धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७८ –
स्वप्रनगरीचे दालन उलगडावे, तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐन शिलावटी भाग समोर आला. एकास एक लागून असलेल्या सातमहालांच्या, माळवदे असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यांतील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर, आतल्या चौकात दगडी पाटातून फिरविलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी, अशी चतुर सोय केली होती. त्या सात महालांची जोड-इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, “हे कसले वाडे?”
“हा राणीवसा आहे संभाजीराजे.” उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला. त्यांना सईबाईूंचा आठव आला. महाल सात होते. ‘आठवा’ म्हणण्यापेक्षा “पहिला’
महाल त्यात असायला पाहिजे होता – सईबाईचा! तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही! कुणाला न दिसेल असा, राजांच्या मनात! सावळ्या स्मृतींच्या रूपात! जिजाऊ, राजे-संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला ‘खासेमहाल ‘ उर्फ ‘राजवाडा’ बघून राजे सिंहासनचौकात आले. ही राजदरबाराची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखान्यापर्यंत पाच हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर रुजामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केली होती. त्या कारंज्यांभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंज्यातून पाणी कसे उसळी घेते, याची जाणकारी देऊ लागला. संभाजीराजे एकरोखाने बर फवारणाऱ्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले.
नगारखान्याची अस्मानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे-संभाजीराजे-जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले. जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव, इंदळकर, आबाजीपंत, मुधोजी सरकवास, चांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या – गडदेवाच्या! श्री जगदीश्वराच्या!
होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळीसणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजीपंतांनी साऱ्यांना दिली. मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी, अशी जोती राखलेली, दुतर्फा एका हारीत दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ बसती झाली नव्हती. ती वसती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह सामोरा आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली.
जगदीश्वराच्या मंदिराचा उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली. हातजोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर, राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे, तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे, संभाजीराजे उभे राहिले. तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा, मंत्रिगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात, अर्धवट फुलांनी झाकलेले,
अभिषेकपात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले. डोकीवर असलेल्या घंटेचा टोल राजांनी दिला. सारे मंदिरआवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले.
“पंत, आम्हा हिंदूंच्या मंदिरांत प्रवेशचौकात या दगडी कासवाची योजना का केलेली असावी? काही अंदाज?” पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजांनी विचारले.
“जी,” म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले. आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, “नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत – पण हे पहिल्या कूर्मावताराचं प्रतीक असावं.”
“आम्हास वेगळंच वाटतं पंत. मंदिरी येणाऱ्या हर दर्शनभक्तास, “काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभाऱ्यात या’ याची सांग देण्यासाठी ही योजना असावी! पण आम्हा दर्शनभक्तांचे, विसरगतीनं का होईना पाय पडतात, ते या कासवाच्या पाठीवर!!” राजे भारल्यासारखे बोलत होते.
कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले – “एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं! महाराजसाहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत – आमच्या पाठीवर!!’
जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले. काळा हौद, भवानी टोक, बारा टाकी, दारुकोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहानथोर साऱ्या जागा बघून राजे-संभाजीराजांच्यासह नगारखान्याच्या पायऱ्या चढून आले. ही रायगडावरची सर्वांत उंच जागा! निशाण-चौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटकक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती.
“तो तोरणा -” उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला. “तो – तो राजगड.”
“जी.” संभाजीराजांनी साद भरला. दोघांचेही जरीनामे वाऱ्यावर फरफरू लागले. जिरेटोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानांतील सोनचौकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या शे-दोनशे मेंढीकळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू, जातिवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो, तसे सह्याद्रीच्या काळपट रांगांत मुरू बघणारे आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले.
“तो ‘सोनगड’, तो “चांभारगड’, तो “’घोसाळा’, हा ‘लिंगाणा’, हा ‘कांगोरा’, हा “कोकणदिवा’, तो “तळेगड’, शंभूराजे, हा “रायगड’ जगदंबेचा सर्वांत थोर भुत्या आहे! भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची चाळ त्यानं कंठात चढविली आहे! त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा “तांदूळ-चौक’ भरला आहे! याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाट संबळ-तुणतुण्याचा ठेका धरून आहेत! जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याचा पोत करून तो हा हाती धरतो! या जरीपटकक्याचा भगवा-भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे! असा हा रायगड आहे!” राजांनी हाताची बोटे छातीशी नेत ‘त्या’ भुत्याला मान दिला.
शुभमुहूर्तावर राजांनी जिजाऊंच्या हातांनी जगदीश्वराला अभिषेक करविला. महिन्याभरातच रायगडाचा दफ्तरी राबता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधरपंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आल. पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलावून राजांनी एक सक्त आज्ञा केली – “एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे. त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची ख्रानादी आन्हिके आटोपून त्या तुळशीपूजेसाठी सदरी येतील, त्या समयास घंटेचे टोल एकसुरी देत जाणे! त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्यासमवेत मावळमाचीवर दाखल होऊ. दुरून का होईना, जे घडेल ते आऊसाहेबांचे करू. ये काम बिलाकसुरीने हररोज पार पाडीत जाणे!”
आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. त्याने केवळ राजे-संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही. पाचाडातील शिबंदीच्या शिलेदारांना, अठरा कारखान्यांतील कष्टकऱ्यांना कळून चुकले की, घंटानाद घुमू लागताच जिजाऊसाहेब सदरेवर आलेल्या असतात! असेच संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळमाचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून राजे-संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते.
चुन्याची बोटभर खडी रेष दिसावी, तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदबमुजरे घातले. सदरेवरची रेष निश्चल खडी होती. बुरुजावरून पितापुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडवून मोकळे झाले होते!
“युवराज” राजे काहीतरी योजून बोलू लागले.
“जी.” संभाजीराजांनी त्यांची साद पडू दिली नाही.
“पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून मासाहेब तुम्हा-आम्हांस अचूक कशा काय ओळखतील?” राजांनी विचारले.
“अलबत… अलबत ओळखतील मासाहेब अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते!” संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायांकडे नजर लावीत म्हणाले – “आपण केवढे थोर – आम्ही – आम्ही केवढे छोटे! मासाहेब चुकणार नाहीत!” संभाजीराजांनी उत्तर दिले.
निरोपासाठी आलेल्या गणोजी शिर्क्यांना संभाजीराजांनी खांदाभेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर जाणून गेले की, “एवढ्या पंधरा दिवसांच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी, ना चमकत्या तोड्यांशी, ना आमच्याशी कधी खुल्या जबानीने बोलले! कधी निसटते बोलण्याचा योग आलाच, तर गणोजी शिर्के पापण्यांची फडफड करतात! एखादा शब्द बोलून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्याच्या कड्याकडे एकरोख बघत राहतात!’ एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की, तसेच चालत त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे! पण ते रिवाजी दिसले नसते.
पिलाजी आपल्या मुला-सुनेनिशी निघून गेले.
क्रमशः छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ७८ –
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव