महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,562

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८८

By Discover Maharashtra Views: 2508 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८८ –

“राजं गादीवं बसनार। मोट्ुं बादश्या हुनार! जंगी दर्बार बशिवनार!” बारा मावळांच्या खोपटाखोपटाला भाबड्या प्रेमांचे रोमांच फुटले. “म्हातारबाईनं लई वनवेस काढलं. आतं पारनं फिटलं तिच्या नदरंचं. ल्योक उपजावा तर अस्सा. न्हायतर आमची बी हाईतच… खायाला कार नि…” पाणोठ्या-पाणोठ्यांवर घागरी ठणठणू लागल्या. या राज्याभिषेकात काही उभे राहायला नको म्हणून अनंतभट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत दोन विवादाचे मुद्दे उपस्थित  झाले. कलियुगात क्षत्रियलोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला “मुंज’ हा राजांचा विधी झालेला नाही. मात्र विवाह झाले आहेत!

गागाभट्टांनी शास्त्रपुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कारलोप भरून काढता येतात, हे नाशिकसभेला पटवून दिले. आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणिसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदेपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी “शिसोदिया’ कुलातील रजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले!

सारे आडबंद दूर झाले. गागाभट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क-जबाबदाऱ्यांच्या वारसापदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागाभट्टांनी दिला. मावळ्यांची होऊ घातलेली राजधानी म्हणून रायगड सजावटीला निघाला. दरबारी चौक, बालेकिल्ल्याचे खासेमहाल आईनेबंदीसाठी हिरोजी इंदलकर, आबाजी, अर्जोजी गिर्जोजी यादव यांनी हाती घेतले.

शिलावट छिल्न्या घुमवू लागले. ठोका-ठोका ताल धरू लागला – “राजा शिवछत्रपती!” सुतार, सोनार, लोहार, कहार, मांग, महार झाडून सारे आघाडीने कामावर पडले. जवाहिरे, सराफ, अत्तर सौद्यासाठी उमेदीने रायगड चढू लागले. पागेची घोडी नालबंदीसाठी बाहेर पडली. प्रांत परगण्यांतून कबाडीच्या बैलांनी फेसाटत वाहून आणलेली धान्याची आणि मिठाची पोती अंबारखान्यात आबादान होऊ लागली.

गडावरच्या मंदिरातील मूर्ती-मूर्तीवर वज़लेप चढू लागले. लाल फासबंदांच्या थैल्या कमरशेल्यात खुपसून थैलीस्वार गड उतरू लागले. बहिर्जी, कर्माजी, विश्वास यांची खबरगीर पथके खांद्यावरची रामोशी कांबळी सावरत मुलूखभरच्या खबरा उचलू लागली. अठरा कारखाने गजबजून उठले. चांदीची कडी भरलेले मर्दाने हात आणि कोपरभर चुडा भरलेले जनानी हात, स्वतःला हरवून एक नामी मनसुबा बा उभा करण्यासाठी झटू लागले.

ओतकामात तरबेज असलेल्या रामजी दत्तोने राजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून “सिंहासन-घडाई’च्या कामाला हात घातला. रामजीला माहीत होते. तो एका “मावळी रामचंद्रा’चे राजआसन घडविणार आहे! बत्तीस मण भराचे! झळझळत्या बावनकशी सुवर्णाचे!

संभाजीराजे हत्तीटाक्याजवळ उभे होते. फार वर्षांपूर्वी बक्चा असताना दोरखंडांनी चोरदरवाजाच्या बाजूने रायगडावर चढविलेला ‘त्रिशूल’ हा हत्ती आता भरात आला होता. टाक्यात पाण्याला पडलेला ‘त्रिशूल’ बाहेर घेण्याच्या खटपटीत माहूत पुरता दमगीर झाला! ‘निशूल’ हटावर आला होता. टाक्‍याबाहेर पडायला राजी नव्हता. संभाजीराजे माहुताची घालमेल बघत हत्तीच्या विचारात गेले होते. शेजारी महादेव यमाजी आणि यादव नामाजी उभे होते. सांजेचा नौबतडंका झडायला सुरुवात झाली न झाली, तोच कुणीतरी रोखल्यासारखा डंका गपकन थांबला.

संभाजीराजांच्या कपाळी आठी जमली. दिठी समोर गेली. विझल्या वणव्याचा काळपट डाग अंगावर घेतलेला लिंगाणा त्यांना दिसला. बालेकिल्ल्याच्या रोखाने चाललेल्या संभाजीराजांच्या कानी माहुताचे वैतागी शब्द पडले – “त्रिशूल, आरं हाटमोरेपन सोड! काय टाक्‍्यातच रुतून बसनार हाईस का काय?”

महादेव यमाजी आणि यादव यांना पाठीशी घेत संभाजीराजे तरातर चालत पालखी दरवाजाने बालेकिल्ल्यात आले. राजांच्या खासेवाड्याच्या सदरी पायऱ्या चढतानाच त्यांना जाणवले – “काहीतरी घडलंय.’बैठकीसमोर खालच्या मानेने उभ्या असलेल्या राजांच्या सामने कर्माजी हा धूळमाखल्या कपड्याच्या आनंदरावाच्या फौजेचा खबरगीर उभा होता. बाजूला अण्णाजी, बाळाजी, मोरोपंत, येसाजी खडे होते. साऱ्यांच्या माना पडल्या होत्या. मुजरा देऊ बघणाऱ्या संभाजीराजांना बघताच हातपंजा उठवून ते म्हणाले, “शंभूराजे, तो मुजरा तुमच्या गेल्या मुतालिकांना करा!” ओढल्या पायांनी राजे युवराजांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “संभाजीराजे, प्रतापरावांनी पंख जाळून घेतले! पठाण बहलोलच्या दहा हजारी फौजेच्या वणव्यात! तुमचे मुतालिक गेले! आमचे सरलष्कर गेले! आमच्यावर रुसून! हटमोरेपणानं! स्वत: संगती आमचे लढाऊ सहा बांके घेऊन!”

संभाजीराजांना आठवले, बहलोलला सलामत सोडल्याबद्दल राजांनी राजसंतापाने प्रतापरावांना पत्र लिहिले होते – “पठाणाशी सला काये निमित्त केला? गनिमास मारून गर्देस मिळवावे. नातर आम्हास तोंड दावो नये!” सुटला बहलोल बेइमानपणे मराठी मुलखाला ताराज करीत सुटला होता. पुरे एक वर्ष प्रतापराव त्याच्या पाठलागावर होते. चुकीचा सल सुधारून काढण्याची संधी बघत होते. बहलोल बंदिस्त होता.

राजे ‘तख्ती बसणार’ ही खबर प्रतापरावांना लागली. आता रायगडी परतावे लागणार. पण बहलोल जिंदा ठेवून राजांना तोंड कैसे दावावे? नेसरीजवळ कुप्याच्या खिंडीवर बहलोलचा दहा हजारी पठाणी तळ पडलाय, ही खबर प्रतापरावांना लागली. फौजेनिशी चालून जाऊन फत्ते होणार नव्हती. म्हणून प्रतापरावांनी आपल्या डेऱ्यात शेलके धारकरी याद केले. कुणाला ध्यानीमनी नसता, प्रतापरावांनी त्यांना साकडे घातले – “आम्ही पठाणावर चालून जाणार! एकले! राजांर्नी आमचा दंडवत सांगा!”

सहा धारकऱ्यांनी कमरेची हत्यारे उपसत त्यांचा शब्द हट्टाने झेलला -“सरलष्कर, जितं तुमी तिथं आमी!” आणि महाशिवरात्रीच्या दिवशी घोड्यांवर मांड घेतलेले प्रतापराव नंगी तलवार हाती नाचवीत – “हर हर हर महादेव” गर्जत बेभान उधळले. सहा घोडाईत पाठीशी घेऊन! ते वेडे सात पक्षी दहा हजारी फौजेवर झडप घालण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत! सात कडकडत्या विजा पठाणी फौजेच्या दर्यात कोसळल्या नि विझल्या.

कर्माजीने सांगितलेला वृत्तान्त राजांच्या तोंडून ऐकताना संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर प्रतापराबांची मर्दानी मुद्रा उभी ठाकली. उधळत्या घोड्यावर मांड घेतलेले, हत्यार नाचवीत चवताळलेले प्रतापराव लिंगाण्याच्या पेटत्या वणव्यात घुसल्याचा भास संभाजीराजांना झाला! घुसते प्रतापराव म्हणत होते – “अमनधपक्यानं पेटल्याली ही आगट लई वंगाळ धाकलं धनी! रानपाखरं त्येनं येलबाडून जात्यात! घालून घेत पंख जाळून घेत्यात!” कारण नसताना माहुताचे ऐकलेले शब्द संभाजीराजांच्या मनात फिरले –

“त्रिशूश्ल, आरं हाटमोरेपन सोड!! टाक्यातच रुतून बसनार हाईस का काय?”

सजला रायगड प्रतापरावांच्या सुतकात आला. दाटल्या मनाने राजांनी प्रतापरावांचे मर्तिकविधी केले. सरलष्करपदाची मोकळी जागा मानवस्त्रासह हंजासी मोहित्यांना दिली. ती देताना “हंबीरराव’ ही खरिताबत त्यांना बहाल केली. हंसाजी सोयराबाईंचे बंधू. त्यामुळे त्यांची ही नामजादी सोयराबाईंना खोलवर सुखवून गेली. अडी-नडीला रक्ताची माणसे कामी पडतात. सत्ता हाती असलेल्या रक्तसंबंधाच्या माणसाचा तर मनाला उगाच मोठा आधार वाटत असतो.

सगळे प्राचीन ग्रंथ राबत्याला घेऊन गागाभट्टांनी तपशिलासह “राज्याभिषेक प्रयोग’ हा विधींचा ग्रंथ तयार केला. पाचाडहून, काशीबाईच्या दुखण्याने उचल खाल्ल्याची वर्दी गडावर आली. राजे, संभाजीराजे, जिजाऊ, राणीवसा, येसूबाई, धाराऊ सगळा राजगोतावळा पाचाडात उतरला. अभिषेक होऊ घातलेल्या राजे-संभाजीराजांच्याकडे भरल्या नजरेने बघत, बोलायचे ते खूप ओठाआड तसेच ठेवून मूकपणे काशीबाई निघून गेल्या. पाचाडच्या दरुणीमहालात आक्रोश उठला.

काशीबाईचा निष्प्राण हात हाती घेऊन त्यांच्या कपाळीचा भरला आडवा मळवट बघताना राजांचे डोळे दाटून आले. एक मुका मनसुबा थंड झाला होता. होणाऱ्या राज्याभिषेकावर आभाळाच्या सांदीतून काही अशिव झिरपेल की काय, या कातरभयाने ते थोपवायला घाईगर्दी करून काशीबाई निघून गेल्या! पाचाडच्या माळावर पेटलेल्या चंदनी चितेकडे उदास नजरेने संभाजीराजे बघत होते. चितेच्या चटचट्या आवाजाबरोबर त्यांच्या शब्दांचे पक्षी पंख फडफडवीत राहिले –

“सरता संचिताचे शेष। नाही क्षणाचा अवकाश।

भरता न भरता निमिष। जाणे लागे।

मृत्यू न म्हणे मुद्राधारी। न म्हणे परनारी।

राजकन्या ।”

प्रतापरावांच्या होमानंतर एकच महिन्यात काशीबाईची चिता पेटली. युवराज म्हणून राजटोप मस्तकी चढण्यापूर्वीच ज्येष्ठ पुत्र म्हणून संभाजीराजांचे जावळ मुंडन विधीने उतरले गेले! रायगड पुन्हा सुतकात आला! काशीबाईंचे मर्तिकविधी पार पडले. संभाजीराजांच्यासह राजे प्रतापगडी जायला निघाले. कुलदेवता भवानीआईचे आशीर्वाद घेऊन, रामजी दत्तोने बांधलेले सव्वामणी सुवर्णछत्र तिच्या मस्तकी चढवायला – शिवथर घळीत उतरून समर्थांची पायधूळ घ्यायला.

दोघा पितापुत्रांनी जिजाऊंचा निरोप घेऊन निवडक शिबंदीनिशी रायगड सोडला. फुलमाळांनी सजल्या पालखीत वस्त्राच्छादित सुवर्णछत्र ठेवण्यात आले होते. ‘जय भवानी!’ नांदी देत भोयांनी पालखीला खांदे दिले. जगावर छत्र धरणाऱ्या तुळजाभवानीवर छत्र चढविण्यासाठी तिचे भुत्ये चालले होते! उन्हाळी मजला मागे पडल्या. घाट चढून छत्रतांडा जावळी खोऱ्यात घुसला.

जनीच्या टेंब्यावरची अफजल-कबर मागे टाकीत छत्रशिबंदी प्रतापगडावर आली. सोनमोहरा उधळून किल्लेदाराने राजे-युवराजांची आगवानी केली. भरल्या मळवटाने सुवासिनींनी निरांजने फिरविली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ८८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment