महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,051

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५१

Views: 3728
7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५१…

“मग राजे आता विशाळगडी आहेत तर आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत?” जिजाबाईंना नेताजींचा करीणा काय ते कळेना.

“न्हाई मासाब, राजं फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात. आन्‌…” बहिर्जीचा साद कातरला. नजर जिजाऊंना आणि बाळधन्याच्या पायांवर पडली.

“आणि काय नाईक?” जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना, अशी शंका आली.

“कसं सांगावं मासाब! अशी खबर सांगण्यापरास जीब झडल्याली ब्येस.”

“नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच? बोला.” जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकला.

“विशालगडावयनं राजांनी सरलस्करांस्री खलिता धाडला. ‘सरलस्कर असून समयास कैसे पावला नाहीत? दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो आहोत’, असा हुकूम दिला. त्यो वाचून नेताजी बिथारले. राजांच्यावर रागं झालं. राजांस्री पारखं होऊन इज्यापूरच्या दरबाराला फौजासुद्धा जाऊन मिळाले!!” मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानांत भरदार मिश्यांच्या, थोराड, तिघारी पगडीच्या ‘नेताजीकाकांनी’ रजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले – “मानूस जिथं उपाजतं ती जागा मानसाला साद घालती, बाळधनी!!”

संभाजीराजांना वाटले – “बहिर्जींच्या अंगावरचं घोंगडी काचोळं मोठमोठं होत आहे! ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन ‘नेताजीकाकांनी’ ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदरकिल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे!!’ त्या काचोळ्याखाली त्यांचेच शब्द गुदमरून तडफडताहेत – “माणूस – जिथं उपाजतं ती जागा मानसाला साद घालती!!”

इकडे आग्ऱ्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहाल असाच गुदमरून तडफडत होता! लाल किल्ल्यावरच्या मुसामाँ बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहाजहानची सात वर्षांची कैद संपली होती! ऐ अल्लाताल, मेरी आगेवाले जहानकी हालत अच्छी कर। मुझे जहन्नमके दर्दे आगसे बचा ले।॥” अश्या खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहाजहानने आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात शेवटची साँस घेतली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते.

शहाजहानची मुलगी जहानआरा, बेगमा – अकबराबादी महल आणि फत्तेपुरी महल त्याच्या बुढ्या, आंधळ्या आणि फाकळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटफुटून रडल्या. शहाजहानचे सुरकुतलेले, म्हातारे, गोरे अंग फाकळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या तबिबाला फितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्याकरवी शहाजहानला मालिश करवून घेतले होते! आपल्या बापाच्या मनाचा झाला, तो दाह कमी वाटला म्हणून की काय औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता! वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधींनी शहाजहान त्या “मालिशच्या मुसीबती’तून कसातरी बचावला होता! पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही.

“मला नरकाच्या आगीपासून वाचव”, म्हणून खुदाला विनविणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती! हरप्रकारच्या नरकयातना शहाजहानने कैदेतच भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपुर्द केले होते! शहाजहानच्या आसवाबखान्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला, तेव्हा मुतमदने आसवाबखान्याला चक्क मोहरा ठोकल्या! दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत, दिवसाला पाचपंचवीस जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले!

या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने! दारा शिकोहच्या जनानखान्यातील, शहाजहानच्या आसऱ्याला असलेल्या गायिका, गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या, असे पत्र आंधळ्या आब्बाजानला लिहिले होते! हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित, नवीन होते.

ताजमहालाचा आरसपानी चिरान्‌चिरा कसा रेखीवपणे एकमेकांवर उभा होता. पण, पण त्याच्या निर्मात्याचा – खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरान्‌चिरा फाकळून निघाला होता!! तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता!! शहेनशहाची काय आणि साध्या हशमाची काय; हयातीची बाकी शेवटी शून्यच असते!!

फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूरजवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यांत मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्यासह आग्रा-दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला! हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने पन्नास हजार घोडदळाची मदत केली होती. राजांचा “उजवा हात’ नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले, तर आपली धडगत नाही, या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठविली. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल, असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता.

काही चांगले हाताशी लागेपर्यंत, हातात असलेले कमी चांगले न सोडणे, हे राजकारणात शहाणपणाचे ठरते! राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आग्ऱ्याला जाण्यापूर्वी सरलष्करपदाची मोकळी जागा योग्य असामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत-भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला, याबद्दल संभाजीराजे हैराण होते.

राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही. फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, “ही फौजी शिस्त आहे. योग्य वेळी ध्यानी येईल.” भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर-बैठकीत फिरली. मुजुमदार निळोपंत, सरलष्करपदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरीनक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली सरपोसांनी झाकलेली तबके जोत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयाण शांतता होती.

“मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत! -” राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, “रिती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी, असे सामने या.”

कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदबमुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला, चोळणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढविला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी अव तून कच्या ती च्या मस्तकावर चढविली. सदरेकडे बघत राजे म्हणाले,

“आजपासून कुः गुजर… आमच्या फौजेचे सरलष्कर! आम्ही त्यास ‘प्रतापराव’ ही खिताबत बहाल करतो आहोत.” राजांनी कुडतोजींना ऊरभेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदरकऱ्याला कळले की, राजांच्या उरात कसले कढ दाटून आले आहेत. त्यांनी “कुडतोजी, आमच्या फौजेचे सरलष्कर” असे थांबून म्हटले होते. “श्रींच्या राज्याचे सरलष्कर” असे म्हटले नव्हते!

राजांचा शब्दन्शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या-बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डुलला – ‘नेताजीकाका झाले, तसे तुम्ही आमच्या महाराजसाहेबांना पारखे होऊ नका! त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका!’ सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की, औरंगजेब दिल्लीहून आग्ऱ्यात आला होता. आपल्या मृत बापासाठी जियारत पढायला!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५०.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment