महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,791

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६

By Discover Maharashtra Views: 2517 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६…

तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण ‘सेवा’ या दोन अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती! उभी झाडे फटाफट फोडत जाणारा “वणवा” आणि उभ्या हिंदोस्तांची दौड घेणारा मावळी “रानवारा” हाच राजांचा “सरंजाम? झाला होता! “दहारआरा’ बागेच्या रोखाने राजे-संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या-ज्या हवेलीसमोरून पुढे सरकत होते, त्या-त्या हवेलीतील गलन्ची-झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी, मेहंदीच्या गोऱ्या हातांनी उचलल्या जात होत्या! त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभरच तसेच थांबत होते! “या अल्ला, सुरूर, सुरते मर्द!” असे जनानी नाजूक चीत्कार बुरख्यांतून उठत होते!

राजे-संभाजीराजे आग्ऱ्याच्या रस्त्यांत खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात “दिवाण-इ-आम ‘च्या दरबारात औरंगजेब नजराण्याची तबके स्वीकारीत होता! एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाटेने दोन रजपुती घोडाइतांनी आपली घोडी पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाढ्यांतून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगाचे चाकर डुंगगरमल चौधरी आणि रामदास. राजांना आदब-कुर्निस करून त्यांनी आपली घोडी थेट गिरधरलालच्या घोड्याला भिडविली. दबक्या आवाज ते गिरधरशी रजपुती भाषेत काहीतरी बोलत होतो. “राणाजी… दर्बार… रास्ता… नूरगंज…” असे शब्द ऐकू येत होते.

“क्या है मुन्शी?” राजांनी गिरधरलालचा अंदाज घेत विचारले. “कुछ नहीं सरकार) राणाजी राह भूल गये। दूसरे रास्तेसे सिधे हवेलीपर पहूँच गये। उनका हुक्म है – आपको नूरगंज बगिचेके पास ले आनेका।” गिरधर उत्तरला. किल्ल्यावरून मुखलिसखानासह निघालेल्या रामसिंगाची वाट चुकली होती! तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोहोचला होता. दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात ‘तख्तेताऊस’वर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की, कधी-कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात! मग कुणाच्यातरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्यातरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात!!

गिरधर आणि कुँवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरगंज बागेच्या रोखाने वळविला. सरंजामाने त्या वाटेवरची “फिरोझ बाग’ मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात “दिवाण-इ-आम?’चा दरबार बरखास्त झाला! राजे-संभाजीराजे नूरगंज बागेजवळ येऊन थांबले. राजांना ‘नजर’ म्हणून सात-आठ झूलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलिसखानासह घाईगर्दीने नूरगंज बागेजवळ आला.

कँवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मांड घेतलेल्या, गोऱ्यापान रामसिंगाचे कपाळ घामेजून आले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताना त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमून आले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले. तेवढे करताना झालेल्या सगळ्या गफलती निवळून जातील; अशी अदब राजांना कशी द्यावी, याचा विचार करून घेतला. कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडेनिशी कदमबाज चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजबळ आणले.

“राजासाब” एवढेच तो कसेबसे म्हणाला आणि त्याने ऊरभेट देण्यासाठी हात पसरले. राजांनी उभ्या घोड्यावरून रामसिंगाची ऊरभेट घेतली. आपल्या हयातीत राजांनी अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले, “रामसिंग ही इतमामाची असामी आहे.’ रामसिंगाने आपला घोडा संभाजीराजांच्या घोड्यांजवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदेपट्टीवर हात चढबीत तो म्हणाला, “कुंवर संभूराजा!”

सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. दोन मावळे सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला. लाल किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. बराच वेळ बसलेले नौबतवाले राजे, रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक बघत आगवानीची नौबत झडवू लागले. या वेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा “दिवाण-इ-आम ‘ हा दुसरा दरबारही बरखास्त झाला होता!

राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोतदारांनी आपल्या ताब्यात घेतली. नजराण्यांची तबके घातलेले मावळे पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्यासह घुसलखान्याच्या दरबाराच्या रोखाने चालले. या वेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असलेल्या पेशाबगारात खापराच्या तुकड्याने “इस्तिजा’ करीत होता!

“इस्तिजा’ नंतर हातपाय धुऊन औरंगजेबाने “वजू’ केली. वाळामिश्रित थंडगार पाणी पिऊन तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली – “जूते यहीं पर उतार दीजिये राजासाब।” कपाळाला आठ्या घालीत राजांनी आपल्या भगव्या मोजड्या संगमरवरी उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजीराजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या.

रामसिंगाने आत वजीर जाफरखानाला वर्दी दिली. जाफरखान सात-आठ हात उंचीच्या कोटबंद आवारात आसनावर गिर्दीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश झाला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली, “आला हजरत, दख्खनसे ‘सेवा’ भोसला फर्जंदके साथ आया है! रामसिंग पेश आनेकी इजाजत मॉँगता है!” ती वर्दी ऐकताना गिर्दीला रेललेला  औरंगजेब पुढे झाला. त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले.

काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीर जाफरखानाच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली. “इ जा ज त !” एकदा घुसलखान्याच्या दरवाजाला नजर देऊन औरंगजेब पुन्हा गिर्दीला रेलला, मणी फिरू लागले! रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला, मोगली नकसकामाचा, विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, “लीजिये.”

भुबईला कमानबाक चढवीत राजांनी त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, “ये क्‍या है?”

“पक दर्बारी रिवाज है राजासाब. नजराना पेश करते वक्त आला हजरतने आपसे कुळ पूछा तो यह रुमाल मँँहपर रखकर जबाब देना राजासाब! ये रिवाज है!”

राजे काहीच बोलले नाहीत. तो रुमाल त्यांनी उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे घुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात शास्ताखान, बहादूरखान, अमीनखान, शेख मीर, झुल्फिकारखान, नजाबतखान, जसवंतसिंग असे औरंगजेबाचे कैक नेक बंदे दाटले होते. उभ्या दरबारात, हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगांचे किमॉश, जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते. ते उठून दिसत होते.

रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी “’नजर’ म्हणून एक हजार सोनमोहरा, दोन हजार रुपये व “निसार’ म्हणून पाच हजार रुपयांची तबके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. जते त्या संपूर्ण दरबारात सर्वांत लहान असे नऊ वर्षे उमरीचे एकटे संभाजीराजेच “करणी आम दुनियेला दिसते’, असे आबासाहेब ज्याच्याबद्दल नेहमी म्हणत होते, तो औरंगजेब संभाजीराजे निरखून बघत होते. संगमरवरी कोटबंदाआड औरंगजेबाची सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासूनचे वरचे शिर दिसू शकत होते. फक्त शिर! जे सलामत ठेवण्यासाठी अनेकांची शिरे त्याने धडावेगळी करविली होती. ज्यात असलेला मेंदू चलाखीने चालवून, कुराणाची ढाल समोर धरीत, त्याने आपली पीळबाज राजहवस पुरी करून घेतली होती!

संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल. पण तो काहीच बोलला नाही! बक्षी आसदखानाने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविडे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या अडीच हजारी सरदारांच्या रांगेत उभा राहिला ला होता. बक्षी आसदखानाने राजांना आणि संभाजीराजांना आणून पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. खरिल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शाहजादे, जाफरखान आणि जसवंतसिंग यांना खिल्लती देण्यात आल्या. खिल्लत घेतलेला जसवंतसिंग मागच्या हटत्या कदमांनी मागे येत, राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता!

“उन्हातान्हातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक? हाच आमचा इतमाम?’ पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसापर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब वीजलाट सरकून गेली!

“स्वागतासाठी मुन्शी येतो! आसनावर बसलेला अकडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही! ज्यांच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर ख्रिल्लती चढतात!’ अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची छाती वर-खाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली! कपाळावरच्या उडत्या, उभ्या शिरेबरोबर शिवगंधाचे पट्टे खालीवर धडधडू लागले! पोत-पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा! थरथरता-उसळता! जाळता!

घुसलखान्याच्या संगमरवरी भिंतीवर रोमांच उठतील, असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले- “रामसिंघ!” दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुवई घोड्याच्या नालेसारखी बाक घेत वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गर्जले, “रामसिंघ!”

हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे, हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसेतरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्याजवळ आला.

समोरच्या पाठमोऱ्या सरदारांकडे हात करून पेटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला सवाल केला, “ये हमारे सामने कौन खडा है रामसिंग?”

“जी वो महाराजा जसवंतसिंग.” रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्याच्या तोंडाला कोरड पडली.

“जसवंतसिंग? हमारे मुल्कसे भागा जसवंतसिंग! इसके पीछे हमें खडा किया तुमने? नहीं! हम ये बर्दाश्‍्त नहीं कर सकते!”

नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला! आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लालेलाल झाली होती. डोळ्यांच्या आत गाजरी रंगाच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथरत्या कानांच्या पाळ्यांबरोबर सोनचौकडे थरथरत होते. बाकदार नाकशेंड्यावर टपटपीत घामथेंब तरारले होते! केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नार्रिंगी भोसलाई सूर्य उतरला होता!

कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेशवाटेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्यांनी औरंगजेबाच्या आसनाकडे तडक पाठ केली!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment