महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,469

संभाजीराजांची कैद व प्रवास

By Discover Maharashtra Views: 1935 23 Min Read

संभाजीराजांची कैद व प्रवास:

संभाजीराजांचे संगमेश्वरातील वास्तव्य आणि शेख निजाम मुकर्रबखानाचे संगमेश्वरी आगमन व संभाजीराजांची कैद झाली त्याचा तपशील उपलब्ध साधनांतून सविस्तर माहिती मिळते.

मल्हार रामराव चिटणीस बखरीत, शिर्के आणि कलशाचे भांडणासंबंधी शिर्के यांचा शाहूस (भाच्यास) राज्यावर बसविण्याच्या कटाचा उल्लेख करून संभाजीराजांनी शिक्यांची केलेली वाताहत याची माहिती देतात व संभाजीराजांचे संगमेश्वरी आगमन, शेखनिजाम (इलाची बेग) यांचेकडून संभाजीराजांची कैद वगैरेची माहिती देतात. मुकर्रबखान संगमेश्वरात आला, त्यावेळी बेहोष होते. तजवीज तयारी काही एक नव्हती. सर्व लोक रायगडाकडे पळाले. येसूबाई व बाळ शाहू रायगडावर होते. लोकांनी संभाजीराजास सांगितले, ‘अद्यापि सावध राहावे. आपणांस पाठीशी बांधून पन्हाळ्यास नेतो.’ त्यांनी ते ऐकले नाही. जवळ शे-पास माणसे फक्त राहिली. दरवाज्यात आले तोच मुकर्रबखान याने पुढे होऊन महाराजांना व कबजीबाबास कैद केले व कोणी हत्यार चालविले त्यांना ठार मारले.

जेधे शकावलीत कैदेसंदर्भात सविस्तर नोंद नाही. जेधे शकावलीतील नोंद: विभव संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कल रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेक निजाम दौड करून येऊन उभयंतास जीवितच धरून नेले. वरकड लोक रायेगडास गेले.

साकी मुस्तैदखान मआसिर-ए-आलमगीरीतील नोंद: मुकर्रबखान वेगाने संभाजीराजांवर एकाएकी चालून आला. एक बाण कवी कलशाला लागला आणि थोड्या मारामारीनंतर संभाजीराजे युद्धांतून पळाले व ते कवी कलशाच्या हवेलीत लपून बसले. बातमीदारांनी चौकशी करून मुकर्रबखानाला कळविले की, ते हवेलीत लपलेले आहेत. मारामारीत जे पळून चालले होते त्यांचा मुकर्रबखानाने पाठलाग केला नाही. त्याने हवेलीला वेढा घातला. मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान हा आपल्या सर्व सहकाऱ्यांच्यासह जिन्याच्या वाटेने आत गेला. संभाजीराजांचे केस धरून त्यांना ओढीत त्याने मुकर्रबखानाच्या स्वारीच्या हत्तीच्या पायापाशी आणले, संभाजीबरोबर त्याची पंचवीस माणसे आपल्या बायका पोरांसह कैद झाली.

मुंतखब-उल-लुबाब-ए-मुहंमदशाहीत खाफीखानाच्या नुसार मुकर्रबखान आणि त्याचे सैन्य  संभाजीराजे व त्यांच्या साथीदारांवर तुटुन पडले. कवी कलश काही मराठे सरदार लढण्यासाठी चालून आले. लढाईत कवी कलशाच्या हाताला बाण लागला त्यामुळे त्याचा उजवा हात निकामी होऊन कलशस कैद केले. संभाजीराजे एका देवळात लपून बसले त्यांना पकडून ओढीत मुकर्रबखानाच्या पायापाशी आणले. संभाजीराजांनी केस काढून टाकले अंगाला राख फासली व वेश बदलला. त्यांच्या वेशभूषावरून मुकर्रबखानाने संभाजीराजांना ओळखले. मुकर्रबखानाने संभाजीराजांना हत्तीवर घेतले. काहींच्या पायात व गळ्यात बेड्या घातल्या. उरलेल्यांन घोड्यावर स्वार केले.

तारिख-ए-दिलकुशाचा करता भीमसेन सक्सेना कवी कलशाचे अनुष्ठानाचा उल्लेख करतो. कवी कलश हा पूजा व अनुष्ठान करण्यात गुंतला होता. संभाजीराजे त्याची वाट पाहत थांबले. त्यामुळे संभाजी व कवी कलश आकस्मिकपणे शाही फौजेच्या हाती सापडून कैद झाले.

फुतूहात-ए-आलमगिरीत ईश्वरदास नागर लिहतो, संभाजीराजांना बहाद्दुरखान व इखलासखान याने विशाळगड किल्ल्यातून पळून जाताना पकडले आणि या कामी कवी कलशाने संभाजीविरुद्ध फितुरी केली. तो औरंगजेबाचा हेर होता असे तो म्हणतो.

मुन्शी जेठमल लिखीत कारनामा मातबरखानाचे पत्रात (फेब्रु., १६८९) तो लिहितो, ‘परमेश्वराच्या अथांग कृपेने मुकर्रबखान संगमेश्वरला पोहोचून दुष्ट संभाजीला जिवंत पकडले आहे.’

संभाजीराजे कैद झाल्याची बातमी औरंगजेबास समजली. याबद्दल खाफीखान असे लिहितो की, बादशहा अकलूज येथेच आहे व तेथेच शेखनिज़ाम कैद्यांन घेऊन येत आहे. बादशहाने बातमी ऐकल्याबरोबर आपला मुक्काम अकलूजहून बहादुरगडाकडे हलविला. कैद्यांना त्याने बहादुरगडाकडे आणण्याविषयी शेख निजामाला आज्ञा दिली.

संभाजीराजे कवी कलश आणि इतर साथीदारांना पकडून घेऊन ३ फेब्रुवारी १६८९ रोजी शेखनिजाम मुकर्रबखान परतीच्या वाटेवर निघाला. बादशहाच्या आज्ञेप्रमाणे त्याला बहादुरगडाला जावयाचे होते. पण या प्रवासादरम्यान शेखनिजामाविरुद्ध मराठ्यांकडून काही प्रतिकार झाला का ? तर डॉ. जयसिंगराव पवार मराठेशाहीचा मागोवा यात दोन घटनांचा उल्लेख करतात

१) जोत्याजी केसरकर २) समर्थ शिष्य आप्पा शास्त्री दीक्षित. परंतु या संदर्भात ठोस लेखी पुरावा कोठेच मिळत नाही. इतर साधनांचा अभ्यास करता आप्पा शास्त्री दीक्षित यांनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी हल्ला चढवला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले या घटना सत्य आहेत असे लेखकाचे म्हणणे आहे.(?)

संभाजीच्या कैदेची आणि हत्येची हकीकत मआसिर-ए-आलमगिरी या औरंगजेब चरित्राच्या मुद्रित प्रतीत पान ३१९ ते ३२६ या पानांवर आली आहे. मूळ फारसी मजकुराचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे,

मुकर्रबखान कोल्हापूर हुन निघून जलद वेगाने संगमेश्वराला आला आणि

संभाजीवर एकाएकी चालून आला. (बसरवक्ते ऊ रसीद.) त्या हीन आणि हलकट माणसान (मतरुदे लईन) चारपांच हजार दखनी भालाइतांना घेऊन हल्ला केला. परमेश्वरी संकेत पहा (कजारा), एक बाण (जणूं काय तो देवाच्या धनुष्यांतून निघाला होता, तीरे अज शस्ते तकदीर) कवि कलशला लागला. आणि थोड्या मारामारी – नंतर (व अंदुक जदोखुर्द) युद्धांत अपेशी झालेला तो (हरबइदवार) पळाला. (संभाजी) कवि कलशच्या हवेलीरूपी बिळांत घुसला (व आं रुबाह सरीरत दर सुराखे हवेलीये कचकलस खजीदा), त्याला वाटले की आपल्याला कोणी पाहिले नाही. (दानिस्त कस ऊरा न दीद), बातमी दारांनी चौकशी करून मुकर्रबखानाला कळविलें कीं तो कुटिल मनुष्य हवेलीत लपलेला आहे. मारामारीत जे पळून चालले होते त्यांचा मुकर्रबखानाने पाठलाग केला नाहीं. त्यानें हवेलीला वेढा घातला.

मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान हा आपल्या सर्व शूर सहकाऱ्यासह जिन्याच्या वाटेनें आंत घुसला (बराहे जीना दरून दरामदा) त्यानें मुकर्रबखानाच्या स्वारीच्या हत्तीच्या पायापाशी आणले. (पाये फीले सवारीयेखान आवर्द) हलकट माणसांना पुढे आणण्याच्या देवाच्या वृत्तीमुळेच तो राज्यावर आला. त्याच दैवाने त्याला आणि त्याच्या सचिवाला (कवि कलशला) नरकाची वाट दाखविली.

संभाजीबरोबर त्याच पंचवीस माणसे आपल्या बायका-पोरींच्यासह कैद झाली (बीस्त व पंज कस अज उम्दहाश बा जनान व दुख्तरान असीर आमदंद.) ही बातमी अकलूज मुक्काम बादशहाला कळली. अकलूज हे यानंतर असदनगर या नांवानें जगांत प्रख्यात झालें. बादशहानें लष्कराचा व्यवस्थापक सरदारखान याचा मुलगा हमीदूद्दीनखान यास आज्ञा केली तुम्ही मुकर्रबखान एकत्र मिळून संभाजीला बेड्यात जखडून आणावे. तसे करून खान युक्तीने मराठ्यांच्या मूलखातून बाहेर आला आणि १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादूर गडावर आला. बादशाही कोप म्हणजे परमेश्वरी कोपाचाच प्रकार होय, बादशहाचा क्रोम प्रगट झाला. इस्लामला पाठिंबा आणि धर्माचा अभिमान (बतआस्सुचे इस्लाम व हमियते दीन) या विचारांनी प्रेरित होऊन बादशहांनी आज्ञा केली की, अपयशाच्या आणि भटकेपणाच्या तावडीत सांपडलेल्या त्या कैद्याला (संभाजी) लष्करांत आणि दरबारांत आणावे. म्हणजे ते दृश्य पाहून इस्लामियांना उत्साह येईल आणि अधर्मियांचे प्राण कंठाशी येतील.

दिवाणेआममध्ये बादशाहा बसला होता त्यावेळी त्याला दरबारांत आणण्यांत आलें. (वक्ते के अंजुमने दीवाने आम बफरें तशरीफे हजरत आरास्तगी दाश्त, बादशहाच्या उपस्थितीने दिवाणे आमचा दरबार सुशोभित झाला होता.) बादशहाने आज्ञा केली की “त्यांना कैदखान्यांत घेऊन जा.”

संभाजीची मोगलांना किती धास्ती वाटत होती आणि त्याच्या कैद होण्याने त्यांना किती आनंद झाला होता याची साकी मुस्तैदखानाच्या वर्णनावरून कल्पना येईल. साकी मुस्तैदखान म्हणतो.

“निसर्गाचा नियमच आहे की दुष्टांना आपल्या कर्माची फळे भोगाव लागतात. आपल्या दुष्कृत्यांनी ते जग जाळून टाकतात पण शेवटी तेहि परमेश्वराच्या कोपानीत जळून खाक होतात. ज्यावेळी बादशहा मोहिमांच्या निमित्तानें अकलूज येथे मुकाम करून होते, एक अत्यंत आनंददायक बातमी कानावर आली. ती बातमी ऐकण्यासाठी कित्येक दिवसांपासून लोकांचे कान आतुर झाले होते. ती आनंदाची बातमी ऐकून मुसलमानांनी शहाजणे वाजवून अक्षरशः आकाश डोक्यावर घेतलें बादशाहाला धन्यवाद देऊन त्याच्याबद्दल लोकांनी प्रार्थना केल्या. धर्मरक्षक बादशहाचे सर्व जग ऋणी झाले. त्यांच्यामुळे सर्वत्र शांतता स्थापन होणार असे सर्वांना वाटू लागले, उच्छादाचा शेवट झाला. सैतान बंधनांत सांपडला. स्पष्टच सांगतो, तो काफर, दुष्ट संभाजी, बादशहाच्या अटल भाग्यामुळे, बादशाही फौजेच्या तावडीत सांपडला.

पुढे औरंगजेबाने हुकूम दिला की,

आपल्या डेऱ्यापासून ४ (सु. ६ कि.मी.) मैलांच्या अंतरावरून म्हणजेच बहादुरगड किल्ल्यातील बादशहाच्या निवासस्थानापासून ४ लांच्या (सु. ६ कि.मी.) अंतरावरून त्यांच्या अंगावर इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालतात तसा पोशाख व विदुषकासारखी उंच टोकदार लाकडी टोप्या (तख्ताकुलाह) घालाव्यात तसेच त्यांच्याबरोबर कैद झालेल्या इतर लोकांनासुद्धा विदूषकी पोशाख घालावा. संभाजीराजांना उंटावर स्वार करून आणावे. या आज्ञेप्रमाणे संभाजीराजांना आसनरहित अशा उंटावर बसवले व दोराने घट्ट बांधले. तख्ताकुलाहला घुंगुर, खुळखुळे व भगवी निशाणे बांधली आणि कर्णे, ढोल, शिंगे या वाद्यांच्या गजरात संभाजीराजांची धिंड निघाली. धिंड पाहाण्यासाठी छावणीतील सर्व लोकांची गर्दी झाली. उंटाला मध्येच पळविले जाई. उंट भेडखळत असे, त्यावेळी उंटाच्या वाकड्या तिकड्या चालीमुळे घुंगरू आणि खुळखुळे यांचा आवाज होई. धिंड चालू असताना लोक त्यांची विटंबना करत पीडा देत. हे करताना लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. रात्री शबेबरात तर दिवसा ईदचा उत्सव केल्याचा आनंद मोगली छावणीतील लोक लुटीत होते. मुकर्रबखान यायच्या आधी संभाजीराजांच्या कैदेची बातमी छावणीभर पसरल्यावर लोकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आता तर ते आनंदाने बेहोष होऊन गेले.

साकी मुस्तैदखान ह्या दृश्यास मनोरंजक म्हणतो. तर खाफीखान विजयसूचक, नगाऱ्यांचा सूचक संदेश सुखदायक वाटला असे म्हणतो. इटालियन प्रवासी निकोलाय मनुची औरंगजेबाला “पीडक बादशाह” असे संबोधतो.

संभाजीला कैद केल्याबद्दल औरंगजेबाने ‘खान जमानफतेह जंग’ ही पदवी मुकर्रबखानला दिली, तर त्याच्या मुलग्यास इखलासखानस “खान-ए-आलम” ही पदवी आणि इतर सैनिक सरदारांस उंची पोशाख देण्यात आले.

संभाजीराजांची धिंड संपली. बादशहाने पूर्ण दरबार भरविला. अमीर उमराव आणि तमाम छावणीतील लोक हजर झाले. बादशहाची उपस्थिती दिवाणे आममध्ये झाली बादशहा आपल्या आसनावरून खाली उतरला. गालिचाच्या कोपऱ्यावर बसून(गोशाये कालीन निशस्ता) त्याने आपले डोके जमिनीवर टेकले आणि हात वर करून अल्लाहाची(परमेश्वर) कृपा झाली म्हणून परमेश्वरास धन्यवाद दिले.

मआसिरे आलमगिरीचा लेखक साकी मुस्तैदखान हा त्यावेळी उपस्थित होता. हा प्रसंग पाहून त्याने पुढील काव्यपंक्ती लिहिल्या.

कुलाह गोशा बर आसमाने बरीन,
हनूज अज तवाजो सरश बर जमीन

याचा अर्थ- ज्याच्या मुकुटाचे टोक आकाशापर्यंत पोहोचले आहे. पण त्याचे मस्तक मात्र अल्लाहच्या आराधनेत खाली जमिनीवर टेकले आहे.

संभाजीराजांना व कवी कलशाला बादशहासमोर आणण्यात आले. त्यांचे डोळे आणि जीर सोडून कोणताही अवयव मोकळा नव्हता. सर्व अवयव साखळदंडाने जखडले होते. अशा परिस्थितीत कवी कलशाने आपल्या डोळ्याचा संकेत दिला आणि ताबडतोब एक हिंदी कविता रचून म्हंटली,

यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रनरंग ।
ज्यो रवि ससि लखतही, खद्योत होत बदरंग ।
त्यो तुव तेज निहार के तखत त्यजो अवरंग ।।

अर्थ- हे राजन, तुला पाहून बादशहाला दिमाखाने आणि वैभवाने सिहासनावर बसण्याचे राहिले नाही. त्याचे भान हरपून तो तुला ताजीम देण्याकरिता सिंहासनावरून उतरून खाली आला आहे.

मराठी काव्यानुवाद,

बजरंग वांधी तो लंकानृपती तैसा शंभू यवनाने ।
शोभे शेंदूर कपीस जैसा तैसा तव रणरक्ताने ।
काजळला काजवा अहा ! शशीरवीच्या तेजाने ।
निरखुन तुमची दिव्य दीप्ति ती तख्त त्यागले औरंग्याने ।।

संभाजीराजे स्वाभिमानी होते. त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी आपली मान किंचितही लवतिली नाही. इखलासखान आणि हमीदुद्दीनखान यांनी त्यांना समजाविले, पण त्यांनी ते धुडकावून लावले. त्यांची सोय सिकंदर आदिलशहाच्या देऱ्याजवळ करण्यात आली होती. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली. बादशहाच्या काही हितचितकांनी, धर्मपंडितांनी व सल्लागारांनी त्यांना जीवदान द्यावे, त्याच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारात असलेल्या गडकोटांच्या किल्ल्या मागवून घ्याव्यात व आपले अधिकारी तेथे नेमावे असा सल्ला दिला आणि नंतर त्यांना एका किल्ल्यात आमरण कैदेत ठेवावे असाही सल्ला दिला. मल्हार रामराव चिटणीस मात्र पुढील गोष्ट लिहितात. कैदेत ठेवलियाने कोट देवतील यास्तव तसे करावे किंवा यास मारावे हेच सर्वांनी सल्ला द्यावा. ते जिवंत असता त्याचा वचक धरतील. यास विल्हे लावले म्हणजे भाऊबंद, सर्व सरदार एक होऊन किल्ले कोट बळकावून भांडतील. मोहीम प्राप्त होईल.

संभाजीराजांना आपला मृत्यू समोर दिसत होता. त्यांनी बादशहाला आणि त्यांच्या सरदारांना कारभाऱ्यांना अपमानास्पद शब्दांची आणि शिव्यांची लाखोली वाहिली. यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रहुल्लाखान यास आज्ञा दिली, ‘तुम्ही जाऊन संभाजीपाशी चौकशी करावी, तुझे खजिने, जडजवाहीर इतर संपत्ती कोठे आहे ? तसेच बादशाही सरदारांपैकी कोणकोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून ठेवीत होते? संभाजीराजांनी यावर बादशहास शिव्यांचा आणि अपशब्दांचा मारा केला. याच वेळी संभाजीराजांना धर्मांतराबाबतीत विचारण्यात आले असावे व मल्हार रामराव चिटणीस म्हणतात. बादशहाने  पाहून विचार केला की, ‘यास बाटवावा, मुसलमान करून नंतर मनसब सरदारी देऊन ठेवावा, म्हणजे मुसलमानी झाली. हा पुरुष चांगला व थोरले घरंदाज (कुळातील) आहे म्हणून विचारावयास पाठविले की, ‘तुम्ही बाटावे म्हणजे जीव वाचवून तुमची दौलत तुमचे स्वाधीन करितो. त्यावरून राजे यांणी उत्तर केले की, ‘बाटा म्हणता तरी हे गोष्ट घडावयाची नाही. ज्या अर्थी कैदेत आलो, तेव्हा वाचणे ते काय ? तुमचे विचारास येईल ते करावे, तथापि तुमची बेटी द्यावी म्हणजे बाटतो.’ ऐसे उत्तर सांगून पाठविले रहुल्लाखानाने बादशहास जसेच्या तसे शब्द सांगितले नाहीत त्याची हिम्मत झाली नाही पण संभाजीराजांचे बोलण्याचे स्वरूप कशा प्रकारचे होते हे सांगितल्यावर बादशहा क्रुद्ध झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्याने संभाजीराजे व कवी कलश यांच्या जीभा मुळासकट उपटून टाकण्याची आज्ञा दिली.(लोखंडी आकडा जिभेला टोचून तो दोराच्या साहाय्याने ओढूल्याने जीभ कंठापासून मुळासकट बाहेर येते) व त्यांच्या असभ्य बोलण्याची त्यांना शिक्षा द्यावी आणि डोळ्यात सळई फिरवून(तप्त सळई डोळ्यात घालून त्या तश्याच फिरवून बाहेर काढणे) त्यांना नवीन दृष्टी देण्यात यावी. १५ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजीराजांचे डोळे काढले व जीभ उपटली. हेच क्रूर कृत्य कवी कलशाचेही करण्यात आले.

शिक्षेचा अंमल मृत्यूंजय अमावस्या

संभाजीराजांना ठार मारण्याचा निर्णय झाला. ३ मार्च १६८९ औरंगजेब बादशहाच्या राज्य ३२ वे वर्ष होते. औरंगजेब बहादुरगडाहून या दिवशी कोरेगांव ऊर्फ फतेहाबाद या ठिकाणी आला संभाजीराजांना व कवी कलशाला तलवारीच्या योगे ठार मारण्याची त्याने आज्ञा दिली.

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः । ।

अर्थ:- आत्म्याला शस्त्राने कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही

हे भगवद्गीतेचे वचन सार्थ करत संभाजीराजे मृत्यूला सामोरे गेले. त्यांचा देह पंचमहाभूत तत्वात विलीन झाले.

फाल्गुन अमावस्या गुढीपाडव्याच्या पूर्व संधेला हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराजांची औरंगजेबाच्या आदेशानुसार निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचबरोबर कवी कलशाची सुद्धा शंभुराजांप्रमाणे हत्या करण्यात आली.

संभाजीराजांच्या हत्येच्या काही नोंदी पुढीलप्रमाणे आढळतात.

  • जेधे शकावली:-

शके १६१० विभवनाम संवत्सरे फाल्गुन वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी (तुळापूर) संभाजी राजे व कवी कलश यांस जिवे मारून सिरच्छेद केले.

  • देशपांडे दप्तर, पुणे:-

तुळापुरी तेच वर्षी मुक्काम जाहला. मग सन तिसा समानीन अलफ सवछर विभव सके १६१० सत हजार १०९८ मध्ये राजश्री संभाजीराजे दस्तगत केले तें सवछर झाले.

  • चिटणीस बखर:-

तत्काळ तुळापुरीवर शके १६१० विभव नाम संवत्सर यांत मारिलें.

  • आलमगीरनामा:-

उस बेदीन का फसादा करना और मुसलमानों के शहरों को लूटना उसके जिंदा रखने से बढ़ा हुआ था। इसलिये शरीयतवालो काजियो ओर मुफतिया के फतवा और दीनदौलत वालों की सलाह से उसको मारना वाजिब ठहरा इसलिये २१ जमादिलावल अव्वल स ३२ (चैतबादि ८/४ मार्च) को कोरागांव (फतहाबाद) मे मुक्काम होने के पिछे २९ (चैत सुदि १/१२ मार्च) को वह कवी कलश समवेत, जो सब जगह उसके साथ रहा था; की मारनेवाली तलवार से मारा गया। ‘काफर बच्चा जहन्नमी रफ्त’ (येथे याचा अर्थ, काफिर बच्चा म्हणजे शिवाजीचा मुलगा संभाजीला नरकात पाठविला.)

या घटनेवर अनेक मुस्लिम विद्वानांनी कवितेच्या ओळी रचून त्यांतून घटनेची तारीख दर्शविली. शहाजादा महंमद आज्जम याचा वकील इनायतुल्ला याने खालील ओळ रचली.

बा जन व फर्जंद संभा शुद असीर

आपल्या बायकापोरांसहित संभाजी कैद झाला. (ओळीतील अक्षरांचे ठरलेले आंकडे असतात. त्याला कालक्लेश (Chronogram) पद्धत म्हणतात. ते जोडले की घटनेचे वर्ष हिजरी अकराशे म्हणजे इ.स. १६८९ हे निघते).

साकी मुस्तैदखान याने खालील काव्य पंक्ती लिहिल्या.

अजल राह सरकर्द व उफताद पेश, कशां सूये दामे फना सैद रवीश

अर्थ- मृत्यू आला आणि समोर उभा ठाकला की सावज आपण होऊन सर्वनाशाच्या जाळ्याकडे जाऊ लागते.

औरंगजेबाचा हा अधिकृत दरबारी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब याने काझींची एक समिती नियुक्त केली आणि संभाजी महाराजांना कोणती शिक्षा करावी याबद्दलचा अभिप्राय या समितीला देण्यास सांगितलं. तो अभिप्राय मआसिर-ए-आलमगिरी या ग्रंथात नोंदलेला आहे आणि तो पुढील प्रमाणे आहे :-

फार्सी पाठ:-

व चूं इफ्नाए आन मुश्रीक-ई-बदकिश-ई जहन्नम नसीब दर बराबर-ई वबाल व नकाले की अज़ क़त्ल व इसर-ई मुस्लमानान व नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम बर इबकाए  ऊ रुझान दाश्त। व ब-फ़तवाए अज़ बाब-ई शर व मिल्ल्त व सवाबदीद-ई असहाब-ई दीन व दौलत सफ़्क-ई दम-ई आन हर्बीए कती-ओततरीघ लाज़िम आमद बाद-ई वसूल-ई-मौकीब-ई जफरंजोल बिस्त व यकम-ई जमादिलावल सना सी व दो ब-कोरागाँव मुसम्मा ब-फ़तहबाद बिस्त व नहम शहर-ई मजकूर ब-वसातत-ई तेग़-ई-काफिरकोश बा कब कलस की ता हमा जा हमराहश बुद ब-दरक-ई असफ़ल फ़रो रफ़्त
काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त

मराठी भाषांतर:-

इस्लामी शहरे लुटून (नहब व ग़ारत-ई-बिलाद-ई-इस्लाम)  व मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून (क़त्ल व इसर-ई मुस्लमानान)  जे पाप या घाणेरड्या धर्माच्या (म्हणजे हिंदू धर्माच्या) आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे अशा या काफिराने (म्हणजे संभाजी महाराज – या सर्व शिव्या मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या आहेत)  केले होते ते बघता, त्याला जिवंत  ठेवण्याच्या कारणांवर विचार विमर्श झाला. शरीयावर (इस्लामी कायदा) आधारित फतव्याप्रमाणे, राज्यातील मान्यवर व इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला (कती-ओततरीघ) नरकात धाडणेच योग्य होईल असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल- अव्वल जुलूस ३२ ला बादशाहा कोरेगावला (ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते ) आल्यावर, त्याला (म्हणजे संभाजी महाराजांना) कवी कलश याच्या समवेत, काफिरांना ठार मारणाऱ्या तलवारीच्या साह्याने  सर्वात खोल अशा नरकात धाडले.

त्याच्या मृत्यूची तारीख ‘काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त’ म्हणजे काफिराचा मुलगा नरकात गेला या कालश्लेषाच्या साहयाने लिहिली गेली.

(फार्सी पाठ आणि भाषांतर सत्येन जी वेलणकर यांच्या एफबी वॉल मधून)

बादशाहाच्या हुकुमाने कलश आणि संभाजीराज्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून संभाजीराजांचे मस्तक औरंगाबाद ते बुऱ्हाणपूरपर्यंत मिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेऊन शहराच्या द्वारावर लटकविण्यात आले.

शिक्षेसंबंधीच्या नोंदीनुसार संभाजीराजे व कवी कलश यांची हत्या केल्याची तारीख वरील नमूद केलेल्या साधनेतून मिळते. संभाजीराजांचे डोळे, तसेच कलशाचेही जीभ उपटले. ईश्वरदास नागर यांच्या म्हणण्यानुसार कुऱ्हाडीने हृदय फोडले, शरीराचे तुकडे तुकडे केले व कोल्ह्या कुत्र्यांना खाण्यास फेकून दिले इ. या गोष्टी संभवनीय आहेत. कारण, एकदम मृत्युदंड देणे म्हणजे देहाला यातना होत नाहीत. मृत्यू हा एक प्रकारचा आरामच आहे असे पवित्र कुराण सांगते.

ज्या लोकांनी आमच्या आज्ञा मानण्यास नकार दिला आहे त्यांना आम्ही खचितच आगीत झोकून देऊ. त्यांच्या शरीराचे कातडे गळून पडले तर त्या जागी दुसरे निर्माण करू, जेणेकरून प्रकोपाचा खूपच आस्वाद घ्यावा. अशा मोठे सामर्थ्य राखतो आणि आपल्या निर्णयाला अमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो. (पवित्र कुराण) (दिव्य कुरआन मराठी भाषांतर- सय्यद आलामी पृष्ठ १६७ सुरह ४, अनानिसा पारा ५, आयत ५०)

जिन लोगोने कुछ किया उनके लिए पीने को खौलता हुआ पानी मिलेगा और दुःख देनेवाली
यातना होगी। उस कुफ के बदले मे जो वे करते थे। (हिंदी कुराण पारा ११, सूरा १०, आयत ४)

औरंगजेबाने अमानुष शिक्षा देताना वरील पवित्र कुराणातील तत्त्वांचा सोईस्कर अर्थ लावून या शिक्षा केल्या नसतील का? हा सुद्धा एक प्रश्न उदभवतो.

फाल्गुन अमावस्येच्या दिवशी संभाजीराजांची क्रूर हत्या करण्यात आली.

समर्थांनी पत्रांतून दिलेला,

शिवरायांसी आठवावे। जीवित्व तृणवत मानावे। इहलोकी परलोकी उरावे। कीर्तीरूपे।।
याहूनी करावे विशेष तरीच। म्हणवावे पुरुष । याउपरी आता विशेष ।काय लिहावे।।

हा समर्थ संदेश संभाजीराजांनी सार्थ ठरवला.

शिवकथाकार विजयराव देशमुख त्यांच्या ग्रंथात लिहितात,

औरंगजेबाने शंभुराजांचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांच स्वप्ने पाहणे थांबले नाही शंभुराजांचे बाहू तोडले म्हणून मराठ्यांचे बाहुबल कमी झाले नाही शंभुराजांचे पाय तोडले म्हणून मराठ्यांची आगेकूच थांबली नाही आणि शंभुराजांचे मस्तक तोडले म्हणून हिंदवी स्वराज्याचा मुकुट काय छेदला गेला नाही. दधीच्या अस्थितून इंद्राचं वज्र तयार झालं शंभुराजांच्या अस्थीमधून अवघा महाराष्ट्र वज्रप्राय झाला. राजारामच्या साथीने धनाजीराव संताजीराव रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण पंतप्रतिनिधी परशुरामभाऊ पटवर्धन यांसारखे कित्येक हनुमंत अंगद नल नील सुग्रीव जांबुवंत यांनी औरंगजेब आणि त्याच्या मुघली सेनेला सळो की पळो, दे माय धरणी ठाय करून सोडलं.

शंभूचरित्रकार डॉ सदाशिव शिवदे लिहितात,

संभाजीराजांनी आपल्या मृत्युप्रसंगी दाखवलेले असामान्य धैर्य आणि बाणेदार वृत्ती ही मराठी माणसाची मानबिंदू ठरली आणि त्यातूनच त्यांचे दोष मराठी मन पूर्णपणे विसरून गेले. “#धर्मवीर_संभाजी” ही गौरवपूर्ण उपाधी त्यांना मराठी माणसाने अर्पण केली. कारण त्यांच्या हौतात्म्यामुळे जागृत झालेल्या महाराष्ट्राने औरंगजेबाच्या धर्मांतर आणि सत्तामोह यांच्या विकृत विजेच्या लोळाला पूर्ण विझवून टाकले.

संभाजीराजांच्या बलिदानाचे विस्मरण हे हिंदुस्थानच्या इतिहासाचे दुर्दैव होय.

हिंदवी स्वराज्य आणि महाराष्ट्रधर्मासाठी आहुती देणारे ज्वलज्ज्वलनतेजस धर्मवीर छत्रपति संभाजीराजे यांच्या पावन स्मृतीस शतशः नमन🙏

अभ्यास संदर्भ:-

१)मराठी रियासात खंड २ – गो. स. सरदेसाई
२)छत्रपति संभाजी महाराज(छोटे चरित्र)- गो. स.  सरदेसाई
३)जेधे शकावली-करीना- डॉ. अ. रा. कुलकर्णी
४)शिवचरित्र प्रदीप- भा. इ. सं. मं.
५)शिवपुत्र संभाजी- डॉ. कमल गोखले(P.hd)
६)राजा शंभुछत्रपति- विजयराव देशमुख
७)ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा- डॉ. सदाशिव शिवदे
८)छत्रपती संभाजी महाराज चरित्र- वा. सी. बेंद्रे
९)चिटणीस बखर- मल्हार रामराव चिटणीस
१०) Storia do Mogor-  Niccolao Manucci (अनु. असे होते मोगल- सेतू माधवराव पगडी)
११)मआसिर-ए-आलमगीरी- साकी मुस्तैदखान(अनु. रोहित सहस्त्रबुद्धे)
१२)मोगल मराठा संघर्ष- सेतू माधवराव पगडी
१३)मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध- सेतू माधवराव पगडी
१४)मराठे व औरंगजेब- सेतू माधवराव पगडी
१५)हिंदवी स्वराज्य व मोगल- सेतू माधवराव पगडी
१६)नियतीच्या विळख्यात औरंगजेब- सेतू माधवराव पगडी
१७)छत्रपति संभाजी स्मारक ग्रंथ- डॉ. जयसिंगराव पवार

संकलन:- सुमित नलावडे

टीप:
–लेख थोडा मोठा आहे. अवश्य वाचावे. समकालीन साधने, कागदपत्रांचा अभ्यास करून तसेच या साधनांचा लेखकांनी केलेल्या संशोधन अभ्यासाच्या माध्यमातून हा लेख मांडण्यात आला आहे.
–लेखात स्वतःच्या पदरचे काहीच नसून त्यावेळी जी साधने उपलब्ध होती त्याचा अभ्यास करून जसे आहे तसेच यात मांडले आहे.
–लेखात संदर्भ दिलेले आहेत त्यामुळे वाचकांनी निरर्थक वाद घालू नये दिलेल्या संदर्भाचा स्वतः आपणही अभ्यास करावा. तसेच काही शंका आल्यास संदर्भ देऊन आपले मत मांडावे.
–लेख वाचताना भावनांचा समतोल ढाळु शकतो, नियंत्रण असावे. हा लेख कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा नाही. तसेच एकेरी उल्लेख केला म्हणून वाद घालू नये वरती सांगितल्या प्रमाणे साधनातील उल्लेखानुसार लेख मांडला आहे.

Leave a Comment