महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,157

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९८

By Discover Maharashtra Views: 1405 11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९८ –

“युवराजांनी पडताळाच घेऊन बघावा.” त्र्यंबकपंतांनी पिंडीवरची बेलफुले हलकेच शाळुंकेवर उतरवली. पुढे होत संभाजीराजांनी आपल्या अंगठीधारी, भरीव बोटांची ओंजळ पिंडीवर पांघरली. त्र्यंबकपंतांनी कोनाड्यातील पेटता पलोता पिंडीजबळ धरला. थोड्या वेळाने संभाजी राजांनी ओंजळ हलकेच मागे घेतली. पंतांनी पलिता पिंडीला लगत केला. रंगरूपी शिवपिंडी हातस्पर्श झाला तेवढ्याच भागापुरती सफेद झाली. मग मजेदार रंगच्छटा एकामागोमाग एक पालटू लागली. त्या बघताना उजवी भुवई चढलेल्या संभाजीराजांच्या डोळ्यांतले रंगही पालटू लागले. त्यांचे मन श्रद्धेने भरून आले. पिंडी पूर्ववत शालिग्रामी झाली. युवराजांनी हात जोडून पुन्हा एकदा तिला नमस्कार केला. डोळे मिटले. त्यांच्या मनी आले ‘अशी- अशीच दिसते महाराजसाहेबांची मुद्रा. शिवर्षिडीसारखी. भावानुरूप रंग पालटणारी! रंगरूपी भावमुद्रा!”

पन्हाळ्याचा सोमेश्वर तलाव, सज्जा कोठी, अंबारखाने, बुरजाबुरजांवरचे तोफमोर्चे पाहून संभाजीराजे सुखदिल झाले. दोन दिवस मुक्काम टाकून, त्र्यंबकपंतांचा निरोप घेऊन चौदरवाजाने सेनेसह ते पन्हाळा उतरले. मिरजेचा रोख ठेवून युवराजांचे घोडदळ दौडू लागले. बत्तीस शिराळामार्गे मिरज हे आदिलशाहीचे मातकोटाने बंदिस्त असे छावणीचे सुसज्ज ठाणे होते. ते अंगावर न घेता भोवतीचा मुलूख ताराज करीत संभाजीराजांची शिलेबंद फौज आदिलशाहीत घुसली. अथणी, एटग्गी असे तळ टाकीत घोडाइतांच्या झडप्या तुकड्या लूट गोळा करीत भागानगराकडे दौडू लागल्या. गोवळकोंड्याच्या भागानगर या राजधानीच्या शिवेवर संभाजीराजांची वारा प्यालेली बीस हजारी फौज खडी ठाकली. कुतुबशाहीचा राजा तानाशहा याला असे काही होईल, याची स्वप्नातसुद्धा कल्पना नव्हती.

“मरगठे आये भागो!” भागानगरात कल्लोळ उठला. भयचूर रियाया गोवळकोंड्याच्या तटबंदीवर किल्ल्याच्या आसऱ्याला जाण्यासाठी धावू लागली. “चौतफेचा मुलूख तसनसीस लावा. बोला हर हर हर महादेव” हाती म्यानखेच, तळपती, नंगी धोप तलवार घेतलेले संभाजीराजे गर्जले.

भागानगरची दक्षिणवेस धरून युवराजांच्या कनातीदार शामियाना उठला. घामाच्या धारा लागलेले संभाजीराजे दौडत्या तुकड्यांवर देखरेखीचा फेर टाकून त्या शामियान्याच्या जवळ आले. पायउतार होऊन त्यांनी कायदे मोतदाराच्या रोखाने फेकले. पाठीशी आनंदराव, रूपाजी, जोत्याजी ही मंडळी होती.

“आनंदराव, कुतुबशहास हेजिब धाडून समज द्या. मनचाही खंडणी वसूल झाल्याखेरीज घोड्याचा खूर पीछे हटणार नाही!” बैठक घेत युवराजांनी आज्ञा केली. “जी.” पगडीला झोल देत आनंदराव कमरेत वाकला. त्याने आजवर नेताजी, प्रतापराव, हंबीरराव असे वावटळ उठवीत दौडणारे सोबती बघितले होते; पण युवराज संभाजीराजांच्या रसरसत्या रूपावर, त्यांच्या तडफेवर धारकरी केवढे जीव लावून आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव या मोहिमेत तो घेत होता.

आनंदरावाने गोवळकोंड्याच्या किल्ल्यावर हेजिब धाडला. तानाशहाने लुटीची मसलतीची मजलीस भरविली. महाराजांच्या राज्याभिषेकाची, बहादूरगडाच्या लुटीची वर्णने ऐकलेल्या त्याच्या सल्लागारांनी खंडणी रुजू करण्याचा सल्ला बादशहाला दिला. त्याचा वजीर मादण्णापंत बोलणी करण्यासाठी किल्ला उतरून संभाजी राजांच्या तळावर आला. संभाजीराजांनी त्याची भेट घेतली.

दोन हजार होन खंडणीची तबके गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून मराठ्यांच्या तळावर उतरली. धास्त घेतलेल्या भागानगरातील डच वखारवाल्यांनी एक हजार फ्लोरिन्स मराठी तळावर रुजू केले! ते दास्तानी लावून संभाजीराजांनी आपल्या फौजेचा मोहरा माघारी फिरविला. पुन्हा आदिलशाहीच्या रोखाने. पण खबरगिरांनी बातमी आणली, “पठाण बहलोलखान फौजबंदीने चालून येतो आहे.” त्याला अंगावर न घेता हूल देऊन संभाजीराजांनी आदिलशाहीची हुबळीची मातब्बर व्यापारपेठ लुटली. आणि नंतर रायबागचे ठाणे मारून युवराजांची फौज, लुटीच्या मोहरबंद थैल्या घोड्यांच्या पाठीवर लादून पन्हाळ्याच्या रोखाने दैडू लागली. युवराज विजयी सेनेसह पन्हाळगड चढू लागले. त्यांच्या स्वागतासाठी नौबत झडत होती. पन्हाळा चढून येताच संभाजीराजांनी गडावरच्या शिलेबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात मिळाली लूट प्रथम रायगडाच्या वाटेला लावली. सोबत सोयराबाईंना रिवाजी खलिता धाडला. जखम – दरबार बसवून मोहिमेत मर्दानगी केलेल्या धारकऱ्यांना कडी, वस्त्रे, हत्यारे बक्षून त्यांची कदर केली.

फोंड्याच्या वेढ्यात असलेल्या महाराजांना बयाजवारीने खलिता धाडला गेला, “साहेबी जोडून दिली मोहीम फत्ते पाववून पन्हाळगडी मुक्कामास आहोत. चरणांच्या दर्शनाची इच्छा बाळगून आहोत.” पन्हाळगडच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर संभाजीराजे कारकून परशरामपंताला मजकूर मायने सांगत बसले होते. बगल धरून आनंदराव उभे होते. एवढ्यात किल्लेदार त्र्यंबकपंतांनी सदरेवर येऊन वर्दी दिली, “युवराज, कऱ्हेपठारातील चांबळी गावचे इनामदार बंधू आले आहेत. निळाजी, शंकराजी, विसाजी व त्रिंबकजी असे चौघे आहेत. भेटीस रुजू होण्याची आज्ञा मागतात.”

“पंत, पेश येऊ द्या त्यांना.” संभाजीराजांनी परवानगी दिली. चांबळीकर इनामदार बंधू सदरेवर आले. मुजरे भरून एक हारीने उभे राहिले. “कोण हेतानं येणं केलंत चांबळीकर?” संभाजीराजांनी त्यांची विचारपूस केली.

“एका बाबीची दाद मागण्यास आलोत आम्ही रायगडाहून.” थोरले निळाजी विषयाकडे वळले. “कसली दाद? काय झाले? सांगा.” संभाजीराजांची नजर एकसरीने चौघांच्या पगड्यांवरून फिरली. “स्वामींनी सिंहासनाची पट्टी मिरासदारांवर घातली आहे. इनामदार पट्टीस माफ केले असत. तरी पुण्याचा राघो भास्कर हवालदार आम्हावर पट्टी घालीत आहे. आम्ही इनामदार असता, आणि तीही पंचवीस टक्क्यांनी! आम्ही इनामदार आहोत, आम्हाला सिंहासनपट्टी माफ आहे, असे सांगितले तरी जुमानत नाही. धाक देतो. युवराज, हे निवारले पाहिजे. आम्हास न्याय मिळाला पाहिजे.”

“तुम्ही इनामदार आहात यासी लेखी पुरावा?” संभाजी राजांनी सावधपणे विचारले. निळाजी पुढे झाला. त्याने आपल्या इनामाच्या वतनपत्रांची थैली संभाजीराजांच्या पायांशी ठेवली. वतनपत्रे वाचून संभाजीराजे चांबळीकरांना म्हणाले. “ठीक आहे. तुम्ही निर्धास्त असा. सिंहासनपट्टी तुम्हावर नाही घातली जाणार. तुम्हास ती माफच असे.”

“आनंदराव, प्रांत पुण्याचे सुभेदार कोण?” संभाजीराजांनी विचारले. “जी. राघो बल्लाळ अत्रे.” आनंदरावांनी झुकते होत माहिती दिली.

“परशराम, मजकूर घ्या.” संभाजीराजे सांगू लागले. चांबळीकर त्र्यंबकपंत, आनंदराव ऐकू लागले.

परशरामपंतांच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू « लागले – “मशरूल अनाम राघो बल्लाळ, सुभेदार प्रांत पुणे – प्रति युवराज संभाजीराजे उपरी दंडवत विशेष – पुणा येथे कास टका इनाम येक आहे. त्यासी मिरासपटी देणे, म्हणोन राघोभास्करे होनु पंचवीस लाविले आहेत, म्हणोन कळो आले. तरी महालास मिरासपटी घातली आहे, तेथे इनामदारास हिसाबाने घ्यावे, ऐसा तह केला आहे. त्यास जे महाली मिरासपटीच घातली नाही, तेथे इनामदारास पैके मागणे कोण गोस्टी? त्याहीमध्ये निळकंठराऊ यास पटी मागणे उचित नाही. तरी तुम्ही राघो भास्करास एक कागद ल्हेवून देणे आणि त्यांचे वाटे नव जाये ऐसी गोस्टी करणे. मशारनिल्हे निळकंठराऊ याचे इनामास पेशजीही तसवीस लागली नाही, आणि हाली राघो भास्कर पटी मागतो. याबद्दल तुम्ही त्यास बहुत वेजेने लिहून त्याचे वाटे नव जाणे, त्यांचा बोभाट हुजूर करणे. नव ये ऐसी गोस्टी करणे, बहुत काय लिहिणे? जाणिजे.”

परशरामपंतांनी याच आशयाचे दुसरे पत्र हवालदार राघो भास्करासाठी लिहून तयार केले. दोन्ही पत्रे वाचून घेऊन संभाजीराजांनी त्यावर दस्तूर दिले. त्र्यंबकपंतांनी पत्रांच्या वळ्या निळाजीच्या हाती दिल्या.

“चांबळीकर, ती पत्रे रायगडी पेशवे मोरोपंतांना रुजू करून त्यांची मुद्रा त्यावर घ्या. तुम्ही जातीनिशी जाऊन सुभेदार राघो बल्लाळांच्या हाती ती द्या.” संभाजीराजांनी निळाजीला सूचना केली.

“जी हुजूर. थोर उपकार झाले.” चारी बंधू कमरेत झुकले.

“ते कर्तव्य आहे आमचे. या तुम्ही.” संभाजीराजांनी निळाजीला दुरुस्त केले. चांबळीकर सदरेबाहेर पडले. त्यांच्यावरची मिरासपट्टी रद्द झाली.

फोंड्याहून महाराजांचा खलिता आला – “फौजबंदीने टाकोटाक फोंडियास निघोन येणे. संगती त्र्यंबकपंतास आणणे.” दम घेऊन तवाना झालेल्या फौजेची बांधणी करून संभाजीराजे त्र्यंबकपंतासह तीन दरवाजाने पन्हाळगड उतरले. कोकणपट्टीचा रोख ठेवून दौडू लागले. राजापूर, खारेपाटण, कणकवली, कुडाळ असा मजला टाकीत फौजेनिशी संभाजीराजे फोंड्याच्या वेशीवर आले. आगेवर्दी रवाना झाली. फोंड्याचा कोटबंद किल्ला उतरून अण्णाजी, धर्माजी नागनाथ अशा असामींसह महाराज त्यांच्या स्वागतासाठी खिळेबंद दरवाजात आले. मोहिमेच्या ऐन उन्हाळ्यातील धावणीने संभाजीराजांची मुद्रा खरपूस गव्हाळ दिसत होती.

महाराजांना बघून त्यांचे पाय शिवण्यासाठी तरातर चालत येणाऱ्या संभाजीराजांना महाराजांनी झुक्‌ दिले नाही. तसेच वर घेत छातीला छाती भिडवून म्हटले,

“आम्ही (बय खास वजेनं बोलावून घेतलं आहे. चला. सावचित्तानं बोलू.” दोघेही किल्ल्यात गेले. मोठ्या हिकमतीने महाराजांनी महमद इखलास या आदिलशाही किल्लेदाराचा पाडाव करून फोंडा दस्त केला होता. त्याची धास्त घेतलेले गोवेकर फिरंगी हालचाल करणार हे नक्की होते. फोंडा मराठ्यांचा हातात असणे, फिरंग्यांना धोक्याचे होते. विश्रांती घेऊन बैठकीत बसलेल्या संभाजीराजांना महाराजांनी बेत खोलून सांगितला – “आम्ही कारवार प्रांतावर चाल घेणार आहोत. तुम्ही तुमच्या तवान्या फौजेनिशी ही मोहीम तुमच्या हाताखाली करून चालविणे. फिरंगी या कोटावर खूब डोळा ठेवून आहे. त्यास त्याच्या मुलखात मुसंडी घेत जरबेत राखणे.”

“जी. आज्ञा.” महाराजांनी आपल्यावर दुसरी जोखीम टाकली, या अभिमानाने संभाजीराजांचे डोळे फुलून उठले. “इकडील तर्फेची चिंता जराही न करावी. आम्ही साहेबकामास हुशारीने रुजू आहोत.” संभाजीराजांनी महाराजांना विश्वास दिला. फोंड्यावर त्र्यंबक पंडितांची सुभेदार म्हणून नामजादी करून, मोहीम संभाजीराजांच्या खांद्यावर सोपवून महाराजांनी फोंडा सोडला. अंकोल, शिवेश्वर, काद्रा, कारवार ह्या आदिलशाही पट्ट्यांची मारतोड करण्यासाठी संभाजीराजांनी गोव्याचा फिरंगी विजरई-लुईस-द-मेंदोस-ई-अल्बुकेर्की यास जरब देणारा खलिता धाडला – “प्रांत फोंडियाचे तर्फेने येणारे हेमाडबासे, अंत्रूज, बाळी काणकोण, अष्टागार, चंद्रवाडी, कोपे, सांगे मिळोन साठ गाव ते तातडीने खाली करणे! ना तर मराठी फौजा फिरंगी मुलखात घुसोन चालवतील!”

विजरईने या खलित्यास दाद दिली नाही, म्हणून त्र्यंबकपंत, धर्माजी नागनाथ आनंदराव यांच्यासह संभाजीराजे पाठीशी घोडदळ घेऊन फोंड्याच्या किल्ल्याबाहेर पडले. अंत्रूज मार्गाने फिरंगी मुलखात घुसले. लूट, मुलूखमारीला तोंड फुटले. विजरईला या साऱ्याचा अंदाज होताच. त्याने आपल्या मुलखाची दरोबस्त बांधणी केली होती. ठाण्या – ठाण्याला कडवा विरोध घेऊ लागला. त्यातच पावसाला सुरुवात झाली. संभाजीराजांनी फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतला. ते सैन्यासह फोंड्याच्या किल्ल्यात येऊन ठाण झाले. महाराजांच्या पुढील आज्ञेची वाट बघू लागले.

आदिलशाहीची मारझोड करून महाराज रायगडावर परतले होते. त्यांचा खलिता आला – “फोंड्यास किल्लेदार म्हणोन धर्माजी नागनाथ याची नामजादी केली असे. त्र्यंबक पंडितास पन्हाळियास धाडून तेथील कोटाची बंदिस्ती करून तुम्ही रायेगड जवळ करणे. पावसास तोंड लागले आहे.”

महाराजांनी दिलेल्या आज्ञेबरहुकूम गोष्टींची पूर्तता करून संभाजीराजांनी धर्माजीचा निरोप घेतला. आनंदरावांसह ते पावसाच्या सरी अंगावर घेत दौडू लागले, रायगड जवळ करण्यासाठी. पुरत्या अडीच महिन्यांनंतर! या परतीच्या वाटेवरही संभाजीराजांनी अंकोल्याचा आणि सरूप नाईकाचा मुलूख घोडदळी झडपा टाकून मारला.

लेख पुरा झाला. संभाजीराजांची मुद्रा कागदाकडं बघताना आगळ्या तेजाने उजळून निघाली. हातचे पीस त्यांनी हलकेच कलमदानात ठेवून दिले. काजळी शाई टिपण्यासाठी मऊशार वाळूची चिमट कागदभर पसरून दिली. टिचकी देऊन कागदावरची वाळू झटकली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment