गोव्यात पोर्तुगीजांनी हट्टाने पाडलेले मंदिर छत्रपती शिवरायांनी हट्टाने पुन्हा बांधले –
सप्तकोटीश्वर मंदिर.
गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिनाच. वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या गोव्याने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. तेथील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. गोवा म्हणजे फक्त नयनरम्य समुद्रकिनारे एवढेच नसून येथील ठिकाणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. अशा ठिकाणांपैकी एक आहे सान्तइंस्तेव्हामचा किल्ला जिथे संभाजीराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातले होते आणि पोर्तुगीजांना सळो कि पळो करून सोडले होते.(सप्तकोटीश्वर मंदिर)
छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीमुळे गोव्याचा व्हॉईसरॉयने घाबरून ख्रिश्चन धर्मियांचा संत झेवीयर याचे चर्च मधील पुरलेले शव उकरून काढून त्याच्या छातीवर डोकं बदडून आपल्या जीवाची भीक मागत होता. आणि दुसरे म्हणजे गोव्यातील नार्वे गावामधील सप्तकोटेश्वर मंदिर. रमणीय आणि शांत परिसर, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे जुने मंदिर. एवढीच याची विशेषतः नाहीतर आपल्या शिवाजीराजांनी बांधलेले हे मंदिर हि त्याची खरी ओळख आहे.
व्यापारासाठी आलेले पोर्तुगीज हळूहळू त्यांचे उद्दिष्ट साध्य करू पाहत होते, खरंतर व्यापार हे एक निमित्त किंवा माध्यम म्हणा हवं तर पण त्यातून पुढे इथल्या स्थानिकांवर त्यांचा धर्म लादण्याचा जुलमी प्रयत्न केला गेला, वाचावेसे वाटणार नाही एवढया भयानक शिक्षा या पोर्तुगीजांनी इथल्या नागरिकांना केल्या होत्या.
धर्मप्रसारासाठी अंध झालेल्या जुलमी सत्ताधीशांना इथली जनता केव्हाच त्रस्त झालेली होती. बळजबरीने त्यांना ख्रिश्चन करणे, हिंदूंच्या सणउत्सवांवर बंधन घालणे, त्यांना बाटवणे, स्त्रियांवर अत्याचार, मंदिरे पाडून त्याजागी चर्च उभारणी या सगळ्या प्रकारात जनता होरपळून निघाली होती.
सप्तकोटेश्वर मंदिरचा इतिहास :
पोर्तुगीजांची पांढरी पावले गोव्याच्या भूमीला लागली अन गोव्याचा विनाश चालू झाला. धर्मवेडे पोर्तुगीजांनी निष्पाप हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. छळ करून धर्मांतरे घडवली. कदंब राजांनी मोठया हौसेने बांधलेले सप्तकोटीश्वराचे प्राचीन मंदिर होते. ख्रिश्चन आक्रमकांनी ते मंदिर हट्टाने पाडले गाव बाटवले अन शंकराची पिंड एका विहिरीवर अशी ठेवली की विहिरीचे पाणी काढणाऱ्या बाटग्यां स्त्रिया त्या पिंडीवर पाय ठेवून पाणी शेंदतील.
गोमंतक अर्थात गोवा हे एकेकाळी संपन्न अश्या कदंब राजवटीचा एक भाग होता. “श्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद” अशी बिरुदावली दिमाखात मिरवणाऱ्या १२ व्या शतकातील कदंबांचे हे तीर्थक्षेत्र. १२व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी साठी हे मंदिर बांधले अशी नोंद आहे. १३५२ मध्ये बहामनी राजवट येऊन कदंबाचे हे राज्य जिंकल्यावर अनेक मंदिरांसोबत हे देखील उद्ध्वस्त झाले होते.
१३६७ ला विजयनगरच्या राजाने हे राज्य जिंकल्यावर याचे पुनर्निर्माण केले. १५६० मध्ये पोर्तुगिजानी हल्ला करून उद्धवस्त केले आणि त्या जागी आपले चॅपल बनवले. हिंदू लोकांनी कसे तरी करून शिवलिंग वाचवले आणि त्यानंतर १६६८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला ते आजतागायत व्यवस्थित उभे आहे याचा इतिहास असा कि ,
गोव्याचा विजरई ( व्हॉईसरॉय ) कोंदी द सांव्हिसेंन्त मृत्यू पावल्यावर राजांनी दुसऱ्यांदा गोव्यावर हल्ला करून पुन्हा गोवा घेण्याचा बेत केला होता त्या वेळेला राजांचा मुक्काम नार्वे गावी होता. त्या वेळेला राजे मोहिमेच्या गडबडीत आपले शिंवलिंग विसरले होते. मोरोपंतांनी चौकशी केल्यावर जवळच एक भग्न अवस्थेत शिवालय आहे असे कळले. तेथील शिवलिंग पाहून त्यांना फार आनंद झाला पण देवालयावर छप्पर नव्हते. तेथील पुजार्याला विचारल्यावर मुसलमानी आणि पोर्तुगीज आक्रमणात हे कसे उध्वस्त झाले याची कथा राजांना कळली आणि त्यांचे मन विषण्ण झाले. ” माझा देव इथे भिजतो आहे आणि आम्ही हे पाहतो आहे” असे म्हणून त्यांनी मोरोपंतांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा सोडली.
श्री सप्तकोटेश्वर मंदिर आणि शिवाजी महराजांचा गुप्त हेतू –
सांस्कृतिक आणि धार्मिक संचिताचे एक महत्वपूर्ण प्रतिक बनलेले हे मंदिर अनेक ऐतिहासिक घडामोडीचे साक्षीदार म्हणून उभे आहे. इ.स. १६६४ साली शिवाजी महाराजांनी भतग्राम महाल जिंकून घेतला होता. त्यावेळी अर्थातच नार्वे गाव जेथे सप्तकोटेश्वराचे मंदिर होते ते गाव शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होते. साहजिकच महाराजांचे लक्ष गोमंतक जिंकून पोर्तुगीजांचे गोव्यातून उच्चाटन करण्याकडे होते. पण त्याकाळी पोर्तुगीज आरमाराशी उघड टक्कर देऊन आपला हेतू साध्य करणे सोपे नव्हते याची जाणीव महाराजांना होती. यासाठीच त्यांनी राजकारण किंवा राजकीय कारस्थान रचताना आपदा गुप्त हेतू साध्य करण्याच्या दिशेने जाणे आवश्यक होते.
पोर्तुगीजांचे गोमंतकातील सत्तेचे मुख्य केंद्र जे जुने गोवे शहर ते श्री सप्तकोटेश्वर देवस्थानपासून दावजेच्या मार्गे एका तिसाप क्षाही कमी अंतरावर असल्याने तेथे राहून सर्व तयारी केली व त्या केंद्रावर अचानकपणे छापा घातला तर आपला इष्ट हेतू साध्य होणे शक्य होईल. असे मनात धरून व पोर्तुगीजांस आपल्या हेतूचा किंवा हालचालींचा काहीच संशय येऊ नये म्हणून श्री सप्तकोटेश्वर मंदिर बांधण्याच्या हेतूने महाराज काही निवडक लोकांनिशी नार्वे येथे मुक्काम करून राहिले. त्या बांधकामासाठी सामान जमविण्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक लहान लहान तुकडय़ा गोवे (आताचे जुने गोवे) शहरात शिरविल्या. या प्रकारे हि संख्या वाढवित नेऊन एका रात्रीत अचानकपणे हल्ला करावा असा त्यांचा गुप्त हेतू होता. पण याच सुगावा ’जुवांव नुसिस हे कुंज कोन्ही हे सां व्हिसेत’ या पोर्तुगीज व्हाइसरायला लागल्यामुळे त्याने हे कारस्थान आपल्याला कळल्याचे शिवाजी महाराजांच्या वकिलांना बोलावून आणून सांगितले. तसेच मराठी लोकांस गोवे शहरातून हाकलून लावले. हि गोष्ट नोव्हेंबर १६६८ मध्ये घडली. शिवाजी महाराजांचे ते कारस्थान यशस्वी झाले असते तर गोवा म्हणजे तिसवाडी, सासष्टी आणि बार्देश हे मुलूख तीनशे वर्षांपूर्वीच मुक्त झाले असता. आणि या ऐतिहासिक घडामोडीत श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या नावावर महत्वपूर्ण घटनेची नोंद झाली असती. याच महिन्याच्या १३ तारखेला श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी दिले. आणि सदर मंदिराचा जिर्णोद्धार होऊन मंदिर बांधकामास प्रारंभही झाला होता.
छत्रपतींच्या पराक्रमाची धर्मनिष्ठतेची साक्ष देणारे सप्तकोटीश्वर मंदिर आजही त्या शिलालेखासहित गोव्यात दिमाखात उभे आहे.
सगळ्यांना एक कळकळीची विनंती : गोव्यात कधी जाण्याचा योग आला तर सप्तकोटीश्वराला जरूर जा.
इतिहास वेड
रोहित पेरे पाटील