संत कवियत्री आदिमाया मुक्ताबाई.
अश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्राचा पहिला दिवस. घरोघरी घटस्थापना होऊन त्यांचे पूजन केले जाते. याच दिवशी जन्म झालेल्या स्त्रीसंत मुक्ताबाईंची आपण माहिती करून घेणार आहोत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना निवृतीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार मुले झाली. संन्यास सोडून पुन्हा कुटुंबात आल्यामुळे आळंदीकरांनी त्यांना वाळीत टाकले होते. गावाबाहेरच्या झोपडीमध्ये अत्यंत गरिबीत हालअपेष्टा या कुटुंबाने सहन केल्या. या चौघा भावंडातील सर्वात धाकटी मुक्ताबाई. हिचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदा १२७९ मध्ये आळंदीला झाला.
लहान वयात आईवडिलांनी मोठे उत्तम संस्कार केले, पण ब्रह्मवृंदानी दिलेल्या शिक्षेमुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई जग सोडून गेले. इतक्या लहान वयात आईवडिलांची माया अंतरली. शुद्धिपत्र मागण्यासाठी चारी भावंड चालत पैठणला गेले. रेड्यामुखी वेद बोलले. या चारी ज्ञानी लहान भावंडाच्याकडे पाहिल्यावर पैठणचे विद्वानही त्यांना शरण गेले. ज्ञानदेवांचे गुरु त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथच होते. पण वेळप्रसंगी मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या ज्ञानदेवांना उपदेश केला. गावातल्या लोकांनी छळल्यामुळेरागाने झोपडीचे दार बंद करून ज्ञानदेव बसले, त्यावेळी मुक्ताबाईंनीच त्यांना उपदेश केला. मुक्ताबाई म्हणाल्या –
संत जेणे व्हावे ! जग बोलणे सहावे !
तरीच अंगी थोरपण ! जया नाही अभिमान !!
थोरपण जेथे वसे ! तेथे भूतदया असे !!
रागे भरावे कवणापाशी ! आपण ब्रह्म सर्वदेशी !!
ऐसी समदृष्टी करा ! ताटी उघडा ज्ञानेश्वरा !!
जगावरचा राग सोडून द्या. तुमच्या हातून अजून मोठे काम व्हायचे आहे. असे सांगत मुक्ताबाई म्हणतात-
योगी पावन मनाचा ! साही अपराध जनांचा !
मुक्ताबाईंचे हे अभंग ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, यांच्याप्रमाणे मुक्ताबाईंनीही अनेक अभंग लिहिले. मराठीभाषेतल्या त्या सर्वात सुरुवातीच्या काळातल्या कवयित्री आहेत.
मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांइतके अभंग लिहिले नाही. तरीपण थोडक्या शब्दात त्यांनी खूप उपदेश केला आहे. शेकडो वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला यायला निघाले तेव्हा पत्र म्हणून कोराच कागद पाठवला, ते कोरे पत्र पाहून मुक्ताबाई हसली आणि म्हणाली – इतके वर्ष तपश्चर्या करून चांगदेव कोरा तो कोराच. मग ज्ञानदेवांनीत्याच कोऱ्या कागदावर पासष्ट ओव्या लिहून पाठवल्या तीच प्रसिद्ध चांगदेवपासष्टी. मुक्ताबाईंच्या हसण्यामुळे निर्माण झालेली. वयाने सगळ्यात लहान असली तरी ज्ञानेश्वरांच्या सगळ्या संत मांदियाळीमध्ये ती सर्वांची लाडकी. देव आपल्याशी बोलतो याचा अहंकार नामदेवांना झाला होता. मग तो अहंकार घालवण्यासाठी गुरूची आवश्यकता होती. मग मुक्ताबाईंनीच युक्ती केली. सगळे संत जमलेले असतांना मुक्ताई गोरोबा कुंभारांना म्हणाली – आम्हा सगळ्या मडक्यांची परीक्षा घ्या. गोरोबांनी मडकं भाजलं आहे की नाही हे पहायचं थापटण हातात घेतलं आणि एकेका संतांच्या डोक्यावर आपटून हे मडकं पक्क असं सांगितल. नामदेवांच्या डोक्यावर आपटल्यावर नामदेव चिडले. माझी कोण परीक्षा घेणार असं म्हणून देवाकडे तक्रार केली. देवांनीच त्यांना विसोबा खेचरांकडे ज्ञान घेण्यासाठी पाठवलं. या सगळ्याला कारणीभूत झाली ती मुक्ताबाई.
जनाबाईंनी या चारी भावंडांच वर्णन करतांना निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात शंकर, ज्ञानेश्वर म्हणजे महाविष्णू, सोपान म्हणजे ब्रह्मदेव आणि मुक्ताबाई म्हणजे साक्षात माया-जगदंबा.
मुक्ता म्हणजे मुक्त. बंधन नसलेली. परंतु लहान अवखळ मुक्ताबाईनं आपल्या मोठ्या भावडांना मोठ होऊन आईसारखी माया दिली. तिचा जन्मही नवरात्राच्या पहिल्या दिवशीचा.
ज्ञानदा प्रशाला – मिलिंद सबनीस