सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या :- सत्य आणि वात्सव –
छत्रपती संभाजीराजे यांनी २४ ऑगस्ट १६८० रोजी कुडाळच्या बाकरेशास्त्री यांना दानपत्र दिले. सदर दानपत्र संस्कृत भाषेत असून सदर दानपत्रात स्वराज्यातील तत्कालीन परिस्थितीची नोंद दिसून येते. सदर दानपत्रात छत्रपती संभाजीराजे महाराणी सोयराबाई यांचा उल्लेख स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या असा केला असल्याच्या एक लोकप्रवाद आहे. त्याची सत्यता तपासण्यासाठी सदर लेखन प्रपंच इतिहास संशोधक डॉ. कमल गोखले यांनी त्यांच्या शिवपुत्र संभाजी या संदर्भ ग्रंथात सदर दानपत्राचे भाषांतर करताना स्फटिकाप्रमाणे निर्मळ ही उपमा महाराणी सोयराबाई यांना उद्देशून असल्याचे लिहिले. परंतु इतिहास संशोधक केदार फाळके व सदाशिव शिवदे यांनी स्फटिकाप्रमाणे निर्मळ ही उपमा संभाजी महाराजांनी स्वतःसाठी उद्देशून लिहिल्याचे वर्णन त्यांच्या संदर्भ ग्रंथात केलेले आहे.सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या :- सत्य आणि वात्सव.
शिवपुत्र संभाजी : – डॉ. कमल गोखले , प्रकाशन वर्ष :-१९७१
दुष्ट मंत्र्यांच्या “ जेष्ठ पुत्राला राज्यदान करू नये “ या दुष्ट सल्यामुळे जिचे हृदय कलुषित झाले आहे, वस्तुतः निळ्या पिवळ्या पार्श्वभूमीत असलेल्या स्फटीकामध्या प्रमाणे जिचे हृदय स्वच्छ , सौजन्ययुक्त आहे, अशा राणीविषयी ( सोयराबाई ) पक्षपातामुळे शिवराजाचे मत आपल्या विरुद्ध असल्याचे समजून सुधा केवळ तेवढ्याच कारणाने पितृभक्तीत अंतर पडू न देणारे , कर्तव्यपालनात दाशरथी रामाचा विक्रम गाजविणारे , पायाशी असलेली दिडकोट संपत्ती , अनेक किल्ले आणि राजपद यांना तृणाप्रमाणे तुच्छ मानून त्याग करणारे , बरोबर थोडे घोडेस्वार घेतले होते.
छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती :- केदार फाळके , प्रकाशन वर्ष :-२०२०
शिवाजीराजाला प्रबळ अशा दुष्ट मंत्र्यांनी जेष्ठ पुत्राला राज्य न देण्याचा बदसल्ला दिलेला जाणूनही निळ्या, पिवळ्या रंगाच्या फुलांच्या सहवासाने स्फटिक जरी त्या त्या रंगाचे भासले तरी मुळचे ते निर्मळ असते त्याप्रमाणे त्याचे ( संभाजीचे ) अंत:करण निर्मळ होते. सौजन्यमूर्ती असलेल्या, पण “ सवतीचे पोर “ म्हणून रागावलेल्या राणीवरील प्रेमाने , शिवाजीराजांनी वडील म्हणून दिलेली आज्ञा , केवळ त्यांचा मानस जाणून पितृभक्तीला पारखे होऊ नये व पुत्र धर्माचेही पालन व्हावे म्हणून ज्याने मानली व दशरथपुत्र रामाप्रमाणे पित्राज्ञेचे पालन केले. पायाशी आलेले दीड कोटींचे धन , राज्य , अनेक किल्ले हे सर्व सोडून देवून केवळ थोडेसे घोडेस्वार बरोबर घेऊन जो राहिला.
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे :- सदाशिव शिवदे , प्रकाशन वर्ष :-२०१५
प्रबल दुष्ट मंत्र्यांच्या सांगण्यावरून जेष्ठ पुत्राला राज्य न देण्याचा दुष्ट सल्ला मानला गेल्यामुळे ज्याला नानाविध उपसर्ग झाले आहेत. स्फटिकमण्याप्रमाणे ज्याचे हृदय आहे, सौजन्याची मूर्ती, सापत्नभावाने झपाटलेल्या राण्यांच्या क्रोधाला अनुसरून पित्याच्या कर्तव्याला न जागणाऱ्या छत्रपती शिवराजांचा विचार कळल्यामुळे पितृभक्तिपासून दूर गेलेले, धर्मपरंपरेने चालणाऱ्या दशरथी रामाप्रमाणे पराक्रमी , धार्मिक विधीसंबंधीच्या निष्ठेमुळे ज्याने अपादमस्तक साधेपणा स्वीकारला आहे , सहजगत्या दीड कोटी नाणी खर्च करून बांधलेल्या अनेक किल्यांमुळे अवघड वाटणारा राज्यभार ज्याने आपादमस्तक साधेपणा स्वीकारला आहे, घोड्यांची छोटी पागा उभारली आहे.
इतिहास संशोधक केदार फाळके व सदाशिव शिवदे यांनी दिलेल्या सदर दानपत्राच्या भाषांतराच्या आधारे इतिहास संशोधक कमल गोखले यांचे भाषांतर चुकल्याचे दिसून येते.
संदर्भ :- शिवपुत्र संभाजी : – डॉ. कमल गोखले
छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती :- केदार फाळके
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे :- सदाशिव शिवदे
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई