महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,640

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७१

By Discover Maharashtra Views: 2521 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७१ –

खबरगिरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली! “मुअज्जम विलासी आहे साजशिनगाराची त्यास गोडी आहे. राजांना तो मनोमन वचकून आहे. आपल्या बापाशी तो नेक नाही!” विचार करून राजांनी निर्णय घेतला. संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता – शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद्द तेच जाऊन  आले की, औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल! या खानदेशी राजकारणाचा समय आला, ऐन दिवाळीत. राजकारण सणवार, भावभावना काहीच जाणत नसते. भरत्या थंडीला धरून नरक चतुर्दशीचा दिवस राजगडावर फटफटला.

आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुर्हर्त होता. जिजाऊ, पुतळाबाई, धाराऊ, सोयराबाई साऱ्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. “येतो आम्ही,” म्हणत येसूबाईचा निरोप घेतला. बालेकिल्ल्याच्या सदरचौकात गड-उतारासाठी प्रतापराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती. जिजाऊ आणि राजे संभाजीराजांसह सदरचौकात आले. शंभूराजांनी जिजाऊंच्या पायांवर कपाळ ठेवले. “औक्षवंत व्हा! कार्य सिद्ध होताच परतीला लागा.” जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला.

राजांच्या संगतीत, बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने. माचीवर गड-उताराची पालखी तयार होती. माचीवर उतरणारे भुयार आले. त्यांच्या तोंडावरची धोंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव, निराजीपंत, रावजी, आनंदराव, प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता-चालता राजे कसल्यातरी विचाराने थांबले.

“तुम्हास आठवते वेरूळच्या कैलासलेण्याची गुंफा?” राजांनी प्रश्न केला.

“जी.” दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला.

“काय आवडलं तुम्हास त्या शिलागारीत?”

“कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण!”

“__.” भुवया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चर्याने निरखले. “का?”

“शिवाचा कैलास त्यास उचलता आलेला नाही! एवढे बल असून.” शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.

संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्यांवर आपला भंडारामंडित माथा ठेवला, त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धिमे बोलले – “सांभाळून असा! आम्ही नसलो, तरी प्रतापराव आहेत. त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा, आम्ही तुमची वाट बघतो आहोत!” शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कातऱ्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे, चोपदार, निशाणबारदार चालू लागले. आग्रा झाला – आता औरंगाबादेला!

मजल-दरमजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादेला पोहोचले. शाहजाद्याच्या वतीने दिल्ली दरबारचा मातब्बर सरदार जयवंतसिंग याने सामोरे येत त्यांची आगवानी केली. जसवंतसिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मन्सबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेरनजराणा बहाल केला.

औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव, निराजीपंत, रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहजादा शहाआलम याची भेट घेतली. तांबूस, गौरवर्णाचा शहाआलम शंभूराजांना बघून खुशदिल झाला. ओठातल्या ओठांत पुटपुटला – “इन्शाल्ला! कैसी शेरे सूरत है!” त्याने एक झूलबाज हत्ती आणि रत्नजडावाची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमामाने नजर केली. संभाजीराजांनी त्याला फेरनजराणे दिले. महालीच्या आलिशान बैठकीवर शहाआलमने संभीजाराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंतसिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता! तो हात बांधून समोर उभा होता.

शहजाद्याने संभजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तबियतीची पूळताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी आत्तरियाने पुढे येत अत्तरदाणीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहजाद्याच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरविले. एक ख्रिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टपोऱ्या गुबालाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला. तबकातील एक फुलता गुलाबगेंद हाती घेऊन शहजाद्याने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहजादा शहाआलमच्या तोंडून नकळत लब्ज सुटले –

“लीजिए, गुलाब भी खुबसूरत होता है, छोटे राजासाब!”

प्रतापराव, प्रल्हाद निराजी, रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मनी घर करून बसलेली वेरूळच्या पहाडी गुंफांतील कोरीव लेणी नजरेखाली घातली. औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे, शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांनिशी नगराचा फेरफटका करून येत होते. औरंगाबाद ही मुगलशाहीची दख्खनेतील राजधानीच. तटबंदीतील शहर देखणे होते.

राजांनी निघताना सूचना केली होती – “मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्यांखाली घाला!” शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते. तळावर येताच त्यांना निराजीपंतांनी वर्दी दिली – “शहजादे सरकार स्वारीस याद फर्मावतात. भेटीचे कारण समजू येत नाही.”

संभाजीराजांनी ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या. तरीही ते म्हणाले, “पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो. धाकल्या राजांनी भेटीला जाऊन यावं.”

संभाजीराजांनी प्रतापराव, निराजीपंत, रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले. शहजाद्याच्या वजिराने सामोरे येत, संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले.

“आईये!” म्हणत, दातकळ्या खुलवीत, देखण्या शहाआलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते. संभाजीराजांवर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या-तिकडच्या गप्पा करून शहजाद्याने आपल्या मूळ हेतूला हात घातला. “कभी शिकार खेलते हो शंभूराजे?”

“नाही.” शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले.

“ताज्नुब है! राजासाबके फर्जद और शिकार का षौक नहीं!” शहजाद्याने आपल्या रेखीव भुवया वर चढविल्या.

“आम्ही विचारले तर आमचे महाराजसाहेब शिकारीला ना नाही म्हणणार.”

“तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने. आज हम रामटेकके बनमें जा रहे है, निशाना लगाने.”

“नको. आम्हास येणे होणार नाही.” संभाजीराजे सावध झाले.

क्यों – डरते हो हमारे साथ चलने?” शहजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येईल याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना.

“डरनेकी कुछ बात नहीं॥ हम आयेंगे शिकार खेलने!” मान ताठ ठेवीत संभाजीराजांनी शहजादा शहाआलमला क्षणात जाब दिला!!

“वाहव्वा! आफरीन – यही उम्मीद थी आपसे! आपके सवारीका सब इंतजाम होगा। आपके नेक लोग साथ लेना।” प्रतापरावांच्याकडे बघत शहजादा म्हणाला.

दुपार टळतीला लागल्यावर वेशीबाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर-गुलाब झाले. संभाजीराजांनी शहजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले. आपल्या माणसांतील कसबी पटेकरी, तिरंदाज, भालाईत, रानात घोडा फेकणारे सराईत, घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव, प्रतापराव, निराजी, रावजी ही हत्यारबाज मंडळी निवडक घोड्यांवर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी-जाळीदार बख्तर चढविले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते, दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले.

वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनिशी तळाबाहेर पडले. शहजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती, हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता.

शहजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुताला इशारत केली. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुशमार देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पढाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत- झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्निस केला.

हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीच्या बगलेला जोडून घेतला. प्रतापराव, रावजी, निराजी, आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठवून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठवून हसत त्याला फेर साद दिला.

शहाजणे कल्लोळून उठली. हत्ती, घोडे, निष्णात शिकारी खेळे, हाका घालणारे असा शिकारी-तांडा दक्षिणवेशीबाहेर पडला. रामटेकचे रान येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हाकारे, खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली.

आज शहजाद्याला “शाही शिकार ‘ कशी असते, ती संभाजीराजांना दाखवायची होती. हाकारे, खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली, माहुर माहतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव, आनंदराव ही मंडळी हत्तीमागून कदमबाज चालीने निघाली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७१ –

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment