महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,774

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८१

By Discover Maharashtra Views: 2515 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८१ –

बागलाण मारून परतलेली मोरोपंतांची फौज महाडात ठाण धरून होती. राजांनी पेशवे मोरोपंतांना रायगडी पाचारण केले. पावसाळा तोंडाशी आला की, मराठी घोडी पागेत लीद टाकीत चंदी चघळतात, हा साऱ्याच शेजारी गनिमांचा अनुभव होता. राजांना या गाफिलीचा पुरता लाभ उठवायचा होता. मोरोपंतांची फत्तेबाज फौज, खासा युवराज संभाजीराजांच्या दिमतीला जोडून घोडी जव्हार-रामनगर या गुजरात सीमेवरच्या कोळी राज्यांवर उतरविण्याचा चुनेगच्च मनसुबा राजांनी बांधला!

संभाजीराजांचा ही पहिली मोहीम! पावसाळा तोंडावर धरून! भोसल्यांचे “राजेपण’ असेच उन्हा-पाबसात सुलाखून निघावे लागते. सदरी दाखल झालेल्या मोरोपंतांना राजांनी बेत खुला केला, “पंत, युवराजांच्या पाठीशी राहून तुमच्या फौजेनिशी जव्हार-रामनगर मारून चालविणे. खासा आम्ही मोहिमेत आहोत, हा भाव युवराजांशी ठेवणे. नदी-नाले आड येतील, ते पार करावया नौका, हत्ती, पोहणीस कसबी कोळी, भोई दिमतीस घेणे. पाऊस जोर धरतो, तरी हिमतीने मोहीम चालती ठेवणे. युवराजांची ही पहिली हत्यारी चाल, फत्तेमुबारकीने कार्यी लावणे.”

युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केला. मोहिमेचा मोहरा जोडून दिला. रायगडच्या देवमहालातील, अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या आवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेलभरली ओंजळ उधळली. भंडाऱ्याची मूठ चरणांवर सोडली. डोळे जोडून आईच्या पेटत्या डोळ्यांतील आग क्षणभर निरखली. आपसूकच संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांना आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले – आईच्या आठी हातांना मिळून एकच थोर हात झाला आहे! प्रतापगडी नाचविला त्याहून थोर – राव तान्हाजी पडले, त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढातरी थोर पोत, खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे! तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटताहेत! त्याच्या दीपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत!

“उदं-उदं.” कळवळती हाक घालण्यासाठी त्यांचे ओठ पुटपुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायांवर ठेवले. “उठा. यशवंत व्हा! पडल्या मुक्कामावरून खबरगीर धाडा. पंतांच्या मसलतीने चला.” राजांनी त्यांचे खांदे-हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहीमशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते.

युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरविणाऱ्या येसूबाईच्या तबकातील ज्योतीकडे बघून – “निघतो आम्ही,” म्हणत निरोप घेतला. ते शब्द ऐकताना येसूबाईना वाटले – “मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा!’ पण ते घडले नाही. त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कापूरव्होळाच्या “म्हादेवा’ला साकडे घातले – ‘संबू म्हादेवा, ल्येकरू पयल्या डाव गर्दीत उतारतंय. येसूसरी कर त्येला!’

संभाजीराजांनी धाराऊची पायधूळ मस्तकी घेतली. बालेकिल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप यांच्याशी राजे, रायाजी, अंतोजी, जोत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला. साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गड- उताराला लागली. मनोरे, गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडु लागली. लहाना दरवाजा आणि बगिचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊसाहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता. राजे, मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी, रायाजीसह संभाजीराजे वाड्याच्या खासेमहालात गेले. तिथे जिजाऊ, पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांनी घेऊन जिजाऊ, पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या, “तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराजसाहेब तोरण्याला भिडले होते. यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे. तुम्ही तसेच कराल!”

पाचाडात थाळे झाले. राजे-संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या – रायगडाच्या मावळती माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना, आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाटीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गर्रकन समोर होऊन डोळ्यांत भरून घेतली. “येतो आम्ही.” त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला.

सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जिन कसून दौडीची घोडी मोतद्रांनी धरली होती. त्यावर मांडा जमल्या. राजे-संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुर्के ढग लटकून होते. गर्मीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या. महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली दहा हजार कडव्या स्वारांची फौज कूचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता.

उन्हे कलती घेईपर्यंत राजांनी महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला. दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले. पाच हजार मांड घेतल्या घोडाइतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्या मध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जनावर बसते केले.

राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला. शाही फर्मानाच्या धूळमाखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराजसाहेबांसमोर गुडघे टेकण्यातील! त्यांना उठवून छा छातीशी घेत राजे म्हणाले, “सांभाळून असा. कधीतरी होळीसणाला तुम्ही लं होतंत – “आबासाहेब, तुम्ही काढाल जळत्या हुडव्यातील नारळ बाहेर?’ आज आम्हीच विचारतो आहोत – तुम्ही तो काढाल काय?”

“जी. कोशिस करू.” संभाजीराजांच्या तोंडून सहज जाब सुटला.

“या; जय भवानी!” राजांचे डोळे लखलखले.

“जय भवानी.” संभाजीराजांनी त्या लखलखीला साद दिला.

हत्तीला शिडी लागली. ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी, जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्यांचे कडे टाकले. निशाणबारदारांनी निशाणी काठ्या वर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाऱ्या घुमविल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदमबाज चाल धरली.

चालला! शिवाचा वरदहस्त घेऊन शंभो चालला! त्याच्या पिछाडी-आघाडीने दहा हजार जानकुर्बान मावळा चालला. युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत, राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कुणाच्या तोंडून ऐकलेले, केव्हा ऐकलेले, ते राजांना नीट आठवेना – पण तेवढे त्यांना आठवले –

“हे गडकोटावर राहतील, प्रलय-तांडव माजवतील!!’

मजल-दरमजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजरटप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारमधील झाडीतून उठलेल्या विक्रमशहाच्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले, “जव्हार – कोळीराजा विक्रमशहाची राजधानी!” ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत असे, तसा त्यांच्या उजव्या भुबईने कमानी बाक घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला – “हर हर महादेव!”

त्या रणघोषाला आघाडी-पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले – “हर हर महादेव!”

खडया ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गर्जत आज्ञा फेकल्या – “वस्तीस चौतर्फेनं घोडाइतांचा घेर टाका. शाजणे, ढोलांचा कालवा उठवा. दोनांस-एक, असा घोडा आणि पाऊलोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव!”

सुरतेपासून अवघ्या पंचवीस कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले. वाटेत दस्त केलेले काळेकभिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडेतुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी, कोळीभाषेत ओरडत दौडू लागले – “मराठे आले! खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे! पळा!”

साऱ्या जव्हारभर आवयांचे उठले. आत घुसलेली दौडती घोडेतुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्याच चालून येतो आहे की काय, हे भांबावल्या कोळ्यांना कळेना! हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत, भाले आणि ढाला-तेगी पेलून ‘जय- भवानी’ गर्जत पाच हजारी मावळी पायदळ चहूवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारे भिडली.

कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा, निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला, नाशिकच्या रोखाने! मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला!

राजा पळाला! जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने, चांदी, मोती; अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांचा हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेताबलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरे, शामियानाच्या तणावा ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला.

मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलूखफाट्यात एकदा नव्हे; दोनदा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ पंचवीस कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते; शिवाजीराजांच्या पुत्राकडून!

सोने, रूपे, चांदी, मोती यांची रास प्रतवारीने संभाजी राजांच्या समोर मांडण्यात आली. सतरा लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे, काढण्यांनी मुसक्‍या आवळलेले धिप्पाड कोळी-कैदी संभाजीराजांच्यासमोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले, तरी मोट्या गुर्मीत ते मिळेल ती सजा भोगायला, मन बांधून तयार होते. फत्ते-खुशीच्या, राजांना लिहिलेल्या, मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथेली खबरगिराच्या सुपुर्द करण्यात आली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment