सप्तस्वरमयशिव –
आधुनिकतेच्या शिखरावर असलेली मुंबई तेवढीच प्राचीन सुद्धा आहे. याच मुंबईच हृदय समजला जाणाऱ्या परिसरात म्हणजेच परळ गावात एक प्राचीन शिवमूर्ती आहे. परळ गावातील चण्डिकादेवी किंवा बारदेवीच्या मंदिराच्या शेजारीच ही मूर्ती आहे. १९३१ मध्ये रस्त्याचे बांधकाम चालू असताना सापडलेली ही मूर्ती स्थानिकांच्या हट्टामुळे (अर्थात चांगलंच आहे) आजही इथेच आहे. पुरातत्व विभागाच्या माहिती प्रमाणे सप्तस्वरमयशिव मूर्ती गुप्त कालीन म्हणजेच इसवी सना9च्या पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावी.
जवळपास १३७ इंच उंचीची ही मूर्ती ७७ इंच रुंदीच्या भागावर उठावशीर कोरलेली आहे. मध्यभागी मुख्य प्रतिमा, तिच्या डोक्यावर एकावर एक अश्या दोन मूर्ती तर मुख्य मूर्तीच्या खांद्यातून दोन मूर्ती, आणि त्या वरील मूर्तीच्या खांद्यावरून दोन मूर्ती त्रिभंगावस्थेत अश्या एकूण सात मूर्ती नजरेला पडतात. मुख्य मूर्तीच्या पायाजवळ एकूण पाच वादक बसलेले आहेत.
सात पैकी सहा मूर्ती ह्या द्विभुज असून, या मूर्तीच्या डाव्या हातात एक हातात कमंडलू आणि दुसरा हात मुद्रा अवस्थेत आहेत. मध्यभागी सर्वात वरची मूर्ती मात्र दहा हातांची आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात हातात कमंडलू, चक्र, खेटक, तलवार, आणि एक हात मुद्रा अवस्थेत आहे, तर डाव्या बाजूला एक हात अभिषेक मुद्रेत असून इतर हातात धनुष्य, दोन भरीव चक्र आणि एका हातात कमंडलू आहे.
एकाही मूर्तीवर मुकुट नसला तरी केसांची जटामुकुट सारखी अतिशय सुंदर आणि वेगळी रचना, डोक्यावर चंद्रकोर, गळ्यात हार, नक्षीदार कटीवस्त्र,कानातील कुंडल, हातात कडे, यांनी युक्त ह्या मूर्ती अतिशय सुंदर दिसतात.
काही अभ्यासकांच्या मते मधल्या तीन मूर्ती म्हणजे तमोगुणी शिव, सत्वगुणी विष्णू, आणि राजस ब्रह्मा असावा, तर इतर चार मूर्ती ह्या सद्योजात, वामदेव, अघोर, आणि तात्पुरुष असावेत. तर काहींच्या मते मधल्या मूर्ती ह्या पाश, पशु आणि पती असावे तर इतर प्रतिमा या विद्या, क्रिया, योग आणि चर्या हे शिवसिद्धांताचे लक्षण असावेत.
सी शिवरामन या मूर्तीला शिवाची सप्तस्वरमय मूर्ती असे म्हणलेले आहे, मात्र मुख्य प्रतिमेपैकी कोणाकडेही कोणतेही वाद्य नसल्याने हा विचार विवादित आहे. तर पायाजवळ बसलेले वादक हेच शिवाच्या सप्तस्वरमय रुपाकडे संकेत करीत आहेत, त्यामुळं सुरांशी मेळ घातला जाऊ शकतो असेही काहींचे म्हणणे आहे.
महेश तानाजी देसाई