महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,462

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७७

Views: 2541
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७७ –

पाली दरवाजा आला. दरवाजाच्या नगारखान्यात गड-उताराची नौबत झडू लागली. दरवाजात उभे राहून राजे-संभाजीराजांनी ती ऐकली. चौघड्यावर पडणाऱ्या काठीचा ठेका नेहमीसारखा एकसूर नव्हता! मध्येच कुठेतरी ठेका चुकार होत होता! राजे दरवाजापार होताच, नौबतवाल्यांनी हातीच्या टिपऱ्या खाली ठेवल्या आणि तेही पायऱ्या उतरू लागले. मावळमेळ्यात राजे-संभाजीराजे राजगडाच्या पायथ्याशी आले. राजांनी किल्लेदार सुभानजींच्या हातात श्रीफळ-विडा दिला. गडाकडे बघत ते म्हणाले, “किल्लेदार, माळी जैसा बगिचा राखतो, तैसी गडाची निगा राखा. येतो आम्ही.” राजांनी गळ्यातील मोतीकंठा उतरून सुभानजींच्या हातात ठेवला.

राजांच्या पायांवर पगडीधारी डोके ठेवत लहान पोर पुटपुटावे तसा सुभानजी गदगदू लागला. त्याला उठवून खांदाभेट देत राजे म्हणाले, “सुभानजी, सावरा, जगी जे-जे प्रिय आहे, त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते.”

राजे आणि संभाजीराजे यांनी समोरच्या खड्या कातळदेवाला हात जोडून नमस्कार केले. ते बघताना भोवतीची मावळी काळजे फुटली. राजे सुरतेवर चालून गेले तेव्हा नव्हती, मिर्झा-अफजलच्या भेटीसाठी गेले तेव्हा नव्हती, आग्राभेटीसाठी कूच झाले तेव्हा नव्हती, पण आज – आज माणसं डोळ्यांवाटे फुटली! दाटीवाटीने पुढे येत धन्यांच्या पायांवर पगड्या ठेवू लागली.

प्रतापरावांनी जीन कसून तयार ठेवलेल्या दोन पांढऱ्याशुभ्र घोड्यांजवळ राजे- संभाजीराजे आले. राजांनी हात देत संभाजीराजांना मांड जमवून दिली. पाठोपाठ राजांनी मांड घेतली. पाठमोऱ्या झालेल्या राजे-संभाजीराजांना कल्पना नव्हती की, जबान असती तर उभा राजगडच कमरेत झुकून म्हणाला असता, “धनी, धाकलं धनी, वाईच थांबतिसा! पायधूळ माथ्यावं घ्यावी म्हन्तो म्या!” आणि – आणि उडत्या गरुड पक्ष्याच्या पवित्र्यात उभा असलेला राजगड सुवेळा आणि संजीवनी माचीचे पंख फडफडवून झेपावला असता – थेट आकाशात!! चालला! तो चक्रवर्ती संन्यासी आपल्या कैक स्मृतींचे पायठसे राजगडावर ठेवून चालला! त्याच्या जोडीने बालभुत्या चालला. आठवणींचे कितीतरी पाजळले पोत राजगडी पेटते ठेवून!

रायगड टप्प्यात आला. पायथ्याच्या पाचाड या गावठाणात आबाजीपंतांनी जिजाऊंच्यासाठी खणबंद वाडा उभा केला होता. रायगडावर सुसहूताने हूर्ताने प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या राजकुलाचा त्या वाड्यात मुक्काम पडला. पाचाड शिं ठाणे होते. गडाला पडेल तो, बस्तभाव पुरविण्यासाठी इथे व्यापारपेठ होती. दुसरा दिवस उजाडला. पाचाडच्या या वाड्याच्या पैस सदरेवरून समोर रायगड दिसत होता, तळ्यातून बाहेर उठलेल्या कृष्णकमळासारखा. त्या पैस सदरेवर उभ्या राहून, मनोमन साद घालणाऱ्या रायगडाकडे जिजाऊ डोळे लहाने करून बघू लागल्या. त्यांच्या नेत्रकडा धरून कानशिलापर्यंत आक्रसलेल्या सुरकुत्या उठल्या. गड बघणाऱ्या खटाटोपात असल्याने त्यांच्या डोईचा पदरकाठ किंचितसा मागे हटला होता. त्यातून डोकावलेली त्यांची पांढरी केसवट राजांच्या नजरेतून सुटली नाही.

“मासाहेब, हा सामने दिसतो तो “खूबलढा बुरूज!  त्यावर थेट दिसते ती मावळती माची!” राजांनी उजवी तर्जनी उठवून रोख दाखविला. शेजारी उभे असलेले संभाजीराजे तो बुरूज व माची निरखू लागले.

“राजे, आमच्यासाठी हा सवता वाडा कशाला उभा केलात?” जिजाऊ समोर बघत म्हणाल्या. राजे गंभीर झाले. जिजाऊंच्या उजाड माथ्याकडे बघताना त्यांचा आवाज धरल्यासारखा झाला. “मासाहेब, आम्ही काय करू शकतो आपल्यासाठी? आमचा तो बकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी आम्ही चढविल्या, तरी ते थिटे आहे. तुम्ही आम्हास कधी बोलला नाहीत; पण तुमच्या महालावरून जाताना आम्ही ऐकले आहे, तुमच्या घशात घोटाळणारी दम्याची उसळ! मासाहेब, तुम्हाला गडावरची गार हवा नाही झेपणार. त्यासाठी हा वाडा आहे.” राजे थांबले. संभाजीराजे राजांच्याकडे बघत राहिले.

“आम्ही समोरचा बुरूज व माची का दाखविली, ध्यानी नाही आलं मासाहेब?” राजांनी पुन्हा समोरच्या बुरुजाकडे बोट रोखत विचारले.

“नाही समजलो. काही खास?” जिजाऊंनी राजांच्या कपाळीचे शिवगंध निरखले.

“मासाहेब, तुम्ही या वाड्यात राहणार. आम्हास गडावरच राहणे भाग आहे. आपले दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गळ्याखाली पाण्याचा घोटह्ी उतरत नाही. म्हणून… म्हणून या वाड्याची बांधणी आम्ही इंदळकरला तिरकी, कोनी धरण्यास सांगितली. वरच्या त्या ‘खूबलढा ‘ बुरुजावरच्या माचीवर आम्ही उभे राहिलो की, या सदरजोत्यावर उभ्या असलेल्या आपल्या मूर्तीचे आम्हास दूरवरून का होईना दर्शन घडेल!! जग पूर्वेला सूर्योदय पाहते, आम्ही पश्चिमेला पाहू!”

राजे वेड्यासारखे माचीकडे बघत राहिले. डोळे पाण्याने भरून आलेल्या जिजाऊ राजांच्याकडे बघत राहिल्या. संभाजीराजांनी समोरच्या रायगडाचा उंचावा क्षणभर निरखला. पुन्हा राजांच्याकडे बघताना त्यांना वाटले – “रायगड थिटा आहे! महाराजसाहेबांच्या कमरेला बांधलेल्या धोप तेगीएवढा! ‘

ठरल्या मुहूर्ताला पालख्या आणि मेणे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. पहाटेचा गारवा धरून भोई रायगडची चढण चढू लागले. झाडाझुडपांत दडलेली वाटेवरची फुलबाग आली. मेणे-पालख्या ठाण झाल्या. सामोरा आलेल्या माळ्याचा मुजरा आपलासा करीत जिजाऊ, संभाजीराजे, राणीवसा, सर्वांसह राजे बगिच्यात आले. गुलाब, कर्दळ, मोगरा, मावळशेवंती, अबोली, अनंत अशा रंगीबेरंगी फुलांचा जमाव बागेत चारी बाजूला दाटला होता. त्यांचा मेळ पडलेला मजेदार सुगंध सगळीकडे पसरला होता. राजे एका गुलाबाच्या रोपट्याजवळ थांबले.

“हा उत्तरी, मोगलाई वाण मासाहेब,” असे म्हणत राजांनी एक फुलू घातलेला गुलाबकळा खुडला आणि जिजाऊंच्या हाती दिला. ते बघताना संभाजीराजांना औरंगाबादेतील शाहजाद्यांचे बोल आठवले, “गुलाब भी खुबसूरत होता हे!” रिवाज म्हणून हाती घेतलेला गुलाबकळा जिजाऊंनी निरखला. कुणालाच न कळणारी अशी एक दुखरी भावछटा त्यांच्या सुरकुतल्या मुद्रेवर पसरली. त्यांना राजांना म्हणावेसे वाटले – “फुलाचा हा वाण आम्ही बघितला आहे राजे! खूप जवळून! काटे असलेला सर्वांत देखणा वाण हाच!”

जिजाऊंनी आपल्या हातातील गुलाबकळा तसाच संभाजीराजांच्या हातात ठेवला. जणू ते फूल जवळ असणे, हा संभाजीराजांचा हक्क होता! वसा होता! हाती फूल घेतलेल्या संभाजीराजांना बघताना जिजाऊंना मन पलटी खाऊन मागील काळात गेल्याचा भास झाला! “तेच साफ डोळे! कपाळाची तशीच भरगच्च गादी!’ बाग नजरेखालून घालून स्वाऱ्या पुढची चढण चढू लागल्या. “लहान दरवाजा’ हा गडाचा पहिला दगडबंद दरवाजा आला. भोई थांबले. राजे-संभाजीराजे पालखी-उतार झाले. अदबीने पुढे होत, आबाजीपंतांनी राजांच्या हाती श्रीफळ दिले. राजांनी गडाच्या प्रथम दरवाजाचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी श्रीफळ वाढविले. भकले दुहाती फेकून दिली. हाताला धरून त्यांनी प्रथम जिजाऊंना उंबरठा ओलांडू दिला. मग ते आणि संभाजीराजे उंबरठ्यावर गेले. जिजाऊ गडाचा कमानबंद दरवाजा निरखू लागल्या! जोड कमानीचा तो भक्क्म दरवाजा बघून त्या सुखदिल झाल्या.

गडचढीचा पहिला टप्पा संपला. दुसरा सुरू झाला. आता भोयांच्या कपाळी घामाची थेंबावळ उठू लागली. मध्येच थांबून ते थोप्यांवर मेणे-पालख्या तोलून उभ्या-उभ्या आपली भरली छातवाने सुमार करून घेऊ लागले. अंबारकोठ्या मागे पडल्या. पहिल्या चौकीची दगडी ओवरी मागे पडली. आणि – आणि “रायगड’ हा एक वास्तुपुरुष असून तो आपला जबडा ताणून उभा आहे; असा भास निर्माण व्हावा तो ‘महादरवाजा’ समोर आला. राजांनी महादरवाजाची पूजा बांधली. दोन भक्कम बुरुजांना धरून या दरवाजाच्या दुहाती उंच नक्षीदार तटबंदी फिरली होती. वर नगारखान्याची व्यवस्था होती

भोसलेमंडळ दरवाजापार होताना रायगडावरची पहिली नौबत झडली! राजे, जिजाऊ, संभाजीराजे यांच्यावर सोनमोहरा उधळण्यात आल्या. आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे-संभाजीराजे पालखी-उतार होऊन जिजाऊ बसलेल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले, समोर आभाळात घुसलेले द्वादशकोनी, पाचमजली मनोरे दिसू लागले. जसा रायगड आपले मनोऱ्यांचे दोन्ही भक्कम हात उभवून वरच्या आभाळाला मूकपणे साद घालीत होता!

गोल घेराचा गंगासागर तलाव आला. जिजाऊंचा मेणा थांबला. एक हात राजांनी धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजीराजांनी घेतला आहे, अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठाशी आल्या. जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिर्बिब बघू लागले; हरवल्या डोळ्यांनी. गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव झाला होता! द्वादशकोनी उंच मनोरे. डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ! त्या तिघांपैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले!

तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून, बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठीएवढ्या खंड्या पक्ष्याने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला!! लाटाच लाटा उठल्या. संभाजीराजे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्ष्याच्या चोचीत मासोळी पाहिली! मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्ष्यामागून दौडत गेले. पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रूपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसलीन्दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली! मासोळी होत्याची नव्हती झाली!

खंड्याने शीळ भरली संतोषाने! संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाजात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पायबांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाजावरून तीन वेळा उतरून दूर फेकून दिले!

असते! चुन्या-दगडांनी घडलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे “बाळसे’ असते! त्यालाही ‘दृष्ट’ लागण्याचा संभव असतो! त्यासाठी हा ‘उतारा’ होता. राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या. आणि पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे, अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे-संभाजीराजे यांनी रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरदरवाजाचा दगडी उंबरठा ओलांडला!!

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७७.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment