महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,65,535

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६९

By Discover Maharashtra Views: 2533 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६९ –

सगळ्या सदरकऱ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींना मुजरे रुजू घातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईच्या महाली आले. त्यांना ओवाळण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तबकाचे भान पुतळाबाईना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या सामोरे येत, त्यांची पायधूळ घेऊन शंभूराजे म्हणाले, “मासाहेब ओवाळता?” तेच शब्द, ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साफ. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले.

संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, “आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की, कसलीच धास्त वाटत नव्हती.”

“गुणाचाच आहे तो!!” पुतळाबाईंच्या मनी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईनी तबक चौरंगीवर ठेवले. आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला! शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता, तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्यात एक विचित्र मुद्रा दिसली. सईबाईच्यासारखी – काळ्या धाग्यांनी विणलेली! सावळी! तेथून दर्शनासाठी म्हणून शंभूराजे सोयराबाईंच्या महाली आले. पायावर कपाळ टेकवून त्यांनी मासाहेबांचे दर्शन घेतले. त्यांना वर उठवून घेत सोयराबाई म्हणाल्या,

“स्वारींना म्हणवले तरी कसे तुमचा “काळ ‘ झाला म्हणून? उठा. औक्षवंत व्हा! गडावर तुमचे दिवस घातले साऱ्यांनी! मासाहेबांच्या कानी घातले पाहिजे. फेरभोजने घातल्याशिवाय हा दोष नाही हटायचा!” संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. पडल्या नजरेने ते सोयराबाईच्या पायांवर फिरलेली आळत्याची नक्षी उकलण्याचा यत्न करू लागले! तिचा शेव सापडत नव्हता. सापडणार नव्हता!

त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती, पण ते जागेच होते. त्यांच्या मनी प्रश्नांचा खडावा खटखटू लागल्या. धूळ उडू लागली – “आमचा काळ झाला! असे खुद्द महाराजसाहेबांनीच साऱ्यांना सांगितले! आमचे दिवस घातले गेले गडावर? का? असे का केले आबासाहेबांनी? यात – यातही त्यांचा काही मनसुबा असेल! नाहीतर – गड उतरून ते आमच्यासाठी का आले असते? ‘ शंभूराजांच्या डोळ्यांवर झोप आपला शालनामा पांघरू लागली. त्यांच्या पोटऱ्यांना तेलवण चोळणारी धाराऊ, त्यांच्या मिटल्या पापण्यांकडे एकरोखाने बघत होती. मायेला फक्त एकच माहीत असते, सेवा करणे! मूकपणे!

मार्गशीर्षाच्या धुकाळ पौर्णिमेचा दिवस गुंजगणमावळात चढीला लागला. स्तरान घेतलेले टोपधारी शंभूराजे जिजाऊंच्या महाली आले. पितळी सरशीने जिजाऊंनी त्यांच्या कपाळी दोनदळी शिवगंध रोखले. त्यांच्या संगतीने जिजाऊ सदरेच्या रोखाने चालल्या. त्यांच्या मागून, राजे-शंभूराजे उत्तरी असताना, जिजाऊंनी बिल्वपत्रे वाहताना खूणगाठेसाठी साठवण केलेल्या मोहरांची तबके घेऊन धारकरी चालले. आज ती तबके “दान ‘ म्हणून वाटली जाणार होती. राजगडाची सदर मानकऱ्यांनी सजली होती. ही कदरेची सदर होती. मथुरेहून संभाजीराजांना सुखरूप देशी आणणाऱ्या कृष्णाजी, काशीपंत आणि लक्ष्मीबाई या त्रिमल त्रिवर्गांची कदर राजे सदरसाक्षीने करणार होते.

जिजाऊ आणि शंभूराजे सदरेवर प्रवेशले. बैठक घेतलेले राजे जिजाऊंना बघताच अदबीने चटकन उठले. सदर सुरू झाली. धारकऱ्यांनी मोहरांची तबके बैठकीच्या बगलेला हारीने मांडून ठेवली. भंडाऱ्याची परडी फिरली. राजांनी बैठ्या-बैठ्या मुजुमदार निळोपंतांना नजर दिली.

पुढे येत निळोजीपंतांनी सदरेचे प्रयोजन खुले केले – “उत्तरी सरकारस्वारीवर बाका प्रसंग बेतला. हुन्नराने राजियांनी गलिमाची कैद फोडली. देशी यावे म्हणोन बैराग्यांचे वेष धारण केले. पण मार्गी पेच उभा राहिला. धाकट्या राजियांना संगती घेवोन चाल धरणे मुश्कील झाले. म्हणोन सरकारस्वारीने धाकट्या राजियांना मथुरेस त्रिमलांच्या हाती स्वाधीन केले. त्रिमलांनी कस्त-कोशिस करोन – इमानइतबारे घरचा दागिना घरी पावता केला. त्याकारणे त्रिवर्ग-त्रिमलांचा मरातब करावा, असे मनी धरोन स्वारींनी ही सदर बसती केली असे.

“ये सदरी मरातब म्हणोन – मशारनिल्हे काशी त्रिमल, मजकूर मथुरा यासी रुपये रोख पंचवीस हजार -” निळोपंत थांबले. मोरोपंतांच्या शेजारी बसलेले काशी त्रिमल उठले. बैठकीजवळ अदबीने आले. राजांनी आणि संभाजीराजांनी चंदेरी रुपयांनी शिगोशीग भरलेल्या तबकाला दस्तुरी-स्पर्श दिले. झुकून मुजरा देत काशीपंतांनी तबक हाती घेतले. त्यांचे हात आणि मन भरून आले. मथुरेत असताना ज्या भावभऱ्या डोळ्यांनी ते यमुनेच्या पात्राला बघत होते, तसेच त्यांनी ‘माँजी ‘ जिजाऊंना जवळून डोळाभर बघितले. हातीचे तबक बाजूला ठेवून त्यांनी बैठकीवरच्या राजे-संभाजीराजे आणि ‘माँजी ‘ जिजाऊ या त्रिदळी राजकुटुंबाला उत्तरी अदबीचा साष्टांग दंडवत रुजू केला.

उपरण्याचा जरीकाठ ठाकठीक करीत निळोपंत पुढे बोलले – “त्रिमलांच्या मातूश्री – आईजी लक्ष्मीबाई, मजकूर मथुरा यांसी रुपये रोख पंचवीस हजार! -”

निळोपंतांनी राणीवबशाच्या बैठकीत चिकाच्या पडद्याआड बसलेल्या लक्ष्मीबाईंना म्हणून पडद्याला नजर दिली. पडदा सळसळला. लक्ष्मीबाई स्त्रीवशाच्या बैठकीतून बाहेर आल्या. जिजाऊंनी दस्तुरी हातस्पर्श दिलेले बंद्या चंदेरी रुपयांचे तबक लक्ष्मीबाईंनी आपल्या थरथरत्या हाती घेतले. पाणावल्या डोळ्यांनी त्या जवळून जिजाऊंना निरखू लागल्या. त्यांच्या हाती चंदेरी रुपयांचे शिगभरले तबक होते आणि समोर दिवसाढवळ्या सदरबैठकीवर उतरलेले दूधदाट चांदणे त्यांना दिसत होते!

तबक बाजूला ठेवून नमस्कारासाठी म्हणून लक्ष्मीबाई वाकायला गेल्या. “बाई, तुमचे आमच्यावर थोर उपकार! हा कोण प्रकार? शक्‍य असते, तर आम्हीच स्वत: तुमची भरल्या फळाने ओटी भरली असती इथे. सदरसाक्षीने.” जिजाऊ त्यांचे हात वरच्यावर उचलून घेत म्हणाल्या. या क्षणी आपले कपाळ उजाड आहे, याची खंत जिजाऊंना कातरून काशीपंत, कृष्णाजी, विसाजी यांना “वबिश्वासराऊ ‘ हे किताब देण्यात आले. पेहराव, पालखी, हत्ती, सरंजाम देऊन साऱ्यांचा गौरव करण्यात आला.

एकामागून एक दानाची तबके शंभूराजांच्या सामोरी येऊ लागली. नावनिशीवार त्यांचा उल्लेख होताच संभाजीराजे तबकांना दस्तुरी हातस्पर्श देऊ लागले. उपवासाचे पारणे फेडून सदरेवर बसलेल्या जिजाऊ समाधानाने भरून आल्या होत्या. तबके सरतीला आली तशी संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या उठून गेल्या. राजांच्याकडे झुकते होत ते पुटपुटले – “महाराजसाहेब -”

“बोला.” राजे समाधानाने फुलले होते.

“मरातबाचं एक तबक… आग्ऱ्याच्या वाटेनं जाऊ द्यावं!!”

“राजांनी भुवया चढत्या ठेवीत “कशासाठी ‘ असा काही न बोलताच सवाल केला. नजर राजांच्या छातीवरच्या माळेवर टाकीत संभाजीराजे म्हणाले – “कुम्हारवाडीच्या कुंभारानं आम्हास घरोबा दिला, त्याच्यासाठी!!”

नकळतच राजांचा हात संभाजीराजांच्या पाठवळीवर चढला. जामा काखेला धरून दाटला. मोहरांनी भरलेले एक तबक आग्ऱ्याच्या कुंभाराच्या नावाने बाजूला काढण्यात आले. राजांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना बैठकीवरून नजर दिली. कारभारी सरपोसाने तबक घेतलेला एक तबकधारी घेऊन राजांच्या सामोरे आले. त्यांनी मुजरा केला. तबकधाऱ्याने सरपोस हटता करून तबक राजांच्या समोर झुकते होऊन धरले. संभाजीराजांना तबकात सोनतारांत मढविलेले एक पदक दिसत होते! कसल्यातरी पिसांचे!

“हे काय?” त्यांनी राजांना विचारले.

“हे गरुडाचे पॉख. हरकामी यश देणारे!” राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्यांनी डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश धरण्याची इशारत केली. “मासाहेब, त्या पदकास हात द्यावा!” राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुडपिसांच्या मढविलेल्या पदकाला हातस्पर्श दिला. आत्ता पदक सर्वार्थाने “हर काममें यश देनेवाले ‘ झाले!

जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या. एवढ्यात पाली दरवाजावरच्या नगारखान्यावरून उठलेली नौबतीची दुडदुड सदरेत घुसली! राजे आणि जिजाऊ ती ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का, ते मात्र सदरेवर कुणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, “सरकार, आज पुनव हाय. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा चाकराला व्हावी. खाशांनी गोंधळाला रात्री मान द्यावा.”

“जरूर.” राजांनी पोतराजाला पानविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांज धरूनच थाळ्याएवढे ‘चंद्रफूल ‘ आभाळ-सुंदरीने डुईत माळले! चांदण्याच्या रूपाने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला. सदरचौकात गोंधळ्यांनी तांदळाचा चौक भरला. रात्रीचा थाळा घेतलेले राजे, संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोंधळ ऐकायला बसले. सगळी सदर माणसांनी गच्च भरली होती.

चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या सामोरा आला. डुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला – “सरकार, उदो करायचा हुकूम व्हावा.”

राजांनी त्याला हाताचा पंजा उठवून थोडा वेळ थांबायची खूण दिली. राजांच्या टोपात गरुडपिसाचे पदक मढले होते! ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंत:पुराच्या दरवाजाकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या. त्या दरवाजाआड गोंदल्या हातांची, पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिणाट उठला. त्या किणकिणाटांशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलमिश्या असलेल्या पिलाजींच्या आणि गोंदल्या मनाच्या धाराऊच्या मधून येसूबाई सदरेवर प्रवेशल्या! खालच्या मानेने! धडधडत्या उराने!

संभाजीराजांचा काळ झाला, या ने दी हुलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांचे जोडे सती जायला निघालेल्या च्यासाठी मागायला आले होते. त्या वेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते. संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपूरला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते – “पौर्णिमा धरोन सूनबाईनिशी निघोन येणे! येते वख्ती भावेश्वरीचा अंगारा घेवोन येणे! शंभूराजे सुखरूप गडी पावते जहाले!”

पिलाजींना सदरेवर येताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले – पण पुढे-पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले! आपसूकच.

“या सूनबाई,” म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमामाने बसविले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमट उधळली. गोंधळ्यांना उदोची इशारत दिली. गोंधळ्यांनी पोत पाजळून नमन धरले.

“गजवदना – गणराया गौरी!” संबळ-तुणतुण्यांचे मेळसूर घुमू लागले. म्होरक्‍या गोंधळी नाचत्या पोतांवर कानाशी हात नेत जगदंबेचा महिमा उभा करू लागला –

“आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले!”

आम्म्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमनी नसता समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्‍्या प्रसंगाने संभाजीराजांची जाण आता चढीने बाढली होती. राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६९.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment