खाफीखानाच्या नजरेतून संताजी घोरपडे –
संताजी घोरपडे म्हणजे विजयश्री, संताजी म्हणजे दरारा, संताजी म्हणजे मुघलांना पडलेलं असं कोडं ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. औरंगजेब फार मोठं सैन्य, अनुभवी सेनापती आणि शाहजादे यांना घेऊन ‘दख्खन जिंकायला’ आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण पण अकस्मात झालेल्या हत्येनंतर, मराठ्यांना जे काही आशेचे थोडे किरण दिसत होते त्यातला सर्वात प्रखर किरण म्हणजे संताजी होते. छत्रपतींची हत्या केल्यानंतर आता मराठे सहज गुढघे टेकतील असा अतिआत्मविश्वास औरंगजेबाला होता. पण संताजींनी औरंगजेबाच्याच नाही तर त्याच्या मोठ्या मोठ्या सेनापतींच्या तोंडचं पाणी पळवलं. खाफीखानाच्या नजरेतून संताजी घोरपडे.औरंगजेबाच्या छावणीत असलेला त्याचा एक इतिहासकार खाफीखान संताजी घोरपडेंबद्दल म्हणतो
‘मराठे सरदारांत प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते. त्यांच्यापाशी पंधरा-वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या. इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करीत. या दोघा सरदारांच्यामुळे बादशाही (म्हणजे औरंगजेबाच्या) सेनापतींवर कमालीचे आघात झाले. यात तो संताजी प्रमुख होता.’
‘समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींच्या वर तुटून पडणे, यात त्याची खूपच प्रसिद्धी झाली. ज्याला ज्याला म्हणून संताजींशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील तीनपैकी एक परिणाम ठेरविलेला असे, एकतर तो मारला जाई, किंवा जखमी होऊन कैदेत (संताजींच्या) सापडे; किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत. आपण जीवानिशी निसटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्यास वाटे. याचा उपाय कुणालाच सुचेना. युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून तो जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरवून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की, नारव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्ध्यांची हृदये कंपायमान होत’.
चक्क औरंगजेबाच्या पदरी असलेल्या खाफीखानाने हे संताजींबद्दल लिहिलेलं आहे. ‘गनिमी काव्याचा’ प्रभावीपणे वापर करून संताजींनी, शत्रूवर फक्तच विजय मिळवला नाही तर त्यांच्या मनात भीतीही उत्पन्न केली. पण अखेर शत्रूवर विजय मिळवणाऱ्या या महावीराचा शेवट आपल्या सेनेशिवाय, एकांतात झाला. संताजींनी तयार केलेली ही ‘काहीही झालं तरी विजयश्री खेचून आणण्याची जादू’ इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
सुयोग शेंबेकर
संदर्भ:
१. खाफीखान