महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,67,822

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८५

By Discover Maharashtra Views: 2531 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८५ –

आठ धापावल्या धारकऱ्यांनी, संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यांतील माणसे माळावर दाटली. दत्ताजी त्रिमल, बाळाजी आवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडांनी तारीफ करीत होती. मेल्या वाघाच्या वासल्या टाळ्याभोवती माश्या घोंगावत होत्या. पिवळ्याजर्द रंगाला धरून त्या धिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरव्ही अखंड नाचता पोत थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले ‘रानकौतुक’ बघत होती. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवजी हे आता बधार झालेले मुलगेही होते. निराजीपंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता.

राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्याची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लव्हारी भात्यासारखी फुगून आली. आडवे जनावर नजरेला पडले मात्र, कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही – काही बोलले नाहीत.

“रान कसे उठले, ध्यानीमनी नसता, हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले, खेळ्यांची बाजारबुणगाई कशी झाली, घोड्यावर असता आपण वार कसा टाकला,” हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते. ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, “टाकोटाक आमच्या भेटीस महाली रुजू व्हा!” राजांच्या पाठीवरची जरीकोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले.

संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. सातमहालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदवलेल्या येसूबाई धाराऊसमोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही.

“सूनबाई, क्‍्यासात वल तशीच ऱ्हायली नी -” म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरलेय ते येसूबाईनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण – पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली. गपकन एकमेकांत रुतली.

“युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले, तर आम्हीही रान उठवितो.” राजांच्या आवाज बांधलेला झाला. “पण – पण आपण अगोदर भोसले आहोत. मग शिकारी! तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो. वाघ पाडण्याची! मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुत्ये आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे, याची भूल इत:पर कधी पडू देऊ नका!!”

“जी. हे – हे आमच्या ध्यानी आलं नाही.” शरमिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. भ ‘तेच, आता येऊ द्या.” राजांनी त्यांना सरक्‌ दिले नाही. तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले.

“गर्दन वर घ्या.” राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता!

युवराजांची गर्दन वर आली. स्फटिकसाफ डोळे राजांच्या निमुळत्या, गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यांतील रानभेरी निधडेपण राजांना जाणवले. आवडले. ते म्हणाले, “आम्हास तुमचं बळ पाहिजे – वाघ पाडणारं नव्हे -वाघ होऊन चालणारं!!”

राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला – ‘आम्ही पाडलेलं जनावर उठून बसलं आहे! त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत!’

“या.” राजांनी त्यांचे खांदे थोपटले. झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदब निरखीत राजे हसत म्हणाले, “गडाच्या वैतेदार चांभाराकरवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खूण म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खूण म्हणून!!”

“आबासाहेब काय आहेत, हे कळणं अवघड आहे.’ महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला!

“आम्ही देवदर्शनास निघतो आहोत. दोन दिवसांनी परतू.” असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले.

दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की, “ताम्रांच्यावतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजियांसी वाटाघाटी करण्यास आला आहे. राजे नाहीत, तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे.”

“साहेबास गडावर पेश येऊ द्या.” संभाजीराजांनी पिलाजींना इजाजत दिली. इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकल्स हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सारसगड ह्या मार्गे पाचाडात पोहोचला होता. त्याच्याबरोबर सदतीस लोक आणि शामजी शेणवी नावाच्या दुभाष्या होता.

आपल्या दरबारच्या दोन कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमससाहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडधाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खणत्या लावून लुटली गेली होती. तिची तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजापूरच्या वखारीची नुकसानभरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळविणे, अशी ती व्यापारी हेताची कामे होती.

पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट-पाटलूण चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे गरगरते खांब उठविणाऱ्या वावटळींनी पाचाडला घेर टाकला आणि हां-हां म्हणता वळीव पावसाची घनचक्कर रायगड-पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला.

दुसऱ्या दिवशी शामजी, पिलाजीसह थॉमससाहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकीसमोर आणले.

“युवराज, ताम्रांचा हेजिब सदरी दाखल झाला आहे.” बाळाजींनी संभाजीराजांच्या महालात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली. बाळाजी मनोमन थोडे साशंक होते. हा परदरबारचा वकील. बोलता-बोलता युवराजांना आडवाटेला नेईल; मनाजोगे करून घेईल!

महालाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, “युवराज, स्वामी गडावर नाहीत. ही ताम्नांची जात. म्हणून अर्जी. जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे.”

“चिटणीस, आम्ही ऐकून आहोत, साहेब आम्हांस बघायला गड चढून आला आहे. त्याला बघू द्या, एकदा डोळाभर आम्हांस.” हसून संभाजीराजे म्हणाले. बाळाजींच्यासह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले. पिलाजी, शामजीने अदबमुजरे घातले. थॉमससाहेबाने डुईवरची, पांढऱ्याशुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी धरीत मान व कमर झुकवून संभाजीराजांना टोपीकर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता-बसता साहेबाला निरखीत शामजीला सवाल केला, “काय म्हणते, तुमच्या साहेबांची तबियत?”

“जी बरी आहे. मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात.” शामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले.

गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता. आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखीत होता.

“आज्ञा.” संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाबकळा उचलून हुंगला. पाठीशी असलेल्या गिर्दीबर कोपरे रोबीत ते रेलून बसले.

“आपल्या सरलष्करांच्या फौजांनी हुबळी येथील टोपीकरांची वखार फसगमतीनं लुटली. या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही. करिता या लुटीची नुकसानभरपाई मिळावी, अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे.” शामजीची भाडोत्री जीभ साखरपेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, शामजी, पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले.

“शेणवी, आमचे सरलष्कर तर पन्हाळाप्रांतात आहेत, असे आम्ही ऐकून आहोत. त्यांनीच हुबळी लुटली, हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना?” युवराजांनी शामजीला आडवाटेला नेले. “बोला, दुसरी काही अर्जी?”

“जी. मराठी मुलखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली, तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल.” शामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले.

“मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी! शेणवी, तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराजसाहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू. ते देवदर्शनास गेले आहेत. दोन दिवसांत परततील.” संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, “चिटणीस, साहेबांना निरोपाचे विडे द्या.”

“जी,” म्हणत बाळाजींनी विड्याचे तबक थॉमससाहेबांपुढे नेले. बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर ह्या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, “पिलाजी, तुम्ही जातीनं साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोहोचते करा! गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही!!”

“जी,” पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून, “जगदंब, जगदंब’ पुटपुटत संभाजीराजे निघून गेले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment