सांग सह्याद्री तु पाहिले का? | मयुर खोपेकर
जुलमी राजकर्त्यांना रयतेवर अत्याचार करताना
स्वराज्यातील सुना लेकींना गुलाम म्हणुन विकताना
धर्मांतराच्या आदेशावर लोकांच्या कत्तली करताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
संताच्या अभंगात विष कालवताना
वारकऱ्यांच्या दिंड्या पताका खेचताना
देवळातल्या देवांना बाहेर फेकुन देताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
रयतेला आपल्याच मुलुखी भयभीत होताना
स्वतःच्या शेतातील धान्य कर म्हणुन देताना
अल्प किंमतीत गुलाम म्हणून राबत असताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
सर्वत्र पादशाहीची हुकूमत असताना
महाराष्ट्राला म्लेंच्छांचे ग्रहण लागताना
कुठेही आशेची किरणे नसताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
माहुलीला सैन्याचा वेढा पडला असताना
आऊसाहेब वेढ्यात अडकले असताना
त्या रणसंग्रामात गरोदर जिजाऊंचे हाल होताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
तह करून शहाजीराजांनी वेढा फोडताना
वेढ्यातून निसटून जिजाऊंचे शिवनेरी जाताना
जिजाऊंना प्रसूतीच्या वेदना होत असताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
शिवनेरीच्या किल्ल्यात लगबग होताना
वैद्यबुवा, पंडितबुवा घाईघाईत येताना
नवजात बालकाला किल्ल्यात रडताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
बाळाचे नामकरण होत असताना
शिवनेरीवर बाळक्रीडा करताना
तलवारी शस्त्रांसोबत खेळताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
आऊसाहेबांसोबत जुन्नर गाव फिरताना
गावातील लोकांना एकत्र आणताना
शेतात सोन्याचे नांगर फिरवताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
मावळी मुलुखात सवंगड्यांसोबत फिरताना
निवडक पोरांना एकत्र जमवताना
रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
प्रचंडगडचे ताबा घेताना
स्वराज्याचे तोरण बांधताना
रयतेला भयमुक्त करताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
स्वराज्याच्या राजधानीचे स्वप्न साकारताना
तोरण्यावर सापडलेल्या धनाने गड बांधताना
बिरमदेवाच्या डोंगरी राजधानीची मुहूर्तमेढ रचताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
राज्याच्या सीमेचा विस्तार होताना
एकेक गड स्वराज्यात येताना
नवनवीन नाती स्वराज्याशी जोडताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
महाराजांना खानाच्या भेटीला जाताना
आऊसाहेबांच्या मनाची हुरहूर होताना
खानाचा कोथळा बाहेर काढताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
पन्हाळी वेढ्यात अडकले असताना
स्वराज्याची पिळवणूक होत असताना
निष्ठावंतांची साथ मिळत असताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
शिवा काशिदांना मृत्यूच्या विळख्यात अडकताना
तोफेच्या इशाऱ्यावर कान लावत असताना
बाजीप्रभूंना हसत हसत खिंड लढवताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
शास्ताला पुण्यात धुमाकूळ घालताना
महाराजांचा लाल महाल ताब्यात घेताना
पुण्यातील खेडी उध्वस्त करताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
राजगडावर सरदारांसोबत मसलत करताना
लाल महालात नियोजनेप्रमाणे थेट घुसताना
शास्ताखानावर तलवारीने वार करताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
पुरंदराला जयसिंगासोबत तह करताना
किल्ले देताना राजांच्या मनाला दु:ख होताना
शंभुबाळाला औरंगजेबकडे ओलिस ठेवताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
औरंगजेबाच्या भेटीसाठी आलेले पत्र वाचताना
आग्र्याच्या भेटीला जाण्याचा निर्णय ऐकताना
स्वराज्याचा काळजाचा ठोका चुकताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
गोसाव्याच्या वेशात राजगडी सुखरूप येताना
जिजाऊंच्या महाली भेटीस जाताना
आऊसाहेबांच्या अश्रूंचा बांध फुटताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
हिंदुपदपादशाहीचा राजा होताना
सुवर्णसिंहासनावर विराजमान होताना
आऊसाहेबांचे स्वप्न पुर्ण होताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
आजाराने राजांच शरीर क्षीण होताना
वैद्यबुवांची वाड्यात ये जा चालू असताना
सर्वांच्या पदरी निराशा पडली असताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
राजांना कायमची चिरनिद्रा घेताना
डोंगर कड्यातून शांतता पसरताना
रायगडी दुःखाचे ओझे वाहताना
सांग सह्याद्री तु पाहिले का?
सांग सह्याद्री तु पाहिले का?
सांग सह्याद्री तु पाहिले का?…..
माहिती साभार – मयुर खोपेकर