महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,523

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९६

Views: 1353
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९६ –

आषाढ सरला आणि श्रावणी उन्ह – पावसाची पाठशिवणी सुरू झाली. कोकलताश जाफरजंगाची बहादूरगड येथील गढी हुन्नराने लुटून, महाराज एक कोटीची लूट दास्तानी लावून परतीच्या वाटेवर होते. संभाजीराजे आपल्या महालात विचारांबरोबर पायफेर टाकीत होते. त्यांच्या मनात जिजाऊंच्या अनेक आठवणींची न सरणारी पाठशिवणी पडली होती. यादव नामाजी हा एकेकाळचा संभाजीराजांचा खाजगीकडचा खिदमतगार महाली पेश आला. मुजरा भरत त्याने वर्दी दिली – “कर्यात मावळाचं मुतालिक शंकराजी भवर आल्यात धाकलं धनी. भेटीची आज्ञा मागत्यात. ” त्या वर्दीने मनातील आठवणींची झिरपण तुटल्याने संभाजी राजांच्या कपाळी निसटत्या आठ्या तरळून गेल्या. आपलं युवराजपण बांधून घेत त्यांनी आज्ञा दिली, “पेश येऊ द्या त्यांना. ”

अदबीनं मुजरा भरत, बाहेर उभा असलेला शंकराजी आत आला. भेटीचा हेत खुला करत म्हणाला, “कर्यात मावळाचं देशकुलकर्ण दरबारी हातरोख्याकारणं नडून आहे, युवराज. महाराजांची स्वारी गडावर नाही…. ”

“कोण अडचण आहे हातरोख्यास? ” संभाजीराजांनी शंकराजीच्या पगडीभर नजरेचा फेर टाकीत विचारले.

यादव नामाजी मध्येच बोलला, “कर्यात मावळाचं मिरासी कुलकरनी रंगभट ठकार वारलं. शंकराजी मुतालिक म्हून त्येंच्या फडात चाकरीस हाईत. रंगभटास्त्री कुनी वारस ऱ्हायला न्हाई. मुतालिक म्हून त्येंच्या येव्हाराची सम्दी शंकराजीस्री म्हाईती हाय. त्यासाठनं त्येंची अर्जी हाय की… ” बोलता – बोलता तो थांबला.

“काय अर्जी आहे? ” संभाजीराजांनी शांतपणे विचारले.

“कर्यात मावळाच्या देशकुलकर्णपणाचा मिरासी हातरोखा आमच्या नावे करून मिळाला, तर चाकरास अधिकारानं स्वामींची सेवा करता येईल. ”

यादव नामाजी पुढे झाला. त्याने शंकराजीच्या हातातील कागदांच्या वळ्यांची थैली आपल्या हाती घेतली. संभाजीराजांच्या समोर येऊन थैलीतील कागद बाहेर काढून शंकराजी हे रंगभटाचे मुतालिक आहेत. बेवारस कुलकर्ण त्यांच्या नावे करणे आवश्यक आहे, हे युवराजांना पटवून दिले. “यादव नामदेऊ, तुम्ही चिटणिसांना आमचा निरोप द्या. हातरोखे करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देणेस सांगा. शंकराजी, कोणत्याही भातेनं कुलकर्णी पणाचं काम नडू देऊ नका.”

“जी.” शंकराजी आणि यादव संभाजीराजांना मुजरे देत बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत हातरोखे तयार झाले. संभाजीराजांनी ते वाचून त्यावर दस्तूर देणारी निशाणी लावली. रंगभट ठकारांचा मुतालिक शंकराजी भवर कर्यात मावळाचा कुलकर्णी म्हणून रायगड उतरला. जिजाऊंच्या बैठकीला नेहमीच्या दिवट्यांचा रिवाज द्यायला, महाराणी सोयराबाई, संभाजीराजे, येसूबाई, पुतळाबाई, रामराजे असे सारे राजकुळ जमले होते. सारे महाराजांची वाट बघत होते.

कल्याण – भिवंडीवर मोगलांनी केलेल्या जाळपोळ, लुटालुटीचा करीणा घेण्यात राजांना यायला थोडा वेळ लागला होता. राजे महालात लगबगीने प्रवेशले. रिवाज नसताना आज त्यांच्याबरोबर सरपोसाने झाकले तबक घेतलेल्या हुजऱ्यासह मोरोपंत पेशवेही महालात आले.

साऱ्यांनी बैठकीला दिवट्याचा मान दिला. राणीवशात सावरत्या पदराने उभ्या असलेल्या येसूबाईच्याकडे बघत राजे बांधील म्हणाले, “सूनबाई, अशा पुढे या.”

येसूबाईच्या कपाळीचे कुकुपट्टे चळवळले. ठीक पदर, महाराजांच्या आदरासाठी त्यांनी पुन्हा एकवार ठीक केला त्या बैठकीजवळ पुढेशा झाल्या.

“तुम्हास बघितले की, आम्हाला मासाहेबांची याद येते सूनबाई!” मोकळ्या बैठकीकडे बघत महाराज म्हणाले. “म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो. आपली कराल?”

“जी.” नजर खाली ठेवून येसूबाईंनी हुंकार भरला.

“आमची शिक्के – कट्यार आजपासून आम्ही तुमच्या सुपुर्द करतो आहोत! ध्यानी ठेवा. या शिक्के – कट्यारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत. त्यांचा भार पेलण्यासाठी मासाहेबांचे आशीर्वाद मागून घ्या. तुम्हास येश येईल.”

महालातील साऱ्यांच्या नजरा भावेश्वरीसारख्या उभ्या असलेल्या येशूबाईच्यावर खिळल्या. येसूबाईचे मन आबासाहेबांच्या विश्वासाला आपण पात्र आहोत, हे ऐकताना दाटून आले. “आबा..” त्यांच्या गळ्यातील सादही अर्धवट राहिली.

“बोलू नका. घ्या.” मोरोपंतांनी सरपोस हटविलेल्या, हुजऱ्याने सामोरे धरलेल्या शिक्के – कट्यारीच्या तबकाकडे हातरोख देत महाराज म्हणाले. भाबड्या येसूबाई भांबवल्या. “श्रीं’च्या, आऊसाहेबांच्या राज्याचे ते मानदान कसे आपलेसे करावे, या विचाराने गोंधळल्या.

साऱ्यांची अपेक्षा होती, येसूबाई त्या तबकाला रिवाजाप्रमाणे हातस्पर्श घेऊन ते आपले केल्याची खूण देतील. पण – पण – तबकातील किरमिजी म्यानातील कट्यार आणि शिक्क्‍्याच्या चंदेरी करंडाकडे बघत त्यांनी सरळ आपला काषायकाठी पदरच पसरता धरला! ते आकाशी राजदान स्वीकारायला जसा धरतीनेच पदर पसरावा.

त्याने हुजऱ्या गोंधळला. “येसू”, भारावलेल्या राजांच्या तोंडून शब्द सुटले. खेचल्यासारखे पुढे होत, राजांनी करंड कट्यार उचलली. येसूबाईच्या समर्थ पदरात ती स्वत: सोडताना राज्यांच्या तोंडून बोल सुटले. थेट जिजाऊंच्या सारखे – “विजयवंत व्हा!”

येसूबाईनी बैठकीला तीनवार नमस्कार केला. मग महाराजांना, साऱ्या मामीसाहेबांसह आपल्या स्वारीला नमस्कार केला. समाधानाने महाराज निघून गेले. राजकुल महालाबाहेर पडले.

तेथून आपल्या महालात फुंफाटत आलेल्या सोयराबाईंनी अगोदर कमरेला दाटलेला सोनपट्टा आकड्यातून उकलला. चंद्रा दासीच्या हाती तो देताना हुस्कारा सोडीत, त्या तिला की स्वत:लाच म्हणाल्या ते त्यांचे त्यांनाच माहीत. पण उद्ारल्या, “शिक्के – कट्यार!”

आपल्या वाड्याच्या सदरेवर महाराज बसले होते. सदरीबैठकीसमोर मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही मंडळी होती. “निराजीपंतांची तब्येत ढासळल्याची खबर आहे. आपल्या गावी ते अंथरूण धरून आहेत.” मोरोपंतांनी वृत्तान्त कानी घातला. तो ऐकून राजे चिंतागत झाले.

“बाळाजी, निराजीपंतांच्या गावी हारकारा धाडून त्यांच्या तब्येतीची वाजीपुशी घ्या. दवादारूची हयगय न होईल तसे करणेस लिहा.” महाराजांनी चिटणिसांना सांगितले. एकीकडे जिजाऊंची आठवण, दुसरीकडे डिवचलेल्या बहादूरखानाच्या मराठी मुलखातील हालचाली, प्रतापगडावर पडलेली वीज अशा विचित्र विचारांची त्यांच्या मनात भेसळ झाली होती.

“धनी, कर्यातीकडचे कुनी बाईमानूस गडावं आल्यंय. सरकारांच्या गाठीची अर्जी करतंय.” महाराजांचा खाजगी खरिदातगार खंडोजी दाभाडे याने वर्दी दिली. “घेऊन या त्यांना,” म्हणत महाराजांनी समोरच्या मंडळींवर नजर फिरवली. तिचा इशारा ओळखून सारे सदरेबाहेर पडले. तांबडे आलवण नेसलेल्या एका उजाड कपाळाच्या उतार ब्राह्मण स्त्रीला खंडोजीने पेश केले. आपले वैधव्य, जे सांगायचे ते सांगणे बिसरून क्षणभर बाई महाराजांना डोळाभर बघतच राहिली.

“बाई, आपण कोण? कोण वजेनं येणं केलंत? पाचाडातून वर्दी दिली असतीत, तर आम्ही मेणा पाठविला असता.” महाराजांनी आस्थेने विचारपूस केली. “आम्ही कर्यात मावळाच्या देशकुलकर्ण्यांकडच्या जानकीबाई! सौभाग्य गेलं नि उघड्या पडलो. स्वामींच्या पायांशी न्यायाची दाद मागण्यासाठी येथवर आलो.”

“बोला. बेअंदेश साफ बोला बाई.” राजमुद्रा निर्धारी झाली. पाठीशी गिर्दीला रेललेले महाराज ते ऐकताच गिर्दी सोडून पुढे झाले. जानकीबाईला ते ऐकून धीर आला. कसे सांगावे याची बांधणी करण्यासाठी ती क्षणभर घोटाळली.

“आमचे मालक स्वामींच्या चाकरीत होते. देशकुलकर्णी म्हणून. त्यांच्या फडात मुतालिक म्हणून चाकरीस असलेला शंकराजी भवर आमच्या ध्यानीमनी नसता एकाएकी मिरासी देशकुलकर्णी झाला आहे! आम्हास जुमानीसा झाला आहे. आम्हास मावळ सोडण्याचा दपटशा देतो आहे. खुद्द दरबारानेच त्याला हातरोखा दिल्याचं ऐकल्यानं आमची जबानच बंद झाली. स्वामी, आम्ही फुटक्या कपाळानं कुठं जावं, याचा रोखाही देऊन टाकावा!” असह्य कुचंबणेने बाईचे डोळे भरून आले.

“शांत व्हा, बाई! तुम्ही आमच्या आईसाहेबांसारख्या आहात! तुम्हास न्याय मिळेल. आमचे ते कर्तव्य आहे. एक सांगाल? हातरोखा कुणाचा आहे?” पेचात आल्यागत जानकीबाई घोटाळली. जाब न देता खालच्या मानेने तशीच उभी राहिली. “बोला बाई. ना कचरता सांगा. हातरोखा कुणाचा आहे?” राजांच्या डोळ्यांसमोर साऱ्या मंत्र्यांचे चेहरे क्षणभर तरळले. “जी. आम्ही ऐकून आहोत. रोखा – रोखा युवराजांनी दिला आहे!” जानकीबाई धीराने बोलली.

“बाई!” दातांखाली जीभ सापडावी तसा महाराजांचा आवाज कातरला. नाकपाळी फुलून उठली. क्षणापूर्वी निराजीपंतांच्या तब्येतीची आच लागल्याने मायेची चिंता व्यक्त करणाऱ्या छत्रपतींचे अंग राजसंतापाने सौम्य थरथरू लागले.

“युवराजांना याद करा खंडोजी.” राजांनी जरबी आज्ञा केली. चरकलेला खंडोजी लपकन कमरेत झुकला. मुजऱ्याच्या हातावरच त्याने महाराजांचे शब्द झेलले! “जी.” चटकक्‍्या पावलाने तो बाहेर पडला. आपल्या महालात संभाजीराजे उमाजी पंडित आणि केशव पंडित यांच्याबरोबर अतुपुराण, मत्स्यपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांविषयी चर्चा करीत होते. खंडोजीच्या वर्दीने ती थांबली. मनात पुराणग्रंथांतील देखणे संदर्भ रेंगाळत असलेले पुढे कोणत्या महाभारताचा थाळा वाढून ठेवला आहे याचा अंदाज नसलेले, भरल्या दमदार छातीचे संभाजीराजे हसतच सदरेवर रुजू झाले.

“यांना ओळखलंत?” त्यांना मुजराही भरू न देता जानकीबाईकडे बोट रोखत महाराजांनी विचारले. संभाजीराजांचे हसणे त्या बदलत्या आवाजाने आणि राजांच्या नुसत्या दर्शनाने ओठातच मुरले. त्यांनी जानकीबाईवर नजरफेर टाकला.

“जी. नाही.” पडेल आवाजात त्यांनी उत्तर दिले.

“ह्या जानकीबाई. कर्यात मावळच्या देशकुलकर्ण्यांच्या विधवा!” महाराजांचा एक – एक शब्द आसूड फुटल्यागत संभाजीराजांना वाटला. शंकराजी भवर आणि यादव नामाजीचे चेहरे डोळ्यांपुढे तरळले. श्वास नकळत चढीला पडला. छाती लपापू लागली.

“बाई, तुम्ही या. निर्धास्त असा. आम्ही तुमच्या हक्कांना अभय दिले आहे. खंडोजी, यांना आऊसाहेबांच्या महाली घेऊन चला. त्यांचा इतमाम ठेवा.” कल्याणकारी राजेपण आपुलकीने म्हणाले. खंडोजी बाईंना घेऊन गेला. खाली मान घातलेल्या संभाजीराजांना महाराजांनी थेट जबानीवर घेतले. “या बाईंना परते सारून तुम्ही मुतालिकास कुलकर्णपणाचा हातरोखा दिलात?”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment