महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,65,427

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६३

By Discover Maharashtra Views: 2577 11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६३ –

“जी!” तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उगळायला सुरुवात केली. हिरोजीने फौलादखानचा निरोप परत्या पावलांनी आणला –

“म्हाराज, खानसाब म्हनलं – बेशक, बेशक सोने दो बल्चेकू बापके साथ!”

रात्रीने चौक भरला. श्रींच्या राज्याचे पिढ्यांपिढ्यांचे भवितव्य ठरविणारा, अत्यंत सावध ‘गोंधळ’ कोठीत उभा राहिला! घटनांचा, हुन्नराचा धैर्याचा, कसबाचा. मनोमन आईचा ‘उदो’ करीत राजे, संभाजीराजे, हिरोजी, मदारी साऱ्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी ‘चुकूर’ झाला तरी जगदंबा आठी हातांत पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून काढायला मुलाहिजा राखणार नव्हती! पाळणुकीला कठीण असलेले दैवत होते ते! कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पायाशेजारी संभाजीराजे बसले होते. राजांच्या तळपायांना तेलवण चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा उबारा देत कोनाड्यात टेंभे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलू लागले, “बाळराजे असे जवळ या.” संभाजीराजे पुढे सरसे झाले.

“नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका. एकही बाब विसरू नका.” राजे क्षणभर थांबले. मग एकलयीत बोलू लागले. “उद्या सकाळी तुम्ही कोठीबाहेर पडा. चाचांच्या हवेलीत जा. नेहमीसारखे त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार उलगताच ‘तब्येत ठीक नाही. आम्ही निघतो.’ असे रामसिंगचाचांना सांगून सर्जरावांसह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुम्हारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जरावांना दोन घोड्यांनिशी नूरगंज बागेजवळ तयार राहायला सांगा, आम्ही तुम्हांस उदईक कुम्हारवाडीत भेटू! तिसऱ्या प्रहरानंतर आम्ही आलो ना आलो, तरी तुम्ही सर्जेरावांसह आग्ऱ्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत, ती दाखवून मथुरा जवळ करा. ते सांगतील तसे वागा. कमी बोला. आमच्यासाठी थांबू नका.” राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरून गेले – मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई! सावळ्या, पारख्या झालेल्या सईबाई!

सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी दोन वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वदवून घेतले. “आता. झोपा तुम्ही.” राजांनी संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला. नेऊन चौरंगावरच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालव वळवळले. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कुणी सांगावे – ही भेट शेवटचीही ठरली असती! राजांची निमुळती – सडक बोटे संभाजीराजांच्या कुरळ, दाट केसांवरून फिरू लागली. मावळी आभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवीत होते! फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची ‘बिछायत’ मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या. आपोआप मिटल्या. टेंभ्याच्या उजेडात मांडीवर सुख झालेल्या संभाजीराजांना बघताना राजे कशाततरी हरवले. विचार करू लागले – “खरेच भाग्यवान आहात. आम्हाला आठवत नाही, कधी आमच्या महाराजसाहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे! ‘

राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हलकेच बिछायतीवर ठेवली. त्यांच्याशेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी, दंडाची वळी डईखाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला.

“हिरोजी” पडल्या-पडल्या राजांनी दबकेच हाकारले.

“जी” फरसबंदी बोलली.

राजे पलंगावरून खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात, तख्तपोशीकडे बघत बोलू लागले. सगळ्या जिवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला.

“आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या?” राजांनी विचारले.

“जी” हिरोजी हुंकारला.

“पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते, ती ऐकायला जागे राहा. त्या वेळी बादशहा फज़ची नमाज पढतो. रात्रीचे पहारे त्या वेळी गस्त देत पालटतात. त्या वेळी आमच्या जागी ‘तुम्हास’ बिमार म्हणून झोपायचे आहे! तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे. आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाजाकडे पाठ करून कोरे झोपा. उदईक पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठीबाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा. इथे असलेल्या लोड, गिर्द्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोड- गिर्द्यांच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी वख्ती बदलतात तेव्हा शिताफीने तुम्ही कोटी कोठीबाहेर पडा. जमेल तशी दौड घेऊन मुलूख गाठा. गाफील राहू नका. इथे झोपल एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका!” ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्याची विचारचक्रे सुरू झाली. राजांच्याबद्दलचा आदरभाव बाराबंदी तोडून बाहेर येईलसे त्याला वाटले.

“झोपा आता.” पलंगाने फरसबंदीला सूचना केली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेला औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे अस्मानाकडे उडवीत पुटपुटला – “खुदा आमेन! आमेन!” कोंदटलेल्या, पावसाळी आकाशाची कूस फोडण्यासाठी श्रावण वद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला.

“दुडदुड धुमम्म्‌ दुड – दुड – धुम्म” लाल किल्ल्यावर नगारखान्यात ‘सबर’ची नौबत उठली. पहाटवाऱ्यावर स्वार होत, ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली राजे निसबतीने जागेच होते! नौबत ऐकून त्यांनी आग्ऱ्याच्या पहाटवाऱ्याच्या कानांत आपला सर्वांत आवडता व भरोशाचा मंत्र सोडला – “जगदंब, जगदंब!” माणसे असली तरी कुठल्याच देशीचे “वारे’ मात्र बेइमान नसतात! त्यांना एकदा सायवळ करून घेतले की, त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्घोर हाकारता येते! क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा “वसा’ असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला. कवड्या भवितव्याला चकरा देणाऱ्या थोर गुणाच्या! राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली. रजई हटवून ख्वाबगारातून बाहेर पडलेला औरंगलेब वज औरंगजेब वजू करून, मक्केला मुखडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पढू लागला – ‘अलहम्दुल्लिल्लाहे’

“हिरोजी” राजांनी फरसबंदीला साद घातली. संकल्पाने साधनाला हाकारले. “जी” फरसबंदी रात्रभर जागीच होती! हिरोजी बांधल्या आवाजाने उत्तरला.

“मदारी” राजांनी “मदार! टाकलेल्या मदारीला सादवले.

“जी जागा हाय!” जाब आला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोठीभर पुन्हा पसरली. “मदारी, दरवाजाची जागा घे. कुणी कोठीच्या आत डोकावले तर इशारत कर!”

“जी!” मदारी उठला. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजेल सरतीला आल्याने टेंभे सुमार झाले होते. “हिरोजी, पडल्या-पडल्या अंगीचा पेहरावा उतरा.” राजांनी उभा केलेला गोंधळ रंगू लागला. पलंगावर पडूनच राजांनी आपला जामा, आतला तहबंद आणि मांडचोळणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचौकडे, अंगठ्या उतरवून एक- एक करीत हिरोजीच्या हाती दिले. उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते! हिरोजीने आपली बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला. पडूनच राजांनी हिरोजीचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले!

शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांचा साज चढवून हिरोजी तयार झाला होता. “हिरोजी, आम्ही उठतो. सिताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या!”

राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालींत झोपलेल्या संभाजीराजांनी हुस्कारा सोडीत कूस परती केली. हिरोजीने त्यांच्या पाठीवर “मायेचा’ हात फिरवला!

हिरोजीचा पांढरा, सुताडी शेला राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीचे सोनकडे बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड मावळी कंगणी पगडी चढविली ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला – “महाराजः…” राजांनी त्याला धीर दिला. “तुम्ही आता राजे आहात. संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा ‘जगदंब’ म्हणा.”

हिरोजी क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत, डोळे मिटून पुटपुटला, “जगदंब, जगदंब!” हुबेहूब राजेच झोपले होते पलंगावर! ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदबमुजरा घालीत सहीसही हिरोजी त्यांनी पेश केला, “महाराज, मुजरा.” वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुण्या देत बर सारला. डावाही वर घेतला. हिरोजीसारखा! मिश्‍्याखालून पालथी मूठ फिरविली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हातपोटरीत घट्ट बसविले!

बाहेर पहारे बदलले होते. आत राजे बदलले होते. आग्ऱ्यात दिवस बदलत होता! पलंगावर हिरोजीशेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती! राजांनी हिरोजीसमोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी दोनदळी शिवगंध रेखून घेऊ लागला. सुखदु:खाचे दोन पट्टे “शिवा’नेच त्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणारा समर्थ होता!

दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तस्तात हात-तोंड धुऊ लागले. ते बघताना हिरोजीच्या वेषातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली. राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकऱ्यांना “कोणेविशी शक – अंदेशा?” येतो काय, याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजांचे बनावट “हिरोजी’वर ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले! तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठीबाहेर पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते!

राजे कोठीच्या भिंतीला धरून ‘अदबी’ने उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप, कमरेत वाकून अदब-पेश केला. हिरोजी पलंगावर कोरे पडून होता.

“महाराजसाहेब,” संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले.

“हां.” पलंगाबरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठवली.

“येतो आम्ही!” संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले. खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत – गडबडीने म्हणाला, “आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुम्हारबाडीत आमची वाट बघा. तिसऱ्या प्रहरानंतर. औक्षवंत व्हा!”

संभाजीराजांनी ‘जी’ म्हणत तीन वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठीबाहेर पडू लागले. न राहवून मावळी वेषातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभुत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले, ‘ये राज्य व्हावे, हे श्रींचे मनी फार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. यशवंत व्हा!’

दरवाजातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजीच्या वेषातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला. कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही, याचे भान काही राजांना उरले नव्हे आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपती बोटे फिरविताना स्वत:ला विसर गेले होते!

क्रमशः-

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment