन उमदे घोडे खूर फेकत दौडत होते. ते स्वार होते किरतसिंग आणि पठाणांचा लष्करे सालार साक्षात

दिलेरखान!

ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेरखानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उठली. मांड मोडून दिलेरखान, सगळ्या तळावर क्षणात

सरसरती नजर फिरवीत पायउतार झाला. खांद्यावरच्या हिरव्याकंच फुगीर खरिल्लतीमुळे तो केवढातरी धिप्पाड दिसत होता.

मिर्झा राजासमोर येऊन त्याला तसलीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात उडवीत, मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, “गडपर रसद चढानी है। ऊपर दानातक पीछे नहीं छोडा है, काफर मरहट्रोंने। ”

त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, “आइये खाॉँसाब।”

संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखीत होते. त्याच्या भुवया जाड होत्या खांद्याच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसबिल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते

सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याच्या कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट, निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमॉशात पाचूचे हिरवे पान मढविले होते.

मिर्झा राजाने दिलेरखानाचा संभाजीरांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेरनजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेरखान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी-स्पर्श दिले.

चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे दोन खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते.

किरतसिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीराजांना म्हणाला, “और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहोत पसंद करोगे कुँबर।” संभाजीराजांच्या भुवया, ते ऐकून वर चढल्या. दिलेरखानालाही मिर्झाच्या तोहफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुप्याचा

नकसदार हौदा चढवून, झूल घालून सजविण्यात आला होता. किरतसिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फीलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, “ये शाही फीलखानेका हाथी “अन्वर’ शहेनशाहने आपको नजर किया है, कंवर संभू। आप दरबारके सबसे पहले कम उम्र पंचहजारी सरदार हो।”

फीलवानाने एकसारखा अंकुश टोचून “चल बेटे “’अन्वर’ सलामी दे!” अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसविला. बसल्या

अन्वरने रणशिंगासारखी बाकदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठ खडा होऊन सोंड झुलवीत, कान फडफडवीत डुलत उभा राहिला.

ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवरून उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी

त्यांनी त्यांच्या कानात सांगितले.

“जी,” म्हणत नेताजींनी पगडी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या फीलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंढी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली.

ती पेंढी घेऊन धिम्या चालीने संभाजीराजे झुलत्या अन्वर जवळ आले. हातातील पेंढी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली. अन्वरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंढीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फीलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता सोंडेत धरलेल्या पेंढीचा कट झटके देऊन हत्तीने उस्कटला ब गवत सोंडेने झटकून साफ केले आणि आख्ख्या पेंढीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला.

चौथऱ्याभोवतीचे सारे असामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेरखान ते बघताना खूश झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्याबोलण्यावर, अदब रिवाजावर खूश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला,

“हाथी पसंद आया कुंवर संभूराजे?”

त्याच्याकडे आणि दिलेरखानाकडे एक नजर आलटून-पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, “ते बिचारे मूक जनावर! कोणासही पसंत येईल. कितीही झाले तरी ते पेंढीचे गुरू!”

मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही; आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता! तो त्याला कधीच वळला नसता!

एवढा वेळ “काफर सेवाच्या’ बन्चाचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेरखानाला संभाजीराजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमॉशाकडे

चढवीत त्याने खोचकपणे, झुलत्या अन्वरकडे हात उठवून विचारले, “इतना बडा शाही हाथी कैसे उठाके ले जावोगे संबूराजे?” दिलेरचे पठाणी डोळे लकलकले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानीमाळेवर चढला. तरतरीत, बाकदार नाकशेंड्याची, शिवर्पिडीसारखी दिसणारी आपल्या महाराजसाहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यांत आपली मावळी, बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याने टोल पडावेत तशा ठणठणीत, कणीदार बोलात बोलले, “डुलत-झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते! ते नेणे सोपे आहे! पण – पण आमच्या महाराजसाहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत!! ते नेणे कठीण आहे!”

तो जाब ऐकून मिर्झा-दिलेर दोघेही थरारले

“येतो आम्ही दादाजी,” म्हणत अन्वरच्या माहुताच्या रोखानं रिवाजी मोहराजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीराबांना पुढे ठेवून शामियान्याच्या रोखाने चालूही लागले. डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठांतून शब्द निसटले, “माशाल्ला! क्‍या तेज जुबॉँ हे! इसकी उमर क्या होगी?”

कऱ्हेपठारवर मावळचा पाऊसकळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाट कऱ्हेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुणग्यांनी गवताळू छपऱ्या उठविल्या. त्यात फुटल्या

आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर राहुट्याच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळांबलेले पाणथेंब वाऱ्याची सुंकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले.

मिर्झा राजे जयसिंग आणि निकोलो मनुची हा गोरा साहेब रजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते! शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते मिर्झा आणि गोरा साहेब शतरंजात रमून गेले होते. कुणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्‍क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी-काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते

त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, “क्‍या सोच रहे हो, कुंवर? खेलोगे चार हाथ?”

पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, “नाही!”

क्यों? राजासाब तो अच्छे लडाते है शतरंज! सिखाया नहीं आपको ये खेल?” मिर्झा आडवा आला!

“आम्हास हा खेळ नाही आवडत. तो अपुरा आहे.” मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते.

“वो कैसे?” मिर्झाचा कपाळ-टिळा वर चढला

“या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी, वजीर आहेत, राजा आहे पण – पण कुठंच राजाचा फर्जंद नाही! त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे!!”

मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्‍्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली! तो संभाजीराजांकडे बघत कुणालाही कळणार नाही असे

पुटपुटला – “ये दिमाग है, या दौडता घोडा!”

हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात; संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता!!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४६…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment