महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,585

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९२

Views: 2505
7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९२ –

संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले. पीतवर्णी वस्त्र अंगभर लपेटून शेजारी उभ्या असलेल्या राजांना ते बघताना वाटले – ‘मोहरांच्या पारड्यातील मोहरन्मोहर रंग पालटते आहे. पिवळ्याधमक मोहरा सावळ्यासावळ्या होता हेत!!’

मंत्रोज्ञाराचा उद्घोष करणाऱ्या गागाभट्टांना, सावळ्या मोहरा बघणाऱ्या राजांना, बिल्वपानाच्या विचारात गेलेल्या संभाजीराजांना; कुणालाच कल्पना नव्हती की, पारड्यात बसलेल्या, टोप नसलेल्या सोनेरी कमळाला एक स्त्रीमन आपल्या डोळ्यांच्या तराजूत तोलून धरू बघत होते! सोनेरी बुट्ट्यांचा शालू नेसलेल्या, कपाळी कुंकुपट्टे असलेल्या, नाकात नथ ल्यालेल्या येसूबाईचे! आपल्या अंगावरचे सगळे सुवर्णालंकार त्यांनी आपल्याच डाव्या डोळ्याच्या पारड्यात टाकून बघितले! मनाचे सोनकमळ त्यावर टाकून बघितले. उजव्या डोळ्यात बैठक घेतलेला हटवादी, बेडर, बांडा, केशरी टोप काही रेसभर हलायला तयार नव्हता! कावऱ्या-बाबऱ्या येसूबाईनी आपल्यावर कुणाचे ध्यान तरी नाही ना, म्हणून डावे-उजवे बावरून बघितले. त्यांच्या शेजारी उभी असलेली धाराऊ हसत त्यांना म्हणाली, “नथंची सवं न्हाई तुमारत्री सूनबाई, म्हून ती काच देतीया!” ते ऐकताना येसूबाईंच्या गाली पळसच पळस फुलारले. संभाजीराजे पारड्यातून खाली आले.

“महाराज्ञी, आइये।” आचार्यांनी सोयराबाईंच्या हाती फुले दिली. तुलेची पूजा करून पारड्यात उजवे पाऊल ठेवताना सोयराबाईंना आचार्य गागाभट्टांना म्हणावेसे वाटले, “करताच आहात आमची तुला, तर आमच्या रामराजांना संगती घेऊ द्या! त्यांच्याखरीज आमची एकलीची तुला कसली करताहात?’ पण हस्तिमृत्तिका रामराजांच्या हाती देताना जाणवेल असे घोटाळलेले आचार्य आठवून, मग काही न बोलताच त्यांनी एकट्यानीच पारड्यात बैठक घेतली.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची पहाट किरणांच्या मोहरा वेचीत फुटू घातली. रात्र तीन घटका उरली होती. शतकांची झोप झाडून एक सोनस्वप्नर उराशी घेऊन किल्ले रायगड जागा होत होता. पन्नास हजारांवर माणसांनी गडावर दाटवा केला होता. दुडदुडणाऱ्या नौबतीने रायगडावर डंक्याचे छत्र धरले होते. पहाटस्रान घेऊन शूचिर्भूत झालेले राजे आणि संभाजीराजे जोडीने लोकमाता जिजाऊंच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या खासेमहालात आले. त्यांना आशीर्वाद देऊन जवळ घेताना जिजाऊंच्या थकल्या मनी विचारांचे काहूर कल्लोळले –

“केवढं मागं पडलं! काय घडलं आणि काय नाही? आईच्या कृपेनंच साऱ्या बाकक्‍्यातून निभावलं. तिच्यामुळेच आजचा दिवस उजाडला. हे बघायला आज आमची स्वारी पाहिजे होती. राजांचे दादामहाराज पाहिजे होते. आमच्या थोरल्या सूनबाई पाहिजे होत्या.’ दमा दाटलेल्या जिजाऊंच्या छातीत शहाजीराजे आणि सूनबाई यांच्या आठवणीने कळ दाटली. उबळ-उबळ उसळू लागली. निर्धारी स्वभावाच्या जिजाऊ, राजे-संभाजीराजे जवळ असल्याने ती निकराने रोधू बघत होत्या. त्यांचा श्वास कोंडणीला पडला. घशात खवखव उठली. आजवर “दम धरणं? त्यांनी साधले होते. पण – पण आता दमा रोखणे, त्यांना साधेना. उभ्या जिजाऊ खोकू लागल्या.

त्यांच्या दोन्ही बगलांना हात देऊन राजे-संभाजीराजे शब्दांनी त्यांचा दमा रोधू बघू लागले.

“मासाहेब.”

“आऊसाहेब.”

ते दोघेही पिता-पुत्र आपला राज्याभिषेकही क्षणभर विसरले! धाराऊ, पुतळाबाई जिजाऊंच्या पाठीशी झाल्या. साऱ्यांनी सावरून त्यांना मंचकावर बसते केले. साऱ्यांचा जीव कळवळला. आचार्यांची वर्दी घेऊन बाळंभट महालात आले. त्यांना बघताच जिजाऊ म्हणाल्या, “राजे-युवराज, या तुम्ही. आचार्यांची सांगी आली. आता तुम्ही आमचे नाही! सिंहासनाचे! पंडित खोळंबलेत.”

संभाजीराजांनी पुतळाबाई, धाराऊ यांची पायधूळ घेतली. दोघेही महावेदीकडे जायला निघाले. मुजरा देत मागच्या कदमांनी मागे हटून वळण्यापूर्वी संभाजीराजांना मान वर करताच पदराने डोळ्यांच्या कडा टिपणाऱ्या जिजाऊ दिसल्या. त्यांचे पाय फरबंदीला जखडल्यागत झाले.

“चला.” राजांचा घोगरा साद त्यांच्या कानी आला. ते वळते झाले. चालू लागले. जगदीश्वर आणि भवानी पूजनासाठी. “धाप लागल्यानं पाणी दाटतंय.” पाठीशी गप्प-गप्प उभ्या असलेल्या धाराऊला जिजाऊ म्हणाल्या. तसे म्हणताना जिजाऊंना कळलेच नाही की, धाराऊच्या डोळ्यांतही पाणी दाटलेच होते! कसलीही धाप नसताना!

महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते, पंडित, शास्त्री यांनी दाटून गेला होता. मंडपाच्या मध्यभागी, अष्टदिशांना आम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णाचे, रुप्याचे, तांब्याचे, मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते. त्यांत दूध, दही, तूप, मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते. त्या सर्व कुंभांच्या कंठांना फेर टाकून कुंकुहळदीत न्हालेल्या शुभ्र धाग्यांनी ते अष्टकुंभ एकजीव करून एक नेटका अभिषेकचौक सिद्ध केला होता. चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती. राजे, युवराज, सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती. औदुंबराच्या पवित्र समिधांची. तिच्यासमोर कढीव तुपाने शीग भरलेली काशाची मोठी परात रांगोळी फिरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती. तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्णकलश, दुध भरलेला रौप्यकलश, दही भरलेला ताम्रकलश, मध भरलेला मृत्तिकाकलश, मोतीलगाचे नकसदार छत्र, मयूरपिसांचा अब्दागिरी पंखा, भगवे वाद लोंबणारा सोनेरी मोर्चेल असा अभिषेकी संरजाम हारीने लावून ठेवला होता.

राजमंडळाच्या समंत्रक स्रानासाठी चौकाच्या मध्यभागी दोन स्रानचौक उभे केले होते. एक खुला. राजे व संभाजीराजांसाठी. दुसरा आडपडदे टाकलेला, सोयराबाईच्यासाठी. स्रानांचे सांडीव पाणी अभिषेकचौकाबाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भोवतीने फिरविले होते. मंडपांचे पूजन करून मंत्रघोषांच्या गजरात राजे-संभाजीराजे-सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले.

गणेशपूजनाने अभिषेकविधीला सुरुवात झाली. कुंकू-हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यापार ठेवीत, अभिषेकचौकात आले. त्यांच्या पाठोपाठ गागाभट्ट, बाळंभट आदी मंत्रवेत्ते आले. मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, रामचंद्रपंत, त्र्यंबकपंत, दत्ताजी त्रिमल, निराजीपंत आणि रघुनाथपंडित हे मंत्रिगण आले.

स्रानानंतर राजे-युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृतसत्रान झाले. मंत्रांचा घोष चढीला पडला. मंडपभर जागा मिळेल तिथे माणूस दाटले होते. मंत्रिगण पाठीशी घेत राजे आसंदीजवळ आले. आसंदीची सविध पूजा झाली. पायाचा स्पर्श होणार नाही, अशी दक्षात घेत राजे आसंदी आरूढ झाले. पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले.

अभिपषेकांच्या मांडल्या सरंजामातली छत्र अण्णाजींनी उचलले, अब्दागिरी मोरपंखा त्र्यंबकपंतांनी घेतला, सुवर्णी मोर्चेल दत्ताजींनी हाती पेलला. तिघेही आसंदीच्या पाठीशी झाले. सुवर्णकुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्यकुंभ उचललेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्रपंत, मृत्तिकाकुंभ सावरलेले रघुनाथपंडित आणि सुवर्णी हिरे-रत्नजडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजीपंत आसंदीच्या दुतर्फा झाले. भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उधळून आचार्य गागाभट्टांनी खडया आवाजात अभिषेकाची रोमांचक, पावन नांदी दिली –

“गं गणपतये नम:! कुलदेवतेभ्यो नम:!”

मोरोपंतांनी हातीचा तूपभरला सुवर्णकुंभ बाळंभटांच्या हाती दिला. राजे, संभाजीराजे, सोयराबाई यांच्या राजमस्तकांवर अभिषेक होऊ लागला. ते तिघेही निथळू लागले. तूप, दूध, दही, मध अशा सत्त्वरसांत गंगा, सिंधू, यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात, पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेस गर्जत, उसळणाऱ्या मर्दान्या सागरांच्या अशरण जलात ते निथळू लागले आणि त्यांच्याबरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला, जमलेल्या पन्नास हजारांवर उराउरांतून ओसंडणाऱ्या स्वातंत्र्यलाटांत. नगारखान्यावरचा सोनकिनारी जरीफटका निथळू लागला,वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंद-आसवांत जिजाऊंचे “म्हातारपण’ निथळू लागले, कृतार्थतेच्या, जीव कोंडणाऱ्या दम्यात! जगदंबेचे ‘आईपण’ निथळू लागले भुत्यांच्या “कवतुक महिम्यात’. झोपडीखोपटांत अंग टाकणाऱ्या, शिंगांची तान कानी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या खोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून ‘जय भवानी’ गर्जत घोड्यावर मांड घेणाऱ्या हर मावळी धारकऱ्यांचे ‘मर्दपण’ निथळू लागले, “आता मराठा गादी जाली!” या रांगड्या अभिमानात!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment