श्री संगमेश्वर महादेव मंदिर, पुणे शहर –
आर.टी.ओ. वरून सी.ओ.ई.पी. कडे जाताना संगम पुलाच्या सुरुवातीला संगम घाट आहे. या संगम घाटावर मुठा नदीच्या काठावर श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे.
हा संगम घाट दशक्रिया विधीसाठी प्रसिद्ध आहे. घाटावर लाल आणि पांढऱ्या रंगात रंगवलेले हे देऊळ उठून दिसते. सदर मंदिर हे उत्तराभिमुख असून एका उंच चौथऱ्यावर बांधलेलं आहे. दगडात बांधलेल्या १०/१५ पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराच्या प्रांगणात जाता येते. प्रांगणात एक छोटासा नंदी आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला शेंदुरचर्चित हनुमान आणि गणपती यांच्या छोट्या मुर्त्या कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यात शंकरांच्या २ पिंडी आहेत.
याच संगम घाटावर राज राजेंद्र लाडोजीराव नरसिंगराव शितोळे यांची दुर्लक्षित समाधी छत्री आहे. ते महादजी शिंदे यांचे जावई होते. यांचे वंशज कसबा पेठेतील सरदार शितोळे वाड्यात राहतात.
या महादेव मंदिरासमोरच एक मारुतीचे मंदिर आहे. ते जाकवंत भगवान मंदिर या नावाने ओळखले जाते. मंदिर जरी अलीकडच्या काळात बांधलेले असले तरी ५ ते ६ फुट उंचीची हि मूर्ती, ३००-३५० वर्षापूर्वीची आहे. इ.स. १९६१ ला आलेल्या पानशेतच्या पुरात श्री संगमेश्वर महादेव मंदिराचे अतोनात नुकसान झाले. तसेच हि मारुतीची मूर्ती सुद्धा वाहून गेली. पण ह्या मूर्तीचे वजन सुमारे १ ते १.५ टन असल्यामुळे हि मूर्ती फार लांब वाहून न जाता तिथेच गाळात रुतून बसली. इ.स. २०१५ मध्ये नदी विकास प्रकल्पाची कामे सुरु असताना हि मूर्ती सापडली. मूर्तीची साफसफाई करून मूर्तीला वज्रलेप करण्यात आला आणि सदर मंदिर बांधून तिथे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
संदर्भ: मुटेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर
पत्ता : https://goo.gl/maps/19aD4yTyPAUyjgwJ8
आठवणी इतिहासाच्या