संगमेश्वर मंदिर, पारनेर, अहमदनगर –
पारनेर हे गाव अहमदनगर जिल्हयातील एक ऐतिहासिक शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. पारनेर तालुका तसा प्रसिद्ध आहे तो राळेगणसिद्धी व हिवरेबाजार सारख्या प्रगत गावांमुळे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी. पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वसिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचेता श्री वेद व्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषि. पारनेर शहरामध्ये महादेवाची बारा ज्योर्तिलिंग आहेत त्यामुळे पारनेर शहराला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरमध्ये राम मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर अशी काही प्राचीन मंदीरेही आहेत.(संगमेश्वर मंदिर पारनेर)
पारनेर शहरा पासून १.५ किमी अंतरावर लहान प्रवाहाच्या दोन्ही बाजूस शंकराचे दोन मंदिरआहेत. स्थानिक लोक ते संगमेश्वरआणि त्र्यंबकेश्वराचे मंदिर म्हणून ओळखतात. यातील संगमेश्वरमंदिर बाराव्या शतकातील असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. यातील संगमेश्वरमंदिर बाराव्या शतकातील असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर व दक्षिण दिशेला देखील प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या समोर काही अंतरावर जमिनीच्या पातळीच्या सहा फूट खाली नंदी विराजमान असून ही दुर्मिळ बाब आहे. संपूर्ण मंदिर रचनेत केवळ सभामंडप व गर्भगृहाच्या द्वारशाखेवर शिल्पांकन आपल्याला दिसून येते. प्राचीन मंदिर स्थापत्य परंपरेतील बहुतेक शेवटच्या टप्प्यातील हे मंदिर असावे. याचाच अर्थ मंदिर स्थापत्यात आता शिल्पांकन कमी होत चालले होते. मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून अजूनही या ठिकाणी उत्खनन चालू आहे.
Rohan Gadekar