महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,13,449

मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमरातील हटकर वीरांच्या समिधा

Views: 1604
3 Min Read

मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमरातील हटकर वीरांच्या समिधा –

मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णकाळ कोणता असेल तर तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्युनंतर छत्रपती राजाराममहाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वात मराठा वीरानी केलेला पराक्रम होय. याच कालखंडात नेमाजी शिंदे सारखा धुरंधर सेनानी नर्मदा पार करून सिरोंच पर्यंत धडका मारून मोगली विळख्यातील उज्जैनच्या धूळु महांकाळ मुक्त करण्याचे स्वप्न पाहात होता. तर दक्षिणेत पदाजी बंडगर यांनी आपला अंमल कावेरी नदी पर्यंत बसवला होता.मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमरातील हटकर वीरांच्या समिधा.

या धामधुमीच्या काळात असंख्य परिचित-अपरिचित नररत्नानी आपला देह या स्वातंत्र्यसमरा करिता दिला होता. असाच एक अपरिचित नररत्न म्हणजे रिसनगावचे नाईक नागोजी हटकर सूरनर होय.

या भागातील हटकर मंडळीच्या संबंधीत मोगल बातमीपत्रात 16 डिसेंबरची 1693 एक नोंद आली आहे ती अशी , “पाथरी भागात हटकर बंडखोर पसरले आहेत. मोगल सैन्य त्यांच्या वर चालून गेले व त्यांचा पराभव केला.” अर्थात ही मंडळी पहिल्या पासूनच बंडखोर व स्वतंत्रवृत्तीची होती यात शंका नाही.

नागोजी नाईक यांच्या बद्दल ची अस्सल नोंद मिळते ती मोगल दरबारच्या बातमी पत्रात ,

दिनांक  13 जानेवारी 1701 रोजी बिदर परगण्याचा सुभेदार खुदाबंदा खान याने नांदेड सुभ्यातील बंडखोर नागोजी हटकर याचे मुंडके कापून व त्या बरोबर ढाल व अकरा अश्रफ्या पाठवल्या.”  देव देश व धर्म रक्षिण्या करिता नागोजी नाईक वीरमरण पावले. परंतु आज आपला इतिहास त्यांच्या कडे अनोळखी नजरेने पहात आहे हेच दुर्दैव.

बिदर परगण्यातील नांदेड सुभ्यात माळेगाव यात्रा नावाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. याच ठिकाणी नागोजी नाईक यांची मोगल सैन्य म्हणजेच खूदाबंदा खान सोबत मोठी झटपट झाली होती. या नागोजी नाईक यांची पुर्वपिठिका अद्याप अज्ञात आहे. यांच्या बद्दल अतिशय त्रोटक माहिती मराठ्यांच्या इतिहासात उपलब्ध आहे. परंतु लोकगीते पोवाडा यांच्या मधून  काही माहिती उपलब्ध होते ती अशी ,

खंदारच्या किल्ल्यावरी तोफ भरली खुर्दान
छाती दिली मर्दानं नागोजी नायकान ,
खंदारच्या किल्ल्यावर काय नवल आयका
राधाबाई गोदाबाई सती निघाल्या बायका नागोजी नायकाच्या,
खंदाराच्या किल्ल्यावरी सांडलाया दहिभात
नागोजी नायकाचा कसा केला अपघात.

अशी काही लोकगीते ओव्या आजही तेथील लोकांच्या मध्ये ऐकायला मिळते.

नागोजी नाईक यांच्याबाबतचे काही गैरसमज –

आजही माळेगाव यात्रेतील देवाच्या पालखी स्वारीचा मान रिसगावच्या सुरनर नाईक घराण्यात आहे. परंतु काळओघात या घटनेचा विसर पडून आता ही घटना निजाम राजवटी मधील सांगितली जाते परंतु तसे नसून सत्य परिस्थिती वेगळी आहे. निजाम राजवटी च्या अगोदरच नागोजी नाईक यांची हत्या झाल्याचे मोगल बातमीपत्र सांगते.

रिसनगाव मध्ये नाईक मंडळीची मोठी गढी आजही दिमाखात उभी आहे. आज त्यांचे वंशज त्या गढी मध्ये वास्त्यव्यास आहेत.

संदर्भ –
1)मोगल दरबारची बातमी पत्रे
2)दैत्य बळी आणि कुंतल देश   नीरज साळुंके पृ 93

धन्यवाद –
मधुकर हाक्के.
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ.

Leave a Comment