धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९७ –
“जी.” मान वर उठत नव्हती. “कोण हेतानं?”
“यादव नामाजीनं आमचा गैरमेळ करून दिला. रंगनाथभटांना कुणी वारस नाही. असा.”
“खामोश, आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात! आम्ही तुम्हाला एकवार सांगितलं आहे – राजांना चुका करता येत नाहीत. आणि केल्या चुकांची सफाईतही देता येत नाही. विसरलात? उद्या आम्ही स्वारीवर असता आमचे काही बरे – वाईट झाले असाही कुणी तुमचा गैरमेळ पाडेल! ठेवाल विश्वास?” शब्दन्शब्द जनहिताच्या पिळाने बांधलेला होता. बिनतोड होता. झटका बसावा, तशी संभाजीराजांची गर्दन वर झाली, त्यांना आबासाहेब दिसत नव्हते. कारण त्यांचे डोळे पाणपडद्याने झाळाकून टाकले होते. ओठ थरथरत होते. “चुकलो – चुकलो आम्ही.” मुश्किलीने एक – एक घोगरा शब्द त्यांच्या घशातून बाहेर पडला.
“ठण ठण ठण!” तासवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे पाचाडच्या सदरेवर दिलेले घाटेचे टोल सदरीमहालात घुसू लागले ह्या टोलांच्या रूपाने जणू जिजाऊसाहेबच सदरेवर प्रवेशत होत्या! संभाजीराजांच्या पाठीवर हात ठेवून, पदर चिमटीने सावरीत म्हणत होत्या, “राजे आम्ही कधी काही मागणं टाकलं नाही! आज एक टाकतो आहोत. आमच्या शंभूराजांच्या आऊ आता तुम्ही व्हा! आम्ही थोरल्या सूनबाईंच्या शब्दांत आहोत!” टोला-टोलाबरोबर महाराज आणि संभाजीराजे दोघांच्याही अंगभर काटा फुलला होता. दोन घडीव मूर्तीसारखे ते एकमेकांकडे अचळ बघत राहिले.
छत्रपतीमहाराज बैठक सोडून चालत संभाजीराजांच्या जवळ आले. त्यांचा खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, “चला. माचीवर जाणे आहे!” आणि ते दोघेही भुत्ये चालू लागले माचीकडे. बाळाजींनी संध्याकाळी राजांच्या दस्तुरासाठी आणलेल्या कर्यात मावळाच्या सुभेदाराला लिहिलेल्या फर्मानात मजकूर होता – तेथील कुलकर्ण जानकी कोम रंगभट ठकार हिचेच मिरासी असे. शंकराजी भवर याने नेला हातरोखा रद्दबातल समजोन तो रोखून धरणे. शंकराजी मुतालिकच असे! त्याजकडून बाईस कोणेविशी दपटशा नव होय तसे करणे.”
त्या फर्मानाची एक प्रत घेऊन जानकीबाई नगारखान्याच्या जरीपटक्याकडे समाधानाने बघत रायगड उतरू लागली.
न्यायाधीश निराजीपंतांनी आपला देह ठेवला होता. त्यांच्या सेवेची कदर राखावी म्हणून महाराजांनी भरल्या दरबाराच्या साक्षीने त्यांचे चिरंजीव प्रल्हाद निराजी यांना मानवस्त्रांसह न्यायाधीशपद दिले. प्रल्हादपंत उमरीचे आणि तसेच उमदे होते. तरतरीत होते. मंत्रिगणातील ते सर्वांत तरुण मंत्री होते.
दरबारी कामकाज आटोपताच एकदा त्यांनी जमल्या अष्टप्रधानांना प्रस्ताव टाकला – “जैसी आमची जाहली तैसी युवराजांची मुंज होणे अगत्य आहे. धर्मशास्त्राच्या गोष्टी एकदा राहून गेल्या की, राहूनच जातात. पुढे नड देतात.” महाराज अनुभवाचे बोल बोलत होते.
अष्टप्रधानांनी तो प्रस्ताव उचलून धरला. महाराजांनी अनंतभट आणि प्रभाकरभट यांना मुहूर्त – शोधनाचे काम जोडून दिले. गडावर संभाजीराजांच्या मुंजीचे बारे खेळू लागले. जाणत्यांना कळून चुकले की, दरबारात महाराजांच्या पायरीशी बैठक घेणारे युवराज, उद्या महाराजांच्या पश्चात बत्तीसमणी सिंहासनावर बसणार. खुद्द महाराजांनीच हे आता निर्विवाद स्वीकारले होते! पुढे राज्याभिषेकात युवराजांना अडचण येऊ नये म्हणूनच महाराजांनी हा मौंजीबंधनाचा निर्णय घेतला होता. तो ऐकताना दरबारी पडदेबंद राणीवशात बसलेल्या सोयराबाई मात्र तडक उठून आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या. हे दरबारात मात्र बाहेर कुणालाच कळले नव्हते.
विचारांबर विचार पाठीशी लागलेल्या सोयराबाई मनचा बेत महाराजांच्या कानी कसा घालावा, या पेचात होत्या. एकदा त्यांना बाटले – ‘अण्णाजींना बोलावून घ्यावं.’ पण अशा कामी अण्णाजी कुचकामी ठरतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणून खूप बिचारांती त्यांनी मनोमन निर्णय घेतला. “आम्हीच जे वाटते, ते जातीने स्वारीच्या कानी घालू!
आले मुंजविधीची निमंत्रणे रवाना केलेले महाराज नेहमीप्रमाणे सोयराबाईंच्या महाली आले. रामराजांना जवळ घेत हसून म्हणाले, “तिकडं आम्ही तुमच्या दादा महाराजांच्या मुंजीची निमंत्रणं धाडतो आहोत आणि तुम्ही इथं महाली काय करताहात?”
अनायासे निघालेला विषय पकडून सोयराबाई हसत महाराजांना म्हणाल्या, “आम्हास स्वारीचं कोडं उकलत नाही! एकच बाब दोन वेळा कशाला करायची ती?”
काहीच न कळलेल्या महाराजांच्या कपाळीचे गंधपट्टे वर चढले. “अभिषेक ते दोन वेळा झाले. स्वारी आता मुंजीही दोन वेळा करणारसं दिसतंय.”
“मतलब?”
“युवराजांची आणि बाळराजांची मुंज एकदमच झाली, तर साऱ्यांचीच धावाधाव वाचेल असं आम्हास वाटतं!” हसून रामराजांच्याकडे बघत सोयराबाई म्हणाल्या. “यांची मुंज? हे अजून लहान आहेत. कर्तबगारी जरा उमटू द्या आमच्या बाळराजांची, मग धडाक्यानं करू आम्ही यांचं मौंजीबंधन. काय बाळराजे?” हसून रामराजांची पाठ मायेने थोपटीत महाराज म्हणाले. ते ऐकताना राणीसाहेबांचा नाकशेंडा लालावून आलाय, हे काही महाराजांच्या ध्यानी आले नाही. पण कोंडी असह्य झालेल्या सोयराबाईची वाफ मुखावाटे फुंफाटत बाहेर पडली, “कुलकर्ण तिसऱ्यालाच सुपुर्द करणारे आपले युवराज आहेत खरे कर्तबगार!”
“खामोश!” महाराजांच्या जरबेने रामराजे दचकले. त्यांना जवळ घेत राजांनी सोयराबाईना समज दिली. “त्यांच्या फडकरी कामात दखल द्याया तुम्हास समंध नाही. त्यांची कर्तबगारी पारखणारे आम्ही खूब आहोत!” दुसऱ्या क्षणी रामराजांच्या खांद्यावर आपला हातपंजा चढवीत राजे शांतपणे त्यांना म्हणाले, “चला.” जात्या रामराजांच्याकडे बघणाऱ्या सोयराबाई भीतीने तुसत्या लटलट कापत होत्या! “बाळराजे थांबा”, असे त्यांना म्हणायचे होते, पण ते ओठांबाहेर उमटलेच नाही. माघ वद्य पंचमीला संभाजीराजांचे मौजीबंधन इतमामाने रायगडावर पार पडले. संभाजीराजे युवराज म्हणून फडाच्या कामात दक्षतेने लक्ष घालू लागले. हिवाळा हटला आणि पुरंदर प्रांताचा गोपाळशेट वाणी शेट्येपणाचा एक तंटा घेऊन रायगडावर आला. त्यांच्या कथल्याचा निवाडा देण्याचे काम महाराजांनी संभाजी राजांना जोडून दिले.
त्यांची पारख घ्यावी म्हणून. कथल्याची बैठक राजांच्या वाड्याच्या सदरेवर बसली. संभाजीराजे न्यायदान कसे करतात, यावर देख ठेवण्यासाठी महाराज जातीने त्यांच्या शेजारी बसले. कथल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. वादी – प्रतिवादींचे म्हणणे पणीणतारकून घेतले. साक्षी ऐकल्या. कागद नजरेखाली घातले. परंपरेच्या वारसाहक्काने पुरंदरचे शेट्येपण गोपाळशेटच्या बाजूने पडत होते.
संभाजीराजे कथल्याच्या महजराचा मजकूर मुतालिक महादेव यमाजींना सांगू लागले. महाराजांनी तो ध्यान देऊन, काही न बोलता ऐकला. शब्दन्शब्द त्यांच्याच जबानीतून बाहेर पडल्यागत संभाजीराजे सांगत होते. महजर पूर्ण झाला. महादेवपंतांकडून तो एकवार वाचून घेऊन संभाजीराजांनी त्याला दस्तूर दिला. तबकात ठेवलेली महजराच्या कागदाची थैली जोत्याजी केसरकराने गोपाळशेटच्या समोर धरली.
संभाजीराजांना मुजरा करून गोपाळशेटने ती थैली उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. हात बांधून तो युवराजांच्यासमोर अदबीने उभा राहिला. मनोमन खूश झालेल्या महाराजांनी गोपाळशेटला जाण दिली – “कथला तुमच्यासारखा झाला गोपाळवाणी, आता निवाडापट्टी तुम्ही रुजू केली पाहिजे! युवराजांना पाच होन आणि सरकारी फडात सव्वाशे होनांची सेरणी भरणा करून मगच गड उतरा!” “जी. धनी.” म्हणत डोकीचा रुमाल डोलावून महाराजांना मुजरा करून गोपाळवाणी सदरेबाहेर पडला.
महाराजांनी संभाजीराजांच्याकडे बघून हसत त्यांना, महजर पसंत असल्याची बैठकीतील इतर कुणालाही कळू येणार नाही, अशी राजस पोच दिली. अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिमल यांना फोंड्याची मोहीम नुकतीच जोडून दिली होती. महाराजांनी आणखी दोन बजोर मोहिमा लगेचच खोलल्या. एक संभाजीराजांच्यासाठी आदिलशाही मुलूख मारीत थेट कुतुबशाहीच्या भागानगरपर्यंत भिडणारी. आणि दुसरी स्वत: आपल्यासाठी राजापूर कुडाळमार्गे फोंड्यावर चाल घेणारी.
संभाजीराजांच्या फौजेची पाचाडात बांधणी झाली. वीस हजार घोडाईत या धावणीत युवराजांच्या घोड्याच्या टापांचा माग धरीत दौडणार होते साऱ्या राजकुळाचा निरोप घेतलेले संभाजीराजे महाराजांच्यासह जगदीश्वराचे दर्शन करून रायगड उतरले. पाचाडात जिजाऊंच्या वाड्याला धरून उत्तरेस आता त्यांची चिरेबंद समाधी उभी झाली होती. तिच्या पादुकांवर बेलफुलांची ओंजळ आणि भंडाऱ्याची मूठ वाहून संभाजीराजांनी पायरीला माथा भिडविला. “फत्ते घेऊन या.” महाराजांनी त्यांना उठवून घेतले. दर्पणात बघितल्यासारखे ते एकमेकांकडे बघू लागले.
आनंद मकाजी, रूपाजी भोसला, ज्योत्याजी, अंतोजी, कोंडाजी फर्जद यांच्यामागून वीस हजार घोडाईत दोडू लागले. ही मोहीम पन्हाळ्यावरून मिरजेवर उतरून आदिलशाहीला ताराज करीत, हूल देत कुतुबशाहीच्या भागानगर या राजधानीवर अचानक चाल घेण्याच्या मनसुब्याने खोललेली होती. फौजेनिशी संभाजीराजे तीन दरवाजाने पन्हाळ्याची चढण चढून आले. किल्लेदार त्र्यंबकपंतांनी त्यांची आगवानी केली
बालेकिल्ल्याचा पायरीदार राजमार्ग सरताच समोरच शंभूमहादेवाचे छोटेखानी मंदिर होते. ते येताच त्र्यंबकपंत म्हणाले, “युवराजांनी दर्शन करून मगच खासेवाडा चढावा.” त्र्यंबकपंतांच्या पाठीशी होत, संभाजीराजे मंदिराच्या घुमटीत वाकून शिरले शालिग्रामी रंगाचे, बेलपुष्पे वाहिलेले शिवलिंग नंदादीपांच्या प्रकाशात झळकत होते. त्याच्यावर नजर जखडून पडलेले त्र्यंबकपंत ओढल्यासारखे पूर्वील काळात गेले होते. ते म्हणाले, “युवराज, ती रात्र आम्ही विसरू शकत नाही. गडास जौहरचं चाळीस हजार हबशांनिशी घेराचं ताकदवर कडं पडलं होतं. वेढा चार महिने जारी होता.
शेवटी महाराजांनी हबशांशी सुलुखाची बोलणी लावून जीव धोक्यात घालण्याचा निर्णय केला. तीनशे निवडक बांदल आणि बाजी देशपांडे यांना संगती घेऊन पडत्या पावसात रात्रीचा गड उतरण्यापूर्वी महाराज या घुमटीत पिंडीच्या दर्शनास आले. आम्ही, बाजी, फुलाजी संगती होतो. या पिंडीच्या शाळुंकेला माथा टेकविलेले महाराज, फरसबंदीवर गुडघे टेकून कितीतरी वेळ तसेच बसले होते. महाराजांचं ते ध्यानमग्न रूप, ही पिंडी आणि ती रात्र आम्ही विसरू शकत नाही.”
ते ऐकून भावभऱ्या मनाने संभाजीराजांनी गुडघे टेकून डोळे मिटत त्या शिवपिंडीच्या शाळुंकेला आपल्या कपाळीचे शिवगंध भिडविले. “युवराज, ही पिंडी रंगरूपी आहे.” त्र्यंबकपंतांनी तिचे खासेपण सांगितले. ते न कळल्याने संभाजीराजांनी विचारले, “मतलब?”
“हाताच्या ओंजळीनं ही पिंडी झाकून थोड्या अवकाशानं ओंजळ हटविली की, ही शालिग्रामी पिंडी प्रथम सफेद दिसते! मग जांभळा, चंदेरी, गर्द निळा असे रंग दाखवीत, पुन्हा शालिग्रामी होते!”
“जगदंब, जगदंब! खरं सांगता पंत?” संभाजीराजांचे डोळे विस्फारले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९७.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.