संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिर, सटाणा.
काही काही गावांची नशीब थोर असतात. ज्ञानोबारायांमुळे आळंदीला महत्त्व प्राप्त झाले. तुकोबारायांमुळे देहुला महत्त्व प्राप्त झाले, तसेच सटाणा गावाला महत्त्व प्राप्त झाले ते संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांमुळेच.
सटाणा हे आराम नदीच्या काठावर बसलेले शहर आहे. नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणापासून ९५ किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. सटाण्याला देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे मोठे मंदिर आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी साधारणता डिसेंबर महिन्यामध्ये यशवंतराव महाराजांची यात्रा सटाणा येथे होते. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी यात्रेला येतात.
संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा जन्म ता. १३ सप्टेंबर १८१५ रोजी पुणे येथे झाला. वाचनाचा छंद, संस्कृत पठण व घरातील संस्कारामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण परोपकारी वृत्ती बनण्यास पोषक ठरली. नावाप्रमाणे त्यांनी यश व कीर्ती मिळविली. १८२९ मध्ये १४ व्या वर्षी वसुली कारकून म्हणून नाशिक जिल्ह्यातील येवला येथे सरकारी सेवा सुरू केली. १९३६ मध्ये कर्जत येथे शिरस्तेदार, १८४० मध्ये पूर्व खान्देशात कानळदा येथे महालकरीनंतर दप्तरदार म्हणून त्यांनी काम पाहिले. १८५३ पासून त्यांनी मामलेदार म्हणून चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, शहादा, शिंदखेडा, सटाणा येथे काम केले.
गोर-गरीब, दीन-दुबळे, अनाथ, पीडीत यांच्यातच महाराजांना देव दिसला. कोणीही याचक त्यांच्या दारातून रित्या हाताने परत गेला नाही. १८७०-७१ च्या बागलाण मधील भयंकर दुष्काळात देवमामलेदारांनी गोरगरिब, दुष्काळ पीडीतांसाठी सरकारी खजिन्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये वाटुन दिले. नारायणाच्या कृपेने खजिना पुर्ववत भरला. हा दैवी चमत्कार होता. खुद्द तपास अधिकारी जो इंग्रज होता तो देखील या चमत्काराने चक्रावुन गेला. श्री. यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचा २७ डिसेंबर १८८७ रोजी नाशिक येथे निधन झाले. नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले.
सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी १९०० मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी हा यात्रोत्सव होतो. १५ दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो. ही यात्रा मार्गशिर्ष महिन्याच्या सफला एकादशी पासून सुरु होते. यात्रेची सुरुवात महाराजांच्या रथाच्या मिरवणुकीने होते. यात्रोत्सवाच्या काळात अन्नदान, किर्तन, कुस्त्यांची दंगल असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. केवळ बागलाण तालुक्यातील नव्हे तर मालेगाव, देवळा, कळवण, साक्री आणि इतर अनेक ठिकाणाहुन लोक या यात्रेत सहभागी होतात.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज