धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७२ –
एका उंच टेकाडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचाणी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूंनी आलेल्या पाणंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळालेल्या होत्या. शहजाद्याने हौद्यात बसूनच खांद्याचा उंच तीरकमठा हाती घेतला. त्याला बाक देऊन वाद पारखून घेतला. त्याच्या निवडक सरदारांनी कुणी तीरकमठे, तर कुणी भाले सरसावले. मराठी भालाइतांनी ते बघून, आपले भाले पेलले. तिरंदाजांनी तीरकमठे सरसेल.
रामटेकचे रान चारी बाजूंनी कुदू लागले. कसलेतरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात कण्हू लागले. हाकाऱ्यांनी चारी बाजूंनी हाका घातला होता. रणशिंगाची एक कातरी ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली. सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खूण होती. नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे, असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटांनी पांढऱ्या, कबऱ्या, बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखूर उड्या टाकणाऱ्या उभवत्या शेपट्यांच्या वनगाईचे कळपच्या कळप पठारात उतरले!! वनगाई!! मराठी खेळे ते बघून चरकले. सामने हंबरत आलेल्या, भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या. शिंगांना शिंगे खटखटली. टेकाडावरून सटासट सुटलेल्या भाले, तीरांनी मिळेल तशी वर्मी फेक केल्याने कितीतरी वनगाई ऊर उठवून जीवजाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या. बचलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या. पडलेल्या जाया गाई आचके देत खूर झाडून शांत झाल्या.
समोर प्राणांतक हंबरडा फोडणाऱ्या बनगाई बघून आपल्या हौद्यात, संभाजीराजे ताडकन वर उठले होते. त्यांच्या हातीचा तीरकमठा गाई बघताच गळून पडला. खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला. त्यांनी आपले डोळे क्षणभर गन्च मिटून घेतले. कानात गाईंचा हंबरडा कसा दाटून बसला.
“सरलष्कर” ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्यातरी मोठ्याने ओरडले. घोडा टाकीत प्रतापराब हत्तीजवळ आले.
“श॒हजाद्यांना सांगा. आम्हास हा खेळ पसंत नाही. आम्ही निघतो.” आणि त्यांनी माहुताला आज्ञा केली. “हाथी घुमाव!” माहुताने हत्तीचा मोहरा लगबगीने वळविला. प्रतापरावांनी शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला. संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाईत, तिरंदाज, भालाईत चालले. कुणीच काही बोलत नव्हते. संभाजीराजांनी हौद्यातूनच आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्याभात्यांवर नजर टाकली. भरले भाते तसेच होते! समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकारखेळ्याने हत्यार चालविले नव्हते!
समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला. त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, “गुजरकाका, शिकार करायचीच झाली, तर कसली करावी आम्ही?” “जी धनी, रानसावजाची! रानडुकराची!” प्रतापराव हौद्याच्या रोखाने मान उठवीत म्हणाले. हत्ती चालविणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की –
“आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळी सिंह बसला आहे! तोही आता शिकारच करणार होता – फक्त रानडुकरांचीच! ‘
आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजी यांना औरंगाबादेत मागे ठेवून, राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले. याच वेळी राजांनी आदिलशाहीशी तह केला. विजापूर दरबाराने राजांना सालिना तीन लाख होनांची खंडणी देण्याचे मान्य केले. स्वराज्याच्या दोन आघाड्या बिनघोर झाल्या – मुगलशाही आणि आदिलशाही. फिरंगाणातील गरीब रयत तर जिवाला कंटाळून गेली होती. तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावागावांवरून फिरवण्याचा सपाटा चालविला होता.
विरोध करणाऱ्यांना गावचौकात आणून उभे जाळण्यात येत होते. शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित, त्राता नसलेली रयत कारवार, कोकणपट्टीत उतरत होती. देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापांखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले!
त्यांना निरोप दिलेले संभाजीराजे आणि जिजाऊ खासेमहालात गिर्दीच्या बैठकीवर बसले होते. समोर एका शिसवी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड-बैठक घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंधाची पोथी होती. त्या पोथीतील एक-एक पान पंडित उचलीत होते. स्वच्छ उच्चारात, लयीत देववाणीतील श्लोक वाचीत होते. वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगीत होते.
“रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिषिक्त झाले. आपल्या बीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला. भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला. तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशीजबळ आला. एका उंच बटवृक्षावर चढून त्याने बैठक घेतली. रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक-एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दाढांखाली फोडू लागला! त्यात प्रभू राम आहेत का, हे पाहण्यासाठी! एकाही मोत्यात त्यास “रामचंद्र ‘ दिसेनात! तो विव्हळ झाला! वृक्षाखाली मोत्यांची टरफले पसरली.”
ऐकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाशपात्रावरून सरसर धावू लागली –
“हुरबाबीत “राम ‘ शोधला पाहिजे! जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले, तसे आम्हास – आम्हास महाराजसाहेबांचे होईल? ‘
“कसला विचार करता?” पाठीवर हात फिरवीत जिजाऊ मायेने म्हणाल्या. उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठविली. एवढ्यात गोमाजीबाबा महालात आले. झुकता मुजरा रुजू ठेवून म्हणाले, “आऊसाब, कोलापूर तरफेचा पुनाळ गावठाणाचा योक असामी आलाय. केसरकरांच्या बीयाचा. जोत्याजी म्हनत्यात त्याला. मानूस कसबाचा हाय. चाकरीसाठनं आऊसाबांच्या पायाची भेट घ्यायची म्हन्तो.”
“पेश करा त्यास.” जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माटाचा आणि मावळी थाटाचा तरणाबांडा जोत्याजी आत आला. चांदीच्या कड्यांचे मनगट फरसबंदीकडे नेत त्याने मुजरा घातला.
“कोण गाव?” जिजाऊंनी त्याला निरखीत विचारले.
“पुनाळ जी.” जोत्याजी अदबीने उत्तरला.
“कोण-कोण हत्यारांची चाल येते?”
“पट्टा, भाला, बोथाटी, गदका – सम्द्यांची सरकार.”
“इमान कोण जातीचं?”
क्षणभर जोत्याजी घोटाळला. “आऊसाहेबांच्या पायाशी ल्येकराच्या जातीचं!”
जोत्याजीच्या जाबाने जिजाऊंचा चेहरा उजळला, आणि संभाजीराजे तर उत्तराने खुशदिल होऊन जोत्याजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मोजू लागले!
“गोमाजी, यास फडावर नेऊन बाळाजींची भेटी पाडा. रुजू करून घ्या.” जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या.
गोमाजी, जोत्याजी मुजरे घालून मागे हटू लागले. ते गर्दन वर करून वळणार एवढ्यात जिजाऊ जोत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या, “पुनाळकर, मनास किंतु येऊ देऊ नकोस, आम्ही इमान विचारलं म्हणून. एक वेळ राज्य मिळणं सोपं जातं पण – पण इमानी चाकर मिळणं, ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते!”
राजांनी मंत्रिगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसविली. बऱ्हाड, खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव, निराजी, आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजे आणि राजांना अदबमुजरे घातले.
प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कुचासाठी पाली दरवाजावरची नौबत घुमू लागली. ती ऐकताना संभाजीराजांना वाटले – ‘आमची फौज सरलष्करानिशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हा येणार? ‘ आता राजगडावर राणीवसा, मंत्रिगण, अठरा कारखाने, फड सर्व ठिकाणी संभाजीराजे मानले जात होते. राजांची ‘चालती-बोलती सावली ‘ म्हणून!
धाराऊचा आणि येसूबाईचा तर आता गडावर काळीजमेळ जमून गेला. येसूबाई धाराऊला “मामीसाहेब ‘ म्हणत होत्या आणि मानीत होत्या. धाराऊ त्यांना “सूनबाई म्हणत होती आणि ‘लेक म्हणून मानीत होती. दररोज दिवस उगवताना ‘सूर्या ‘चा आणि मावळताना ‘ दिवट्या’चा नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसूबाईंना खासेमहालात घेऊन येत होती.
सुरुवातीला बावरलेल्या येसूबाई – जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यागत होऊन जात होती, सोयराबाईंच्या. मासाहेबांचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द “त्या ‘ हिंदोळत्या मोतीलगाच्या “टोपा ‘चा नाही, पण येसूबाईंना सोयराबाईंचा धाक वाटायचा! ह्या ‘मामीसाहेब त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे येसूबाईना त्या म्यानखेच करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपत ठेवलेल्या हत्यारासारख्या वाटायच्या!
बोलता-बोलता सोयराबाईंच्या शेंडा नकळत लालावून येतो, हे येसूबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते! हातीच्या सुवर्ण-कंकणांचा नाद व्हावा, म्हणून सोयराबाई पदर पुन्हा-पुन्हा नीट करतात हेही येसूबाईंच्या ध्यानी आले होते. आणि दर्पणात मेणमळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एकलगीत आलीत का नाहीत, हे बघताना तर
“मामीसाहेबां ‘ना कशाचेच भान उरत नाही, हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसूबाईनी अनेकदा अनुभवले होते!
क्रमशः छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७२.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव