महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,665

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१

By Discover Maharashtra Views: 2528 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१ –

राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला!

“जरूर… जरूर हम कोशिश करेंगे!” खानाचे जाड, निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या. औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली! आग्ऱ्याच्या “मेवामंडी’तून मध्यम माटाचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंकपंत आणि निराजीपंत ते “दस्तुरी-स्पर्शा’साठी कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्दी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की, रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होताहेत?

उभ्या आग्रा शहरात राजांनी हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मोकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठ्ठास मिठाई खाताना सराई-सराईतील फकीर आणि आग्रेकर आस्मानाकडे हातपंजे उठवून दुवा देऊ लागले – “खुदा बिमारको सलामत रख्खे!!” बाहेर आग्ऱ्याचे आस्मान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असह्य काळढगांनी येरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघारा हटत होते. त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या, बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. ‘खरंच महाराजसाहेब आजारी आहेत?” क्षणात एक, तर क्षणात दुसरी अशा शंकांत त्यांचे मन फटका खाऊ लागले.

राजांनी त्यांच्या मुद्रेवरच्या शक-अंदेश हेरला… हळुवार उठून संभाजीराजांच्या कानांतील चौकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाटवेळच्या थंड वाऱ्याने दवर्बिदू उमटावेत, तसे राजांचे सावध मोतीबोल संभाजीराजांच्या कानांत उतरले, “काळीज टाकू नका! आमची बिमारी बनावटी आहे! इथून सुटणे आहे आम्हास, आणि तुम्हासही रामसिंगचाचाकडे येणाऱ्या हर असामीचा बोलन्बोल कान देऊन ऐकत चला! कुंभाराच्या बाडीचा राबता तोडू नका! सावध असा!”

“जगदंब जगदंब,” असे पुटपुटत, राजे कण्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले. आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले! कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत, अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढविली.

“दो पंडत आये है। अंदर पेश आना चाहते है। आलिजाने उनको इजाजत दी है।” कोठीच्या दरवाजावर पहारा देणारा रामसिंगाचा नाथावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला.

“भेज देना.” राजे पलंगावरून न उठताच म्हणाले. नाथावत उत्तर हिंदोस्तानी, ब्राह्मणी पेहराव केलेल्या दोन इसमांना घेऊन कोठीत आला. त्यांतील एक होते, कवींद्र परमानंद आणि दुसरे होते, अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले, “लेटते रहना स्वामिन्‌।”

राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आग्ऱ्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी, असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला! एकाच हेतूने की, “बिमार सेवा’ला हे “पंडत’ आयुष्य नश्वर आहे, हे काफरी पद्धतीने अधिक चांगले पटवू शकतील!

परमानंदांनी राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावर उठून बसले.

“ये कनोजके कविवर हे। कवि कुलेश।” परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला. आणि म्हणाले, “बडे सुभागसे आपके दर्शन हुए।” संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक-एक शब्द म्हणाले, “हमारे फर्जद – संभाजीराजे.” संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले. कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघताना मनोमन वाटले की, “कालीमाता दुर्गाभवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्यातरी अज्ञात काव्याचे हे दोन सर्ग आहेत! एक पुरा – दुसरा पुरा होऊ घातलेला! आज ते पुसून टाकण्यासाठी औरंगजेबाने आपला मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण?’ शस्त्रधारी दुर्गची मूर्ती डोळ्यांसमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वत:लाही ऐकू येणार नाही असे नकळत पुटपुटले – “रक्ष-रक्ष दुर्गशनंदिनी!”

राजांनी दोघाही कवींशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कविवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीने नमस्कार केले.

“हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फीलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत!” राजांनी हिरोजी फर्जदला हुकूम फर्मावला.

“जी सरकार.” हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहवून परमानंद अदबीने म्हणाले, “स्वामिन्‌, हमें हाथियोंसे क्या लाभ?”

“कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो! आपणच मार्ग दाखविला पाहिजे! हत्ती मार्गी लावले पाहिजेत! आमचा भार हलका केला पाहिजे!” राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले! परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले.

“जैसी आपकी आग्या।” म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठीबाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकाविला. त्यांच्या काना-मनात राजांचे बोल फिरू लागले – “ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा राबता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत!”

संभाजीराजे आपल्या महाराजसाहेबांचा पाय हलक्‍या हातांनी चेपू लागले. कोठीत राजांचे ‘आजारपण’ चढत्या अंगाने रंगू लागले! “हा भार आता सोसत नाही. आई कोण सत्त्वपरीक्षा ही? ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नाबाचा “उदो’ करीत आम्ही पाजळले पोत नाचविले. आणि तू…? तू आमचे ‘आऊपण’ भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे? तू साऱ्या जगाची आऊ’. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो, तरी आम्ही पोरक्‍्याच कशा? घे, तू उधळलेला या जिवाचा भंडारा आता तुझ्याच आठी हातांनी तुझ्याकडे परता घे! नाही! हा भार आता सोसत नाही!’

धुनीतील बाभळगाठ तडकत जळावी तशा जिजाऊ असह्य कढांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणाऱ्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात “शिवरून’ पडत होत्या. त्यांच्यासमोरची जगदंबा समया, नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत-शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले “अभद्र प्राशून टाकण्यासाठी तिने विस्फारलेले थोर मोठे डोळे बघताच जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या-मनाच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे ताम्हन पालथे करून थंड-थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले! त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशुच रिकिबीत जखडवून त्यांना फरफटवत दूर घेऊन गेला! जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेचे विशाल, फाकले नेत्र बघताना जिजाऊंना बाटले – ‘नरमुंडाचा सोस असलेली तू! तू हे डोळे ताणून रोखले आहेस तेच माझ्या राजा-बाळराजांवर!!!’ बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळी थाळी थडथडत, थरकत, थपडा खात पायथ्याशी उतरावी, तसे जिजाऊंचे मन त्या चरकविणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलाव्यात तडफडत कोसळत गेले!

“नाःही! हा भार आता सोसत नाही!’ म्हणत कावऱ्या-बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असहायपणे देव्हाऱ्याच्या पायजोतावर आपला असहाय, उजाड माथा टेकला! तोही जगदंबेसमोरच! धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर टेकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाझरू लागले. प्रतापगडीच्या गोंधळ्याच्या हातातील पोत गडवाऱ्यावर थरथरतो, तशा त्या अंगभर गदगदू लागल्या. भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला “मासाबास्री’ कशी साद घालावी कळेना. रंजुकीत खिळा ठोकलेली तोफ नाकाम होते, तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला, भरला गोंदला हात गदगदत जिजाऊंच्या पाठीवर ठेवला! तिच्या डोळ्यांतून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवलेल्या ताम्हणात पडताहेत याचे तिला भान नव्हते. त्या ताम्हनात वाहिलेल्या बेलपत्रांची खूणगाठ पटावी म्हणून तिनेच एक-एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या! आता ते ताम्हन भरले होते. त्या मोहरा धाराऊच्या मावळी अथूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते; पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भारल्या नजरेने बघत होत्या.

आपला गोंदला हात जिजाऊंच्या पाठीवर ‘सांतवना’ साठी ठेवलेली धाराऊ होती संभाजीराजांची “दूधआई’! तिचा हात पाठीवर असलेल्या व माथा जगदंबेसमोर टेकलेल्या होत्या जिजाऊ – राजांच्या आऊसाहेब! आणि त्या दोघींच्या पाठीवर आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत उभी होती जगदंबा – उभ्या मावळाची आई!!

“बेताला पक्का’ असलेल्या औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला! राजांच्या कत्तलीचा!! आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलादखाँकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हबशी नंग्या हत्यारांनिशी घुसवायचे होते. जी काफर दारा शिकोहची झाली, तीच गत “दख्खनी काफर मरहट्ट्याची’ होणार होती! मग रामसिंगच्या गळ्यावर तो वीतभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता – ‘बेमार ‘सेवा’ गुजर गया!!’

जसे फर्मान घेऊन आग्ऱ्यातून “शाही सवार’ सुटले होते, तसेच राजांची ‘वस्त्रे’ घेऊन सांडणीस्वार मग मजल दरमजल करीत दख्खनेच्या रोखाने सुटणार होते! खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास ‘विश्वासू’ सरदार त्यांच्याबरोबर घोडा फेकीत जाणार होता. एका उजाड माथ्याच्या ‘म्हातारी’समोर राजांच्या वस्त्रांचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता – “आलिजाने दवादारूकी जारी कोशिश की! मगर बस ना चला! राजासाब… राजासाब खुदाको प्यारे हो गये!!” आणि आपल्याच मकानातले कुणीतरी “गेल्यासारखे’ दाखवीत तो हात बांधून गर्दन “’मातमीच्या दु:ःखाने’ खाली टाकणार होता!

मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलायला वेळ लागणार नव्हता! मागे ‘राखलेल्या’ ‘संबूर्ला मग “शाहजादे, संबूराजे’ असे हाकारत मुल्लामौलवींकडून मोगली रिवाज पढविणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाक देऊन वळविता येतात!

दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताच, जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या “सेवाच्या बल्चाला – संबूराजाला’ बरोबर घेऊनच लाखभर प्याद्यांसह मग दख्खनेत उतरता आले असते – राजरोस! खुद्द आपल्या बैठकीच्या “शाही हत्ती’वरच्या हौद्यात ‘संबूराजा’ला बसवून घेऊन, ढोल-ताशांची तडतड उठवीत मराठी मुलखात औरंगजेबाला दवंडी पिटता आली असती – “तमाम मुफलिसोंको जाहीर हो बादशहा सलामत राजा सेवाजी की “’अमानत’ लाये है! अदब-अदब!!”

औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा बीतपशील ‘शाही’ बेत होता!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment