धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५४ –
सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरा आला. दोघा भुत्या-बालभुत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या आपल्या ओंजळी त्यांनी तोंडावरून फिरवून घेतल्या. राजे-संभाजीराजे बालेकिल्ल्याच्या राबत्या सदरेवर आले. जगदंबेच्या पुजाऱ्याने पुढे होत, हातातील परडीतील भंडाऱ्याने त्यांचे भरगच्च मळवट भरले. दोघा पितापुत्रांनी देवतेला गुडघे टेकून वंदन केले. सदरचौकात जमा झालेला एक-एक असामी पुढे होत, संगमरवरी मूर्तीसारख्या सदरजोत्यावर निश्चल उभ्या राहिलेल्या जिजाऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवू लागला. त्यात असलेला मदारी मेहतरही आऊसाहेबांच्या समोर आला. क्षणभर घोटाळला. आणि झटकन पुढे होत त्याने जिजाऊंच्या सोनरंगी चरणांवर सरळ आपले शिर ठेवले! जिजाऊंनी त्याला उठते केले.
राजे आणि संभाजीराजे राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेसमोरील हमचौकातून बाहेर पडले. त्यांच्या मागून जमलेल्या मंडळींचा जमाब चालला. बालेकिल्ल्याची तटबंदी ओलांडून मंडळी पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडाच्या रोखाने चालली. त्यातील राजे, संभाजीराजे वा कुणालाही माहीत नव्हते की, सगळ्यांना बगल देऊन आलेली धाराऊ बालेकिल्ल्याच्या तटबंदीजवळ उभी होती! मिळतील तेवढे संभाजीराजे डोळ्यांत साठवून घेताना तिला आपले डोळे थिटे बाटत होते! क्षणात ते डोळेही भरून आले. त्यामुळे तिला दिसत होते, तेही पाठमोरे संभाजीराजे दिसेनासे झाले!
संभाजीराजांच्यासह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव, बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरी आली. तेजसिंह कळवाह आणि बक्षी बेग यांनी त्यांना तसलीम केली. राजांना आग्र््यापर्यंतचा मार्ग दाखवण्यासाठी बक्षी बेगला औरंगजेबाने दख्खनेत पाठविले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापराबांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजापदार झूल घातलेला, हौद्याचा निशाणी हत्ती, पागेतून सैसने निवडलेली, गरमीच्या मुलखाला टिकाव धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, काबाडीचे बैल सारे सज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहानी पालखी ठाण केली होती उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गेळे चढविले होते. बगलेच्या हत्तिणींवर वाटेत लागणाऱ्या नद्या पार करण्यासाठी दोन छोटेखानी होड्या चढविल्या होत्या. अब्दागिरे, शिंगाडे, निशाणबार्दार, ढालाईत, भालाईत, मुदपाके, वंजारी, वैदू, मशालजी सारी माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती.
साडेतीनशे धारकरी पगड्यांना पगड्या भिडवून हारीत उभे होते. त्यात पट्टेबाज बीटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हरप्रकारचे हत्यार चालविणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भवत्याने विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिजींचे खबरगीर आपल्या आणखी दहा खबरगिरांनिशी उभे होते. राजांच्याबरोबर उत्तरेकडे जाणाऱ्या मंडळीने निवडक घोड्यांवर स्वार होऊन पालखीच्या भोवतीने वळे करून शिस्त धरली. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी ऊरभेटी दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसलीतरी आठवण झाली.
“थोडं थांबावं राजं. याक ऱ्हाऊनच गेलं,” म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. “ह्यो भावेसरीचा प्रसाद राजं,” म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्यावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरीपटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, “चला शंभूराजे.”
संभाजीराजे आपल्या पालखीत बसले. अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुबकेदार, भगवा राजगोंडा पकडला. कूचाचा आखिरी चौघडा दुडदुडला. भोयांनी दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जीनी आपले खबरगिरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. तो आपल्या रामोशी साथीदारांसह दोन मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तिथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते निशाणी हत्तीवरच्या फीलवानाने हत्तीला अंकुशमार देऊन चाल दिली सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, दत्ताजी, रघुनाथपंत, निराजीपंत. त्र्यंबकपंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या.
चालला! दख्खनचा “मावळा’ काफल्यासह उत्तरेच्या ‘शहेनशहा’च्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन! जोपर्यंत त्या पितापुत्राच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यांवर कवड्यांच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालाव्या लागणार होत्या. ध्यानीमनी नसलेल्या! त्यांच्या राजरक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या! मजल-दरमजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळमुलूख मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की, दिवस तापायला लागताना बहिर्जीच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांजगतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठचे नेवासे, गोदावरीतीराचे गंगापूर असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर – औरंगाबादमार्गे काफला वेरूळजवळ आला. तेथे जवळच राजांच्या आजोबांनी – मालोजीरावांनी – भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक.
देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाऱ्याकरवी घृष्णेश्वराला अभिषेक चढविला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटीबाहेर आले. राजांच्या मनात, कधीही बघायला न मिळालेल्या आपल्या आजोबांचा –
मालोजीराजांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाने नवल त्यांना घुमटीबाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजीराजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते!
घुमट सोडून राजे-संभाजीराजे आपल्या डेऱ्याकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूख न्याहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती. श्रमभूमी होती. चालता-चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धपापते घोडे कायद्यांनी आखडून कर्माजी पायउतार झाला. एव्हाना राजे आपल्या डेऱ्यापर्यंत आले होते. त्यांच्याभोवती तेजसिंह कछवाह, बक्षी बेग, रघुनाथपंत, त्र्यंबकपंत अशी मंडळी उभी होती. घामेजला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला
“काय आहे कर्माजी?” राजांनी त्याला जबानबंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळीकडे बघत कर्माजी म्हणाला, “तसं काई खासं न्हाई!
पर….”
राजांनी भोबती नजर फिरविली. सगळी मंडळी मुजरे, कुर्निस करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. “बोल.” राजांची उत्सुकता कर्माजीने चढाला घातली होती.
“म्हाराज, इदलशाहीच्या शर्जाखानानं मिरजा राजाची ससेहोलपट मांडलीया. तुळजापूर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत रजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण हाय. तिथे इज्यापूर सोडून नेताजी – नेताजी मिरजाच्या गोटाला मिळालं!”
कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले. सोंगटीपटातील नरद भकत जावी, तसे आता नेताजींचे आयुष्य भकत कुठे जाणार होते, ते त्या घृष्णेश्वरालाच माहीत!
कर्माजीचे ते बोल ऐकताना, मिर्झाच्या गोटात खुद्द मिर्झाला, “चटका लागल्याबिगार कळत न्हाई “इंगळ’ कनचा आन् “’कोळसा’ कनचा” म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर उभे ठाकले – गिर्दीला रेलून मिर्झा राजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक््क्याची काळीबाळी वुरनळी परनळी : आहे! त्या हुक्क्याच्या पसरट रंजुकीत नेताजींना ठेवलेले आहे दिसत आहेत ते. रजपूत जसजसा हुक्का चूस करीत आहे, तसतसा रंजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख-राख होत आहे!!
रात्रीचा मुक्काम घृष्णेश्वराच्या कृपाछायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी सरान करून पेहराव चढविले. राजांची स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोनशिकल चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांची इंतजारी करीत डेऱ्याबाहेर तेजसिंह कळवाह आणि बक्षी बेग उभे होते.
त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तसलीम-कुर्निस केले. बक्षी बेगने अदबीने रिवाजाचे विचारले, “निद कैसी रही राजासाब?”
“हां. बिलकूल ठीक.” राजांनी उत्तर दिले.
“सराजासाब खुशी फर्मायेंगे तो एक अर्जी है।॥ ” तेजसिंह कछवाह राजांना म्हणाला.
“हां. सुनाओ राणा.” राजांनी त्याच्या केशरी साफ्याकडे बघत उत्तर दिले. पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछबाह म्हणाला, “उस पहाडीमें पत्थरोंकी बडी अच्छी खुदाई हे। बहोत बढिया. राजासाब रजामंदी फर्माते है। तो थोडी राह तेढी करे। एक दफा उसपर ऑख डाले।”
“अच्छा! जरूर, हमें खुशी होगी।” राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले.
बक्षी बेग आणि कछवाह यांनी आठ-दहा घोडी निवडली. दोन माहीतगार मशालजी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलख घोड्यांवर मांड जमविली. सोबतीला बहिर्जी फर्जंद आणि मदारी मेहतर, सर्जेराव जेधे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणग्या पाडून वाळल्या गवताची आगटी केली. त्यावर करंजेलाच्या मशाली पेटवून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वेलींच्या कमानी हातांनी बाजूला सारीत कळछवाह आणि बेग आघाडीला आले. राजे आणि संभाजीराजे टोपांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे चालले. समोर एक गुंफा आली. मशालजी त्या गुंफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्यातरी अज्ञात हातांनी मनात उभ्या ठाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देव-देवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या छि्लीचा एकही ठोका गफलतीनेसुद्धा चुकला नव्हता!
राजांच्यासह सारे अवाक होऊन पत्थरांचे ते अत्यंत शांत; पण अत्यंत बोलके, देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धरतीवर आहोत, असे कुणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे अवतरला होता!
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५४…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव