महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,517

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८२

Views: 2515
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८२ –

“युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करीणा द्यावा.” कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरविली. काही झाले, तरी ते आपल्या मुलखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत, धीरगंभीर ते म्हणाले, “पंत, यांतील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयांस रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यांस इतमामाने परते पाठवून द्या.”

“जी. जशी आज्ञा.” मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल, याचा त्यांना कयास नव्हता.

जव्हारचा तळ हलला. मिळाली लूट पहाऱ्यात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर दोन मजलांवर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या पंधरा कोसांवर! मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी, अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती.

“युवराज, रामनगरवर चाल धरली, तर सुरतेची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार.” मुजरा देत पंत म्हणाले.

“त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे.” संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले.

“तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भवत्यानं दौडवून आणावं, असं आम्हास वाटतं.” मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या दोन फळ्या पडणे; कार्यी लागणारे नव्हते.

“आम्हांला वाटतं, सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत, असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगिर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी अडकून पडतील.” पंतांच्यासह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली. “चार लक्ष रुपे खंडणीदाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील.” असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वारा बरोबरच चलाख खबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला!

ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नाशिक-बागलाणकडून विक्रमशहा आणि दिलेरखान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला. रामनगर जवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराथी पावसात मावळी डेऱ्यांच्या कनाती भिजू लागल्या. पावसाने पंधरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पाठवाने पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी दोन पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबायतातच ठाण धरून आहोत, याची जाण दिली!

पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. “मराठे आलेत!” हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता! कबिल्यासह तो सुरतभागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले!

तिकडे सुरतेत, शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगाबादेचा अकलमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडीत होता!

रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखम-दरबार भरविला. दोन्ही चालींत मर्दानगी केलेल्या असामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आगट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबाबीने बातचीत होत होती. रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकारखेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हाकारा घालून उठविलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविली. पडली रानसावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाठलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागुतीचा तवाना भोग मिळाला!

सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नाशिक-त्र्यंबकच्या तोंडावर आला. नाशिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या दोन फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली. दुसरी नाशिकवर चालून गेली.

जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोडसैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नाशिक (उर्फ गुलशनाबाद) हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामेभावाच्या ताब्यात होते! संभाजीराजांचे ते मामेकाका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक, नाशिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नाशिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले.

जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामेकाका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवाकालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले! आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला.

“रूपाजी, काकासाहेबांच्या काढण्या उतरा.” संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला. क्षणभर घोटाळला.

“रूपाजी.” बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली.

घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंतांकडे वळून संभाजीराजे म्हणाले, “पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही! तो नीट देता यावा, म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत.”

“जी.” मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावां जवळ आले. त्यांनी समज दिली – “राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या.”

जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, कोट झाला म्हणून वाघ गवत खात नाही! पोर-फर्जदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही!”

“कोण वाघ?” फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चीत्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी – ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली.

बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामेकाकांच्या डोळ्यांत चालवीत, फुलल्या नाकपुड्यांनी आसुडासारखे वाटावे, असे शब्द त्यांनी त्यांच्या कानावर ओढले – “वाघ गवत खात नाही -पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये! दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे, असा तुमचा वकूब. पण – पण तुम्हांस काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते! आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे! आम्हांस नव्हे, त्यांना! आम्हांला बघून त्यांची याद आली नाही तुम्हांला! तुम्हांस बघून आम्हांस मात्र ती आली! गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला! ती आऊसाहेबांची आहे!

नाहीतर…!” “नाहीतर काय?” भुवई चढवीत जाधवराव गुर्मीने बोलले. “काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून त्या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही! पंत,” संभाजीराजांची छाती लपापू लागली.

“राव, मुजरा घाला. बैठकीला आणि युवराजांना!” संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवराबांचा खांदा हलवीत म्हणाले. एक क्षण गेला – आणि तसलीम-कुर्निस करून मार खाल्लेल्या उभ्या ह॒यातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला.

पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या च्यामोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, “आत्याबाईचे पाय धरण्याची आमची लायकी नाही! खरे तर तुमचे सुद्धा!”

युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले. आणि त्यांच्या डोळ्यांत खोलवर बघताना, ‘हे आऊसाहेबांचे नातलग आहेत. भाचे आहेत. आमचे मामेकाका आहेत’, या भानाने त्यांचे डोळे पाणावले; फर्जंदपण जागे झाले! झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडविले. जाले नाशिक-त्र्यंयकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाल!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment