धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७४ –
“राजे,” जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना बाटले, तडक वळते व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे.
“बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर?” जिजाऊ हलक्या शब्दांनी दिंडी उघडून राजांच्या मनाच्या दरवाजात घुसल्या.
“मासाहेब… मासाहेब, उभी उत्तर धूळदोस्त करण्यासाठी औरंगजेबानं हत्यार उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जाताहेत. शाही फौजेचा वरवंटा मंदिरांच्या कळसावरून फिरवला जातो आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं! त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते, पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते! आम्ही शरमिंदे आहोत, आपल्यासमोर उभे राहायला!” राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवरून नुसता फिरत राहिला.
जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळं उठणारा ठणका बंद झाला! त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला. आम्म्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला! कोणीतरी त्यांना विचारत होते – “हौदा खेलते हो संबूराजे?”
बाळाजी आवजी चिटणिसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली, “स्वामी, प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता, मोगलाईतून सेनेसह परतले! गड चढून येताहेत.” राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हनात, हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले – आणि “जगदंब,” म्हणत ते प्रभाकरभट आणि केशव पंडितांकडे बघत चौरंगीवरून उठले! हीच वर्दी जोत्याजी केसरकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायांवर घातली. जिजाऊ पुण्याहून बलावू धाडून आणलेल्या खोंद्याशी, सोयराबाईंच्या डोहाळजेवणाच्या वेळी ‘ लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या.
जिजाऊंच्या महाली ‘मखराचा साज कंचा ‘ ते ऐकायला आलेली सोयराबाईंची कुणबीण चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली! मग ती चटक्या पावलांनी सोयराबाईसाहेबांच्या महाली आली. पण आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली. गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला.
त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या मासाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी, त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या! डोळ्यांआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलू बघत होते!
चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, “ये. आज फुटता दिवस धरून कुणासाठी नौबत उठली?” चंद्रा संभाजीराजांकडे बघत गप्पच राहिली.
“बोल. ते आमचेच आहेत!” सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, “सरलस्कर परातलं न्हवं मोगलाईतनं!” चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले.
“आम्हास आज्ञा द्या मासाहेब. आम्ही येतो.”
“या,” सोयराबाईंनी पडल्या-पडल्या हात उभविला. धाराऊसह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई, ते आड होऊपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी तळपत्या उन्हात मंदिराच्या सोनकळसाला नजर दिली! संभाजीराजे सदरेवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे दिले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेला मोगलाईचा करीणा पेश करू लागले.
“एका रातीत सारा तळ आमी उठविला. ह्ये रावजी वऱ्हाडात हुतं. त्येसती खबरगीर धाडून आपला मुलूख गाटायची झ्यायली कराय सांगितलं. धनी, बादशानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला हुता. आमची आन रावजींची उभी फौज दस्त व्हायची हुती! पर शाजाद्यानं हात दिला! खुद्द त्येनंच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली -“रातीत तळ सोडायची! ‘ न्हाईतर…” प्रतापराव थांबले.
औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहाआलमला औरंगाबादेला हुक््म सोडला होता. त्यांची आगाऊ कुणकुण लागलेल्या शहजाद्यानेच प्रतापरावांना हुक््म हातात पडण्यापूर्वीच इशारत भरली होती! प्रतापरावांचा वृत्तान्त ऐकून राजे शेजारी बसलेल्या संभाजीराजांकडे बघत राहिले. एक दीर्घ हुस्कार त्यांच्या नाकपाळीतून सुटला. तो एकाच विचाराने – “आता फर्मान असो, भेट असो, जहागिरीची वस्त्रे असोत, मोगलांच्या छावणीत आमचे संभाजीराजे कधी-कधीच जाणार नाहीत! आम्ही त्यांना पाठवणार नाही! ‘
“राजश्रियाविराजित, अखंड सौभाग्यअलंकृत, वजचुडामंडित थोरल्या राणीसरकार सोयराबाईसाहेब प्रसूत जाहल्या. पुत्ररत्न प्रास जाहले.”
चौवाटा पुत्रजन्माची वार्ता घेऊन थैलीस्वार सुटले. गडागडांवर साखरमुठी वाटण्यात आल्या. चौघडे, नगारे दुडदुडले. तोफांची भांडी फुटली. राजाच्या ‘थोर ‘ संसारातील नातेबंधाची मंडळी राजगड जवळ करू लागली. पाचवी झाली. सटवी येऊन जन्मल्या बाळाच्या भाळी आपल्या अज्ञात हातांनी “भाकीतलेख ‘ रेखून गेली. राजांचा सारा गोतावळा दरुणीमहालातील सोयराबाईंच्या दालनासमोर एकवटला. बाळराजाचे दर्शन घ्यायला. त्यात संभाजीराजे होते. येसूबाई पण धाराऊच्या सोबतीने होत्या. उपाध्यायांनी दिलेल्या शुभमुहूर्तावर ‘दर्शन ‘ घ्यायचे होते.
जमल्या गोतावळ्यात राजे येऊन दाखल झाले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली. घंगाळातील न मुहताचे पात्र डुबले. दालनाचा दरवाजा कुरकुरला. जिजाऊंच्या पाठीशी होत, सारे भोसलेमंडळ दालनात प्रवेशले. सुइणीने दुपट्यात लपेटलेले बाळ सोयराबाईच्या कुशीतून उचलले. हलक्या हातांनी हसत जिजाऊंच्या समोर धरले. जिजाऊंनी मोहरांचा सतका बाळाच्यावरून उतरला आणि आईचा भंडारा ओंजळीत घ्यावा, तसे बाळराजे हळुवार आपल्या हाती घेतले! डोळाभर त्यांना पाहून भरल्या समाधानी मनाने जिजाऊंनी बाळ राजांच्या हाती दिले. ते देताना जिजाऊ म्हणाल्या, “मातृमुखी आहेत. पण – पण आम्ही ऐकून आहोत हे पालथे उपजले! -” जिजाऊंचा आवाज कातरा झाला होता. भुवया चढत्या ठेवून, हातीच्या आपल्या देखण्या सोनरूपाकडे बघत राजे म्हणाले,“मासाहेब, चिंता करू नका. हे पालथे उपजले म्हणूनच उभी पादशाही हे पालथी घालतील!” राजांचे मर्मबोल संभाजीराजांना फार आवडले.
“घ्या.” राजांनी बाळांना संभाजीराजांच्या समोर धरले. संभाजीराजांनी बाळराजांच्यावरून मोहरथैलीचा सतका आपल्या हातांनी उतरता केला. हळुवार हातांनी संभाजीराजांनी बाळराजे आपल्या हाती घेतले. वेरूळच्या पहाडी लेण्यांकडे बघावे, तसे ते हातीच्या बाळलेण्याकडे बघत राहिले. सोयराबाईंनी आकाशीचा चंद्र जसा खुडून आणून साऱ्यांच्या हाती दिला होता! बाळराजांच्याकडे बघताना संभाजीराजांना वाटले, नक्की… नक्कीच हे उभी पादशाही पालथी घालतील. ‘
काहीतरी मनी धरून राजे आता संभाजीराजांना अष्टोप्रहर स्वत: संगती घेऊ लागले. फडावरची कलमदानाची कामे कशी चालतात, पत्रावर दस्तुर कसा लावतात, शिक्कामोर्तळ कसा करतात, कथला कोण पद्धतीने ऐकून घ्यावा, निवाडा मंत्रिगणांच्या मसलतीने सावचित्ताने कसा द्यावा, मर्दानगी करणाऱ्यांना हत्यार, कडे बक्षून त्याचा मरातब कैसा करावा, कुणबियास राजेपणाचा धीर दिलासा देऊन त्याला तवानगी येईल कसे वागवावे, परदरबारचा हेजिब आल्यास त्याकडून मनाचा मतलब अल्लाद कसा काढून घ्यावा, “डावे जाणाऱ्यास सलगी देऊन त्यास थोरपण कैसे बहाल करावे, हा सारा राज्यकारभारी कुलकरीणा स्वत: राजे संभाजीराजांच्या कानी घालू लागले.
आता फडावरच्या मंडळींशी संभाजीराजांचा निकटीचा संबंध येऊ लागला. त्यातील कारकुनी पद्धतीची मोड बैठक घेणारे, हातीचे शहामृग पीस कुरुकुरु चालविताना हस्तलेख वळणदार यावा म्हणून मान तिरकी करणारे, काही खासे मतलबाचे लिहिण्यापूर्वी मध्येच थांबून वरच्या छतास डोळे देणारे चिटणीस बाळाजी आवजी.
आबासाहेबांनी “ पंतऊ“ अशी हलकीच साद घालताच “जी स्वामी” म्हणत लपकन कमरेत झुकणारे, केळीच्या मोन्यासारखे सतेच दिसणारे, कपाळीचा गंधटिळा हमेशा एक आकारात ठेवणारे, कमरेच्या हत्यारावर हाताची बोटे चाळवीत असताना कुणीही “पंत” असे हाकारताच त्या बोटांची मूठ पक्की बसती करणारे, कमी घेरांच्या, गोल, डाळिंबी पगडीचे पेशवे, मोरोपंत पिंगळे. काही खाशी मसलत पेश करण्यापूर्वी “आमची पेश अर्जी ऐसी की,” असे म्हणत छातीच्या दुबाजूंनी कमरेपर्यंत आलेल्या लालकाठी उपरण्याचे शेव मुठीत घट्ट धरणारे, पेडापेडांच्या गोल घेरबाज पगडीचे, मूळचे लहान डोळे हसताना मुळीच न दिसणारे सुरनीस अण्णाजी दत्तो.
आबासाहेब आता कोणतीही ‘वस्त ‘ रुजू करायला सांगतील म्हणून ‘काढता पाय ‘तयारीत ठेवणारे, ‘मोहरा ‘, “रुपये ‘, ‘डाग ‘, “वसूल ‘ असे हिशेबी शब्द योजणारे मुजुमदार निळो सोनदेव. ही सारी मंडळी संभाजीराजांना राजांच्या एवढीच अदब देत होती. संभाजीराजांना त्यांच्याबद्दल, प्रसंगी त्यांची पायधूळ मस्तकी घ्यावी, असा आदर वाटत होता. ही सर्व माणसे राजांच्या खास विश्वासातील होती. कर्तबगारीने, सचोटीने, इमानाने त्यांनी आपापली पदे कमावली होती.
पुरंदरचे फर्मान व ओलीसपण, आगऱ्याची कैद व हुन्नरी सुटका, औरंगाबादेची शहाआलमची भेट, राजे आणि जिजाऊसाहेब यांचा सार्थ प्रेमा या संभाजीराजांच्या हयातीतील घटना प्रत्यक्ष समोर पाहिल्यामुळे मंत्रिण आणि फडकरी मंडळी मनोमन पुरते जाणून होते की – उद्याच्या श्रींच्या राज्यात राजांचे पडणारे बिंब आहे ते! दौलतीच्या वाढत्या बारदान्याचे भोसलाई कर्ते वारस आहेत ते संभाजीराजे!
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७४.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव