महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,65,972

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६०

By Discover Maharashtra Views: 2566 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६० –

बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेषांत आग्ऱ्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते “बहिर्जी’, पण कुणालाही ऐकता येणार नाही असं “खाशा गोटा’तील ऐकण्याएवढे त्याचे कान “तिखट’ होते! नाव “बहिर्जी’ आणि कृती “बहुरूपी’ असा तो मामला होता!

“मला रामसिंगाच्या तळावरून हलवा.” असा एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. “रामसिंग हमारा कदीम चाकर है, वही रहना। ” असा जबाब औरंगजेबाने दिला. “मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीस जाण्याची इजाजत मला आलाहजरतनी द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छा आहे!” असाही एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला. “सेवा’ अवलिया बनना चाहता है। ठीक है। उसे कहना इलाहाबादके किलेपर जाकर बो अवलिया बने रहे। हमारा सुभेदार बहादूरखान उसकी अच्छी हिफाजत रखेगा।” असा जवाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला!

राजांचा आणि औरंगजेबाचा “शतरंज’ एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते; घडू घातले होते, त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत, हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिक अदबीने वागू लागले वेळ मिळेल तेव्हा ‘कुम्हारवाडी “ वाडी’त जाऊन कुंभाराची गाठभेट घेऊ लागले. एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की, बादशहा सलामत ‘पैलवानोंका जंग देख रहे है!’ संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता लकडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दगिऱ्या, चवऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते आग्ऱ्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, “खुदातालने हर किस्म की मिट्टी पैदा की। लाल, काली, सफेद पर हारी मिट्टी कैसी नहीं पैदा की?’ अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मिरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले!

हिरव्या जांगा कसलेले, पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्निस देऊन “या मौलाली” अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौद्याला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दणादण शड्डू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती! मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगासह लकडकोटाजवळ थांबले.

“आता एकदम जिले सुबहानीसमोर कसं जावं’, या विचाराने रामसिंगही थांबला. दोघोही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. “रामसिंग!” बक्षी आसदखानाने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. “क्या है?” रामसिंगाला एवढ्या दिवसांत चारच समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते, तेही निघून गेले!

“आला हजरत पूछते है की, सेवाका ये बन्ना कुश्ती खेलेगा क्या?” आसदखानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तलवारच सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, “बक्षी, उमर तो देखो इनकी।” बक्षी आसदखानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्याला म्हणाले, “हांऊ जरूर खेळू आम्ही हौदा! पण तो या चाकरी ठेवलेल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात! आमच्या जोडीचा ‘शाहजादा’ उतरेल हौद्यात, तर आम्हीही जांग चढवू!”

आसदखानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबाच्या कानांवर घातली! बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. “आसद, उसको पैलवानकी ठंडाई देना।” एवढेच औरंगजेब म्हणाला आणि “आपले शहजादे कसे निपजतील?’ या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पढायला आपल्या महालात निघून गेला!

राजगडावरच्या देवमहालात शाळिग्रामी शिवलिंगासमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुन्न, बधिर, काजळकाळ्या संध्याकाळीसारख्या! “बाळराजे आणि राजे आगरियात कैदी पडले.” ही खबर कानांवर पडताच आपले काळीजच कुणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे, असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी, थरथरत्या हाताने त्या एक-एक बिल्वपत्र शिवर्पिडीवर अर्पित होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता. शंभर-शंभर बेलपानांची तबके धाराऊ त्यांच्यापुढे गोंदल्या हाताने आणि काळवंडल्या मनाने सरकवीत होती. एका तबकातील बिल्वदले संपली की, खुणेसाठी एक सोनेरी मोहर उचलून बाजूच्या ताम्हनात ठेवीत होती.

“शांतता? हा शब्द मनोमन उठविला तरी भंग पावेल एवढी भयाण शांतता देवमहाली पसरली होती! लटकत्या नंदादीपातील करंजेल तेलाशी वातीचे भांडण झाले, तर तेवढाच ‘चर्रर’ असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धाराऊच्या काळजाला तो चिरत जात होता! शिवर्षपिडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या ओठी आणि उघड्या डोळी वितंड-भांडण मांडले होते!

एक-एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक-एक कप्पा उलगडत होता. शेकडो, हजारो कप्पे!

“किती-किती फसगमत करावी तू आमची आई! थोरले संभाजीराजे तू आमच्या ओटीतून कनकगिरीवर हिरावून नेलेस. होदिगेरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळी घेतलंस! राजांना पुत्रलाभ झाला यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाहीत, तोच तू आमच्या थोरल्या सूनबाईना जवळ केलंस! आणि – आणि आज – “जे-जे आम्हांस आवडावं ते-ते तुझ्या डोळ्यांत भरतं! मग – मग नेमक्या आम्हीच कशा नाही भरत तुझ्या डोळ्यांत? की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडासमोर नकोशा झालो? बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तू आमच्या कंठाशी आणून लावणार? का मांडावी तुझी पूजा आम्ही? “नाही हे थांबविणे आहे!! आमच्या राजांच्या-बाळराजांच्या केसास धक्का लागला, तर बरे समजोन असणे! आम्ही तुझाही मुलाहिजा नाही धरणार!!’

आग्ऱ्याचा तावला मुलूख गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला, ताजमहाल, हवेल्या, कोठ्यांवर रपरपत कोसळू लागला. पहारा देणे सोयीचे व्हावे, म्हणून फौलादखाने राजांना रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत हलविले. खुल्या मैदानात शामियान्यात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांच्या मनी विचारांचा पाऊसकाळा कोसळू लागला. सरींवर सरी, विचारांवर विचार धावणी धरू लागले.

आणि – आणि खुद्द आपल्याच माणसांना हबका बसावा, असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले! आजारी माणसांस अधिक सावधानगीचे उपाय सुचतात!

पहाऱ्यावरच्या हबशांनी, “मरहठ्ठा बेमार हो गया” ही खुशीची खबर परस्पर फौलादाच्या जाड कानांत नेऊन सोडली! राजांची पूळताछ करायला तो कोठीत आला.

“सुना है तुम्हारी तबियत बिगड गयी है?” जाड, काळ्या ओठांवरचे फौलादचे भोकरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हबशी घोडेपारखी बघतो, तसा फौलाद राजांना निरखू लागला! तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुन्यावर घेणारे घोडे कण्हते, तसे राजे बेमालूम कण्हले! उभ्या चर्येवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले! तो कातळकठोर सह्याद्री छातवान गदगदवून अमळ खोकला!

“खान, आम्हास आमचा भरोसा लागत नाही! जिवाची घालमेल होते आहे! आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हांस फेड करू द्या! आम्ही खैरियत करावी म्हणतो! मेवामिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच!” धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातांत गच्च धरल्या. खाली मान टाकून, “पापां’चा बोजा शिरावरून झटकण्यासाठी आपली आपणालाच नफरत वाटते आहे, अशी बेमालूम डावी- उजवी मान डोलवली! खान डोळे ताणून बघतच राहिला. शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले!

“आम्हास खैरियत देण्याची इजाजत आलिजासाहेबां कडून मिळवून द्या खान.एवढी – एवढी मेहरबानगी करा आमच्यावर!” वेदना असह्य झाल्यासारखे भासवीत बुरुजाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत, “जगदंब, जगदंब’ म्हणत उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६०.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment