महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,048

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५

Views: 2559
11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५…

गुंफामागून गुंफा बघत राजे आणि संभाजीराजे “कैलास लेणे’ ह्या सोळाव्या गुंफेत आले. या गुंफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती, अंबा जाणे! दगडाचा एक टक्कासुद्धा त्यांनी आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्वसौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्माने त्याला जाता-जाता लावलेली “तीट’ होती, ती कैलासलेणे! दृष्ट लागावी अशीच आपले सूर्यपेट डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालले होते. आणि ती दगडी शिल्पे, आपले युगायुगांचे अर्धमिटले लांबट डोळे उघडून, जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही हर भोसलाई रक्तशिल्पे बघत होती! किन्नराची एक मूर्ती बघण्यात, पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चल उभे होते.

– मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणवून गेले – “हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्यामोहऱ्यात कळणार नाही, एवढं बेमालून सारखेपण आहे.’ सगळे शिल्पमूर्तीमधून ओसंडणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंज्यात न्हात चालले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या.

“महाराजसाहेब, ते बघा.” एकाएकी संभाजीराजे गुंफेच्या छताकडे हात उठवून मान वर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मान वर उठविली. छताकडे बघताना “जगदंब, जगबंद” म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडविला. मती गुंग करून टाकणारे छत होते! एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या!!

“हम निहाल हो गये राणा!” तेजसिंहाकडे न बघताच राजे म्हणाले.

कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवीत राजांनी विचारले, “ही शिलागारी बघताना तुम्हास काय वाटतं?”

संभाजीराजांच्या छातीत, महाबळेश्वरवरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना उठली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत म्हणाले,“ही “दगडी-गीते’ आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही! वाटतंय हे दगड आमच्याशी गाताहेत!” दगडात प्राण संचारलेल्या त्या गुंफेच्या आवारात फिरताना एका उडत्या पक्ष्याच्या पवित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजींची आठवण आली!

विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला, “इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि – आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे! श्रींची करणी अगम्य आहे!’ राजे संभाजीराजांच्यासह गुंफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभाऱ्यात कैलासपर्वतावर श्रीशंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे. असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टी भाव सुंदर रीतीने उमटविलेले होते.

ते “शिवरूप’ बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले. डोळे मिटले. थोडया वेळाने डोळे उघडून ते ‘शिवशिल्प’ बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या ‘सावळ्या’ शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणवून गेले की, त्या शिल्पात “शिवपुत्र ‘ गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती!!

संभाजीराजे मात्र, कैलास उठविणाच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टी भाव निरखून बघत होते! त्यांच्या विचारांची लय वाढत होती – “कसा असेल रावण? अफजलखानासारखा? मिर्झा राजासारखा? छे! छे! मग?… कसाही का असेना, त्याला “शिवाचा कैलास’ काही उचलता आला नव्हता!!’ आवाराबाहेर पडता-पडता संभाजीराजांना एका स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्र युगुलाचे शिल्प दिसले! त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात! त्यातील स्त्रीच्या पायांत तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महालातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले! त्या वेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेणा शेृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्याच्या बगलेने पिलाजी शिर्के धिम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेण्यात येसूबाई होत्या. जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी गारपुरी चालल्या होत्या.

बुऱ्हाणपूर, इंदौर, गवालेर अशी शहरे मागे टाकीत, गिरणा, तापी, नर्मदा, चंबळा ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजबळ आला. आग्ऱ्याची गिर्दनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपानी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कछवाह राजांना तसलीम करून आज्ऱ्याच्या रोखाने मिर्झा राजाचा बडा कुंवर रामसिंग ह्याला वर्दी द्यायला घोडे फेकीत निघून गेले.

मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक-सारीक दिल्या होत्या. “त्यांच्या केसालाही धक्का न लागेल’, अशी कसम आपण घेतल्याचे रामसिंगाला पुन:पुन्हा कळविले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही.

तेजसिंह आणि बक्षी आणखी चार-सहा माणसांनिशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यांतील रामसिंग कुठला? याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडापथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यमवयीन माणूस राजांच्या आणि संभाजीराजांच्या समोर आला. गर्दन झुकवून त्याने कुर्निसात केला. “कँबरजीके तरफसे हम बडी खुशीसे मेहमान साहबानकी आगवानी करते है!” तो अदबीने म्हणाला.

“आपकी तारीफ?” त्याचा कुर्निसात स्वीकारीत भुबई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या असामीत रामसिंग नव्हता!

“चाकरको गिरधरलाल कहते है। कुंवरजीके हवेलीपर मुन्शीगिरी करता हूँ!” गिरधरलाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उत्तरला.

मुन्शी! राजांच्या काळजात कसलीतरी कळ उठली. एक मामुली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता! “कवर रामसिंग किधर हे?” राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला.

“गुस्ताखी माफ हो मालिक. कँवरजी किलेमें आला हजरतके महेलपर पेहरे लगा रहे हे! वहासे नहीं छूट पायेंगे! आप चलिये!” राजांनी सर्वांना जाणवेल असा नि:श्वास सोडला.

औरंगजेबाच्या पन्नासाव्या सालगिराचा दिवस आग्रा शहरावर रोषण झाला. आपल्या उजळलेल्या मनोऱ्यांचे डोळे लाल किल्ल्याच्या रोखाने ताजमहालाने जोडले. सालगिरा बघायला!!

मुलुखचंदाच्या सराईत राजांनी आणि संभाजीराजांनी स्रान करून खासे पेहराव घातले. राजे आपल्या डेऱ्यात स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात औरंगजेबाने आपल्या महालात ‘सब्रकी नमाज’ पढून घेतली होती. दिवस अर्धा कासरा वर आला, तरी तो मक्केकडे तोंड करून कुराणाचे कलमे पढतच होता. संभाजीराजे सराईतून दिसणारे यमुनेचे पात्र बघत होते.

औरंगजेबाच्या महालाबाहेर रामसिंगाचा पहारा चालूच होता. राजांचा सरंजाम सराईत सिद्ध झाला. अंगी जरीबुंदक्याचे सफेद झगमगीत जामे, डोक्‍्यांवर लखलखीत केशरी टोप, त्याखाली द्विदली, रेखीव शिवगंध, गळ्यात कंठे भवानीच्या माळा, कानांत सोनचौकडे असा वेष परिधान केलेले राजे- संभाजीराजे सिद्ध ठेवलेल्या सजल्या घोड्यांजवळ उभे होते. त्यांच्या भोवतीने त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे, सर्जेराव जेधे, हिरोजी फर्जंद, मदारी महेतर, राघो मित्र, दावलजी घाटगे अशी मंडळी ठेवणीचे आसवाब चढवून हारीने उभी होती. राजे वाट बघत होते रामसिंगाची. तोच त्यांना दरबारी नेऊन पेश करणार होता. पण अद्याप रामसिंगाचा पत्ता नव्हता! त्याची प्रत्यक्ष भेट अद्याप झालीच नव्हती. शेवटी मुन्शी गिरधरलाल सराईत आला. चेहऱ्यावरचे ओशाळेपण लपवीत राजांना तसलीम करून तो म्हणाला, “अभी तक राणाजी नहीं आये किलेपरसे। आप हवेलीपर चलिये राजासाब, मैंने हारकारा भेजा है किलेपर। राणाजी आतेही होंगे।” त्या रजपुती कारकुनाला समोरच्या “दख्खनी मावळ्या’ची “किरत’ ऐकून चांगलीच माहीत होती. तीन वेळा तो कमेरत वाकत होता. खांद्यावरचे उपरणे ठीकठाक करीत ‘जी’ म्हणत होता.

राजांच्या कपाळीचे शिवगंध आठ्यांत आक्रसून उठले. पण ते काही बोलले नाहीत. गिरधरलालच्या सोबतीने राजे आणि संभाजीराजे सरंजामासह आग्ऱ्यातील मिर्झा राजाच्या हवेलीजवळ आले. रजपुती माटाच्या गन्चीदार अशा त्या हवेलीसमोर राजांच्या मुक्कामाची सारी तयारी रामसिंगाने करवून घेतली होती. प्रशस्त आवारात लहान-मोठ्या राहुट्या, सायवान डेरे-शामियाने उठविले होते. राजांचा सरंजाम त्या आवारात ठाण झाला. दिवस दीड कासरा वर आला. डाव्या हातात धूपदाने आणि उजव्या हातात मोरपिसाचे जुडगे घेतलेले फकिरांचे तांडे आग्ऱ्याच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यांतून न खैरात गोळा करून लाल किल्ल तटाजवळ गोळा झाले. ठिकठिकाणी डेरे ले औरंगजेबाचे सरदार, अमीर, उमराव, सुभेदार वाजत-गाजत सरंजामात लाल किल्ला जवळ करू लागले.

अस्वस्थ झालेले राजे संभाजीराजांना घेऊन शामियान्याच्या दारात रामसिंगाची वाट बघत उभे होते. त्या दोघांनाही कल्पना नव्हती की, समोरच्या मिर्झा राजाच्या हवेलीतून गऱ्चीला लागून असलेल्या दालनात चिकाच्या पडद्याआड मिर्झाचा आणि रामसिंगाचा “’जनाना’ उभा होता. त्या जनान्यातील बायका मेहंदी रंगल्या बोटांनी एकमेकींना खुणा करून राजे आणि संभाजीराजे दाखवीत होत्या! नाजूक कलकलाट करीत होत्या – “शेरे दख्खन ‘सेवा’ और उसका बच्चा ‘संभा’!”

दिवसाने दोन कासऱ्यांचा पल्ला मागे टाकला. लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजावाजा नौबत-नगारा एकसारखा दुडदुडु लागला. सरदारमागून सरदार लाल किल्ल्यात प्रवेशू लागले. संगमरवरी खांबाचा “दिवाण-इ-आम *चा देखणा, आईनेबंद दरबार तमाम झाला. कनोजी धूपाची वळी दरबारात उठू लागली. जरीबुंदीचा हिरवाशार जामा अंगी घातलेला, डोक्‍यावर पिसांच्या तुऱ्याचा बाकदार किमॉश घेतलेला औरंगजेब आसवाबखान्यातून बाहेर पडला. त्याच्या कदमबरहुकूम फरास रुजाम्यांच्या तलम पायघड्या अंथरत चालले.

अल्काबांच्या खड्या ललकाऱ्या उठल्या – “बा अदब बा मुलाहिजा तहे दिल होश्शीयॉ अबुल मुजप्फर मुईउद्दीन मुहम्मद, औरंगजेब, बहादूर, अलमगीर बादशहा गाझी मालिके तख्ते ताऊस शहेनशाहे हिंदोस्तो तशरीफ ला रहे है। होश्शीयाँ इ!”

त्या ललकाऱ्या ऐकताना तोंडात तोबरे भरल्यासारखे रामसिंगाचे राजपुती मन घुसमटून गेले होते.

औरंगजेबाने ‘दिवाण-इ-आम’च्या दरबारात कदम टाकताच, वाऱ्याच्या एकाच झोताबरोबर गवताळू कुरणाचा पट्टाचपट्टा लपकन लवावा, तसा दरबारीयांचा जमाव ताजीम देण्यासाठी कमरेत लवला.

रामसिंगाने आपल्या हवेलीकडे स्वार धाडले. त्यांनी मुन्शी गिरधरलालसाठी निरोप आणला – “दर्बार शुरू हुआ। राजासाबको ले आना। मैं आ रहा ही”

आता गिरधरवर नापसंदी दाखवायलाही राजांना वेळ नव्हता. राजे-संभाजीराजे शामियान्याबाहेर आले. राजांनी आपल्या उजव्या हाताची जोड देऊन संभाजीराजांना घोडाबैठक दिली. खुद्द राजांनी एका सजल्या कुम्मैत घोड्यावर मांड जमविली.

कँवरसिंग, तेजसिंह, गिरधर, बक्षी बेग यांच्या सोबतीने राजे लाल किल्ल्याकडे चालले. त्यांच्यामागून त्यांचा सरंजाम चालला. राजांच्या आणि संभाजीराजांच्या तर्फेने अब्दागिरे अब्दागिऱ्या ढाळत होते. मार्गावर भेटणाऱ्या फकिरांना राजे आणि संभाजीराजे मुठींनी खैरात देत होते. आता आग्ऱ्याच्या हमरस्त्यावर दुसरा कुठलाच सरदार दरकदार जाणारा-येणारा नसल्यामुळे “दख्खनी “सेवा’ आ रहा है!” ही खबर भिंगरीसारखी गल्ची- हवेल्यांत पसरली. सगळे मर्दानी लाल किल्ल्यात रुजू झाल्यामुळे आग्ऱ्यातील बायका-बन्चे- बुढे गज्च्यांत-झरोक्यांत गोळा झाले होते.

औरंगजेबाने दुर्लक्षिले होते, रामसिंगाला इच्छा असून जमले नव्हते, पण इंतजाम ठेवून होणार नाही, असे त्या ‘थोरल्या’ आणि ‘धाकल्या’ मावळ्यांचे इतमामात आग्रा आणि शहाजहानची रियाया यांच्याकडून स्वागत होत होते!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment