धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५३…
फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रानचाऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात ख्रान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला, मोतीलगाचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांडचोळणा, कमरेला शुभ्र शेला, असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली निघाले, “शिवगंध’ रेखून घेण्यासाठी! महालात जिजाऊसाहेब, येईल त्या दासदासीला हरतऱ्हेचा हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या; मध्येच त्या थांबत होत्या. स्वत:ला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या.
त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला, हातांत एक तबक घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये, अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या!
“येसू, अशा पुढे या.” जिजाऊंनी येसूबाईना साद घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या…. रेंगाळल्या. त्या शब्दांतील मायेने मग अदबीत पुढे झाल्या. आपल्या नणंदांच्यात जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी-अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ, पुतळाबाईना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चालीत जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढेतरी कल्लोळ उमळून आले –
“केवढं-केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत? धाराऊनं यांना दुधास लावलं. दोन वर्षांचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या, रजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फर्मान घेतलं. आणि – आणि आज उत्तरेकडं चालले! कशी झेपणार यांना या गरमीच्या दिवसांत एवढी दूरची, परमुलखाची वाटचाल?” काटेभिवरीच्या वेलीने तुळशीचे रोपवैभव झाकाळून जावे, तसे जिजाऊंचे मन भरून आले!
पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले. “केवढा, केवढा फेर आहे, मान टाकून फर्मान घेण्यात आणि – आणि आऊसाहेबांच्या पायांवर डोकं ठेवण्यात!’
“उठा” आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारेझुळकीने रानमोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा, तसे जिजाऊंनी त्यांना अलगद वर घेतले!
मागे न बघताच त्यांनी ‘धाराऊ’ अशी याद फर्मावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊच्या हातातील तबक थडथडले. “जी!” म्हणत ती सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी गंध-अष्टगंधाच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळ बर उठवून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबविली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हातकसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्य-चंद्र रेखले असतील, तसे त्यांनी दोनदळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले! आपण रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला –
“आपण शिवभक्त शंभूराजे. सुखदुःखाचे हे दोन पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत! भार त्याचा आहे. पाठराखण करणारा तोच समर्थ आहे!”
जिजाऊंनी शांतपणे हातीची सरशी तबकात ठेवली.
“वर्दी आलीय. आता राजे येतील. त्यांच्या सोबतीनं जगदंबेचं, गडावरच्या देवदेवतांचे दर्शन करून या.” जिजाबाई संभाजीराजांना जवळ घेत म्हणाल्या.
“जी!” संभाजीराजांनी मान डोलावली.
“गोमाजीबाबा, सिदोजी, महमद सैस, केशव पंडित साऱ्यांची गाठभेट घ्या. गड सोडण्यापूर्वी राणीवशाकडे मुजरे लावून या.” जिजाबाई झरा झुळझुळावा तशा बोलत होत्या. संभाजीराजे ते ध्यान देऊन ऐकत होते.
“जा. पाय शिवा त्यांचे.” जिजाऊंनी पुतळाबाईंच्या रोखाने हात करीत संभाजीराजांना इशारत दिली. संभाजीराजे पुतळाबाईच्यासमोर आले. वाकून त्यांनी पुतळाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. त्या स्पर्शाने एक अंग फुलवती सरसरी पुतळाबाईना जाणवली. डोळे पाणथर झाले. त्यांचे मन सांगत होते – “बाळराजे, आम्ही केला आहे ‘सुलूख’, पण तो एकट्या आमच्या कपाळीच्या “कुंकवा’शीच नाही तर – तर तो तुमच्या कपाळीच्या “शिवगंधाशी’ही केला आहे!’
“उठा” पुतळाबाईनी नी मायेने संभाजीराजांना उठवून घेतले. त्यांच्या हनुवटीची वाटी तर्जनीने वर घेत त्या म्हणाल्या, “दर्शनं आटोपली की, आमच्या महाली या. आम्ही तुम्हास दंडास बांधण्यासाठी एक ताईत देणार आहोत!” “जी,” म्हणून संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवण्यासाठी पाऊल पुढे टाकले आणि पुतळाबाईच्या मागे अंगचोरीने उभ्या असलेल्या येसूबाईंना बघताच ते पुन्हा झटकन मागे हटले!
“हां शंभूबाळ, धाराऊची पायधूळ परती सारू नका!” जिजाऊंनी त्यांना पुरते वळू दिले नाही!
पुढे होत संभाजीराजांनी धाराऊचे पाय शिवले. हातांतील तबक थरथरत होते. घसा दाटून आला होता. सुरसुरते नाक वर ओढत तिने पदर डोळ्यांना लावून झटकन आपली मान दगडबंदीकडे मागे वळविली. तिचा गदगदला कुणबाऊ ऊर वर-खाली लपापू लागला. कल्लोळ-कल्लोळ माजला तिच्या काळजात.
“आऊ, आम्ही तुरंतीने सलामत परतू.” संभाजीराजे तिच्याकडे बघत बोलले. इतक्यात महालात राजे प्रवेशले. अंतोजी-रायाजीने त्यांना वाकून मुजरे घातले. जिजाऊ, पुतळाबाई, संभाजीराजे, येसूबाई सारीच धाराऊकडे बघत होती. राजांना पाठमोरी होती.
“मासाहेब, आम्ही दर्शनाला निघतो आहोत.” पाठमोऱ्या जिजाऊंना वाकून अदबमुजरा देत राजे शांत बोलले. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लख्खकन उजळून जावा, तसा राजांच्या बोलांनी तो आऊपणाचा महाल उजळून गेला. साऱ्यांना जागीच सोडून जिजाऊ राजांच्या रोखाने शांत चालीत पुढे झाल्या. त्यांच्या स्थिरावल्या पायांसमोर राजांनी गुडघे टेकले. आपले रुंद कपाळ त्यांनी जिजाऊंच्या नितळ पायांवर टेकविले.
““उठा” राजांच्या खांद्यांना धरून वर उठविताना आऊसाहेब आपले आपणालाच फक्त ऐकू यावे, तशा बोलल्या. राजांच्याकडे बघावे म्हणून त्यांनी नजर जोडली होती. पण डोळ्यांच्या पाणपडद्यातून त्यांना काही-काही दिसत नव्हते. त्यांनी आवेगाने राजांना आपल्या मिठीत कवटाळून घेतले! शब्द जाया झाले. लटके पडले. मिठीत आपला अर्थ शोधीत विरघळून गेले. मूकपणे दोन्ही राजमने एकमेकांशी उदंड बोलून गेली!
संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे महालाबाहेर पडले. गडावरच्या साऱ्या देवदेवतांची दर्शने झाली. शिवलिंगपूजा बांधण्यासाठी राजे आपल्या महाली निघून गेले. गोमाजी, सिदोजी, निळोपंत अशा गडघसटीच्या असामींची भेट घेऊन संभाजीराजे आशीर्वादासाठी सोयराबाईंच्या महाली आले. सोयराबाई म्हणाल्या, “दिवस गरमीचे आहेत. चाल दूरची आहे. जपून असा! एवढी भेट झाली की, स्वारी दख्खन-सुभा होणार आहे. तुम्ही मोठे सरदार होणार आहात! आम्हास चिंता वाटते – तुम्ही हे सारं पेलणार कसं?” म्हटले तर ते बोलणे सादिलवार होते, म्हटले तर काळीजमार होते!
“येतो आम्ही. आमच्या बाळीबाईंना जपा मासाहेब.” सोयराबाईंच्या कन्या बाळीबाई यांच्याकडे बघत संभाजीराजे त्यांना म्हणाले. निरोप घेऊन बाहेर पडले. पुतळाबाईंच्या महाली त्यांनी चार घास खाऊन घेतले. पुतळाबाईंनी त्यांच्या दंडात एक ताईत बांधला. प्रभाकरभट आणि केशवभट यांनी सदरजोत्यावर घंगाळात सोडलेले घटिका पात्र डुबतीला आले होते. प्रस्थानाचा मुहूर्त जवळ आला. राजांनी निवडलेली रघुनाथपंत कोरडे, त्र्यंयकपंत डबीर, निराजीपंत, सर्जेराव जेधे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद, दावलजी घाटगे, दत्ताजीपंत, राघो-मित्र, रामाजी माणकोजी अशी मंडळी हत्यारबंदीने बालेकिल्ल्याच्या सदरेवर एकवटली. मागे राहणारी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळोपंत, येसाजी, तानाजी, आनंदराव अशी मंडळी निरोपाचे मुजरे द्यायला गोळा झाली.
राजांच्या महालात सदरेवर जाण्यासाठी राजे आणि संभाजीराजे सिद्ध झाले. सखू, राणू, अंबा, बाळीबाई असा राजांचा कन्यावसा संगती घेऊन जिजाबाई राजांच्या महालात आल्या. साऱ्या कन्यावशाने राजांना नमस्कार केले. येसूबाईना घेऊन दाट कानकल्ल्यांचे थोराड पिलाजी महाली आले. राजांच्या आणि मासाहेबांच्या रोखाने हात करून त्यांनी येसूबाईना नमस्कार करण्यासाठी खुणावले. येसूबाई पुढे झाल्या. मासाहेबांना आणि राजांना त्यांनी कुळअदबीने नमस्कार केले. त्यांना वर उठते करून घेत राजांनी त्यांची हनुवटी आपल्या रोखाने तर्जनीने वर घेतली. ते अदबशीर पोर-खानदान बघताना राजे आपण कसल्या पेचात आहोत, हेही क्षणभर विसरून गेले. येसूबाईच्या कानात बोलावे तसे अल्लादीने हळुवार म्हणाले,
“सूनबाई, शृंगारपुरी परतण्याची घाई नका करू!”
“मासाहेब यांना ठेवून घ्या थोडे दिवस.” राजांनी जिजाऊंच्याकडे बघत सांगितले. लाजलेल्या येसूबाईनी आपली हनुवटी राजांच्या तर्जनीतून हळूच मागे घेतली आणि पटकन मागे येत पिलाजींच्याजवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हळूच हात ठेवून, त्यांच्या कानाजवळ तोंड नेत पिलाजी त्यांना पुटपुटले, “इसारता कसं? आपल्या कुंकवाचं पाय न्हाई शिवलं तुम्ही?” “हे काय आबा!’ अशा अर्थाने आपले टपोरे डोळे आणखी टपोरे करून येसूबाईंनी पिलाजींच्याकडे फुरंगटून बघितले.
“जावा” दटावल्यासारख्या दबल्या आवाजात पिलाजी त्यांना म्हणाले. नाइलाजाने येसूबाई पुढे झाल्या! कुणाकडेही न बघता संभाजीराजांच्या समोर आल्या गडबडीने वाकून पायाखालच्या बिछायतीला हातांची बोटे लावून त्यांनी तीन वेळा नमस्कार केला. संभाजीराजे जाणूनबुजून दुसरीकडे बघत होते! त्यांच्याकडे लक्ष नाही असे भासवीत होते. राजांनी संभाजीराजांची ती ‘नजरचोरी” हेरली. त्यांच्या खांद्यावर एक हात चढवून दुसरा हात येसूबाईच्याकडे दाखवीत राजे म्हणाले, “निरोप घ्या. त्यांना सांगा -येतो आम्ही!”
संभाजीराजे गडबडले. राजांच्याकडे बघतच येसूबाईना म्हणाले, “येतो आम्ही राजांनी, संभाजीराजांनी जिजाबाईंना मस्तक टेकून नमस्कार केले. येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायला मनाने बांधील झालेल्या जिजाऊंनी त्यांच्या टोपांवर हात ठेवीत आशीर्वाद दिले, “औक्षवंत व्हा!”
संभाजीराजांनी पिलाजी आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार केले. जिजाऊंच्या हातून दह्याच्या कवड्या उजव्या तळहाती घेऊन त्या ओठांआड केल्या. अंतोजी गाडे एक सरपोसाने झाकलेले तबक घेऊन बाजूला उभा होता. त्याच्याकडे हात करून जिजाऊ राजांना म्हणाल्या, “ते तुमचं पूजेचं स्फटिक शिवलिंग आहे. तुमच्या बैठकीला पालखीत ते जवळ ठेवा.”
“जी मासाहेब, सांभाळून राहावं, हवेवरच्या खबरा येतील. त्यांनी कान हलके करू नयेत. येतो आम्ही.” राजे संभाजीराजांना घेऊन महालाबाहेर पडले. त्यांच्या मागून जिजाऊ, पिलाजी, अंतोजी चालले. पायाच्या नडगीला कचणारा तोडा ढिला करण्यासाठी येसूबाई वाकल्या होत्या. त्यांचे कशाकडे लक्ष नव्हते..
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५३ –
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव