महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,103

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न

By Discover Maharashtra Views: 477 3 Min Read

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न –

मराठी माणसाच्या ह्दयात तीनशे वर्षाहून अधिक काळ भळभळणारी जखम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबकडून झालेली निर्मम हत्या ! ह्या संबंधात सगळ्यांच्या मनात नेहमी येणारा प्रश्न म्हणजे संभाजी महाराजांना संगमेश्वराहून मुकररब खान कैद करून मोगल छावणीत नेत असतांना कुणी कसे काय अडवले नाही ? शंभूराजे व कलूषाला मुकरबखानाने १ फेब्रुवारी १६८९ ला पकडल्याचे जेधे शकावली म्हणते. ह्या दोघांना बहादूरगड ( दौंड ) येथे १५ फेब्रुवारी ला औरंगजेबापुढे हजर करण्यात आले. संगमेश्वरहुन बहादूरगडपर्यंत मुकर्बखान कुठल्या वाटेने शंभूराजांना घेऊन गेला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. तरी पण अंदाज असा व्यक्त केला जातो की मुकरब खान आपली प्रचंड सेना घेऊन राजकैद्यांसह कऱ्हाड, वडूज, दहीवडी, फलटण, बारामती मार्गे बहादूरगडला औरंगजबच्या छावणीत पोचला असावा. ह्या प्रवासाला त्याला जवळपास १५ दिवस लागलेले दिसतात.

सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे समस्त मराठी जनांच्या मनात प्रश्न येतो तो हा की संगमेश्वर ते दौंड ह्या १५ दिवस चाललेल्या प्रवासात कुणीच कसे काय मुकरबरवानाला अडवून शंभूराजांच्या सुटकेचा प्रयत्न केला नाही ?
असा प्रयत्न झाल्याचे नुकतेच माझ्या वाचण्यात आले आहे . प्रख्यात इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ‘ मराठेशाहीचे अंतरंग ‘ ह्या पुस्तकात शंभुराजांना सोडविण्यासाठी झालेल्या दोन प्रयत्नांचा उहापोह केला आहे. पहिला प्रयत्न ज्योत्याजी केसरकर या पन्हाळा शिराळा परिसरातील पुनाळ गावच्या पाटलाने केल्याची लोककथा त्या भागात प्रचलित असल्याच म्हटलं आहे. पण त्यासाठी कुठलेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्याने त्यावर जास्त विश्वास ठेवता येत नाही.

दुसरा प्रयत्न शिराळा येथील अप्पा शास्त्री दीक्षित ह्या शिवकाळातील वेदशास्त्र संपन्न , ज्योतिष पारंगत तसेच बलदंड शरीरयष्टीच्या व्यक्तिने केला होता. हा अप्पा शास्त्री शिवरायांचा आश्रीत व समर्थ रामदास स्वामींचा शिष्य होता. त्याने शिराळ्यात मारूती मंदीर व तुळजाभवानीची मंदिरे तसेच एक व्यायामशाळा पण बांधली.आप्पा शास्त्री शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात साथ देणारा लढाऊ वृत्तीचा ब्राह्मण होता. त्यामुळे त्याचे शिवरायांप्रमाणेच शंभूराजांच्या चरणी निष्ठा होती. संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेबकडे नेतांना मुकरब खानाचा मुक्काम शिराळ्याला पडला होता. अप्पा शास्त्रीने हि बातमी कळल्यावर आपल्या तालमीतील पहिलवान , गांवातीत लढाऊ लोक तसेच मराठयांची शिबंदी एकत्र करून मोगली छावणीवर हल्ला केला . मोगलांच्या विशाल सैन्य बळापुढे आप्पाजीचा हा प्रयत्न फसला. तो आपल्या साथीदारांसह पकडला जाऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

हा हल्ला अप्पाजीने महाशिवरात्रीपूर्वी चार ते पांच दिवस आधी केला होता. खरे जंत्रीनुसार त्या वर्षी महाशिवरात्रीची इंग्रजी तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते त्या पूर्वी चार ते पांच दिवस आधी म्हणजे तीन ते चार फेब्रुवारी १६८९ तारीख येते.जेधे शकावलीनुसार संगमेश्वरला छापा १ फेब्रुवारी १६८९ ला पडला होता. म्हणजे संगमेश्वराहून मुकरबरवान शिराळयास तीन दिवसात पोचला असावा.
पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी अप्पा शास्त्रीच्या स्वामीभक्तिची नोंद घेऊन त्याच्या वंशजांना मौजे कणदूर या ठिकाणी जमिनी इनाम दिल्या . त्या जमिनी कुळकायदा अंमलात येईपर्यंत अप्पा शास्त्रींच्या वंशजांकडे होत्या.

संदर्भ: ( १ ) मराठेशाहीचे अंतरंग
( २ ) छत्रपती संभाजी -एक चिकित्सा
दोन्ही पुस्तकांचे लेखक डॉक्टर जयसिंगराव पवार .

-लेखक प्रकाश लोणकर

Leave a Comment