धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९९ –
“धाराऊ, जरा आमच्या कबिल्यास याद करता!” आपल्याच नादात असलेले संभाजीराजे कागदाकडे बघत म्हणाले. धाराऊ आपल्याशीच हसली. पदर नेटका करीत बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने येसूबाई आत आल्या. त्यांच्याकडे हसून बघत संभाजीराजे म्हणाले, “ओळखा बघू कशासाठी आम्ही तुम्हास वर्दी दिली असेल?”
डागाच्या यादीची आठवण मनात रेंगाळत असलेल्या येसूबाई आपल्या स्वारीची हसरी चर्या बघून गोंधळून गेल्या.
“नाही? ऐका तर. आम्ही एका काव्याची बांधणी केली आहे!” कागदाकडे बघताना संभाजीराजांचे डोळे तळपू लागले. मनाची शंका दूर पळालेल्या येसूबाईच्या डोळ्यांत क्षणात अभिमानी कौतुक उतरले.
“वाचू आम्ही?”
पदराच्या मखरातील येसूबाईंची होकारी मुद्रा इलली. डोळे तेजाळले. संभाजीराजे वाचू लागले. ते एका स्त्रीचे पायाच्या नखापासून शिखापर्यंत केलेले हिंदोस्तानी भाषेतील काव्यमय वर्णन होते! नखशिखा!
ते ऐकताना कावऱ्या – बावऱ्या झालेल्या येसूबाई महालात कुणी येईल काय म्हणून एकसारख्या दरवाजाकडे बघू लागल्या. काव्य वाचून येसूबाईच्याकडे बघत संभाजी राजांनी विचारले, “काय? आवडलं?” काहीही उत्तर न देता मान खाली घालून येसूबाई उभ्या होत्या संकोचलेल्या, शरमलेल्या. त्या कसल्या गैरसमजात आल्या आहेत, हे कळल्याने त्यांचे कावरेपण ताणीत संभाजीराजे हसून म्हणाले, “तुम्हास कसं आवडणार हे? हे काही तुमचं वर्णन नाही!”
“येऊ आम्ही?” येसूबाईंना आता उभे राहणेच अवघड झाले.
“या.” युवराजांची मुद्रा हसली. मिश्यांची बारीक रेघ तणावली.
येसूबाई जायला निघालेल्या बघून त्यांच्या शालूवरच्या जरीकळ्यांवर नजर जोडून संभाजीराजांनी काव्याचा विषय सांगितला. “पण जाताना ऐकून जा. गोकुळात कृष्णाकाठी वेड्या झालेल्या राधेचं वर्णन आहे हे!! नखशिखा! आम्हास भरोसा आहे. तुम्हालाही राधा अशीच दिसत असेल, चांदणवेलीसारखी! तलवारधारेसारखी!” संभाजीराजे मनमोकळे हसले. पाय घोटाळलेल्या येसूबाईंना ते ऐकताना वळून म्हणावेसे बाटले, “अगोदरच सांगणं झालं नाही ते!”
रायाजी आणि अंतोजीला पाठीशी घेत संभाजीराजे बालेकिल्ल्याबाहेर पडले जगदीश्वराचे दर्शन घ्यायला. श्रावणमासाचा तो अनेक वर्षे चालत आलेला रिवाज होता. पहाटवेळच्या जगदीश्वराच्या दर्शनाचा. उभा रायगड दिवसफुटीच्या धूसर प्रकाशात एखाद्या गंभीर स्वप्नरनगरीसारखा दिसत होता. झाडापेरावरची गडपाखरं अज्ञाताला साद घालीत कलकलत होती, फडफडत होती. दूरवर डोंगरकडा काळपट रेषा ओढीत साऱ्या भवतालाने फिरत्या होत्या.
जगदीश्वराचा मंदिर आवार येताच आघाडीच्या दगडी उंबरठ्याला हात भिडविण्यासाठी संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील आईची कवड्यांची माळ झोल घेत ओळंबली. मनात थोरल्या आऊंची आठवण उभी राहिली – “रायगड सोडून हा गड चढून आलो, तेव्हा मासाहेब होत्या. या मंदिराचा हाच उंबरठा आम्ही त्यांच्या सोबतीनं पहिल्यानं ओलांडला. आज हे सारं आहे. त्याच फक्त नाहीत. नाहीत तरी कशा? त्या इथंच तर आहेत. सूर्य डोंगराआड असला, तरी त्याचा हा धुकट उजेड कसा सगळीकडं पसरून राहिला आहे तशा!’
विचारांच्या लाटांबरोबर ते चौकआवारातील दगडी कासवाजवळ आले. फरसबंदीला, अंगाखाली झाकलेल्या पायांची पकड रुपबीत ते कासव त्यांना मूकपणे सांगून गेले, “मंदिरात येणाऱ्या हर दर्शनभक्तांस “मनाचे विकार आमच्या पायांसारखे मागे सारून या’ याची सांग देण्यासाठी आमची योजना केली गेली आहे.”
त्या कासवाच्या दर्शनाने संभाजीराजांचे मन नितळ झाले. अत्यंत श्रद्धेनं त्यांनी माथ्यावरचा घंटेचा घुमरा टोल दिला. सुरांची थरथरती लाट रायगडच्या माथ्यावर सळसळत सरकली.
गाभाऱ्यातील शिवर्षिडीवर नजर खिळलेले संभाजीराजे पिंडीला बेलफुले बाहण्यासाठी धीमी पाबले टाकीत पुढे चालू लागले. अचानक समोरची पिंडी अदृश्य झाली! गाभाऱ्याच्या घुमटीतून पहाटपूजा उरकलेली, एका हाती खांद्यावर सरंजामाचे तबक आणि दुसऱ्या हाती रिकामी परडी घेतलेली, शुभ्र वस्त्रधारी, सत्त्वदेखणी एक सुवासिनी बाहेर पडत होती! डोंगरकडांआडून फुटणाऱ्या श्रावणी पहाटेसारखी! जशी महाराजांच्या पूजेची स्फटिक शिवर्पिंडीच राधेचे निरामय स्त्रीरूप घेऊन गाभाऱ्याबाहेर येत होती! नखशिखा!! तिच्या दर्शनाबरोबरच संभाजी राजांचा हात छातीच्या माळेला भिडला. ओठांतून बोल सुटले – “जगदंब! जगदंब!”
कपाळी कुंकवाचा रेखीव टिळा, दोन्ही हातांत भरलेले हिरवे सवाष्ण चुडे, गळ्यात काळ्याशार मण्यांचा पावनसूत्राचा पोत, टीका, बोरमाळ असे सुवर्णालंकार, पायी चांदीची जोडवी आणि नाकात मोतीबंद नथ अशी ती स्त्री संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध व भरजरी टोप बघताच झटकन नजर पायगतीला टाकून, एक , एका कडेकडेने तरातर निघून गेली. पहाटवाऱ्याच्या दौडत्या, गतिमान, !
चांदणवेल डोळ्यांआड आली. “नखशिखा! नखशिखा!” एक विचित्र नौबत संभाजीराजांच्या कविमनात दुडदुडु लागली. तिच्या प्रत्येक पावलांबरोबर नजर खिळून गेलेले संभाजीराजे जगदीश्वराला पाठमोरे होत, ती गेलेल्या दिशेने सु्च होत नजरजोड बघतच राहिले. विचारांचा हलकल्लोळ माजला होता त्यांच्या कविमनात ‘नखशिखा! नखशिखा! इथं! जिवंत! रायगडावर?’ रायाजी आणि अंतोजी ताणल्या डोळ्यांनी संभाजीराजांचे कधी न पाहिलेले जरासुद्धा न कळू येणारे ते रूप गोंधळून बघतच राहिले.
संभाजीराजांनी बेतलेल्या नखशिखेतील राधेसारखे रूप लाभलेली ती स्त्री सुरनीस अण्णाजींच्या नात्यातील होती. माहेरपणासाठी रायगडी आली होती. तिच्या सोज्वळ रूपाला आणि संस्कारसंपन्न मनाला साजेल असेच तिचे नाव होते – गोदावरी!
महाराणी सोयराबाईंनी सुवासिनींना आमंत्रणे दिलेले वाड्यावरचे श्रावणी शुक्रवाराचे हळदी – कुंकू संपले. भरल्या ओटीने एक – एक बाई महाराणींच्या महालाबाहेर पडली. त्यात ब्राह्मणवाडीतील इतर स्त्रियांच्याबरोबर आलेली गोदावरीही सातमहाला समोरील सदरी जोते ओलांडून त्या सर्व स्त्रिया पाण्याचे पाट फिरविलेल्या दर्शनी चौकात आल्या. आघाडी मनोऱ्याच्या पाचव्या मजल्यावरून उन्हसावटाच्या पालटत्या खेळात रंगलेला गंगासागर तलाव निरखण्यात संभाजीराजांचे कविमन रमले होते. मनोऱ्याच्या पैस हौद्यात चक्कर टाकताना त्यांना चौकातील स्त्रियांच्या घोळक्यात असलेल्या गोदावरीचे दर्शन झाले. त्यांची नजर चौकाने क्षणभर पकडूनच ठेवली. त्यांच्या रसिक मनाचा शांत गंगासागर डहुळला. लाटाच लाटा उठल्या.
“नखशिखा! ही कोण? कुठली? गडावर कशी?” दुसऱ्याच क्षणी ते मनोऱ्याचे मळसूत्री जिने सरासर उतरू लागले. पायरी – पायरी मागे पडू लागली. मजल्यागणिक मुजरे झडू लागले. पाची मजले उतरून संभाजीराजे दर्शनी चौकात आले. तिथे कुणीच नव्हते! चारी बाजूंच्या वाडे – महालांच्या दारांवरचे पहारेकरी मात्र त्यांना बघून भाल्याचे दंड पेलून ताठ झाले. कुठूनतरी जनानी कलकलाट येत होता. समर्थांनी पाठवून दिलेल्या मारुतीच्या मूर्तीची महाराजांनी बालेकिल्ल्यातच घुमटी बांधून प्रतिष्ठापना केली होती. साऱ्या स्त्रिया त्या घुमटीत गेल्या होत्या. संभाजीराजे चौकातील पाण्याच्या पाटात फिरणाऱ्या माशांचा खेळ बघत राहिले. एक-एक स्त्री त्या घुमटीबाहेर टीबाहेर पडू लागली. गोदावरीही बाहेर आली. संभाजीराजांना तिच्याशी बोलायचे होते. काही विचारायचे होते. पण हे घडावे कसे? रिवाजी बसावे कसे?
झटकन ते घुमटीच्या रोखाने पुढे झाले. त्यांना बघून साऱ्या स्त्रिया अदबीने घुमटीच्या एका बाजूला सरकत्या झाल्या. पायरीला हातस्पर्श देऊन संभाजीराजे मारुतीच्या घुमटीची पायरी चढले नि थांबले. मोतीलगाला झोल देत त्यांनी मान वळवून गोदावरीवर नजर टाकली. साऱ्या स्त्रिया खालमानेने उभ्या होत्या.
“तुम्ही – तुम्ही कोण? इथं कशा?” संभाजीराजांनी गोदावरीला म्हणून सवाल केला. पाण्याची सर घेताना गाय खाली ठेवते, तशी तिची मान खालीच होती. कुणीतरी तिला खोपरटीच दिली. भांबावलेल्या गोदावरीने मान उठवली. संभाजीराजांच्या पाणतेजी डोळ्यांना डोळे भिडताच आपली नजर तिने त्यांच्या पायांवर टाकली.
भोसलाई, खानदानी तोल न सोडता संभाजीराजांनी पुन्हा विचारले, “तुम्ही कोण? इथं कशा?”
“जी. आम्ही सुरनिसांकडच्या, गोदावरी. इथं घरपणासाठी आलोत.” धडधडत्या उराने गोदावरीने जाब देत त्यांचा मान राखला. चांदणवेल नखांपासून शिखापर्यंत थरथरली. हसून संभाजीराजे तसेच समोरच्या घुमटीत शिरले. क्षणात दिसेनासे झाले.
शुभ्र कबुतरांचा थवाच थवा क्षणात डोळ्यांसमोरून गेला, असे गोदावरीला वाटले. स्त्रियांचा घोळका दबके कुजबुजत बालेकिल्ल्याबाहेर पडला. युवराजांनी फक्त गोदावरीचीच विचारणा कशी काय केली, याचे आश्चर्य त्या खुले करीत होत्या. त्यांच्या बोलण्यात काहीही वावगे नव्हते, तरीसुद्धा शरमून, गोदावरी मूकपणे साऱ्याजणींच्या मागून रेंगाळत चालली.
ना तिला, ना घुमटीत शेंदरी हनुमान मूर्तीचे दर्शन घेणाऱ्या संभीजाराजांना कळले की, झाला सर्व प्रकार आपल्या महालाच्या सफेलीत उभ्या राहिलेल्या महाराणी सोयराबाईंनी पाहिला असेल! आणि शांतपणे आपल्या महालात शिरताना चिमटीतला पदरकाठ पुढे खेचीत त्या स्वतःशीच म्हणाल्या असतील – “ही सुद्धा कर्तबगारी आहे तर आमच्या युवराज साहेबांजवळ!”
आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पावले टाकायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर उभ्या राजघराण्याच्या भवितव्याची नक्षी कुणालाही उकलता येणार नाही, अशी किचकट गुंतत चाललीय याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यांनी सणवार, धर्मविधी यांची निमित्ते करून अण्णाजींच्या घरी गोदावरीला आमंत्रणे धाडायला सुरुवात केली. राजवाड्यावरची महाराणींची म्हणून ती परती सारणे गोदावरीला शक्य होईना. वाड्यावर येणाऱ्या गोदावरीच्या हालचालींवर सोयराबाईंच्या दासी व खाजगीचे चाकर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवू लागले. एक जनानी मनसुबा अंगधरू लागला.
आपल्या सरळघोप, रांगड्या स्वभावाप्रमाणे संभाजी राजे गोदावरीशी प्रसंगा – प्रसंगाने बोलत होते. त्यात आतबाहेर असे काहीच नव्हते. हत्तीने चालताना कुत्र्याच्या भुंकीकडे लक्ष देऊ नये, हे जेवढे खरे असते, तेवढेच त्याने आपल्या पायांखाली मुंग्यांचे वारूळ येणार नाही याचेही ध्यान ठेवणे, जरुरीचे असते! नाहीतर चवताळलेली एखादी लाल मुंगी सोंडेचाच राजमार्ग करून कानाकडे सरकते. जीव घेणाऱ्या मर्मस्थानावर डंख देऊन जाते! पेचपाच गावी नसलेल्या संभाजीराजांच्या हे ध्यानी येत नव्हते. माणसाने उमदे असणे, हे जेवढे मोलाचे आहे; त्याहून सावध असणे हे अधिक मोलाचे आहे.
सोयराबाईच्या रूपाने राजवाड्याच्या भिंतीच आता राजघराण्याची अब्रू गिळायला बसल्या. सूड ही भावनाच भयानक आहे. स्त्रीच्या मनी ठाण झालेला सूड हा तर अति – भयानक असतो. आणि राजस्त्रीच्या मनात दबा धरून राहिलेला सूड तर निर्णायकी बिध्वंसकच असतो.
सोयराबाईच्या महालातून विषारी अफबांचा द्रव आस्ते – आस्ते पाझरू लागला. गडभर पसरू लागला. त्याच्या पाटांतून जरीपटका, भवानीचा भंडारा, शिवगंध वाहतीला लागणार होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जिजाऊंनी असंख्यांचा घाम, रक्त आणि आपले अश्रू देऊन जोपासून वाढविलेले श्रीं’च्या राज्याचे गोमटे रोपटेच जाया होणार होते!
रायगडावर काय चालले आहे, याची काहीच कल्पना नसलेले अण्णाजी, प्रांत फोंड्याहून निघून रायगडावर आले. फोंड्याचा कोट भक्कम करून दुबार बांधणीचे काम महाराजांनी त्यांना जोडून दिले होते. त्याचा तपशील अण्णाजींना महाराजांपुढे रुजू करायचा होता. अण्णाजी गडावर आले आणि त्यांना थोड्याच वेळात कळून चुकले की, चौकीपहाऱ्याचे, फडाच्या कारखान्यातले लोक आपणाला बघून एकमेकांच्या कानांशी पडतात. दबके कुजबुजतात. विचित्र नजरेने आपल्याकडे बघतात. तशातच ध्यानीमनी नसता त्यांना राणीसाहेब सोयराबाईंची वर्दी आली. मनात शंकाकुशंकांचा, न कळणाऱ्या भीतीचा कल्लोळ घेऊनच अण्णाजी सरकारस्वारींच्या महाली पेश आले.
“सुरनीस, तुमचा मुजरा घेताना आम्हास शरमिंदं वाटतं. पण आम्ही तरी काय करावं? आपल्याच दातांनी आपलीच जीभ नाही तोडता येत!” मुजरा करणाऱ्या अण्णाजींची उत्सुकता आणि गोंधळ वाढेल, एवढ्या शांतपणे सोयराबाई स्वत:कडे दोष घेत म्हणाल्या. नेहमी हातांच्या मुठीत असणारे उपरण्याचे शेव अण्णाजींच्या हातून नकळतच सुटले. “आमचा काही कसूर असेल, तर सरकारस्वारीनं आम्हास सांगावा. आम्हाला काही कळेना झालं आहे. गडावरचे लोक आमच्याकडं विचित्र नजरेनं बघताहेत.”
अण्णाजींच्यातील जातिवंत राजकारणी तेवढ्याच धीरगंभीरपणे बोलला.
“सुरनीस, तुम्ही चिऱ्यावर चिरा रचून फोंड्याचा कोट भक्कम करून आलात. पण त्यासाठी आम्ही आणि स्वारी तुम्हास काय बक्षिसी देणार? अपमान, मानहानी! तुम्ही कोट बांधलात, आमचा ढासळला आहे. पण तुम्ही घरचे आहात. हे सारं समजून घेतलं पाहिजे.” सोयराबाई सरळ काहीही न सांगता अण्णाजींना मोठेपण देत काठाकाठाने फिरल्या. “क्षमा असावी. पण काय घडलं हे अद्याप आमच्या नीट ध्यानी आलं नाही. आम्ही पायीचे सेवक आहोत. जे असेल त्याची आज्ञा व्हावी.”
“अण्णाजीपंत, आमचा होनच खोटा निघाला! जे ऐकून तुम्हाला दुःख होईल त्याहून या बाबीचीच आम्हाला अधिक शरम वाटते. तुम्ही मोठ्या मनी युवराजांना क्षमा केली पाहिजे! त्यांनी गुन्हा थोर केला आहे. तरीसुद्धा ते तुमचेच आहेत. तुमच्या घरी घरपणासाठी आलेल्या सवाष्णीवर – गोदावरीवर – त्यांची नजर गेली. सारा गड या बाबीची चर्चा करतो आहे…” क्षणभर सोयराबाई थांबल्या. त्यांनी अण्णाजींची प्रतिक्रिया हेरण्यासाठी त्यांच्यावर नजर टाकली. अण्णाजींच्या कपाळीचा गंधटिळा पेटती उदबत्ती टेकविल्यागत आक्रसून एकवट झाला होता. डोळे विस्फारले होते. उपरण्याचे शेव त्यांनी मुठीत गच्च पकडून ठेवले होते.
“सुरनीस, हे अकरीत तुमच्या कानी घालताना आम्हास कोण यातना होताहेत, हे कळलं असेल. तरीही धीर सोडू नका. याची वाच्यता तुम्हीहून न कुठं करू नका गड सोडण्याच्या गोष्टी करते, असे आमच्या कानी आलं आहे. ते चूक होईल त्यानं तिच्याबद्दलच्या गैरसमजांना वाव मिळेल. स्वारींना यातील काहीच माहीत नाही. त्यांच्यासमोर जाऊन हे बोलण्यास कुणाचीही जीभ उचलत नाही. खुद्द आम्हालाही तो धीर येत नाही!” सोयराबाई ठरवून थांबल्या.
“शहानिशा करून आम्हीच हे स्वामींच्या कानांवर घालू!” सुन्न झालेले अण्णाजी निर्धाराने म्हणाले. खाली मान घालून “येतो आम्ही”, म्हणत हटत्या पावलांनी महालाबाहेर पडू लागले.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ९९.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.