लोभस बाळं व सप्तमातृका –
वेरूळ (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मधील कैलास लेणं वगळलं तर इतर लेण्याकडं पर्यटकांचे पाउल वळत नाही. “रावण की खाई” नावाने ओळखले जाणार्या १४ व्या क्रमांकाच्या लेण्यातील या सप्त मातृका. बसलेल्या सात स्त्रीया आणि त्यांच्या भोवती बागडणारी मुलं असा हा सुंदर लोभस लोभस बाळं व सप्तमातृका शिल्पपट आहे. मुल आईच्या पायाशी घोटाळत असून मांडीवर घेण्याचं आर्जव करत आहे, कुठे मांडीवर बसून स्तनांना तोंडात घेवू पहात आहै, कुठे मांडीवर उभं राहून आईच्या कानातल्यां आभुषणाशी खेळत आहे, या सातही मातृका अलंकाराने नटलेल्या आहेत.
पुत्रवल्लभेचं एक अतीव समाधान या मूर्तींच्या चेहर्यावर आहे. स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणतात हे तंतोतंत सिद्ध करणारं हे शिल्प. ही बाळं नग्न आहेत. यातूनही परत एक निर्व्याजता दाखवली आहे. बोरकरांच्या पाणी कवितेत एक ओळ अशी आलेली आहे
खोल काळ्या बावडीचे
पारदर्शी मग्न पाणी
कोकरूसे नाचणारे
खेळणारे नग्न पाणी
तशी ही बाळं आई भोवती नागव्याने बागडत आहेत. देवदेवतांची शिल्पं पाहताना त्यातील स्वाभावीक मानवी भाव भावनांचे जे दर्शन होते त्याकडे आपले दूर्लक्ष होते. सप्तमातृका खुप ठिकाणी कोरलेल्या आढळून येतात. पण अशी लोभसता कुठे नाही. या शिल्पाचा कुणी फारसा उल्लेख करत नाही याची खंत वाटते. “वेरूळ लेणी” याच नावाने मधुसूदन नरहर देशपांडे यांचे सुंदर पुस्तक अपरांत प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे. त्यात यावर लिहिले आहे. वेरूळ लेणी पाहायला येणार्यांनी या पुस्तकाचा वापर जरूर करावा.
Travel Baba Voyage मित्रा तूझे छायाचित्रासाठी आभार. आम्हा भारतीयांना आमच्या संस्कृतीची ओळख करून देणार्या तूझ्या सुसंस्कारीत फ्रेंच मानसिकतेला लाख लाख प्रणाम.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद