धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४८…
जगदंबेसमोर एका हारीत पूजलेल्या हत्यारावरील आपली ग्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात
हात चढवून त्या जमदाडीचे पाते सर्रकन बाहेर खेचले. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यांत भरून घेतली. आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊसाहेंबांना एकदा नजर
दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले. मान
नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सर्रकन ओढला! अंगठ्यावर रक्ताचे कोंभ तरारत उठले होते! रक्तमंडित आपला राजअंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या मिया सतचया गच्या मस्तकावर संभाजीराजाच्या उष्ण रक्ताचे दोन थेंब स्थिरावले. “नवरात्रा’त पूजलेले आपले हत्यार त्यांनी “पाजून’ घेतले! मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला! हातातील पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्यांच्या त्या रुद्रमंगल क्षात्ररूपाकडे बघताच जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले.
“चला.” संभाजीराजांच्या पाठवळीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसराचौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसराचौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्यांभोवतीचा “’सोनआखाडा’ खाशा स्वारीने आपल्या हत्याराने फोडायचा होता. तो पिढ्यान्पिढ्यांचा चालत आलेला रिवाज होता. दिवस
सणाचा होता – आणि सण मानाचा होता. आजवर खुद्द राजेच दसऱ्याचा ‘सोनआखाडा’ आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवीकंच निबर पाने झालेली आहेत, असे राजांना खोलवर जाणवत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना ‘आखाडा’ फोडण्याची आज्ञा दिली होती.
किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजे आणि जिजाऊसाहेब राजांच्या महाली आले.
मासाहेबांना महालात प्रवेशताना बघून राजांच्यासह साऱ्यांनी मुजरे कयी राजांचा चेहरा शांत होता, पण नजर दुखरी होती. ती बघताच जिजाऊ काळजात कुठे खोलवर गलबलल्या. समोर उभे असलेले जबानबंद राजे, पानांची लूट झालेल्या आपट्याच्या झाडासारखे दिसत होते.
“बाळराजे आलेत तुमच्या दर्शनासाठी.” स्वत:ला सावरीत जिजाऊ धिमेपणाने म्हणाल्या. त्या नेहमीच अशा बोलत आल्या होत्या. वणवा असला तरी ओठांत मधुर गारवा ठेवत. संभाजीराजांच्या डोळ्यांत खोल बघत त्यांचा ठाव घेण्यासाठी राजांनी घोगरट सादात विचारले, “सारा रिवाज नीट ध्यानी घेतलात?”
“जी.” संभाजीराजांच्या टोपावरचा कोंब-तुरा डुलला.
🔊 “कसा फोडाल आखाडा?”
▶ संभाजीराजांच्या डोळ्यांतले रंग पालटू लागले. समोर माणसांनी भरलेला दसराचौक त्यांना दिसू लागला! त्यांची जबान, लोहारमेटावर पाठीवर घण खाणारे तेगीचे लाल पाते लखलखीत ठिणग्या फेकते तशी ठिणग्या उठवू लागली! नजर आपल्या आबासाहेबांच्या बाकदार, धारी नाकाच्या शेंड्यावर ठेवून संभाजीराजे म्हणाले,
“संजीवनी माचीवर दसराचौकात चिवाट्यांचा आखबंद चौक मांडलेला आहे. त्या चौकआखाड्यात सोन्याच्या डहाळ्या आहेत. माचीच्या शिवेवर आपट्याचं झाड आहे.
त्याच्या बुंध्याजवळ नवरात्रात पूजलेली, घोंगड्यात बांधलेली हत्यारं आहेत. माचीचे तटसरनौबत ती हत्यारं दसराचौकत आणतील. आमच्या समोर पेश करतील. आम्ही त्या घोंगड्यास हाताचा दस्तुरी-स्पर्श करू. हत्याराचं घोंगडं चौकातील डहाळ्यांवर ठेवण्यात आलं की, सरनौबत मानकरी म्हणून आम्हास चौक फोडण्याची अर्जी करतील. आम्ही आखाड्याजवळ जाऊ. बेलगंध वाहून आखाड्याची पूजा बांधू. आमच्या जमदाडीचे पाते म्यानखेच करू. ते कपाळी लावून आई भवानीचे नाव घेऊन हत्याराच्या एका बारात चिवाट्यांचा चौक चीत करू. हत्याराचं पातं मागं न घेता, तसंच सामने चालवून चौकातल्या सोन्याच्या डहाळ्यांना भिडवू. सोनं उष्टं करू! मग सारा गडलोक आखाड्यावर तुटून पडेल. सोनंलूट होईल!”
हे सांगत असताना संभाजीराजांची उजळलेली चर्चा पाहून राजांच्या छातीवरचा जामा अभिमानाने काखेजवळ दाटून आला!
राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. मासाहेबांनीच आपल्या बाळराजांना रिवाजाचा हा बयाजवार करीणा समजून दिला होता.
“आखाडा फोडणाऱ्या असामीत ज्यांच्या हाती पूजलेल्या हत्यारांतील हत्यार मिळेल त्यांची नावनिशी वाजपूज करा. त्यांना मानाची कडी, मोहरा बहाल करा. या.” राजांनी शेवटचा – महत्त्वाचा रिवाज संभाजीराजांच्या कानी घातला.
राजांची पायधूळ ब आशीर्वाद घेऊन संभाजीराजे महालातून बाहेर पडले. जरीनक्षींचे जाकीट घातलेला एक पठाणी हेजीब दोन हशमांना संगतीला घेऊन पाली दरवाजाने गड चढून आला होता. संजीवनी माचीवरच्या दसऱ्याच्या गलगलाटाकडे नफरतीने बघत राजांच्यासाठी आणलेला खलिता त्याने बालेकिल्ल्यावर रवाना केला
होता. बाळाजी चिटणिसांनी तो खलिता स्वीकारून राजांच्यासमोर दस्तुरी-स्पर्शासाठी अदबीने धरला. राजांनी त्याला स्पर्श करून खलिता वाचवण्याची आज्ञा केली.
▶बाळाजी खलिता वाचू लागले –
“तुम्हास जाहीर करण्यास संतोष वाटतो की, आम्ही अर्जी केल्याप्रमाणे तुमच्या वफादारीचा बादशहा सलामतनी स्वीकार केला आहे. इतकेच नाही, तर हप्त हजारी
मन्सब, दोन लाख रुपये बक्षीस आणि निशाण-नौबत घेण्याची परवानगी तुमचे फर्जद संभाजीराजे यांना देण्याचा दुकूम लाद बादशहा सलामतनी रजामंद होऊन सोडला आहे. सबब हे पत्र पावताच फर्जंद संभाजीराजांना इकडे ताबडतोब पाठवून द्यावे. म्हणजे हुकुमाप्रमाणे त्यांना या चीजवस्तू बक्ष करण्यात येतील….”
बाळाजींनी वाचन पुरे केले. पुरंदरवरून दिलेरखान पठाणाने ते पत्र पाठविले होते. दसऱ्याचा मुहूर्त धरून त्याने आपला खास हेजीब राजांच्याकडे पाठविला होता
संभाजीराजांना मोगली मनसब दिल्याचे “शाही फर्मान’ औरंगजेबाने दिल्लीहून जातीनिशी सांडणीस्वाराकडून पाठविले होते. ते फर्मान मिर्झा राजाच्या गोटाजवळ आले
होते. जातीनिशी सामोरे जाऊन संभाजीराजांनी ते स्वीकारायला पाहिजे होते.
बाळाजींनी वाचून थैलीबंद केलेल्या पत्राकडे बघताना राजे कसल्यातरी विचारात गढून गेले. त्यांनी बाळाजींच्याकडून पत्र आपल्या हाती घेतले. थैलीतून पत्राची वळी बाहेर
काढली. ती उलगडून पत्रावरून एक धावती नजर फिरविली. दिलेरच्या पत्रात कुठे चुकूनसुद्धा राजांच्यासाठी अदबीचा-आदराचा शब्दही दिसत नव्हता! राजांनी एक
उतरता नि:श्वास सोडला, पत्र पुन्हा थैलीबंद केले. इतक्यात जातीनिशी आखाडा फोडून आणलेले विजयादशमीचे सोने राजांना देण्यासाठी संभाजीराजांनी महालात प्रवेश केला
आणि पुढे होत संभाजीराजांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले.
राजांच्या ओंजळीत लुटीचे सोने देताना संभाजीराजे म्हणाले, “महाराजसाहेब, आम्ही बयाजवार, बिलाकसूर आखाडा फोडला! एका वारात चौक चीत केला.”
राजांच्या हातातील दिलेरच्या पत्रथैलीवरच संभाजीराजांचे सोने होते! एकदा आपल्या ओंजळीकडे आणि एकदा समोरच्या आपल्या पुत्राकडे राजांनी बघितले.
राजे विचारांच्या तंद्रीतच होते.
“तुम्ही आखाडा फोडून सोने बाहेर काढलंत. आम्ही मात्र आमच्या हातानं आमचं सोनपान आखाड्यात लोटलं आहे! कधी-कधी माणसाला अंदाज नसलेल्या सीमाही
उल्लंघाव्या लागतात. जगरहाटीवेगळं सीमोल्लंघन करावं लागतं. धुमसणाऱ्या दिलेरनं अचूक वेळ साधली, बाळराजे. हत्यारानं सोनं उष्टं केलंत – तसंच या मुहूर्तावर
अक्कलहुशारीनं राजकारण उष्टं करा. आई जगदंबा त्यासाठी तुम्हाला आपल्या वाघाचं बळ देईल!” राजांनी ओंजळीतील सोनपाने आणि थैली तशीच बाळाजी आवजींच्या हाती दिली. आणि आपल्या हाताच्या बोटातील अंगठी उतरून संभाजीराजांच्या ओंजळीत ठेवली!!
▶ दसऱ्याची सोनपाने सुकलीसद्धा नाहीत, तोच संभाजीराजांना पुन्हा राजगड सोडावा लागला. शाही फर्मान स्वीकारण्यासाठी!
राजांचा आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे रजपुतांच्या गोटाजवळ आले. सोबतीला दावलजी घाटगे, नेताजीराव, गंगाधरपंत आणि विश्वासू मंडळी होती.
किरतसिंगाने सामोरे येत त्यांची आगवानी केली. “आइये संभूराजे,” म्हणत मिर्झा राजाने पुढे येत त्यांचा हात हातात घेऊन स्वागत केले. मिर्झाचा गौरवर्णी चेहरा उजळून गेला होता. दख्खनेत कुणाला नाही अशी फत्ते त्याला मिळत होती.
मिर्झाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसवून घेतले. शामियान्यात असलेल्या बक्षी जानी बेग आणि तेजसिंह कळवाह यांचा परिचय करून दिला. राजांच्या तब्येतीची, राजकारणी रिवाज म्हणून विचारपूस केली. मोठ्या समाधानाने मिर्झाने हुक््क्याची नळी हाती घेऊन क्षणभर हुक्का चूस केला; आणि बक्षी जानी बेगकडे बघत
म्हणाला, “बक्षी, फर्मान अपनानेका रस्मोरिवाज कुंवर संभूजीको समझा देना। कुसूर मत करना।?
बक्षी बेगने झटकन वाकून मिर्झाला तसलीम केली. “जी हुक्म राणाजी!” म्हणत त्याने संभाजीराजांना निरखले. त्याला जाणवले की, एवढ्या कमती उमरीचा दिल्ली
दरबारात एकही सरदार नव्हता व अदब राखून फर्मान स्वीकारण्याची ‘शाही पद्धत ‘ त्याला समजावून सांगणे बक्षी बेगला अवघड वाटले.
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४८…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव