धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५७…
“महाराजसाहेब!” म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न-बधिर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफुसतं नि:श्ववासत ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला! कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तरातर पाच कदम मागे हटत, पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसेतरी गाठले! त्यांचा हात हातात घेऊन तो गदगदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, “सुनिये तो राजासाब!”
“कभी नहां!” म्हणत राजांनी त्याचा हात सरळ झिडकारून टाकला! तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला. भेदरलेले संभाजीराजे “महाराजसाहेब! महाराजसाहेब!” अशा सादा घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत आले. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला! संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सदरजोत्यावर आले. क्षणभर थांबले.
मावळमुलखातील – पुरंदर, राजगड, प्रतापगड कुठल्याही गडवास्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते, असे विचित्र दृश्य त्या संगमरवरी सदरेला बघायला मिळत होते! वर राजसंतापाने थरथर कापणारे “शिवाजीराजे’ आणि खाली त्यांचा हात धरून भीतीने थरथर कापणारे “संभाजीराजे’ असे ते विचित्र दृश्य होते! सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हातांनी डोके गच्च आवळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एका हाताची मूठ वळलेली होती. तीत दरबारी पानविडा होता फसफसणारा श्वास त्यांचा त्यांनाच जाणवत होता!
दरबारात गडबड मचली होती. जाफरखानाकडून औरंगजेबाला कळले की, ‘सेवा खिल्लत के लिये खपा हो गया।! त्याने मुलतिपखान, मुखलिसखान आणि आखिलखान यांना आज्ञा दिली, “सेवाला ख्रिल्लत देऊन शांत करून आत आणा.” ते तिघेही बंदे राजांच्याजवळ आले. त्यांना खिल्लत घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, “पाहिजे तर तुमचा बादशहा माझा खून करू शकतो. पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही!”
औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला विचारले, “क्या हुआ रामसिंग? सेवा खपा क्यों हो गया?”
“हुमारे मुल्क के गरमीसे उनकी तबियत बिघड गई हे, आला हजरत!” रामसिंगाने राजकारणी उत्तर दिले!
औरंगजेब हसून म्हणाला, “अपने मुकामपर उसे पहुंचा दो!” “जी हुजूर,” म्हणत रामसिंग बाहेर आला.राजांच्या घामेजल्या हाताच्या मुठीत आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला. संभाजीराजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता. थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली. रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला. “महाराजसाहेब, आपल्या मोजड्या.” संभाजीराजांनी त्यांना आठवण करून दिली! कुणाची वाट न बघता संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्यासमोर आणून ठेवल्या! राजांनी मोजड्यांत पाय भरले. रामसिंगाच्या मोतहारांच्या ताब्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजीराजांनी मांडेखाली घेतली. रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजे झाला प्रसंग आणि राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते – “आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता! आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता! प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता, तर त्याही भेदरल्या असत्या!’
राजे आणि संभाजीराजे लाल किल्ल्यावरच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले. आपल्या मनोऱ्यांचे डोळे करून मुमताजची कबर असलेला ताजमहाल त्यांच्याकडे बघत होता. आज तो धन्य झाला होता. दारा, मुराद, सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना जे जमले नव्हते, खुद्द शहाजहानला कधी साधले नव्हते, ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते! औरंगजेबाच्या पन्नासाव्या सालगिराचा रोशन झालेला दिवस सांजावून आल्यामुळे निसूर होत होता!! रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहऱ्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता. रामसिंगाच्या चाकरांनी खुशबूदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले. दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद्द मिर्झा राजे जयसिंग आणि ताहिरखान जिथे उभे राहत, ती जागा होती ती. हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता. पण आता बाण सुटला होता.
“भाई, तुम फिक्र मत करना।” राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली. कधी नव्हे ते “भाई ‘ हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणूनबुजून वापरला! अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले. रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठविली. राजांनी त्याला सरोपा बक्ष केला. रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशाह आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले. बल्लूशाह राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खूश होता. तो अदबीने राजांना बादशाही दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशाह आणि गिरधर निघून गेले. चिराखलागणीची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो ‘मगरीबची नमाज ‘ पढायला निघून गेला.
या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जाफरखान, जसवंतसिंग, मुर्तुझाखान, शास्ताखान आणि त्याची बहीण जहानआरा यांनी आग्रहाने औरंगजेबाला ‘बदतमीज सेवा’ला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला!
औरंगजेबाला चीड आली होती, ती राजांनी ‘खिल्लत’ साफ नाकारल्याची. त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची. पण तो बाहेरून शांत होता! नमाज पढता-पढता त्याने दोन गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. ‘सेवा’ला दरबारी पेश यायला भाग पाडायचे. खिल्लत पांघरायला लावायची. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे! तेथून तो सलामत परतणारच नाही! आणि हे सगळे नाहीच घडले तर – तर मुल्लामौलवींच्याकडून सेवाच्या बदतमिजीचा कथला तय करवून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची! आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता!
औरंगजेबाने आग्ऱ्याचा कोतवाल फौलादखान याला दाद फर्मावली. तो परतीतराय नावाचा हरकारा बरोबर घेऊन पेश झाला. औरंगजेबाने त्याला हुक््म सुनावला – “रामसिंगको बतावो कि सेवा को समझाकर कल दर्बार ले आना)” फौलादखान आणि परतीतराय किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले. त्यांनी आपल्या आलिजाचा हुक््म रामसिंगाला सुनावला. रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना “बादशहा सलामत'”ची भेट घेणे किती आवश्यक आहे, ते सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले.
सगळ्या आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिराळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिर्बिबांची बाग उठली होती. राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते. राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणवून गेले – यांना नको होतं बरोबर आणायला!’
“जगदंब! जगदंब!” पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पितापुत्र काही न खाता यमुनाकिनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दरबारी झालेल्या प्रकारची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते – “जो शाहजादा दाराका हुआ, मुराद-सुजाका हुआ, वही दख्खनी “सेवा’का होगा।”
दुसऱ्या दिवशी उन्हे कासराभर वर सरकली, तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी रावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले,
“आम्हास ज्वर धरला आहे!” ती बातमी परस्पर रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की.
“राजासाबका बुखार बनावटी है!’ पण ‘तुम्हाला बुखार कसा चढला?’ असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता! त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की, ‘शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही! राजांनी रघुनाथपंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठविला, “हम बिमारीसे मजबूर हे। हमारे फर्जंद संभाजीराजाको दरबार ले जाना।” आता मिळेल तो माणूस अक्कलहुशारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्ऱ्यातून सुटूच शकत नव्हते.
सगळ्यांत मोठे हाल होते रामसिंगाचे. त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यांत मोठी कसोटी होती संभाजीराजांची! ते राजांच्याबरोबर आलेल्या सर्वांत कमती उमरीचे होते. परक्या मुलखात होते. आणि आता तर ते सारेच प्राणसंकटात होते. आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हरभातीच्या सावध सूचना देत होते. “ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात, तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंगचाचाला विनंती करा! बादशहाने काही विचारले तर न कचरता जाब द्या. हिंदोस्तानी बोली जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या असामीची ओळख करून घ्या.” त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होते, “राज्यासाठी द्यावी लागली, तर जुनी पिढी खर्ची द्यायची असते. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीने.”
संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबारी नेण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, “येतो आम्ही महाराजसाहेब.”
““अं” राजे ठरल्याप्रमाणे कण्हले.
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५७.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव