धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७६ –
राजे बैठकीवरून उठले आणि जमल्या दरबारला आपल्या मनचा हेतू खुला करून सांगू लागले – “मंडळी, जखम-दरबार सरला आहे. आम्ही जातीने सांगतो आहोत त्यास प्रयोजन वेगळे.” राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांच्याकडे एकदा बघून घेतले. पुन्हा ते एकसुरी धीमे बोलू लागले. “उत्तरेहून रजपूत मिरजा राजा आला. त्याने वस्त्रे, हत्ती, नजर करून आमच्या फर्जंद संभाजीराजांना मनसबीचा मरातब दिला.
“आगरियात भरल्या दरबारी पादशाह औरंगने त्यांना रत्लजडावाची कट्यार बक्ष केलत औरंगाबादेस शहजादा शहाआलमने त्यांना हत्ती नजर करून मानाची वस्त्रे बहाल. फक्त आम्हास त्यांच्यासाठी काही देणे करणे, ते आजपर्यंत म्हटले तरी साधले नाही! म्हणोन एक विचार बांधून मासाहेबांच्या आणि आपल्या साक्षीने आम्ही तो बोलणार आहोत.
“आजपासून आम्ही आमचे फर्जंद संभाजीराजे यांना सवत्या कारभार-कामावर नामजाद करणार आहोत! शिक्के, कट्यार, वस्त्रे बहाल करणार आहोत.” राजांनी थांबून आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना मध्येच अर्थपूर्ण नजर दिली. “आजपासून संभाजीराजे दिल्या अधिकारात आपल्या नावे पत्रांवर शिक्के करतील. फर्मान, निवाडे, करार, खलिते यांवर दस्तुर लावतील.
“आम्ही त्यांच्या दिमतीस वबाकनिसीच्या मुतालकीसाठी मशारनिल्हे महादेव यमाजी यांना व चिटणिसी कामासाठी लेखनिक परशराम यांना जोडून देत आहोत. फडाचे कारभारी धारराव निंबाळकर यांनी हरकामी पडेल ती मदत करणे आहे. आजपासून संभाजीराजे शिक्काधारी, सरते कारभारी जाहले!” राजांच्यासमोर त्यांच्या खाजगी कारभाऱ्याने शिक्के, कट्यार, वस्त्रे, म्यानबंद तलवार असलेले तबक धरले.
तबकातील तलवार उचलीत राजे संभाजीराजांना म्हणाले, “असे दरबारा सामने या.”
संभाजीराजे उठून अदबीने राजांच्याजवळ आले. चिकाच्या पडद्याआडून येसूबाई बघत राहिल्या. राजे उठून आपल्या हातांनी तलवारीचे भगवे वाद संभाजीराजांच्या कमरेला आवळीत असलेले त्यांना दिसले. राजांनी मानवस्त्रे संभाजीराजांच्या खांद्यावर झडीने टाकली. तबकातील भंडारा घेऊन त्याची आडवी बोटे “जगदंब” म्हणत, संभाजीराजांच्या कपाळी असलेल्या शिवगंधावर ओढली.
संभाजीराजांनी त्यांना आणि जिजाऊंना नमस्काराचा रिवाज दिला. एका हाती संभाजीराजांचा हात घेऊन दुसऱ्या हाताची जोड जिजाऊंना देऊन राजांनी त्यांना उठते केले. त्या दोघांच्या मधून संभाजीराजे चालू लागले. त्या त्रिदळी भोसलेमंडळात मुजरा करण्यासाठी मंत्रिगणांसह उभा जखम-दरबार कमरेत झुकला!
राणीवशात हरोलीच्या बैठकीवर बसलेल्या सोयराबाई मात्र चटक्याने उठल्या. इतर कुठल्याही बाईसाहेबांकडे न बघता त्या पाठीशी उभ्या असलेल्या चंद्रा दासीला म्हणाल्या, “चंद्रा, चल. आमचे बाळराजे महाली एकलेच आहेत!!” आणि चंद्रा मागून येते आहे की नाही, हे न बघताच त्या आपल्या महालाच्या रोखाने तरातरा चालूही लागल्या. त्यांच्या चालण्याबरोबर फरफटत जाणारा नेसूचा जरीकाठी घोळ बघताना धाराऊंच्या कपाळीचे गोंदणे मात्र कळेल न कळेल, असे लकलकले!
इमारत कारखान्याचे प्रमुख आबाजीपंत यांचा किल्ले रायगडहून निरोप आला –
“जैसा सरकारस्वारीने मनी योजला, तैसा गड घडीव केला आहे. स्वामींनी पायधूळ झाडून शिलागारी नजरेखाली घालावी. काही उणे असल्यास करीणा सांगावा. चाकर सेवेत तत्पर राजांनी संभाजीराजे आणि निवडक लोक संगती घेऊन रायगडाची वाट धरली. इंद्रपुरीसारखा सजलेला किल्ले रायगड डोळ्यांखाली घातला. जेवढे राजांनी मनी धरले होते, त्याहून दशगुणी, रूपवान गड कारागिरांनी सजविला होता. जसे चांदण्यारात्री स्वर्गीचे शिलावट गडमाथ्यावर अल्लाद उतरून घडीव दगडाची नजरखेच रांगोळी रेखून पसार झाले होते! सजला गड पाहून राजे संतुष्ट होऊन राजगडी परतले. त्यांनी राजज्योतिषी आणि कुलोपाध्याय प्रभाकरभट यांच्या मसलतीने राजगड सोडण्याचा आणि रायगडी प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला. ही खबर आपगतीने गुंजणमावळभर पसरली. काळीजवेडी कुणबाऊ माणसे तांड्या-तांड्यांनी राजगडावर येऊन भोसलेमंडळाचे दर्शन घेऊ लागली.
पुढे होऊ घातलेल्या धरणीकंपाची कशी कुणास ठाऊक, पण मधमाश्यांना चाहूल लागते. मग कपारीला लटकलेल्या पोळ्यात ते सोडण्यापूर्वी त्यांची विचित्र चाळवाचाळव सुरू होते. तशी गडावरची सारी मने दाटल्या भावनेने भरून येऊ लागली. हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात प्रथम जामदारखान्यातील जडजवाहिरांचे मोहोरबंद पेटारे हलले!
संभाजीराजांच्या मनाच्या जमादारखान्याची मोहोर मात्र कुणीतरी आपल्या अज्ञात हातांनी खोलली! आजवर खोलवटात जतून ठेवलेल्या आठवणींचे जडजवबाहर बाहेर पडले! कधी पोहण्याच्या टाक्यावर, तर कधी रोवलेल्या मल्लखांबांसमोर, कधी कालेश्वरीच्या मंदिरगाभाऱ्यात, तर कधी होळीचौकात तर कधी संजीवनी व पद्यावती माचीवर ते कुणाला संगती न घेता, एकटेच फेर टाकू लागले!
गडाच्या दफ्तरखान्याचे बांधीव गठ्ठे मावळ्यांनी डोकीवर वाहून गडपायथ्याशी नेले! संभाजीराजांच्या मनाच्या दफ्तरखान्यातील आठवणींचे कितीतरी हस्तलेख गडवाऱ्यावर फरफरू लागले! कधी सदरेच्या हमचौकात, तर कधी संजीवनी माचीवर, बाहेर पडणाऱ्या भुयारी पायऱ्यांवर, कधी फडफडत्या जरीपटक्याला मिरवणाऱ्या निशाणचौथऱ्याच्या पायाशी, तर कधी दसराचौकाच्या खुल्या पटांगणात, असे ते वेड्यासारखे मूक रेंगाळू लागले!
आसवाबखान्यातील जरीवस्त्रांची गाठोडी गडाच्या कुणबिणींनी आवळली. संभाजीराजांच्या अंतरीच्या आसवाबगारात घटनांची कितीतरी वस्त्रे सळसळून उठली!
कधी थोरल्या मासाहेबांच्या खासेमहालात, तर कधी आबासाहेबांच्या बैठकमहालात, कधी अष्टभुजा जगदंबेची मूर्ती उभी असलेल्या देवमहालात, तर कधी रंगीबेरंगी घटनांचे पडदे-आडपडदे सळसळताहेत, असे वाटणाऱ्या दरुणीमहालात ते एकलेच पायफेर टाकू लागले!
शिलेखान्यातील भाले, तलवारी, कट्यारी, बोथाट्या, ढाला घोड्यांच्या पाठीवर टाकण्यात आल्या. अवजड तोफांची भांडी हत्तीवरून मार्गी लागली. संभाजीराजांच्या मनाच्या शिलेखान्यात विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळू लागली –
“हा गड सोडणे आहे! जेव्हा मनाचा दाटवा झाला, तेव्हा-तेव्हा तिथल्या वाऱ्याशी कानगोष्टी केल्या, जिथल्या भिंतीभिंतीवर मासाहेब आणि महाराजसाहेब यांचे श्वास-श्वास रुतून बसले आहेत, जिथल्या पाखरांचा झाडांच्या गचपणात उठलेला सांजकालवा मनी शिक्केमोर्तबासारखा ठसून बसला आहे, जेव्हा कोणीच जवळ नव्हते, तेव्हा ज्याच्याशी मिटल्या ओठांनी आम्ही उदंड बोललो आहोत, तो हा गड सोडणे आहे!
प्रस्थानाचा ठरला दिवस कातळकड्याबाहेर उठला. संभाजीराजांनी नेहमीच्या हमामखान्यात शेवटचे स्रान घेतले. गडवा खाली ठेवताना त्यांना वाटले – ‘या वाहत्या पाण्याबरोबरच खूप काही वाहून चालले आहे! ‘ अंगी राजसाज घेऊन ते जिजाऊंच्या महाली दर्शनासाठी आले.
त्या महाली मुसमुसणारी धाराऊ जिजाऊंना म्हणत होती – “मला जाऊ देवा आता कापूरव्हळाला, मासाब. म्या कशाला येऊ संगट. ह्यो ठाव बरा हुता. कदी नडलं- पडलं, तर हितनं गावाकडं जाया सुदरत हुत. त्यो गड कुठल्या पल्ल्यावर हाय कुनाला ठावं!
जिजाऊ धाराऊला सोडायला तयार नव्हत्या. त्या परोपरीने तिची समजूत काढू बघत होत्या. धाराऊ ते ऐकत होती; पण कानाच्या पलीकडे ते तिच्या काळजापर्यंत पोहोचतच नव्हते. शेवटी संभाजीराजे पुढे झाले. धाराऊला एवढेच म्हणाले, “तुझ्या बरोबर आम्हीही येऊ कापूरहोळास!”
ते ऐकून मात्र धाराऊ चक्करली. “ल्येकरा, तुज्यामागनं मसणोटीत जाया दिकुल पाय मागं हटायचे न्हाईत माजं! लई गुंतवा झालाय रं माझ्या वासरा तुज्यात!” म्हणत आखरीला धाराऊ साऱ्यांबरोबर रायगडी येण्यास राजी झाली. संभाजीराजांना बरोबर घेऊन जिजाऊ सदरी बैठकीजवळ जायला निघाल्या. आपल्या महालातून बाहेर पडलेले राजेही येऊन त्यांना मिळाले. ते भोसलाई त्रिदळ सदरेवर आले. मुंगी शिरणार नाही, असे माणूस समोरच्या चौकात दाटले होते. माणसे होती, पण आवाज नव्हता. शांत, सारे कसे शांत होते.
राजे, जिजाऊ, संभाजीराजे बैठकीवर बसले. परडी फिरविणारा मानकरी आला. राजांनी भंडाऱ्याची चिमट उचलून उधळली – या सदरेवरची ही अखेरची चिमट आहे. या विचाराने त्यांची बोटे थरथरली. पूर्वी रिवाज नव्हता, तरीही परडीवाल्याने हातची जिजाऊ आणि संभाजीराजांच्या समोर धरली. त्यांनी चिमटी भरून घेतल्या. आईच्या कृपेची उधळण केली. कण उधळले, मनामनातील दाटल्या भावनांचे. आजवरच्या भल्या-बुऱ्या एकोप्याचे! गडावरच्या एकजात झाडून साऱ्या असामींच्या हातावर ते तिघेही मोहरा, वस्त्रे, हत्यारे ठेवणार होते! ज्यांनी सेवा केली त्यांचा तो हक्क होता. राजासाठी तो रिवाज होता. मागील माणसास संतोषून जाणे!
सदरबैठकीवरून शेवटचे दान झाले. राणीवशात वर्दी गेली. अंगाभोवती शालनामे पांघरलेला राजांचा राणीवसा दरुणीमहालाबाहेर पडला. सिद्ध ठेवलेल्या मेण्यात खाशा स्वाऱ्या बसल्या. गड-उताराला लागल्या. सर्वांत शेवटी जिजाऊ मेण्यात बसल्या. वळीव पावसाने आभाळ भरून यावे तसे त्यांचे मन भरून आले. बाहेर काहीच न दाखविता त्या पुटपुटल्या – “जगदंब, जगदंब.”
मेणे गड उतरू लागले. जिजाऊंच्या मेण्याबरोबर चालणाऱ्या धाराऊने वाकून चिमटभर माती वर घेतली. आपल्या सुताडी लुगड्याच्या शेवात बांधली. मंत्रिगण, किल्लेदार सुभानजी, सिलिमकर यांच्या सोबतीत राजे आणि संभाजीराजे संजीवनी माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या रोखाने चालले. दरम्यान गडाची किल्लेदारी सिदोजी थोपट्यांकडून सुभानजी शिळिमकरांकडे आली होती. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसताच राजे थांबले. ते का, ते कुणालाच कळले नाही. या – याच माचीवर झिजून शांत झालेल्या सईबाईची चिता पेटून विझली होती. त्या आठवणीने राजांच्या नेत्रकडा ओल्या झाल्या, त्यांचा हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला.
आजवर अनेक वेळा पायांखाली टाकलेला तोच भुयारी मार्ग आला. धोंड हटली. राजे-संभाजीराजे आत उतरले. पायऱ्या मागे पडू लागल्या. काहीतरी योजून चालते राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, “तुम्हास आठवतं, तुम्ही विचारलं होतं एकदा – हे भुयार संपणार तरी केव्हा?”
“जी, आठवतं. तुम्ही आम्हांला सांगून ठेवलं आहे महाराजसाहेब, “भुयारं कधीच संपत नसतात. चाल कधी थांबत नसते!’”
ते पितापुत्र संजीवनी माचीवर आले. उभी माची माणसांनी फुलली होती. गड- उतारासाठी सिदोजी थोपट्यांनी पालख्या सिद्ध ठेवल्या होत्या. माचीच्या निशाण चौथऱ्याजवळ राजे आणि संभाजीराजे आले. माना उठवून त्यांनी जरीपटकक््याला नजरा दिल्या. मोतीलगी ओळांबल्या.
राजे थोपट्यांना म्हणाले, “सिदोजी, आज आम्ही पालखीतून गड उतरणार नाही! साऱ्यांच्या पायसोबतीने आम्ही गड उतरू.”
“जी.” सिदोजींनी आज्ञा झेलली. राजे-संभाजीराजे देवदर्शन करून संजीवनी माची सोडून पाली दरवाजाची वाट तोडू लागले. देवमाशांच्या आवतीभोवतीने, पाठमागाने शेकडो लहाने मासे ओढल्यागत जात असतात, तशी गडमाणसे राजांच्याबरोबर चालू लागली.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७६.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव