धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४९…
थंडीचे दिवस असल्यामुळे गव्हाच्या गरम कांजीचे बदाम, पिस्ते सोडलेले कटोरे घेऊन एक खिदमतगार आत आला. मिर्झा राजासमोर कटोऱ्याचे तबक चौरंगावर ठेवून निघून गेला. मिर्झाने दोन कटोरे उचलले. त्यातील कांजी एकमेकांत ओतून पुन्हा कटोरे सारख्या शिगेचे केले. गरम वाफा वर उफाळल्या. त्यातील एक कटोरा संभाजीराजांच्या हाती देत मिर्झा म्हणाला, “लीजिये छोटे राजासाब।” संभाजीराजांनी कटोरा हाती घेतला. गरम कांजीचा एक सुखावह घुटका घेत मिर्झा राजा म्हणाला, “छोटे राजासाब, इस बक्षीके डेरेमें जाना। रिवाजकी हर बात ध्यान देकर सुनना। फर्मान अदबसे अपनाना। समझदार हो। सब ठीक होगा।”
कांजीचा घुटका घ्यावा म्हणून संभाजीराजांनी कटोर ओठाला लावला होता. पण त्याचा चटका बसल्यामुळे त्यांनी तो तसाच झटकन खाली घेतला! हातांतील कटोऱ्याकडे बघताना त्यांना आपल्या आबासाहेबांची आठवण झाली. त्यांनीही रिवाज सांगितला होता, दसऱ्याच्या आखाड्याचा. कडी-मोहरा बहाल करण्याचा. मिर्झाही रिवाज सांगत होता, ‘अदब राखण्याचा! ‘
“ठुंडी होने दीजिये।” मिर्झा संभाजीराजांच्या कटोऱ्याकडे बघत, पुढे झुकून म्हणाला. मान उठवून त्याच्या डोळ्यांत क्षणभर रोखून बघताना संभाजीराजांना होळीच्या पेटत्या हुडव्यात बेधडक हात घालणारे, सोन्याच्या आखाड्यावर तुटून पडणारे आपले मावळे आठवले. त्यांचे अंग सरसरून आले. मिर्झावरचे डोळे तसेच ठेवून त्यांनी हातीचा कटोरा वर उठवून ओठाला लावला. कपाळावरचे शिवगंध जराही न ढळविता. पापणी न मोडता त्यांनी कटोऱ्यातील गरम कांजी घटाघटा पिऊन टाकली! ताणल्या भुवयांनी त्यांच्याकडे बघत मिर्झाने आपल्या हातीचा कटोरा तसाच ठेवला. त्याच्या राजपुतानी मनात एक विचित्र विचार तरळून गेला. त्याला शिवाजीराजे समोर असताना धगधगीत अंगार वाटले होते. त्यांचा हा फर्जद त्या अंगाराच्या जवळपासचा वाटत होता. पण कसा ते मात्र मिर्झाला नीट उमजेना. त्याच्या केशरी टिळ्याला कपाळभर आठ्या पडल्या. सोपे होते, पण मिर्झाला सापडले नव्हते. राजे धगधगीत अंगारासारखेच होते! न विझता अंगभर पेटणारे. त्यांचे फर्जंद संभाजीराजे त्या अंगाराचाच अंश होते. अंगाराने फेकलेल्या धगीच्या लोळासारखे! न चुकता चटका देणारे!
“बक्षी, छोटे राजासाबको अदबसे ले जाना अपने डेरेमे,” मिर्झाने स्वतःला सावरीत जानी बेगला फर्मावले.
“जी हुजूर।” किरतसिंगाने डोईवरचा साफा डोलविला.
“जाईये संभूराजे।” मिर्झा राजाने संभाजीराजांना सुचविले.
बक्षी जानी बेग आणि किरतसिंग यांच्यामागून नेताजींच्यासह संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियान्यातून बाहेर पडले. त्यांच्या समोर किल्ले पुरंदर दिसत होता. कानांत नेताजींचे बोल घुमत होते – “जिथं मानूस उपाजतं ती जागा साद घालती मानसाला!” त्यांना वाटत होते, दहादा कमरेत वाकून तसलीम करणारा हा कोरल्या दाढीचा बक्षी बेग, पिळल्या दाढीला पुन:पुन्हा पीळ देणारा हा किरतसिंग या संगळ्यांना इथेच सोडावे आणि थेट किल्ले पुरंदरची चढण चढून त्याचा माथा गाठावा! एकट्याने आणि पायी!
बक्षी बेगच्या छोट्या माटाचा, चांद-ताऱ्याचा डेरा आला. त्याचे पठाणी पहारेकरी हातातील हत्यारे कपाळाला लावीत कमरेत वाकले. बक्षी बेग, किरतसिंग यांच्या मागून संभाजीराजे आणि नेताजी त्या चाँद-ताऱ्याच्या डेऱ्यात शिरले! कुणाची नियती कुणाला कसल्या अभद्र दरवाजात केव्हा उभे करील, ते सांगता येत नाही! किरतसिंगाने संभाजीराजांना आपल्या बैठकीवर बसविले. नेताजीराव त्यांच्यासमोर सावध नजरेने उभे राहिले. पढविलेल्या पोपटासारखा बक्षी बेग फर्मानचे रिवाज सांगू लागला. हे असले काही संभाजीराजांनी कधीच ऐकले नव्हते. दिल्लीहून ‘मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब अलमगीर पादशहा गाजीचे’ त्यांना पंचहजारी सरदार करणारे शाही फर्मान सुटले होते! त्या फर्मानावर ‘फर्मानी निशानी’ म्हणून औरंगजेबाच्या खाशा हाताच्या पंजाचा, मेंदीच्या रसात बुडविलेला ठसा होता. फर्मानाचा सांडणीस्वार मजला मागे टाकीत, औरंगाबादमार्गे कऱ्हेपठाराजवळ मिर्झाच्या तळापासून एका मजलेवर येऊन थांबला होता. मिर्झाने आपल्या तळाच्या उत्तरेच्या बाजूला त्या फर्मानासाठी “फर्मानबाडी’ उभी केली होती. ज्यात उभा उंट सहज मावू शकेल, असा चौकोनी आकाराचा उंच शामियाना ‘फर्मानासाठी’ खडा करण्यात आला होता!
फर्मान घेऊन येणारा सांडणीस्वार आपला उंट थेट शामियान्यात आणून खडा करणार होता. ज्याने फर्मान स्वीकारायचे त्या दरबारच्या कदीम चाकराने पाठ न दाखविता त्या उंटासमोर पेश व्हायचे होते. तीन वेळा लवून तसलीम कुर्निस करायचा होता. मग सांडणीस्वार सवारीचा शाही उंट खाली बसविणार होता. चाकराने आपले गुडघे जमिनीवर टेकून त्या उंटाच्या बगलेला खाली मान घालून बसायचे होते. सांडणीस्वार त्याच्या डोक्यावर फर्मानाची थैली उंटावरून ठेवणार होता. ती हातांनी धरून उठत पाठ न दाखविता चाकराने तसेच दहा कदम मागे हटायचे होते. साक्षात “शहेनशाहे हिंदोस्तॉ’ आपल्या सामने मौजूद आहेत, या कल्पनेने चाक राने हे सारे रिवाज बिलाकसूर पार पाडायचे होते! ही शाही चाकरी होती. तिचे हे शाही फर्मान होते! त्याचे हे रिवाज होते. आजवर मी – मी म्हणणाऱ्या कैक समशेरजंगांनी, तेगबहाहरांनी याच पद्धतीने तसले फर्मान स्वीकारले होते.
बक्षी बेगचा एक-एक शब्द संभाजीराजांच्या जिवाची घालमेल करीत होता. आजवर मासाहेब, राजे, आई जगदंबा आणि प्रेमाचे वडीलधारे यांच्याखेरीज कुणासमोरच त्यांनी कधीच गुडघे टेकले नव्हते! एका जनावरासमोर तर नाहीच नाही! मासाहेब, राजे आणि राणीवशातील आऊसाहेब यांच्या हाताशिवाय काहीच मस्तकावर घेतले नव्हते. किमान कसल्याही प्रसंगी कुठलाही “कागदी चिठोरा’ मस्तकी घेण्याची पाळी त्यांच्यावर आली नव्हती! संभाजीराजांचा श्वास घुसमटत होता. आपल्या जिवाची ज्योत कुणीतरी काळ्याकभिन्न चिमटीत पकडून चेचू पाहत आहे, असे त्यांना वाटत होते. ते एकसारखे नेताजींच्याकडे बघत होते. त्यांची छाती वरखाली धुमसत होती. ते ताडकन म्हणाले, “ध्यानी आला फर्मानचा रिवाज. येतो आम्ही.”
किरतसिंग आणि बक्षी बेग यांना एक शब्दही न बोलू देता त्यांनी नेताजींना मानेने इशारत केली. ते तडक बक्षीच्या डेऱ्याबाहेर पडले! लगबगीने धावत नेताजी त्यांच्या पाठीशी आले.
“नेताजीकाका, दादाजींना सांगा – आमच्याने हे रिवाज पार पडणार नाहीत! आमच्यावतीने कुणीही ते फर्मान घेईल.” “पर धाकलं सरकार, राजांनी तहात ह्ये मानल्यालं हाय. त्येंचा शब्द खाली यील. रजपूत ह्ये न्हाई मानायचा.” नेताजी त्यांच्या बरोबरीने चालताना त्यांची समजूत काढू बघत होते. “नाही, नेताजीकाका, एका जनावरासमोर गुडघे टेकणं आम्हास साधणार नाही, थैली मस्तकी धरणं होणार नाही.”
“माजं ऐकावं बाळधनी, ही चाल हाय. ह्यो रजपूत आमच्या मुलकातनं ढळायची राजे आन् आम्ही वाट बघतोय. समजुतीने घ्यावं बाळराजं. न्हाईतर – न्हाईतर तुम्हापायी राजं आम्हाला बोल लावतील! ठपका आमच्यावर यील. फर्मान घ्यावं. तीन येळा करायचा मुजरा आई अंबेचा योक, मासाहेबांचा योक, आन् राजास््री योक मानून करावा. गुडघं टेकावं त्ये पुरंदराकडं बघत थोरल्या रानीसाबास्त्री टेकावं!” नेताजी कळवळ्याने बोलत होते
ते ऐकून संभाजीराजे थांबले. नेताजींकडे रोखल्या नजरेने बघत गोफणगुंड्यासारखा वाटणारा प्रश्न त्यांनी विचारला, “तुम्ही – तुम्ही कराल डे सारं नेताजीकाका?”
नेताजींच्या थोराड पगडीची मुंडी क्षणात खाली आली. बाळ. कसे सांगावे, ते त्यांना समजेना. तसेच चालत संभाजीराजे मिर्झा राजाच्या शामियान्यात आले. त्याच्या डोळ्यांना डोळे लावून म्हणाले, “तुमचं फर्मान आमच्या वतीनं कुणीतरी घेईल. आम्ही ते घेणार नाही राणाजी!” कधी नव्हे तो ‘राणाजी’ हा शब्द त्यांच्या ओठांतून निसटला. “क्यों? क्या हो गया कवर?” मिर्झाचा चेहरा चिंतातुर झाला. तो गपकन बैठकीवरून उठलाच.
“तुमच्या रिवाजात ते घेणं आम्हास जमणार नाही. आम्ही गुडघे टेकणार नाही!” संभाजीराजे मिर्झाला जाणवेल एवढ्या निर्धाराने म्हणाले.
“नहीं! ऐसा मत करना। फर्मानकी बेअदबी हमको – राजासाबको मुसीबतमें डालेगी।” मिर्झाच्या कपळीचा केशरी टिळा एका जागी गोळा झाला! पोटात गोळा धरल्यासारखा तो बोलत-बोलत संभाजीराजांच्या जवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवताना तो क्षणभर गप्प झाला. त्यांना डोळाभर निरखून बघताना त्याच्या लालसर नाकपुडीतून एक दीर्घ निःश्वास सुटला. “आप किसको मानते है? राजासाबको ना?” हुक्क््याचे संथ झुरके घ्यावेत, तसे त्याने पडल्या आवाजात शांतपणाने विचारले.
“जी,” संभाजीराजांनी होकाराचा टोप हलके डुलविला.
“राजासाबने क्या बताया है? हमको “दादाजी’ बोलना। हमारी बात मानना। कहो कुंवर – आप हमें ‘दादाजी’ नहीं मानते?” मिर्झा आपल्या खास राजकारणी मिठ्ठास पद्धतीने बोलला. संभाजीराजे घोटाळले. हा तोच माणूस होता, ज्याने स्वत:च्या शामियान्यात आपली व्यवस्था केली. स्वत:च्या खास बिस्तऱ्यावर आपल्याला झोपू दिले, शाल पांघरली. इतमामाने एक हत्ती नजर केला. मोठ्या आदराने आणि अदबीने वागविले. हा आपला नव्हता, पण स्वतःबद्दल कुणालाही आपलेपण वाटायला लावणारे कसब याच्या अंगी होते. संभाजीराजे त्याला निरखीत होते. आपल्या छोटेखानी डोळ्यांत जोखू बघत होते.
एकाएकी तळावरची शहाजणे वाजू लागली. किरतसिंगाची वदी मिळालेला फर्मानाचे शहाजणांनी स्वागत होत होते. तळावरच्या पठाणी, रजपुती, उझबेकी हशमांनी नंगी हत्यारे नाकांसमोर पेलून फर्मानाच्या उंटाच्या वाटेवर दोन्ही बाजूंना शिस्त धरली. उखळीचे बार दणदणू लागले.
“लिए संभूराजे। जूते यहींपर उतार दीजिऐ!” मिर्झाने आपला हात संभाजीराजांच्या पाठीवर हळुवार ठेवीत शब्दांची अत्तरी कुप्पी खोलली. संभाजीराजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मिर्झा राजा संभाजीराजांना घेऊन बाहेर पडला. राजा रायसिंह, किरतसिंह, तेजसिंह कछवाह, इंद्रमण बुंदेला, निकोलो मनुची, बादल-बख्त्यार, नेताजी, दावलजी, गंगाधरपंत अशा दोन्ही बाजूकडील खाशा मंडळींनी त्यांच्या मागे फेर घेतला.
चालले! पंचहजारी मन्सबदारीचे शाही फर्मान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायांनी संभाजीराजे फर्मानबाडीकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर काळा दिवस होता. समोर त्यांना काळवंडलेला पुरंदर दिसत होता. त्यांच्या काना-मनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते – “औरंगजेब दिल्लीचा बादशहा आहे. त्याच्या सरदाराखेरीज तो कुणालाच दिसत नाही – त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते! त्याच्या भावांना दिसली. खुद्द त्याच्या बापाला दिसली!….”
“भुयारं कधीच संपत नसतात बाळराजे! चाल कधीच थांबत नसते!”
मासाहेबांची तुळजाई बोली त्यांना आपल्या पाठवळीवरून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला – “अशा वाटा चालताना मागं कधीच नसतं बघायचं!…. कुणास ठाऊक. प्रसंग घडला तर तुम्हांस आणि आम्हासही ती कोशिस करणं पडेल! जळत्या हुडव्यात हात घालणं पडेल!”
संभाजीराजांच्या सुन्न झालेल्या कानांना घुमणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुणतुण्याची टणटण त्यात मिसळली होती. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला –
उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी।
लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा मागविली बरवी।
स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फर्मानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजवा खुल्या होत्या. सगळा तळ तो “नजारा’ बघण्यासाठी वाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजतगाजत सांडणीस्वार फर्मानबाडीत आला.
तसलीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले. मान खाली टाकली.
सांडणीस्वाराने धुळीने माखलेला शाही फर्मानाचा पिस्ताई रंगाचा उंट बसता केला. हातातील फर्मानाच्या वळीची फासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकिराने बंद्याच्या शिरावर मोरपिसाचा जुडगा ज्या टेचात ठेवावा, तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केशरी टोपावर ठेवली! चढी आवाजी लावून त्याने शिरा फुगवीत सरावाची खडी ललकारी दिली –
“अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर अलमगीर पादशहा गाझी, मालिके तख्ते ताऊस, शहेनशाहे हिंदोस्तॉसे फर्माने दर्बार-संभूजी बिन सेवाजी भोसला सुभे दख्खनको रजामंदीसे बक्ष! अदब-अदब!”
स्वाराच्या तोंडातून दरबारी शब्दांच्या लाह्या फुटत होत्या. तळावरच्या तोफा अंगाला झटके देत बारांचे आवाज उठवू लागल्या. ठवू लागल्या. खाली मान घातलेल्या संभाजीराजांच्या सूर्यपेट डोळ्यांतून सरसरत ओघळलेले पाणमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले! त्यांच्या छातीचा भाता कोंडला होता. भवानीचा भंडारा सांडला होता! त्यांच्या कोवळ्या नियतीने क्रूर खेळ मांडला होता! त्यांना वाटत होते, उशी घेणाऱ्या घोड्यासारखे ताडकन बर उडावे. मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे घोडगतीने धावत सुटावे.
“उठिये कँवर.” मिर्झाने वाकून त्यांच्या पाठीवर हात ठेवला. फर्मानासह त्यांना तसेच दहा कदम मागे हटते घेतले. संभाजीराजांनी मान वर उठवून फर्मान नेताजींच्या हाती दिले. त्यांच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला! एवढ्या अवधीत बाळराजांची नजर केवढी दुखरी झाली होती! ती बघताना नेताजींची मान आपोआप खाली गेली. आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबर, बारा मावळांचा रानवारा पिणारे “हर$हर$महादेव’चा जोष उठविताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजींचे डोळे क्षणात पाणथरून आले. त्यांना आपल्या “धाकल्या राजाच्या’ पांढऱ्या सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते! ते डाग जामा धुतला, तरी कधीच जाणार नव्हते!!
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४९…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव