संत गाडगेबाबा धर्मशाळा, पुणे –
नावात काय आहे?असं शेक्सपिअर म्हणाला,असं म्हणतात. बहुधा ते खरं असाव. नाहीतर “धर्मशाळा” हे नाव वाचुन कोण तिकडे फिरकेल?संत गाडगेबाबा धर्मशाळा.
काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त सोमवार पेठेतील केईम-शाहू उद्यान/तलाव-नरपतगिर चौक या रस्त्यावरून जाण्याचा योग आला.जाताना शाहू उद्यान-जलतरण तलावा शेजारी “संत गाडगेबाबाबा धर्मशाळा”असा बोर्ड दिसला आणि आतल्या बाजुस गद॔ झाडातून एका मंदिराचा पांढर्रा शुभ्र कळस बाहेर आलेला दिसला.नेहमीप्रमाणेच कुतूहल जागं झालं. पहायला हवं,अस म्हणत प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकलं आणि…..गद॔ झाडं…स्वच्छ परीसर….सगळीकडे पांढर्या रंगातील वास्तू यामुळे “स्वछता हाच परमेश्वर “असा संदेश देणार्या गाडगेबाबांच्या नावाने उभारलेला हा परीसर,त्यांच्या संदेशाचा तंतोतंत पालन करताना लक्षात येतो.
प्रवेश दारातून आत गेलं की नजरेत भरते ,साठ-सत्तर वर्षांपूर्वींची डेक्कन जिमखान्या वरील आठवण येईल अशी दुमजली वास्तु.पांढरा व चाॅकलेटी रंगातील,उतरते कौलारू छप्पर ,प्रशस्त व स्वच्छ व्हरांडा असलेल्या या वास्तूत कार्यालय असुन आत संत गाडगेबाबांच्या अध॔ पुतळ्यासमोर आपण नतमस्तक होतो.अतिशय स्वच्छ वातावरण,निटनिटके पणा यामुळेच आपले पाय रेंगाळतात. बाजुच्या कपाटात विविध विषयांची असंख्य पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवली आहेत. अतिशय अल्प दरात लायब्ररी म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.
बाहेरच्या बाजुस दोन ध्यान कुटी आहेत.पुर्वी गोसावी लोक इथे ध्यान लावून बसत असत.(हा सगळाच भाग पुर्वी गोसावीपुरा म्हणून ओळखला जात असल्यामुळे येथे त्यांची वस्ती असावी) शेजारी साधं,कुठलाही भपका नसलेल,पत्र्याच उतरत छप्पर असलेलं भगवान दत्तात्रयांच मंदिर आहे.समोर शंकराची पिंड आहे,रेखीव नंदी आहे.
स्वच्छता, टापटीप,नीटनेटकेपणा,मन शांत करणारा परीसर म्हणजे काय याचा अनुभव घ्यावयाचा असेल तर एकवेळ नक्की भेट देऊन बघाव असा हा परीसर.
जाता जाता-येथुन बाहेर पडल्यावर समोरच दबडगे यांच खाजगी गणेश मंदिर ही बघाव.दगडी बांधकाम,कमान,शेंदरी रंगातील बाप्पाच दश॔न घ्याव.
धर्मशाळा म्हणून दुल॔क्षित अशा पुण्यातील एक अपिरिचीत स्थानाची आठवण मनात साठवावी आणि म्हणाव….
“गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा”!
प्रमोद कानडे