महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,751

संभाजीराजे अन दिलेरखान | बंड की राजकारण

Views: 5530
14 Min Read

संभाजीराजे अन दिलेरखान | बंड की राजकारण

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासातील एक सोनेरी पान.

छत्रपती शिवराय अन छत्रपती शंभुराय हे या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे भाग्य ते काय. संभाजी महाराज हे अशा एका योध्याचे पुत्र होते ज्यांनी शून्यातून स्वकीय तसेच परकीयांशी लढा देत मराठी रयतेला जपणारे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांना सगळं काही सुरुवातीपासून जमवाव लागलं, म्हणजे सैन्य अन बाकीच्या तत्सम गोष्टी, तर संभाजी राजांवर जबाबदारी होती आपल्या पित्याने निर्माण केलेले हे रयतेचे राज्य राखण्याची. आणि संभाजी राजांनी ही जबाबदारी लीलया पेलली होती.

संभाजी राजेंबद्दल खूपच चुकीच लिहल गेलं. अनेक नाटक अन चित्रपटांतून त्यांच्याबद्दल चुकीच रंगवलं गेलं. लोकांनी त्यालाच इतिहास मानलं. याखेरीज काही महाभाग असेही आहेत जे इतिहासातील किंवा इतिहास घडून गेल्यानंतर लिहली गेलेली निरर्थक व आधार नसलेली साधने वाचून त्याचे दाखले आम्हाला देत त्यालाच खरा इतिहास मानून संभाजी राजांना बदनाम करत राहतात.

अनेक अशा काल्पनिक घटना, व्यक्ती अन अनेक भाकडकथा संभाजी राजांच्या जीवनपटात अशा लेखकांनी घुसवल्या.

आता ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचं निधन झालं अन रयतेचे राज्य पोरके झाले.

तत्पूर्वी

६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवरायांचा राज्यभिषेक पार पडला. आणि डिसेंबर १६७८ ला संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले.

आता ११ मार्च १६८९ रोजी तुळापुरास संभाजी राजांनी स्वराज्यासाठी अन हिंदू धर्मासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिले हे आपल्याला ठाऊक आहे.

आता आपण लॉजीकली जर विचार केला तर ११ वर्षांपूर्वी म्हणजेच १६७८ ला एक राजपुत्र आपल्या पित्याशी, स्वराज्याशी, रयतेशी गद्दारी करतो, अन नंतर ११ वर्षांनी त्याच पित्याच्या स्वाभिमानासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी, हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करतो ही गोष्ट काही मनाला पटत नाही.

१६७२ ला महाराष्ट्रात आलेला फ्रेंच प्रवासी करे लिहतो:

“युवराज वयाने लहान आहे पण तरीसुद्धा धैर्यशील अन बापासारखाच शूर आहे. युद्धकुशल पित्याच्या सोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला असून तो एखाद्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका मुरलेला आहे. तो बांध्याने मजबूत अन पीळदार शरीराचा एक रूपवान राजपुत्र आहे. याच गुणांमुळे सैनिक त्याच्याकडे आकर्षित होतात. सैनिक त्याच्यावर खूप प्रेम करतात अन शिवाजी राजांसारखा आदर देतात. सैनिकांना संभाजी राजाच्या नेतृत्वाखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”

मल्हार रामराव चिटणीस या बखरकाराने संभाजी राजांच्या मृत्यूनंतर जवळपास १२२ वर्षांनी चिटणीस बखर लिहली. त्यात त्याने संभाजी राजांविषयी अत्यंत विकृत अस लेखन केले. संभाजी राजांना बाईबाज अस दाखवुन संभाजी राजांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. संभाजी राजांवर कित्येक आरोप केले, थोरतांची कमळा, गोदावरी, मोहित्यांची मंजुळा, तुळसा अशा कित्येक महिलांसोबत संभाजी राजांचे संबंध जोडले. त्यांच्यावर अत्याचार केला अन शिवराय शिक्षा करतील म्हणून ते दिलेरखानाकडे निघून गेले असं विकृत लेखन चिटणीस बखरीत केलं गेलं.

आणि त्यानंतर अनेक चित्रपट अन नाटकांमध्ये संभाजी राजांची हीच ओळख दाखवली गेली की संभाजी राजे फितूर होते, दुराचारी होते, स्त्रीलंपट होते, अय्याशी होते.

राम गणेश गडकरीने तर कहर करत राजसंन्यास या नाटकात संभाजी राजांच्या मुखी असले घाणेरडे संवाद घातले की त्या लेखकाची कीव येते.

एवढं सगळं ऐकून वाचून कोणाचाही ग्रह होऊ शकतो की संभाजी राजे असेच असावेत.

आता मल्हार रामराव चिटणीस याने लिहलेल्या बखरीबद्दल बोलायच झालं तर ती चिटणीस बखर १८११ च्या आसपास म्हणजेच संभाजी राजांच्या निधनानंतर तब्बल १२२ वर्षांनी लिहली गेली, त्यामुळे त्यात किती खरे मानायचे हा ही एक प्रश्नच आहे.

आणखीन एक

मल्हार रामराव चिटणीस हा स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजी यांचा पणतू होता. स्वराज्याशी गद्दारी केल्यामुळे बाळाजी आवजी यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले, ह्याचाच राग मनात ठेवून मल्हार चिटणीस याने आकसापोटी अन द्वेष मनात धरून लेखन केले नसेल कशावरून.

मल्हार चिटणीस लिहतो की आपल्या बापाचा रोष टाळण्यासाठी घाबरून संभाजी राजा दिलेरखानाच्या आश्रयाला गेला.

आपला बाप छत्रपती होतो अन त्यानंतर केवळ सहा महिन्यात स्वराज्याचा युवराज हा पित्याच्या कट्टर शत्रूला जाऊन मिळतो हे खूपच वेगळे वाटते.

औरंजेबाच्या आदेशानुसार संभाजी राजांना आपल्या सोबत आणण्यासाठी एक पत्र लिहल अन त्यास जवाब म्हणून युवराजांनी एक गुप्त खलिता खानाकडे रवाना केला. तो खलिता असा:

“आपण माझ्या हिताची गोष्ट करत आहेत, अन ती तशीच घडून येईल. परंतु माझे पिताश्री ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्याकडे सोपवून निर्धास्तपणे मोहिमेवर गेले आहेत ते इथे वापस येईपर्यंत मी आपली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांनी आज्ञा मोडू शकत नाही. मी त्यांना संतुष्ट करेन अन आपण मला पाठवलेले पत्र आपल्या मैत्रीचं प्रतिक आहे आम्हास आता एक आपलाच आधार आहे.” –(परमानंद काव्य, संपादक- जी.एस.सरदेसाई, पान-७८)

वरील मजकूर जर आपण बारकाईने वाचला तर एक गोष्ट निश्चितच लक्षात येते ती म्हणजे “आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून आम्ही आ मच्या वडिलांची आज्ञा मोडू शकत नाही.” जो युवराज आपल्या बापाबद्दल अन राज्याबद्दल अस सांगतो, आज्ञा मोडणार नाही असे सांगतो तो त्या वेळी त्याच प्रिय अशा बापाविरुद्ध बंड कसे करु शकतो का? तर नक्कीच नाही.

संभाजी राजांच्या दिलेरखानाकडे जाण्याबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले गेले आहेत. काहीजण म्हणतात राज्यभिषेकानंतर भोसले घराण्यात गुरहकलह निर्माण झाला, राजाराम राजांना युवराज पद न मिळाल्याने सोयराबाई नाराज झाल्या असे तर्क लावले गेले.

अष्टप्रधान मंडळातील काही व्यक्तींचे अन संभाजी राजांचे नीटसे जमत नव्हते. त्यांनी सोयराबाई यांना फुगवले अन हा कलह वाढत गेला अन स्वराज्याची वाटणी करण्यात यावी अशी मागणी सोयराबाईंनी केली.

आता शिवरायांना राज्याचे दोन तुकडे करणे कदापी मान्य नव्हते पण नाईलाजाने त्यांना तयार केले गेले. शिवरायांनी संभाजी राजांना ही गोष्ट बोलून दाखवली अन कर्नाटक मधील राज्य देण्याचे कबूल केले. पण हे ऐकताच संभाजी राजांनी रायगडावर या गोष्टीचा कडाडून विरोध केला. वाटणी करण्यास स्पष्ट नकार दिला. “प्रसंगी आपल्या चरणांशी राहून दूधभात खाऊ पण स्वराज्याचे दोन तुकडे नको.” अशा प्रकारची विनंती त्यांनी शिवरायांकडे केली.

आता स्वराज्याचे दोन तूकडे करण्याला विरोध करणारे संभाजी महाराज सत्तेसाठी दिलेर खानासोबत जातात हे कसे सत्य मानावे. कारण राज्य तर असेही मिळतच होते.

दरम्यान शिवरयांनी दक्षिण मोहीम काढली अन त्याच वेळी राजांनी विचार केला की आपण रायगडी नसताना या मंत्र्यांच्या अन सोयराबाई यांच्या गटात संभाजी राजे एकटे सापडतील त्यामुळे त्यांनी शंभुराजांना शृंगारपुरी पाठवले. तिथुन घटना घडत गेल्या अन माहुली वरून किल्लेदाराला सांगून दिलेरखानाकडे गेले.

आता रायगडावर तर संभाजी महाराजांच्या विरोधात एक गट तयार झालेला, त्या गटाचा कल नेहमीच संभाजी महाराजांचे चारित्र्य हनन करण्यावर असायचा.

आता राजकारणात प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आज देखील पाहायला मिळतात.

या सगळ्या कटकारस्थान, कुटुंब कलह, बदनामीपासून संभाजी राजांना दूर ठेवण्यासाठी शिवरायांनी सुंठीवाचून खोकला घालवावा या हेतूने संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले असावे अशी सुद्धा शक्यता खूप वाटते.

आणि शिवराय दक्षिणेत होते, स्वराज्यातील बहुतेक सैन्य त्यांच्यासोबत मोहिमेवर होते. अन इकडे दिलेरखान दख्खनेत आला होता स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी. तेव्हा त्याला रोखून धरण्यासाठी अन स्वराज्यावर आलेले संकट टाळण्यासाठी शिवरायांनी खेळलेली ही एक चाल सुद्धा असू शकते.

एक पराक्रमी योद्धा, धर्मपंडित, सर्व शास्त्रांत निपुण असणारा लेखक, कवी, आज्ञाधारक पुत्र, प्रजाहितदक्ष राजा, एक प्रेमळ पती, सच्चा दोस्त असे गुण असणारा कर्तव्यदक्ष पुरुष दुराचारी कसा असू शकतो असा ओरशन करणे म्हणजे सूर्याला आरसा दाखवणे.

आपल्या राज्यासाठी, आपल्या धर्मासाठी प्राण देण्याची मानसिकता असलेला राजा आपल्याच पित्याविरुद्ध कटकारस्थान करू शकतो का याचे उत्तर संभाजी राजांचे ज्वलंत चरित्र्य बघताच लक्षात येते.

एवढा साधा मुद्दा लोकांच्या लक्षात कसा येत नाही हेच कळत नाही. लोकांना एवढं कळत नसावं की सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे शिंतोडे आपल्या अंगावर पणपडतील हे यांना कोण समजावून सांगणार.

आता दिलेरखानाकडे गेल्यानंतर जेवढा काळ संभाजीराजे खानाच्या गोटात होते तेवढा काळ त्यांनी दिलेरखानाला स्वराज्यावर हमला करण्यापपासून रोखले. दरम्यानच्या काळात फक्त भूपाळगड हा एकच किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. त्याबद्दल पण संभाजी राजांनी लढाईत जाण्यास नकार दिला आणि मावळे पडताना पाहून संभाजी राजांनी किल्ला देण्याचा निर्णय घेतला.

त्याबद्दल सुद्धा संभाजी राजे बाकरे नावाच्या एका ब्राह्मणाला दिलेल्या पत्रात लिहतात “जेव्हा तो दिलेर भूपाळगड घेण्याचे प्रयोजन घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी प्रखर विरोध केला अन लढाईस जाण्यास स्पष्ट नकार दिला.”

हे सगळ घडत असताना औरंगजेब संभाजी राजांना अटक करणार हा सुगावा लागताच शिवरायांनी संभाजी राजांना बहिर्जी नाईक अन आदिलशाही वजीर मसूद खानाच्या मदतीने सोडवले अन पन्हाळ्यावर आणले.

या घटनेची माहिती शिवराय त्यांच्या बंधूंना म्हणजेच व्यंकोजीराजांना देताना लिहतात: “त्यांची आमची भेट झाली. घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान करुन ये तैसे केले.” या पत्रावरुन संभाजी महाराजांचे दिलेरखानाकडे जाणे म्हणजे स्वराज्यद्रोह नव्हता उलट त्यातील “करुन ये” हा शब्दप्रयोग महाराजांच्या राजकीय डावपेचाकडे लक्ष वेधतो. “चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्यास आणावयास उपाय बहुत प्रकारे केला; त्यासही कळो आले की ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुरुप चालणार नाही. ऐसे जाणोन त्यांणी आमचे लिहिण्यावरुन स्वार होऊन आले.”

जर संभाजीराजे गद्दार असते, फुटीर असते तर महाराजांनी त्यांचे तोंड कधीच पाहिले नसते. आधीच्या गद्दारांना जी शिक्षा फर्मावली, जो न्याय दिला तोच नाय संभाजी राजांना सुद्धा दिला असता. पण त्यानंतर कोलापूरमध्ये पुन्हाळ येथे दोघा बापलेकांची ऐतिहासिक अशी भेट झाली. परत आल्यानंतर शिवरायांनी युवराज संभाजी राजांना पूर्वी युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार पुन्हा एकदा सुपूर्द केले. जर संभाजी महाराज फितुर असते तर महाराजांनी त्यांचा सन्मान केलाच नसता. उलट त्यांना जबर शासन केले असते.

दिलेरखान प्रकरणाची तर्काधिष्ठित व उपलब्ध माहितीनुसार छानणी केली असता असे दिसते की हा एक पितापुत्रात प्रदिर्घकाळ शिजलेला कट होता. याला एक प्रकारचा गनीमी कावाच म्हणता येईल. या कटाच्या सिद्धतेसाठी गर होती ती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांत बेबनाव झाल्याची हूल उठवण्याची. राज्याभिषेकाने हुलीला कारण दिले. सोयराबाईंच्या महत्वाकांक्षी स्वभावाची जोड घेण्यात आली. परंतू बेबनावाच्या वावड्या उठवल्या गेल्या. या कटात मंत्री व बाकी लोकांच्या कानावर पडल्या त्या फक्त वावड्या. पण त्या वावड्यांपासून नंतर संभाजी महाराजांची मुक्तता झाली नाही. त्यात लवकरच शिवाजी महाराजही गेल्यामुळे त्या वावड्या सत्य आहेत अशी कल्पना बखरकारांची होणे स्वाभाविक होते.

संभाजी राजांना शृंगारपुरला पाठवणे हा त्या कटाचाच भाग होता. बेबनावाची कहाणी खरी त्यामुळेच वाटली. असे असले तरी संभाजी महाराजांचे कोणतेही अधिकार कमी झालेले नव्हते. दिलेरखान व पातशहाला संभाजी एक सावज वाटला असणार कारण दिलेरखानाशी संवाद साधायला सुरुवात संभाजी महाराजांनीच केली असावी. पण त्यांनीही उतावळेपणा कोठे दाखवला नाही. संभाजी महाराज हे जर खरेच नाराज राजपूत्र असते, बंडखोर असते तर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीतच पलायन केले असते. पण तसे झालेले नाही. शिवाजी महाराज कर्नाटकाहून परत आल्यानंतर ताजी राजकीय स्थिती पाहुन व भावी योजनेला यशाकडे नेता येईल अशी व्यवस्था करून मग संभाजी महाराजांना अत्यंत सोयीच्या सज्जनगडावर जायचा आदेश झाला. तेथून दिलेरखानाची छावणी जवळ होती. संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळनार अशा वावड्या उठत ही असतांनाही शिवाजी महाराजांनी कोणतीही प्रतिबंधक व्यवस्था केली नाही. कारण दिलेरखानाला जाऊन मिळणे हाच तर उद्देश्य होता. उलट तो पुर्ण होईल असे वातावरण व संधी निर्माण करायला शिवाजी महाराजांने संधी दिली असेच एकंदरीत दिसते.

आपल्या बापाविरुद्ध जाऊन स्वराज्याच्या मुख्य शत्रूकडे जाणारा युवराज परत आल्यानंतर त्याच शत्रूविरुद्ध तब्बल ९ वर्ष निकराने कसा झुंजू शकतो. त्या शत्रूला कसे सळो की पळो करून सोडतो. त्याच स्वराज्यासाठी आपले प्राण कसे त्यागू शकतो, ही सुद्धा विचार करण्यायोग्य गोष्ट आहे. हे आजकालच्या ज्या लोकांना समजत नाही किंवा त्यांना समजावून घायच नाही त्यांना कोणीही समजावून सांगू शकत नाही.

अनेक अग्निदिव्यातून बाहेर आलेल्या या राजाची आज प्रतिमा केवळ भव्य आहे, उदात्त आहे, उत्तुंग आहे, दिव्य आहे, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, पराक्रमी आहे, चारित्र्यशील आहे, स्वराज्यनिष्ठ आहे, कर्तबगार आहे.

कस आहे ना, कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सूर्य उगवायचा राहत नाही अन सत्य कधीही लपवता येत नाही हे सुद्धा एक त्रिकालाबाधित सत्य आहे.

दिलेरखानाला जाऊन मिळणे ही संभाजी राजांची “घोडचूक” नव्हती. तर ती शिवरायांची एक योजनाबद्ध चाल होती. हा महत्वाकांक्षी कट जरी फसला असला तरी पण म्हणून या राजकीय कटाचे महत्व कमी होत नाही. किंबहुना या कटामुळेच संभाजी महाराजांवर फितुरीचाही कलंक लागला. पण त्याची नीटशी चिकित्सा इतिहासकारांनी केली नाही.
यामुळे संभाजीराजे हे दिलेरखानाकडे स्वराज्याच्या विरोधात जाऊन गेले यात काहीच तथ्य नाही. संभाजीराजे मरेपर्यंत स्वराज्याशी, रयतेशी, आपल्या पित्याशी, या मातीशी एकनिष्ठच राहिले.

संदर्भ

१.”युवराज संभाजी राजे:एक चिकित्सा” -जयसिंगराव पवार

२.संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र- ले. प्रशांत धुमाळ

३.परमानंद काव्य संपादन-जी. सरदेसा

४ छत्रपती संभाजी महाराज-वा. सी. बेंद्रे

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment