महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,400

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६२

By Discover Maharashtra Views: 2514 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६२ –

औरंगजेबाने राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी “दस्तके’ देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता, आणि स्वत:च्या कब्जात घ्यावयाचा होता. राजांची माणसे आग्ऱ्याबाहेर पडली. राजांनी रामसिंगामागे ‘जामीनकीचा कतबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान गुंतवू नका’ असा लकडा लावला. नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जमानकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही, हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला!

“बिमारा’साठी “दुवा’ मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्यावेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहतर, तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठीबाहेर पाठवीत होते. “बाळकृष्णा’सह यादवनायक वसुदेव मथुरेतून, धो धो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकारा अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो ‘कृष्णअष्टमी’चा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. “पण हे सारे जमावे कैसे? पेटाऱ्यात बसून?’ राजांच्या जागत्या, उघड्या डोळ्यांसमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल! दिवट्या! हूल! हूल! ‘गनिमांस पेटारियांची हूल!’ राजे विचारासरसे झटकन पलंगावर उठून बसले! हेरो पडला! पाणी!” हिरोजीला राजांनी आज्ञा केली. पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजांच्या समोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्याच्यावर नजर गेली. आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले. दर्पणात बघितल्यासारखे! हिरोजी राजांचा अनौरस बंधू होता. त्याची शकल राजांशी मिळतीजुळती होती! हनुवटीभर राजांच्या सारखी निमुळती दाढी फिरली होती

एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला! माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला – “आमचा पेहराव अंगी चढवून हिरोजी आमच्याऐवजी या पलंगावर चढेल औरंगशाचा दरबारी “बिमार’ म्हणून! आम्ही हिरोजीचा मावळ वेष अंगी चढवू. “हिरोजी’ म्हणून! पुढे? पुढे आई माग देईल तसे!’ “महाराज, पानी!” गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचा आठव करून दिला. मान वर करून नरड्याची घाटी वरखाली दौडवीत राजे पाणी प्याले. गडवा हाती

देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, “हिरोजी, आमचं चालणं-बोलणं, उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे! मोठा हुन्नर कार्यी लावणे आहे.”

वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल, असे करकरते तसा हिरोजीच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला – “जी.”कमरेचा शेला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, “आता पेटारे येतील. त्यातल्या एकात हा ठेवून द्या! त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटाऱ्याबरोबर तुम्ही शी जा. घडेल ते आमच्या कानी घाला.”

“जी.” हिरोजीला राजांचा अंदाज येईना!

ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी-स्पर्श केले. हिरोजीने राजांचा शेला एक पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल, असा बेमालूम सरकविला! कमरेत झुकून राजांना अदबमुजरा घालीत हिरोजी पाच कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठीबाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला. कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि सिद्दी हशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटे डोळे ताणीत भोयांना दरडावले, “ठायरो!

खोलो ये!” त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला. भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकविला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशमाने शेल्याचे टोक हातात धरून तो सर्रकन बाहेर खेचला… “खाली करो ये सब)” पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली! एखाद्या “लड्डूत’ सेवा बसलेला नाही, याची खातरजमा करून घेतली!!

राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते! सिद्दी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेतच होते. घेणार होते. आग्ऱ्यावरून चढून आलेली श्रावणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटत परतीला लागली. दरबारातून बाहेर आलेल्या रामसिंगाचे घोडेपथक लाल किल्ल्याच्या बडया दरवाजातून बाहेर पडले. रामसिंगाचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्याच्या कपाळीचा राजपुती टिळा आक्रसत होता. त्याच्या बगलेला धरून एका जातवान घोड्यावर मांड घातलेले संभाजीराजे कायदे पेलत धिम्या चालीने दोडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मागे राजपुती घोडाईत धावणी धरून होते.

औरंगजेबाने खूब होशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी तो रामसिंगाच्या कानी आज घातलाच. उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला – ‘जुम्म्याच्या पाक’ दिवशी “नापाक’ राजांना या जगातून पाठविण्यात येणार होते ‘जहन्नमच्या’ दरबारातली खिल्लत घेण्यासाठी! पथकाची घोडी दुडकत दौडत होती. मानी रामसिंगाचा जीव मान फासात अडकल्यागत घुसमटत होता. घोड्याच्या खूर टापांचा आवाज त्याला विचित्र वाटू लागला.

“उद्या तुम्हाला हलविण्यात येणार. खबरदार असा.” हा निरोप राजांना कोठीत पोहोचायला हवा होता. आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोहोचवावा?

रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबाराने ‘मनाई’ घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोहोचविण्यात कुसूर झाला, तर नतिजा ठरलेला होता. माथ्यावरच्या रजपुती टिळ्यावर एक जन्मभराचा काळा डाग पडणार होता! रामसिंगाची हवेली आली. मोतदारांनी झटकन पेश येत, सवाऱ्याची घोडी ओठाळ्या धरत आपल्या ताब्यात घेतली.

मध्यभागी असलेल्या रजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसविले. महालात अस्वस्थ येरझाऱ्या घेणाऱ्या रामसिंगाची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन, हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रिते करीत एक लोंबता, असहाय नि:श्वास सोडला. संभाजीराजे रामसिंगचाच्यांची घालमेल बघून बैठकीवरून उठले. त्यांच्याजवळ जात म्हणाले, “चाचा, कोण प्रकारची तकलीफ?” रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्यांच्या खांद्यावर आपले हाततळवे चढवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यांत बघत राहिला. त्यांच्या कपाळीचे दोन दळी शिवगंध बघताना रामसिंगाला कसलीतरी अजब मसलत स्फुरून गेली. “चंडी चंडी” ओठांतून शब्द सुटले त्याच्या. संभाजीराजांचे खांदे घट्ट आवळून टाकीत तो म्हणाला, “कवर, चला हमारे साथ!” संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देव्हाऱ्यात पूजल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माथा क्षणभर देवीसमोर टेकविला. झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद टाकून बंद केले.

रणचंडीच्या पायांवरचे एक त्रिदली बेलपत्र उचलले. त्याची दुबाजूची दळे खुडून संभाजीराजांच्या हातात ते ठेवताना रामसिंगाचे डोळे भरून आले.

“कंबर, बडे होशियारीसे सुनना। आज रात कोठीमें राजासाबको मिलना। कहना, कल तुम्हे कोठीसे हिलाया जायेगा। ये बेलपत्ता उन्हें देना! कहना, एक सिर्फ – एकही पत्ता बाकी रहा!!” गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले. त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मनी कुठेतरी खोलबटातून आल्यासारखे शब्द घुमले – रजपूत म्हणजे “राजाचे पुत्र’! आम्ही रजपूत आहोत! तुम्ही रजपूत आहात. आणि – आणि रामसिंगही रजपूत आहे!!’ रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगाच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झा राजाच्या छातीवर होते, तसे “हिरवे पदक’ नव्हते!

रामसिंगाच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराजसाहेबांची पायधूळ घेऊन त्यांनी कोठीभर आपली सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोनाड्यातील टेंभे आपल्या उरातील उजेड उधळीत अंधाराला दूर पिटाळून जळत होते.

“बसा!” पलंगावर लेटल्या राजांनी हाताचा पंजा बिछायतीवर थोपटला. संभाजीराजे अदबीने राजांच्या बिछायतीवर टेकले. व्व्ीत  जळत्या टेंभ्यांना धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाजावरचे रजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यारे पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या येरझाऱ्या घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजे आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या. पुन्हा दूर जात होत्या.

“थाळा घेतलात?” राजांनी मायेने विचारले.

“जी!” संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला.

“महाराजसाहेब…” पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवट कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा, तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले – “रामसिंगचाचांचा सांगावा आहे. तुम्हास उद्या बादशहा कोठीतून हलविणार! ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, “एक – सिर्फ एकही पत्ता बाकी है!”” संभाजीराजांनी ते एकदळी बेलपान राजांच्या हाती ठेवले. दिवसभर भरघाव दौड घेऊन, रात्री पागेत ठाण झालेल्या, मिटल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हारीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंग फणा उभवीत, फुत्कारीत घुसताच ती घोडी जशी खूर खटखटून उधळतील, तसे राजांचे सारे दबले विचार क्षणात उफाळले! कोठी बदलणे म्हणजे कत्तल! केविलवाणे मरण! झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्यांनी आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजांना एक बालभुत्या दिसू लागला. “भवानी राजा उदं” म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या ठेक्यावर पोत नाचविणारा. हरभट ज्योतिष्याचे भाकीत बोल राजांच्या कानांत दौडून गेले, “हा उंच गडकोटावर राहील! प्रलय माजवील!” संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुणा राजांना गदगदवून गेल्या – “’एकला जीव पदरी घातला!”

राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. चुनेगच्च मनसुबा! ‘आम्ही कोठीबाहेर सलामत पडलो, तर बेहतरच आहे. तसे नाहीच घडले तर – तर हे बाळराजे तरी यवनाच्या दाढेतून सुटलेच पाहिजेत! गडकोटावर राहणेसाठी! प्रलय माजविणेसाठी!’ बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले – “आज तुम्ही कोठीतच झोपा.” संथपणे राजे पलंगावर लेटते झाले. बघणाऱ्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकले. लटके! हिरोजीने पुढे येत थुंकीसाठी तस्त राजांच्यासमोर पेश धरले. तस्तात थुंकून राजे म्हणाले, “हिरोजी, खानसाहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करताहेत. त्यांना इथं झोपू द्या म्हणावं.”

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६२.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment