महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,562

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९४

Views: 1398
10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९४ –

राजमाता जिजाऊसाहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, शिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली.

“आऊसाहेब, येताव. तब्येतीला धरा. लई तापदरा करू नगासा आता. पाऊस धराय लागलाय. आमास्री जाय पायजे. शेतीवाडी हाय. निगताव. गारठ्याला दम्याचं दुखणं दुनावतया. हतं ऱ्हावू नगासा. खालतं पाचाडात जावा कसं.” नितळ, भाबडया, मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या. जमले मावळमाणूस चौवाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला धरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सूंकारत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकाऱ्यात त्यांच्या घशातील “जगदंब” घुसमटू लागला. कांबळ्याच्या दोन-दोन घड्या टाकल्या, तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते.

पडदेबंद मेणे जोडण्यात आले. हातजोड देत, शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासेमहालाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे – सारा गोतावळा त्यांच्या भोवती दाटला होता.

“राजे. आम्हांस जरा दरबारीचौकात नेता?” जिजाऊंच्या तोंडून शब्द आले. जी.” महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या. जागजागी अभिषेकाच्या खुणा मिरवणारा, सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख, सुवर्णमंडित, रत्नजडावाच्या बत्तीसमणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, “चला. राजे, तुमच्यावर छत्र आलं….”

बालेकिल्ल्याच्या पालखीदरवाजाने जिजाऊंचा मेणा मनोऱ्याबाहेर पडला. त्याच्या दोन्ही तर्फांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्यांचे सात-आठ मेणे चालले… जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. ‘ही गड-उताराची वाट कधीच सरू नये! पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही. मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी! भोयी थकले, तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ, महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत, अशी तोलती चाल धरू!

“कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते – “आम्ही आपला मान काय करावा? तो आमचा वकूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढविल्या तरी ते थिटेच आहे.’ मासाहेब खोक्‌ लागल्या की, आमचाच जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते. त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही.

“आता अभिषेक संपला. हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू. त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ. दम्याची उबळ तुटताच त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, “हं, ऐकवा तुमची गीतं. आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत. तेवढी बाण शंभूराजे तुम्ही भरून काढलीत.’ मग आम्ही त्यांच्यावरच रचलेले गीत सर्वांत शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिटते घेत पुटपुटतील, ‘जगदंब, जगदंब!’ बिछायतीवर हात थोपटीत आम्हांस बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत; पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल! बोलतच राहील!’

पाचाडच्या दरुणीमहालातील समया मंद तेवत होत्या. शिसवी मंचकावर जिजाऊ पडून होत्या. खालती सहाणेवर औषधीमात्रा उगाळणाऱ्या धाराऊच्या हातांतील किणकिणणाऱ्या काकणांबरोबर जिजाऊच्या मनाने विचित्र सूर धरला होता. “आमच्या थोरल्या सूनबाईंच्या सेवेत अशाच औषधीमात्रा झिजल्या! मात्रा घेऊन-घेऊन त्या कंटाळत. तेव्हा आम्ही त्यांना मायेच्या रागाची जरब देऊन त्या घ्यायला लावीत होतो. तेव्हा जाणवलं नाही की, शेवटी-शेवटी मात्राही नकोशा होतात. आज ही सारीजणं आमचं ऐकत नाहीत. आम्हांस त्या घ्यायला लावतात.’

“या.” दरुणीमहालाचा उंबरठा ओलांडणाऱ्या सोयराबाईंना बघून जिजाऊ क्षीण बोलल्या. त्यांनीच वर्दी पाठवून सोयराबाईंना बोलावून घेतले होते. बाहेर सदरी जोत्यावर महाराज आणि युवराज महाडहून आलेल्या वैद्यांचा सल्ला ऐकताना चिंतातुर बसले होते. त्यांच्या ओढल्या चेहऱ्याकडे बघत तुळईची घाट निश्चल टांगती होती. मध्येच वाऱ्याचा झपकारा येत होता. त्याने घाटेतील टोर थरारत होता. तिकडे कुणाचेच ध्यान नव्हते. सोयराबाईंनी मंचकावर झुकून पदर तळहाती घेत तीन वेळा जिजाऊंना नमस्कार केला. त्यामुळे उठलेल्या त्यांच्या सुवर्णी कंकणांच्या किणकिणाटाचा माग घेत काही क्षण शांततेत तसेच गेले.

“सूनबाई, काही एक मनचं तुमच्या कानी घालावं म्हणून आम्ही तुम्हाला याद केलंय.” जिजाऊंना धाप लागल्यागत वाटले. त्यांनी नजर वरच्या तख्तपोशीत जोडली होती. हात छातीवर होते. सोयराबाईंच्या कपाळीचे कुंकुपट्टे आक्रसले. जीव कानांत गोळा झाला. नाकाची नथ काच देतेय, असे त्यांना वाटले.

“सूनबाई, आता अधिकाचं सांगायला आम्ही राहू याचा भरवसा नाही!” ते ऐकताना सहाणेवर फिरणारे धाराऊचे हात कलम झाल्यासारखे गपकन थांबले “जे सांगतो आहोत, ते शेवटचं. ते तुमच्या कानी घातल्याखेरीज आम्ही मरणास मोकळ्या नाही! सूनबाई, आता तुम्हास एक नाही तीन फर्जंद आहेत, हे नीट ध्यानी घ्या! राजे, शंभूराजे आणि रामराजे!” दमा जिजाऊंशी भांडू लागला. त्या त्याला खानदानी जरब देत जागी बसवू लागल्या. धाराऊचे हात थांबले. कान टबकार झाले.

“बाई, भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्कील. तुमच्या हातांत तीन आहेत! त्यांना सांभाळून घ्या. हा वाढला पसारा, याहून अधिक वाढवा. शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा. त्यांच्या आऊ गेल्या नि आम्हीच त्यांच्या आऊ झालो. आता आम्हां दोघींचा भार तुमच्यावर आहे. धाराऊ ” कोरड पडल्याने जिजाऊंनी धाराऊला हाक दिली. त्यांना काय पाहिजे हे ओळखून धाराऊ पाण्याचा गडवा, वाटी घेत चटक्याने पुढे झाली. पाणी घशाखाली जाताच जिजाऊंना कितीतरी हुशार वाटले.

“तुम्ही महाराणी झालात. आम्ही भरून पावलो. आता महामाता व्हा! त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर मोठा करा. आईला मान-अपमान मानून नाही चालत. ते बळ येण्यासाठी जगदंबेची आण भाका. आमची याद ठेवा न ठेवा, पण जगदंबेला कधी विसरू नका. आम्हांस भरोसा आहे, पडल्या न पडल्याला ती तुम्हास मार्ग दाखवील. हे एवढंच सांगणं. या तुम्ही.” जिजाऊंनी डोळे मिटते घेतले. सोयराबाईची नथ ओळांबली. सुवर्णी कंकणे किणकिणली. नमस्कार करून त्या महालाबाहेर पडू लागल्या.

“हां. घेवा मासाहेब.” धाराऊने उगाळली मात्र बोटाने राजमाता जिजाऊंना चाटवली. महालाबाहेर पडणाऱ्या राणीसाहेबांच्या शालूवरचे झळझळणारे जरीबुद्टे जिजाऊंना दिसत होते. मंचकाच्या उशाकडे जिजाऊंना दिसणार नाही अशी उभी राहिलेली धाराऊ न राहवून म्हणाली, “मासाब, तुमी बऱ्या व्हनार. मग असं कशापायी बोलता ते! आम्ही हाव की साऱ्यांस्री!” आणि घशातून फुटणारा हुंदका जिजाऊंनी ऐकू नये म्हणून तिने आपल्या पदराचा बोळा तोंडात कोंबून घेतला

मृगाची पाणझडप पाचाडावर पडली. सावित्री, काळ, गांधारी नद्या लाल पाण्याने भरून आल्या. टपटपती थेंबावळ झाडांच्या पानापानांवरून उतरू लागली. जिजाऊंचे पाय चेपीत बसलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांवरची झापड केव्हा हटतेय याची टक लावून वाट बघत होत्या.

“येसू.” मासाहेबांच्या हलक्या सादेने त्यांची तंद्री मोडली.

जी.” म्हणत येसूबाई उठल्या. चौरंगीवरचे पंचपात्र उचलून जिजाऊंच्या जवळ गेल्या. “तीर्थ घ्या मासाहेब आईचं,” येसूबाईनी पळी जिजाऊंच्या ओठांशी नेली. जिजाऊंनी तीर्थ घेतले. “येसू, इथल्या सदरीजोत्यावर आम्ही उभ्या राहिलो की, गडाच्या मावळमाचीवर तुम्हीही असाल काय असा विचार मनी यायचा!”

“हां मासाहेब, स्वारी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावर आहेसं बघून आम्ही एकदा मावळमाचीवर आपल्या दर्शनास येण्याचं धाडस केलं होतं. आबासाहेब गडावर नव्हते.”

येसूबाईचे उत्तर ऐकून जिजाऊ क्षीण हसल्या. “तुम्ही तसं घेतलेलं ते पहिलं नि शेवटचं दर्शन आहे आमचं!” असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्या बोलण्याने येसूबाईंचा चेहरा किती दुखरा होईल, याची कल्पना असल्याने त्या म्हणाल्या, “नातसूनबाई, तुम्हाला काही सांगणं कधी साधलंच नाही. आमच्या स्वारीनं खूप सालांपूर्वी एक तुला केली होती. नांगरगावी. इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावर. हत्तीचा बच्चा नावेत चढवून.” उबळ आल्याने जिजाऊ आपोआप थांबल्या.

येसूबाई पदर सावरीत मंचकावरून उठल्या. कारण त्यांच्या स्वारीसह महाराज महालात आले. त्यांच्या पाठीशी राजवैद्य नि मोरोपंत होते. जिजाऊंना येसूबाईंना सांगायची होती, ती हत्तीच्या तुलेची कथा त्यामुळे त्यांच्या ओठांत तशीच राहिली संभाजीराजांचे बोट धरून चालत येणारे रामराजे जिजाऊ थकल्या नजरेनेच, पण कौतुकाने बघू लागल्या. त्या मनोमन म्हणाल्याही – “असेच राहा. राम-भरतासारखे!’

“राजे, यांना कशाला त्रास देता?” वैद्यांकडे बघत जिजाऊंनी विचारले.

“आईचं करताना मुलाला त्रास कसला?” वैद्यांनी त्यांना धीर द्यायचा यत्न केला. मंचकावर टेकून महाराजांनी जिजाऊंचा हात हाती घेतला. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या संभाजीराजे आणि रामराजांनी मंचकावर बसावे, म्हणून जिजाऊंनी हात थोपटून खूण दिली. संभाजीराजांनी उचलून रामराजांना मंचकावर ठेवले. जिजाऊंचा थरथरता हात रामराजांच्या पाठीवरून फिरू लागला. शांत आवाजात त्या म्हणाल्या, “बाळराजे, दादामहाराजांचे धरले बोट सोडू नका.”

“मासाहेब, कसं वाटतंय?” जिजाऊ आपणाला टाळू बघताहेत, हे जाणून महाराजांनी विचारले.

“आता काय वाटायचं राजे? आम्ही वाटण्याच्या पलीकडे गेलोत. या साऱ्यांना नजरभर बघून बरं वाटतं. राजे, एक वाटतं.” जिजाऊंचा आवाज साऱ्यांनाच परका वाटला.

“आज्ञा मासाहेब.” महाराजांनी त्यांचा हात मायेने थोपटला.

“आम्हास – आम्हास आईचा गोंधळ ऐकावा वाटतो!”

महाराज चरकल्या नजरेने त्यांच्याकडे बघतच राहिले. मग त्यांनी मोरोपंतांना नजर दिली. तिचा इशारा ओळखून पंत गोंधळ्यांना निरोप धाडण्यासाठी बाहेर पडले. औषधी पोतडी खोलून वैद्यांनी नाना प्रकारच्या मात्रा जोडल्या. रात्री वाड्यात गोंधळाचा चौक मांडण्यात आला. आपल्या हाताने जिजाऊंनी जमल्या गोंधळ्यांना पानविडा आणि वस्त्रे दिली. ती पाजळून गोंधळ्यांनी नमन धरले. त्यांचा म्होरक्या उदासवाण्या आवाजीत आईचा महिमा गाऊ लागला.

“उदर परडी देऊन हाती,
ब्रह्मांडी फिरवी!
लक्ष चौऱ्याणऐंशी घरची भिक्षा,
मागविली बरवी!
ज्या-ज्या घरी मी भिक्षा केली,
ते-ते घर रुचले!
आदिशक्तीचे कवतुक मोठे,
भुत्या मज केले!”

ते ऐकताना जिजाऊंचे पाय चेपणाऱ्या संभाजीराजांचे डोळे झरझरू लागले. राजांच्या गळ्यात दम्यासारखी दाटण झाली. जिजाऊ मात्र डोळे मिटून शांत पडून होत्या. बाहेर वाड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या गजरात संबळ-तुणतुण्याचे सूरसाद क्षीण होत विरून जात होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment