महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,649

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे

By Discover Maharashtra Views: 3817 5 Min Read

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे…

नगरदेवळे गावाच्या वायव्येस तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर ! तीन नद्यांच्या पवित्र संगमावर एका उंच टेकडीवर या मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने त्याला संगमेश्वर महादेव म्हणतात.
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे मंदिराचे नंदीगृह, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग पडतात. तीनचार वर्षांपासून या मंदिराचे जीर्णोद्धार कार्य भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरू केले आहे. नंदीगृहाचे पुनर्निर्माण नव्याने केले आहे. त्यात प्राचीन नंदीची मूर्ती आहे . त्याची उंची तीन फूट लांबी चार फुटांपर्यंत आहे. गळ्यात घंट्यांची सुंदर साखळी माळ आहे . नंदिसमोर भद्र कलशधारी अलगद कोरलेला असून तो नंदिसमोर बसलेला आहे त्याचे तोंडमात्र शिवाकडे आहे अशा प्रकारचं नंदीशिल्प पाटणादेवी परिसरात पण आहे. येथे नंदीची शिंगे व कानांची मात्र झीज झाली आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला एक वराह नंदी आहे .याचा आकार वराहासारखा असतो . त्यांना यज्ञवराह असेही म्हणतात. मूर्तीशास्त्रानुसार त्याला भूवराह असेही म्हणतात .

आता आपण सभागृहात प्रवेश करतो . डाव्या हाताला भिंतीला उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते . मूर्तीची सोंड नंतर दुरुस्त केलेली असली तरी हात व पायांची ठेवण प्रमाणबद्ध आहे . प्रत्येक पायात दोन असे चारही पैंजणांचे कोरीव काम सुबक आहे .कंबरेचा नंदीपाश , यज्ञोपवीत , मूषक हातातील परशु , अंकुश, मोदक ठळकपणे दिसतात.वरदहस्त मात्र भग्न झाला आहे .

सभागृहात उजव्या हाताला देवडीत तीन मुर्ती आहेत. पैकी एक डाव्या सोंडेची गणेशाची आहे . उजवा व डावा असे दोन गणेश असा दुर्मिळ योग्य येथे पहावयास मिळतो . ( पद्मालय सोडल्यास )
गणपतीच्या बाजूला चंडिकेची अर्धमूर्ती पहावयास मिळते . ही सप्तमातृकांमधील एक देवी म्हणून ओळखली जाते .ही देवी चालुक्यवंशाची कुलदेवता आहे त्यामुळे हे मंदिर चालुक्य कालीन असावे का ? असाही प्रश्न निर्माण होतो .
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पोट खपाटलेले असून पोटावर विंचू कोरलेला आहे . तो भुकेचे प्रतीक आहे . तिला सहा हात असून ती शस्त्रधारी आहे .उजव्या हातात बालक मूर्ती कोरलेली दिसते . कंबरेला मेखला घंटाकर आहे .
चंडिकेच्या बाजूला पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे .या मूर्त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांचे सौंदर्य दिसत नाही . त्याच्याच बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे .

सभा मंडपाला प्रत्येक कोपऱ्यात तीन असे बारा खांब आहेत . खांबावरील कोरीव काम वाखाणण्याजोगे आहे . सभा मंडपाचे काम गोलाकार असून हवा व उजेड येण्यासाठी मोकळे ठेवले असावे .
आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो .गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असून अप्रतिम सुबक कोरीवकाम त्यावर आढळून येते . उंबरठ्याच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहे .विशेषतः शिवमंदिराच्या पायऱ्यांवर व इतर मुर्तींच्या मागे किंवा डोक्यावर किर्तीमुख कोरलेले असते . या ठिकाणी दोन शिंगे असलेली बटबटीत डोळ्यांची दोन किर्तीमुखे आहेत .त्यांचा चेहरा सिंहाचा आहे .

पद्मपुराणाच्या एका दंतकथेनुसार या किर्तीमुखाचा संबंध शिवाशी येतो . राहू आणि शिव यांच्या वादात शंकराच्या क्रोधाग्नीतून किर्तीमुख हा भयंकर प्राणी जन्माला आला . परंतु राहूने क्षमायाचना केल्यावर शंकराने किर्तीमुखास थांबविले .पण किर्तीमुखास भयंकर भूख लागली . तो मांसाची याचना करू लागला .तेव्हा शंकराच्या आदेशाने तो स्वतःचेच मांस खायला लागला . शेवटी त्याचे मुखच शिल्लक राहिले . या आज्ञाधारक पणाबद्दल शंकर त्याची प्रशंसा करतात व त्याला थांबवतात .तेव्हापासून किर्तीमुख हा शिवाच्या पायाशीच असतो .

किर्तीमुखाच्या डाव्या व उजव्या बाजूला शिल्पमालेत असंख्य देवी देवतांच्या शिल्पाकृती आहेत . तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस अनेक देवतांच्या मूर्ती आहेत . त्यांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल . मध्यभागी गणेशाची आकृती असून त्यामागे गणसेना असावी .

सभामंडप व गर्भगृहाचे खांब तसेच भव्य तुळया पाहिल्यावर थक्क व्हायला होते .साधारणतः 11 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम पाहता कुठलेही तंत्रज्ञान विकसित नव्हते असे म्हणणे धाडसाचेच होईल .आपल्या पूर्वजांच्या तंत्रशुद्ध ज्ञानाबद्दल आपण विस्मित होतो .
मंदिराचा बाह्यभाग अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. मंदिर बांधकाम करतांना कुठेही चुन्याचा वापर करण्यात आला नाही . दगडी तुळया व खांब एकमेकांत साखळी पध्दतीने गुंफलेले आहेत . मंदिराची लांबी 50 फुटांपेक्षा अधिक आहे . चारही बाजूंनी मंदिर पाहतांना त्याची भव्यता जाणवते . एका नजरेत मंदिर पाहता येत नाही .

मंदिर परिसरात अनेक दुर्मिळ शिल्पे आढळतात .पैकी शिवपार्वती शिल्प अप्रतिम आहे . शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे .तिच्या डोक्यावर नागाने फणा उभारला आहे . शिव हे नंदीवर पद्मासनात बसलेले आहेत . मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती आहे .शिवपार्वतीच्या मागे दोन दंडधारी उभे आहेत . ते वीरभद्र व कार्तिकेय असावेत असे वाटते .
शंकराची अजून एक मूर्ती नंदीवर विराजमान आहे. स्थानिक लोकांनी शेंदूर चढविल्यामुळे मूर्तींचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. उघडयावर असल्याने या मूर्तींची झीज झाली आहे . पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारसोबत या शिल्पकृतींचे पण संवर्धन करावे ही अपेक्षा !!!

संजीव बावसकर, नगरदेवळे

Leave a Comment