सप्तशृंगी गड
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका.सप्तशृंगी गड.
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेलं वातावरण भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सप्तशृंग गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंण्डेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजुबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे ही आकर्षण होय. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंग गडावर येता येते.
नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरूवात करतात. सप्तश्रृंग गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहेत. येथून ५०० पाय-या चढून वर गेल्यावर डोंगराच्या कपारीत ८ फूट उंचीची शेंदूरचर्चित रक्तवर्णीय अशी महाकाय स्वयंभू सप्तश्रृंग मातेचे दर्शन घडते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
सप्तशृंग गडाच्या दक्षिणेस शिवालय नावाचे एक पुण्यकारक तीर्थ आहे. हेच ते गिरीजा तिर्थ व शिवतीर्थ होय. पूर्वी त्याचे बांधकाम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज