श्री छत्रपती संभाजी महाराज, करवीर –
करवीरकर छत्रपती संभाजी महाराज यांनी कोल्हापूर राज्यावर ४६ वर्षे राज्य केले. एवढा प्रदीर्घ काळ राज्य करण्याची संधी त्यापूर्वी छत्रपती घराण्यात कोणालाही मिळाली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर ६ वर्षे राज्य केले आणि राज्यविस्ताराच्या अनेक महत्वाकांक्षा मनात असतानाच त्यांचे आयुर्मान संपले. शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे सत्ता गाजवली आणि त्यानंतर त्यांना शत्रूच्या हाती पडून हौतात्म्य पत्करावे लागले. छत्रपती राजाराम महाराजांस गादीवर बसण्याची शक्यता व संधी असूनही ते शेवटपर्यंत गादीवर बसले नाहीत, त्यांची सत्ता मर्यादित प्रदेशात ११ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालत होती. ते मराठ्यांचे अनभिषिक्त छत्रपती होते. त्यांच्यानंतर ताराबाईंचे पुत्र दुसरे शिवाजी गादीवर बसले. कोल्हापूर राज्याचे ते पहिले छत्रपती होत. ते चौदा वर्षे राज्यावर होते. त्यांनंतर त्यांना आणि ताराबाईंना पन्हाळ्यावर नजरकैदेत राहावं लागलं.
छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र इ.स. १७१४ पासून १७६० पर्यंत राज्य केले. या कालखंडात प्रथम त्यांना रामचंद्रपंत अमात्यांसारख्या मुरब्बी मुत्सद्द्याचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मातोश्री राजसबाईही कारभारात लक्ष घालीत असत. त्याचबरोबर संभाजीराजांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांच्या राजकारणी आणि मुत्सद्दी धोरणाची साथही त्यांना लाभली.
संभाजीराजांच्या कारकिर्दीत करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी पुन्हा स्थापना झाल्याचा एक महत्त्वाचा उल्लेख मिळतो. कोल्हापूर शहराच्या इतिहासाच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. मुसलमानी अंमलाखाली हिंदू देवस्थानांवर संकटे येत असत. अशा प्रसंगी मूर्ती मंदिरातून हलवून गुप्त रितीने इतरत्र ठेवावी लागे. असाच प्रसंग महालक्ष्मी मंदिरावर आलेला असावा.
संभाजीराजांनी संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या वंशजांना देहू व किन्ही गावच्या सनदा दिल्या होत्या. व तसेच समर्थ रामदास स्वामींचे संप्रदायी शंकराजी गोसावी तोरगलकर यांना तोरगल येथे मठ बांधण्यासाठी आणि पाटगाव येथील मौनी महाराजांच्या मठासाठी इनामे दिली आहेत.
संभाजीराजांनी सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीवर इ.स.१७३२ साली छत्री बांधली. यासंबंधी बाजीरावाचे बंधू चिमाजीआप्पा यांना पाठविलेल्या एका पत्रात उल्लेख आढळतो.
(चित्रात दिसणारी महाराजांची पन्हाळगडावरील मंदिरातील पाषाण-मूर्ती)
संदर्भ : करवीर रियासत