धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८० –
अंगाबाहेरे वाटावा, असा शालू नेसलेल्या येसूबाई पुतळाबाईच्या महालासमोरच्या सफेलीत येऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यांना समोरच्या चौकातील पाटात फिरविलेले पाणी दिसत होते. पावसाने ते आता गदळ झाले होते. थोडा वेळ येसूबाई त्या पाटाकडे बघत राहिल्या. सातमहालातील पुतळाबाईंच्या महाली वावरताना घडलेले अनेक प्रसंग त्यांच्या मनात पाटासारखे फिरले. पाचाडात मासाहेबांच्या सोबतीला जाताना मामीसाहेब – पुतळाबाई त्यांना दोन-तीन वेळा बजावून गेल्या होत्या – “थोरल्या बाईसाहेबांचे नुसते ऐकत चला. त्यांना जाबसाल करू नका. धाराऊस पाठीशी ठेवूनच त्यांच्या भेटीस जाणे करा. हा महाल आमचा नव्हे. आत तुमचा आहे!”
रायगड चढताना गंगासागर तलाव बघताच येसूबाईनी मनोमन ठरवून टाकले होते, ‘या तलावासारखे झाले पाहिजे. कानी पडेल ते-ते पोटी ठेवले पाहिजे!’ त्या विचाराबरोबर येसूबाईची नजर पाण्याच्या पाटावरून उठली आणि सफेलीच्या दगडी भिंतीला भिडली. तिच्या पायथ्याजवळून चाललेल्या मुंग्यांच्या रांगेतील थरथऱ्या देवमुंग्या त्यांच्या पायांवर चढल्या! त्यांनी फरसबंदीवर पाय झटकून त्या हटवल्या. एकमागात अंगापेक्षा मोठे कसलेतरी पांढरे कण घेऊन धावणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे येसूबाई एकरोख बघत राहिल्या. त्यांच्या पायांच्या हालचालीने झालेला थोडासा गैरमेळ मुंग्यांनी पुन्हा जमवून घेतला.
रामराजांशी बोबड्या बोलात बोलून सोयराबाईंच्या महालातून बाहेर पडलेले आबासाहेब आपल्या पाठीशी येऊन उभे आहेत, याचे येसूबाईना भान नव्हते! राजेही त्या कष्टाळू, लहान्या जिवांची धडपड बघत, तसेच थांबले होते.
“बघितलंत सूनबाई, एवढासा जीव पण वकुबापेक्षाही केवढा भार वाहून नेतो आहे!” राजे शांतपणे बोलले.
त्या आवाजाने येसूबाई मात्र गडबडल्या. झटकन त्या तळहातात पदराचा शेव घेऊन नमस्कारासाठी झुकू लागल्या. त्यांना थोपवून वर घेत राजे म्हणाले, “असू दे.”
खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाईच्या कपाळीच्या मेणमळल्या आडव्या कुंकुबोटात राजांची नजर क्षणभर स्थिरावली. आणि कारण नसता त्या बोटांनी खोलवर रुजलेली सईबाईंची सय उमळून आली. “यांना बघायला, यांच्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवायला त्या हव्या होत्या.’ अनेक विचारांची मुंग्यासारखी एक रांग राजांच्या मनी चरत गेली. तिचा माग घेत गंभीर झालेले राजे संथ पाबलांनी चालू लागले. त्यांना तसे चालताना बघून न येसूबाईना आपल्या आबांचा – पिलाजींचा – आठव झाला. क्षणापूर्वी राजे म्हणाले, बोल प्रत्यक्ष आपले आबाच घोगऱ्या आवाजात आपल्या कानांत सांगताहेत असे येसूबाईना वाटले – “एवढासा जीव पर वकुबापरास केवढा भार वाहून नेतोय!”
जगदीश्वराचे दर्शन घेऊन जोत्याजी केसरकरासह खासेमहालात परतलेल्या संभाजीराजांना खिदमतगाराने आत येऊन वर्दी दिली, “मुतालिक महादेव यमाजी भेटींची आज्ञा मागतात.”
“पेश येऊ द्या.” युवराजांनी त्याला इजाजत दिली.
प्रौढ वयाचे महादेव यमाजी उपरणे सावरीत महालात आले. पगडी झुकवीत त्यांनी मुजरा रुजू घातला. नजर युवराजांच्या पायांवर ठेवून ते म्हणाले, “थोरल्या स्वामींनी युवराजांना आपल्या सदरेशी याद फर्मावलं आहे.” महादेव यमाजींना पुढे ठेवून जोत्याजींसह संभाजीराजे तसेच महालाबाहेर पडले. राजांच्या वाड्याची सदर आली. तिच्या दोन्ही तर्फांना मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी त्रिमल, बाळाजी हात बांधून अदब धरून उभे होते. राजांच्या पाठीशी विश्वासू हुजऱ्या खंडोजी दाभाडे कमरेच्या हत्यारांवर मूठ देऊन खडा होता. युवराजांना बघताच त्या साऱ्यांचे मुजरे झाले.
“या.” संभाजीराजांना बघून राजे म्हणाले. राजे बसलेल्या बैठकीच्या समोर येत युवराजांनी त्रिवार अदबमुजरा रुजू घातला.
“या. यांची ओळख करून घ्या.” राजांनी समोर उभ्या असलेल्या भगव्या कफनीधारी, तेजस्वी गोसाव्याकडे हाताचा इशारा दिला. राजांच्या बैठकीच्या खालगत पायरीवजा बिछायतीवर संभाजीराजे बसले.
“हे समर्थांचे शिष्य. दिवाकर गोसावी.” राजांनी संन्याशाची ओळख दिली.
दंड, मनगटात रुद्राक्षांची टपटपीत कडी आवळलेले, दाढीधारी, सतेज दिवाकर गोसावी हातातील दंड तसाच धरून नमस्कारासाठी किंचित झुकले. “आणि हे आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे.” राजांनी युवराजांच्या खांद्यावर हाताची बोटे ठेवीत दिवाकर गोसाव्यांना त्यांचा परिचय दिला.
“रघुकृपा!” दिवाकर पुटपुटले.
संभाजीराजांनी उठून त्यांना नमस्कार दिला.
“बोला दिवाकरपंत, काय धरून येणं झालं?” राजांनी गोसाव्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे निरखले. “गुरुदेवांचा मुक्काम कोडोली पारसगावात आहे. आपल्या भेटीची ते इच्छा करतात. आपल्यासाठी त्यांनी पत्र दिले आहे.” दिवाकरांचा आवाज हनुमानाच्या मंदिरातील घाटेसारखा होता. त्यांनी खांद्याची झोळी पोटाशी घेत तिच्यातून पत्राची बळी बाहेर काढली. पुढे येत वाकून ती राजांच्या हाती दिली. हाती घेतलेली वळी मिटत्या डोळ्यांनी राजांनी आपल्या कपाळीच्या शिवगंधाला भिडविली. ती वाचण्यास तशीच बाळाजींच्या हाती द्यावी, म्हणून एकदा बाळाजींच्याकडे नजर टाकली. आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, ती मागे हटलेल्या दिवाकरांच्याच रोखाने पुन्हा धरीत राजे म्हणाले, “समर्थांचे बोल समर्थशिष्यांच्या तोंडून ऐकावे, असं आम्हांस वाटतं.”
“जशी राम इच्छा!” म्हणत दिवाकर पुन्हा पुढे झाले. झुकून त्यांनी राजांच्या हातून पत्राची वळी आपल्या हाती घेतली. त्या पत्रात काय आहे, ते खुद्द दिवाकर गोसाव्यांनाही माहीत नव्हते.
चौदा वर्षांपूर्वी एकदा राजगडावर दुसऱ्या एका समर्थ शिष्याची – भास्कर गोसाव्यांची – राजांशी भेट झाली होती. त्या भेटीत राजांनी त्यांना विचारले होते की, “तुमचे गुरू कोण? कुठले? कोठे राहतात?” भास्कर गोसाव्यांनी त्यांच्या गुरूंचा महिमा त्या वेळी सांगितला होता, पण त्याउपर राजकारणाच्या घाईगर्दीत राजांना समर्थांचा परामर्श घेणे जमले नव्हते. आज समर्थांनी आपणहून त्यांना पत्र धाडले होते. निर्हेतुक. राजांचे चढत्या शिगेचे पराक्रम ऐकून जे वाटले, ते रसाळ रामबोलीत समर्थांनी पत्रात उतरविले होते.
“जय जय रघुवीर समर्थ” पत्र वाचण्यापूर्वी दिवाकरांनी नामस्मरण केले. तासावर ठणठणीत टोल उठावेत, तसे दिवाकर गोसाव्यांच्या तोंडून समर्थांचे सूर्यबोल सर्वांच्या कानी पडू लागले :
“निश्चयाचा महामेरू| बहुतजनांस आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुणमहत्त्वाशी। तुळणा कैशी।।
नरपति हयपति। गजपति गडपति।
पुरंदर आणि शक्ति। पृष्ठभागा।।
यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत आणि जयवंत। जाणता राजा।।
आचारशील विचारशील। दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील। सर्वांठायी।।
धीर उदार सुंदर। शूर क्रियेसी तत्पर।
सावधपणेसी नृपवर] तुच्छ केले।।
तीर्थक्षेत्रे ती मोडिली। ब्राह्मणस्थाने बिघडली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्म गेला।।
देवधर्म गोब्राह्मण। करावयासी रक्षण।
हृदयस्थ झाला नारायण। प्रेरणा केली।।
उदंड पंडित पुराणिक। कवीश्वर याज्ञिक वैदिक।
धूर्त तार्किक सभानायक। तुमचे ठायी।।
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही| तुम्हांकरिता।।”
गावोगाव भ्रमंती करताना डोळांदेखत लोकांचे नरकहाल बघणारे दिवाकर गोसावी भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून झरलेली आसवे दाढीवर उतरली. वाचन खुंटले. सारे कानांचे ओठ करून ते अमृतबोल प्राशीत होते. नाकाचा गड्डा चिमटीत धरून मिटल्या डोळ्यांनी राजे विचारात गेले होते – “कसे दिसत असतील समर्थ? हृदयस्थ झाला नारायण! श्रीमंत योगी! योग? केवढा दूरचा पल्ला! खर्ची पडलेला आमचा हर मोहरा योगी झाला! आम्ही त्यांच्या योगीपणाचा भार खांद्यावर घेऊन वाहतो आहोत! आम्ही भारवाहक! महाराष्ट्र धर्म! पृथ्वी आंदोळली!’ जिथं तारे संपतात तिथं जाऊन राजे पोहोचले होते! खोल – खोल. दूर – दूर. दिवाकरांच्या बोलाबोलांनी आजवर सापडत नव्हते; ते सारे मनात अडखळलेले महाराजसाहेब, संभाजीराजांना मूर्तिमंत गवसत होते – “निश्चयाचा महामेरू!’ महामेरू!
केशव पंडितांनी रामायणाच्या पठणात सांगितलेला, सर्वांत उंच पर्वत! या रायगडाहून दशगुणी उंच! तेवढा निश्चय! आग्ऱ्याच्या दरबारात “कभी नहीं’ म्हणताना पेटून उठलेला!
आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला! निश्चयाचा महामेरू!
“बहुतजनांस आधारू!” ‘आमच्या मावळ्यास हात-जोड देऊन बसल्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे’ म्हणणारा! – ‘आधारू’! म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवीत – “बाबा जे मनी आले, ते आम्हांस बोलले पाहिजे’, म्हणणारा आधारू!
धीर, उदार, सुंदर! होय अतिसुंदर! एका रात्री आई जगदंबा स्वप्नात आली तेव्हा “जाऊ नको, थांब!” म्हणत विसकटल्या केसांनी, घामेजल्या, थरथरत्या चेहऱ्याने, फुलल्या डोळ्यांनी आम्हाला बघताना दिसलेला तो सुंदर चेहरा! “ल्येकरा घात झाला!” म्हणत आग्र्याच्या डेऱ्यात आम्हाला मिठीत घेताना दिसलेली ती सुंदर मुद्रा!
“कीर्तिवंत, यशवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, वरदवंत, जयवंत’ – पाचाडच्या
सदरेवरची घाट घणघणावी, तसे ते रामबोल संभाजीराजांच्या कानामनात घुमू लागले.
“आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सुशील’ –
सावचित्त झालेले दिवाकर पुढे आणखी काही वाचणार तोच संभाजीराजे म्हणाले, “थांबावं! गोसावी, तो महाराष्ट्र धर्माचा काव्यबोल आणखी एकवार ऐकवा.” संभाजीराजांच्यातील कवी आणि राजपुत्र दोन्हीही तवाने झाले होते.
“या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।”
दिवाकर वाचू लागले. राजांचे मिटले डोळे तसेच होते. संभाजीराजांचे टवकार कान अधिक टवकार झाले.
“आणखी काही धर्म चालती। श्रीमंत होऊन कित्येक असती। धन्य धन्य तुमची कीर्ती। विस्तारली।।
तुमचे देशी वास्तव्य केले। परंतु वर्तमान नाही घेतले।
क्रणानुबंधे विस्मरण जाहले। बा काय नेणू|।
उदंड राजकारण तटले। तेथ चित्त विभागले।
प्रसंग नसता लिहिले। क्षमा केली पाहिजे।।”
शेवटची ओवी कानी पडताच राजांनी खाडकन डोळे उघडले! क्षणभर त्यांना दिवाकराऐवजी समर्थच समोर आहेत की काय, असा भास झाला!
संभाजीराजांचे डोळे मात्र आपोआप मिटले गेले होते. आपल्या आबासाहेबांची असंख्य गोमटी रूपे, ते ऐकल्या शब्दांशी ताडून बघण्यात गढले होते.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८०.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव