धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५९.
घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्यांच्या रजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजे आणि रामसिंग यांचा घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की, रामसिंग, राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यांत तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या ‘मेहमान स्वाऱ्या’ सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील, याचीच रामसिंगाला फिकर लागली. तिला दोन कारणे होती; एक तर दिला शब्द पाळणे, हे रजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की, जर राजे आणि संभाजीराजे यांच्या जिवाला काही धोका झाला तर आपले दख्खनेत असलेले “पिताजी’ मावळ्यांच्या जानकुर्बान झडपीतून सुखरूप परत येतील की नाही, याची रामसिंगाला काळजी पडली! जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आग्ऱ्याच्या उरावर रोखून धरले होते! तिचा तरी काय इलाज होता? राजे-संभाजीराजे तर तिचे भुत्येच होते. पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता! तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते.
औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठविण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखविला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगळला. राजांनी औरंगजेबाचा वजीर जाफरखान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन त्याला किमती नजराणा दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही. दख्खनेतून मिर्झा राजाची औरंगजेबाला पत्रे येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले –
“तुमने दखनी सेवाको कौन कौनसी बयत जबान दी है? सिलसिला बयाजवार भेज देना!”
राजांच्या हाती आता एकच चाल राहिली. औरंगजेबाला आपले कलमकसदार विनंती अर्ज पेश करणे!अमीनखानमार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठविला – “पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले, तर मी दोन कोटी रुपये दरबारी पेश करीन! मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जद संभाजीराजे यांना मी आग्ऱ्यातच ठेवून जाईन. बादशाह चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापुरावर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन! वख्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून आलिजांपाशी माझी चाकरी रूजू करीन!”
अमीनखानाने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफरखानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जाफरखानाने अर्ज जिले सुबहानी औरंगजेबाला पढून दाखविला. हातची माळ थांबवून औरंगजेबाने अर्जातील शब्दन्शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वत:च्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे चार मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते!! वाकलेल्या जाफरखानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, “जाफर, देखो ‘सेवा’ कितना इनायती है! शाही सूरतके तीन कोट रुपीया हजम करके हमें दो कोट बक्ष दे रहा है!!” आणि तो काहीतरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्यासह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारिये बाहेर पडले.
मोकळ्या “दिवाण-इ-खास’मध्ये फक्त कनोजी धूपाची वळी तेवढी फिरत राहिली!
रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले.
“क्या हुआ रामसिंग हमारे अर्जीका?” राजांनी रामसिंगाला विचारले. “कुछ राय नहीं दी आलिजाने आपके अर्जीपर राजासाब। हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिकर मत करना।” रामसिंग किती केले तरी रजपूत होता!
थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच, नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर ध्स्यय घेऊ लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले “रघुनाथपंत, बादशाह कोण चालीचा फैसला करील आमच्या अर्जाचा?” राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले.
“बाळराजांना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे. तेवढ्याचाच काही नतिजा निघेल असे वाटते, स्वामी!” कनातीजवळ उभे असलेले रघुनाथपंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना मासाहेबांचे शब्द आठवले – “प्रसंग पडला तर समयी राज्यासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राज्याची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत!”
संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले. त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने. एकाएकी वळिवाच्या ढगांची आकाशाच्या नगाऱ्यावर टिपरी घुमते, तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणारी असंख्य घोडटापांची टिपरी अचानक सर्वांच्या कानांवर आली! राजे चमकले. संभाजीराजे ताडकन मंचकावरून उठले. दोघांच्याही टोपांतील मोतीलगी थरथरल्या!
डेऱ्याबाहेर असलेला रामसिंगाचा पहारेकरी नंग्या हत्यारानिशी घाबराघुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले, भेदरलेले रघुनाथपंत, त्र्यंबकपंत, निराजी तिघेही हत्यारे उपसून आत आले. सर्वांचे गुंतवा झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानांवर एकदम आदळले. “घात झाला धनी! हबशी हत्यार चलाने आ रहे है। भा गो! पळा!भागो!”
बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तबकात ठेवलेली “भवानी’ उचलण्यासाठी त्यांनी पायझेप टाकली, पण संभाजीराजांची आठवण येताच ती पुन्हा मागे घेतली! एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटाळले! एक – एकच क्षण निघून गेला. पण – पण तेवढ्या अवधीत राजांच्या मनी विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बांध फुटले.
“श्रींचे राज्य… कामी आलेले इमानबंद जीव… दह्याच्या कवड्या… मासाहेब…मिर्झा राजा… फर्मानबाडी… भंडाऱ्याची परडी… उचलला गेलेला कैलास… एकला जीव…भुयार… शिवलिंग – पेटता हुडवा’ विचित्र-विचित्र दृश्ये राजांच्या डोळ्यांसमोर त्या क्षणात दाटवा धरून गेली. कैक हबशांचे निर्दय वार आपल्या आणि संभाजीराजांच्या आता अंगावर पडणार या कल्पनेने राजे अंगभर चरकले. सगळे डाव अपुरे असताना, परमुलखी एका गाफील क्षणी; एकुलत्या एक पुत्रासह कत्तलीचे केविलवाणे मरण! सर्वस्वाची राख! शतरंजचा हा फसलेला डाव! नामुश्कीची शिकस्त! राजांचे सूर्यपेट डोळे कडकडीत काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एकजीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठांतून मायेने थबथबून गेलेले घोगरे शब्द ओघळले, “लेकरा, घात झाला! आम्ही फसलो!”
तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते, तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांना हातांच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठवून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्याच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. “महाराजसाहेब!” म्हणत त्यांनी आपले तोंड राजांच्या जाम्यावर घुसळले. ते फर्जंद-आबा थरथरत होते. काळ्याभोर ढगांच्या तांडवात सापडलेल्या वीजरेघांसारखे!
क्षणात डेऱ्याभोवती बेफाम दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडा पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कातऱ्या ख्रिंकाळ्या घुमल्या. पाठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट, केसाळ हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पत्थरी रंगाचा, हनुवटीकडे पडलेल्या जाड ओठांचा आग्ऱ्याचा धिप्पाड, हबशी फौजदार सिद्दी फौलादखाँ डेऱ्यात घुसला. आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की रुतवीत दरवाजाजवळच तो थांबला. आपले भोकरांसारखे बटबटीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनुवटीकडे पडलेला जाड ओठ खोलला, रुंद दात चमकले – “मेरे हथियारबंद हशमोंका पेहरा तुमपर लगा हे। किसीको भी मिलना तुम्हे सख्त मना है। ये हुक््म हे आलिजाका, खयाल रखना” त्याच्या जाड भुवया क्षणभर आक्रसून फिसकारल्या. खांद्यावरच्या झगझगीत, हिरव्या खिल्लतीचा उजव्या कोपराने पिसारा फुलवून टाकीत, जबाबाची वाट न बघता फौलाद वळला. आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा, तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला!
पाच हजार धिप्पाड, कडव्या हबशांच्या दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या! तोफांची तोंडे डेऱ्यावर रोखून हबशांनी तोफगाड्यांची मांडणावळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच ‘सिद्दीचा वेढा’ पडला! मावळी सिंह आग्ऱ्याच्या हिरव्या कुरणात अडकला! राजे कैद झाले! औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकींच्या पाठीवर जागती ‘गस्त’ घालू लागल्या!!
राजे कैद झाले, तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लालकिल्ला यांत ये-जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते, त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. ‘धाकला असला तरी, साप म्हणू नये आपला’ हे तत्त्व औरंगजेब विसरला! आणि हे तर मावळी बचनाग! संधी मिळेल तेव्हा सळसळत फणा वर उठविणारे!
राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा ‘मनाशी मनाचा’ तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला. “संभाजीराजांच्यासह आलेल्या साऱ्या असामींनिशी या काळदाढेतून सलामत सुटका! कोण हुन्नर चालवावा? कैसी चाल खेळावी?’ आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत, शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढली!
एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना “’दिवट्याची सलामी’ द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवया वर चढवीत राजांनी जरबेने विचारले, “कशास आलात? चालते व्हा! आमचे आणि बाळराजांचे होणे असेल ते होईल!” राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले.
मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलादखाँ डेऱ्याजवळ आला! त्याला बघताच एकसारख्या फेऱ्या घेता-घेता राजे मावळ्यांवर कडाडले, “काय सांगतो आम्ही? चालते व्हा! तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही. निघा येथून!” राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना “परवलीची खूण’ देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून सोडली! हुशार मावळ्यांनी हा ‘बनाव” हेरला!
“पर आमी जावं कुठं?” खालच्या मानेने दावलजी घाटग्यांनी विचारले.
“कुठेही जा. देशी जा. निघा.” राजे फेऱ्या घेतच राहिले.
“क्या हुआ?” सिद्दी फौलादखांने आत येत राजांना विचारले.
“चाकरी करते है! कैदीकी चाकरी! खान, इन लोगोंका बौज हमपर किसलिये? जाने दो इन्हें। मै आलिजाको अर्जी पेश करता हूँ। दे दो दस्तक इनको!”
राजांनी फौलादखांमार्फत औरंगजेबाला आपली “शिबंदी’ परत पाठविण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला!
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५९.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव